हॉर्मोने : (संप्रेरके). जीवांची वाढ, चयापचय आणि इतर क्रिया यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या नैसर्गिक कार्बनी पदार्थांना हॉर्मोने म्हणतात. हॉर्मोन हा शब्द ‘उद्दीपित करणे’ किंवा ‘गतिमान करणे’ या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून बनलेला आहे. शरीरक्रियाविज्ञ सर विल्यम मॅडॉक बेलिस आणि अर्नेस्ट हेन्री स्टार्लिंग यांनी १९०४ मध्ये हॉर्मोन हा प्रथम वापरलेला शब्द इंग्रजी भाषेत लवकरच रूढ झाला. 

शरीराच्या विशिष्ट भागात तयार होणाऱ्या व अतिसूक्ष्म प्रमाणात रक्तप्रवाहात मिसळून इतर भागांवर परिणाम करणाऱ्या पदार्थांनाच सुरुवातीस ‘हॉर्मोने’ म्हणून संबोधीत. आज कोणताही असा नैसर्गिक पदार्थ जो रक्तांतर्गत नसूनही शरीरभागावर परिणाम करू शकत असल्यास हॉर्मोन या संज्ञेस पात्र ठरला आहे. न्यूरोहॉर्मोने (तंत्रिका तंत्राच्या – मज्जासंस्थांच्या – कोशिकांत तयार होणारी हॉर्मोने), फेरोमोने [काही प्राण्यांमध्ये लैंगिक आकर्षण उत्पन्न करणारे पदार्थ → फेरोमोने], पॅराहॉर्मोने (अंतःस्रावी ग्रंथीत तयार न होणारे, परंतु शरीरात इतरत्र संश्लेषणाने तयार होणारे पदार्थ) या सर्वांचा समावेश हॉर्मोन या संज्ञेत होतो. या सर्वांना रासायनिक संदेशक किंवा संप्रेरक वा प्रवर्तक असेही संबोधतात. कारण हे पदार्थ जिवंत शरीरातील निरनिराळ्या रासायनिक प्रक्रियांचे नियंत्रण तसेच सहनिर्देशनाचे कार्य करतात. अशा पदार्थांचे विवेचन अनेकदा स्थानिक हॉर्मोने, परास्रावी कार्य करणारे पदार्थ, स्वयंस्रावी किंवा स्वयंभावी (स्वयंसिद्ध) या संज्ञा वापरून केले गेले आहे. 

प्रस्तुत नोंदीत पृष्ठवंशी व अपृष्ठवंशी प्राण्यांतील हॉर्मोनांसंबंधीचे वर्णन केलेले आहे. मराठी विश्वकोशात वनस्पतींतील हॉर्मोनांसंबंधीचे वर्णन ‘वृद्धिनियंत्रक, वनस्पतींतील’ आणि ‘हॉर्मोने, वनस्पतींतील’ अशा स्वतंत्र नोंदींत दिलेले आहे तसेच महत्त्वपूर्ण हॉर्मोनांवर स्वतंत्र नोंदी आहेत (उदा., पौरुषजन प्रगर्भरक्षी स्त्रीमदजन इत्यादी ). 

पृष्ठवंशी प्राण्यातील हॉर्मोने : इतिहास : माणूस आणि माणसाळलेले प्राणी यांच्या (वृषण किंवा लैंगिक अवयव यांच्या) खच्चीकरणामुळे सबंध शरीरावर होणारे परिणाम बायबलच्या मध्ययुगीन काळात माहीत होते. लाकडी कोरीव कामाच्या चित्रात दाखविलेला कोंबड्यांवरील खच्चीकरणाचा परिणाम कोनराट फोन गेस्नर यांच्या Historia animaliumया ग्रंथात स्पष्टपणे दिसतो. हॉर्मोनांच्या अभ्यासास १८४९ मध्ये सुरुवात झाली. त्या सुमारास खच्ची केलेल्या कोंबड्यांवर वृषण-प्रतिरोपणाच्या परिणामांसंबंधीचा वृत्तांत जर्मन शरीरक्रियाविज्ञ आर्नोल्ड एडाल्फ बर्थहोल्ड यांनी प्रसिद्ध केला. अशा कोंबड्यांतील तुरा, गलुली इ. अपकर्षित बाह्य लक्षणे वृषणाच्या पुनःस्थापनांमुळे पुन्हा पहिल्या- सारखी होतात. यावरून वृषणामध्ये कोणता तरी पदार्थ तयार होत असावा की, ज्यामुळे हा बदल घडवून आणला जातो. तसेच हा पदार्थ रक्तप्रवाहात मिसळून या शरीरभागावर परिणाम करीत असावा, ही कल्पना आली. या पदार्थाविषयी बरेच संशोधन केले गेले; परंतु १९२७ पर्यंत विशेष प्रगती झाली नाही. त्यावर्षी एफ्. सी. काक आणि एल्. सी. मॅक्गी या शास्त्रज्ञांनी बैलाच्या वृषणापासून अल्कोहॉल व ईथर यांमध्ये विरघळणारा अर्क तयार केला. या अर्काची खच्ची केलेल्या कोंबड्यांना अंतःक्षेपणे दिली असता सर्व पौरुषीय बाह्य लक्षणे पूर्ववत होतात, असे त्यांनी दाखविले. या प्रयोगानंतर अनेक प्रयोगशाळांतून या पदार्थाच्या रासायनिक संरचनेविषयी संशोधन सुरू झाले. १९३५ च्या सुमारास अँड्रोस्टेरोन आणि टेस्टोस्टेरोन या दोन महत्त्वाच्या पौरुषीय हॉर्मोनांच्या रासायनिक संरचनेची संपूर्ण माहिती आडोल्फ फीड्रिख योहान बूटेनांट या शास्त्रज्ञांनी मिळविली. १९०१ मध्ये जोकिचि टाकामाइन या अमेरिकन-जपानी शास्त्रज्ञांनी मानवातील एपिनेफ्रिन हे हॉर्मोन स्फटिकीय स्वरूपात प्रथम तयार केले. १९०४ मध्ये बेलिस व स्टार्लिंग यांनी ग्रहणी च्या (जठरानंतरचा लहान आतड्याचा नालेच्या आकाराच्या सुरुवातीच्या भागाच्या) श्लेष्मकलेपासून एक अर्क तयार केला. हा अर्क अंतःक्षेपणाने रक्तप्रवाहाद्वारे शरीरात पसरविताच अग्निपिंडात (पोटाच्या मागील भित्तीवर ग्रहणी व प्लीहा यांच्या दरम्यान असलेल्या द्राक्षघडासारख्या ग्रंथीत) बाह्यस्राव वाढल्याचे त्यांना आढळले, म्हणून त्यांनी या अर्कातील उद्दीपक पदार्थाला ‘सिक्रिटीन’ हे नाव दिले. जठरात अर्धवट झालेली पचनक्रिया पुढे चालू राहण्याकरिता अन्न ग्रहणीत येताच अग्निपिंडरस त्यामध्ये भरपूर प्रमाणात मिसळविण्याच्या उद्देशाने अग्निपिंडाला तसा संदेश पोहोचवून उद्दीपित करण्याचे कार्य सिक्रिटीन करते. याच पदार्थाला त्यांनी ‘हॉर्मोन’ ही संज्ञा प्रथम वापरली. शरीरातील निरनिराळ्या भागांतील रासायनिक प्रक्रियांच्या अभ्यासास या प्रयोगामुळे अधिक चालना मिळाली. 

रासायनिक प्रक्रिया व रासायनिक सहनिर्देशन ही सजीवांची महत्त्वाची अंगे ठरल्यानंतर ही कार्ये नियमित व वेळेवर व्हावीत, म्हणून संदेशक असणे अत्यंत आवश्यक ठरते. हे रासायनिक संदेशक एकाच कोशिकेच्या भित्तीच्या आत मर्यादित असतील किंवा सजीवाच्या एका भागाकडून दुसऱ्याकडे जाणारे असतील किंवा तंत्रिका कोशिकेच्या अभिवाही प्रवर्धापासून नजीकच्या कोशिकेकडे जाणारेही असतील. तंत्रिका कोशिकेतील अंतर्गत संदेशवहन मुख्यतः विद्युत् प्रवाहीय असते. 

हॉर्मोनांच्या मूळ व्याख्येतील ‘नैसर्गिक’ हा शब्दही पुढे गाळून टाकावा लागला. कारण रसायनशास्त्रज्ञांनी हे पदार्थ संश्लेषणाने (कृत्रिम रीतीने) बनविले. एवढेच नव्हे तर रासायनिक संरचना निराळी असूनही नैसर्गिक हॉर्मोनांप्रमाणे कार्यशील असणारे पदार्थही बनविले. उदा., स्टिल्बेस्ट्रॉल( डाय-एथिल स्टिल्बेस्ट्रॉल याही नावाने ओळखली जाणारी वसंश्लेषणाने बनविता येणारी पांढऱ्या रंगाची स्फटिकीय भुकटी जिची क्रियाशीलता नैसर्गिक स्त्रीमदजनासारखीच असते ). जीवनावश्यक अशा जैविक उत्प्रेरकांची (रासायनिक विक्रियांची गती वाढविणाऱ्या पदार्थांची) (१) जीवनसत्त्वे, (२) एंझाइमे आणि (३) हॉर्मोने अशा तीन गटांत विभागणी करतात. हॉर्मोने व एंझाइमे बहुधा शरीरात तयार होतात परंतु बहुतेक जीवनसत्त्वे अन्नातून घ्यावी लागतात. एंझाइमे व जीवनसत्त्वे रासायनिक प्रक्रियांमध्ये प्रत्यक्ष भाग घेतात, तर हॉर्मोने अप्रत्यक्ष रीत्या कार्य करतात. हॉर्मोने नक्की कशी कार्यान्वित होतात, हे अजूनही समजलेले नाही. ती जीनांच्या (जनुकांच्या) डीएनएवर (डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्लावर) प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम करीत असावीत किंवा कोशिकेच्या पारगम्यतेवर परिणाम करीत असावीत. हॉर्मोने कशी कार्यान्वित होतात याविषयी तीन सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत.

(१) हॉर्मोने कोशिकापटलांची पारगम्यता नियंत्रित करतात.कोशिकापटल दोन प्रकारची असतात. सबंध कोशिकेभोवतालची भित्ती आणि तिचे विभाजन करणाऱ्या आतील भित्ती म्हणजेच एका कोशिकेत निरनिराळे कप्पे असतात व या कप्प्यांतून एंझाइमे, आयन चयापचयोत्पादके यांचा विशिष्ट गट असतो. हे गट योग्य राहणे भित्तींच्या पारगम्यतेवर अवलंबून असते. इन्शुलीन हे हॉर्मोन स्नायू व कोशिकांच्या भित्तीवर असा परिणाम करते की, त्यामुळे ग्लुकोज, ॲमिनो अम्ले व विद्युत्विच्छेद्य पदार्थ कोशिकेत सहज शिरतात. 

(२) हॉर्मोने कोशिकेमधील एंझाइमांचे स्वरूप बदलत असावीत. यकृत व स्नायू यांमध्ये ग्लायकोजेनाचे ग्लुकोजामध्ये रूपांतर करण्याच्या क्रियेमध्ये एपिनेफ्रिन हे हॉर्मोन अशा प्रकारचे कार्य करते. (प्रयोगशाळेतील प्रयोगात हॉर्मोने एंझाइमांवर परिणाम करीत असल्याचे आढळले आहे.) 

(३) काही हॉर्मोने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीत्या जीन क्रियांवर परिणाम करीत असावीत. एकडायसोन नावाचे हॉर्मोन कीटकांच्या रूपांतरणाकरिता आवश्यक असते. हे हॉर्मोन विशिष्ट गुणसूत्रावर परिणाम करीत असल्याचे आढळून आले आहे.

 एखादे ठराविक हॉर्मोन एकापेक्षा अधिक महत्त्वाच्या निरनिराळ्या क्रिया करीत असावे. कदाचित या क्रिया एकाच कोशिकेपुरत्या मर्यादित असू शकतील किंवा निरनिराळ्या कोशिकांवर विभिन्न क्रिया करीत असण्याचीही शक्यता आहे.


 कोष्टक क्र. १. मध्ये पृष्ठवंशी प्राण्यांतील काही हॉर्मोनांची माहिती दिली आहे. कोष्टकात बाणाने दाखविलेल्या आकड्यापुढील ‘परिणाम व कार्य’ या रकान्यातील माहिती ही तेथील माहितीला पूरक अशी आहे. 

कोष्टक क्र. १. पृष्ठवंशी प्राण्यांतील काही हॉर्मोने

 

हॉर्मोने

उत्पत्तिस्थान

 

परिणाम व कार्य

१.

 

कॉर्टिकोट्रोपीन रिलिजिंग हॉर्मोन (सीआरएच)

अधोथॅलॅमस

कॉर्टिकोट्रोपिनाचे (अधिवृक्क ग्रंथीच्या बाह्यकावर क्रिया करण्याच्या) रक्तात मोचन. (→) १०

२.

लुटिनायझिंग हॉर्मोन-रिलिजिंग हॉर्मोन (एलएच- आरएच)

अधोथॅलॅमस

लुटिनायझिंग हॉर्मोनाचे मोचन, पीतपिंड (कॉर्पस लुटियम) तयार करणे. (→) ११

३.

 

फॉलिकल स्टिम्युलेटिंग रिलिजिंग हॉर्मोन

अधोथॅलॅमस

फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोनाचे मोचन. पुरुषांमध्ये वृषण वाढ व शुक्राणू उत्पादनास चेतावणी देणे. स्त्रियांमध्ये अंडाशयाची वाढ व पूरक वाढ. (→) १२

४.

थायरोट्रोपीन रिलिजिंग हॉर्मोन

अधोथॅलॅमस

थायरोट्रोपिनाचे मोचन. अवटू ग्रंथीवर नियंत्रण. (→) १३

५.

सोमॅटोट्रोपीन रिलिजिंग हॉर्मोन

अधोथॅलॅमस

सोमॅटोट्रोपिनाचे मोचन. सर्व शरीराच्या वाढीवर परिणाम करणे. (→) १४

६.

प्रोलॅक्टिन रिलिजिंग इनहिबिटिंग हॉर्मोन

अधोथॅलॅमस

प्रोलॅक्टिनाचे मोचन थोपविणे. (→) १५

७.

मेलॅनोफोर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन–इनहिबिटिंग हॉर्मोन

अधोथॅलॅमस

मेलॅनोफोर स्टिम्युलेटिंग हॉर्मोनाचे मोचन थोपविणे.( →) १६

८.

ऑक्सिटोसीन

पोष ग्रंथीचा पश्चभाग

स्तनातील दूध बाहेर पाडणे, प्रसूती, पुरुषात शुक्राणू वहन. 

९.

व्हॅसोप्रेसीन

पोष ग्रंथीचा पश्चभाग

शरीरातील जलतोल नियंत्रण प्रतिमूत्रल (मूत्राचे प्रमाणकमी करणे).

१०.

ॲड्रीनो-कॉर्टिकोट्रोपिक हॉर्मोन (एसीटीएच)

पोष ग्रंथीचा अग्रभाग

अधिवृक्क ग्रंथी बाह्यकावर नियंत्रण. ॲड्रीनोकॉर्टिकल स्टेरॉइडांचे संश्लेषण व मोचन.

११.

लुटिनायझिंग हॉर्मोन (एलएच)

पोष ग्रंथीचा अग्रभाग

स्त्रीमध्ये पीतपिंड तयार करणे. प्रगर्भरक्षक (प्रोजेस्टेरोन) व स्त्रीमदजन (इस्ट्रोजेन) यांचे स्रवण, अंडमोचन. पुरुषामध्ये वृषणातील पौरुषजनाचे (अँड्रोजेन) स्रवण. कनिष्ठ वर्गातील प्राण्यांमध्ये शुक्राणू उत्पादन.

१२.

फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (एफएसएच)

पोष ग्रंथीचा अग्रभाग

स्त्रीमध्ये अंडाशयातील पुटकांची वाढ. पुरुषांमध्ये शुक्राणू उत्पादनास मदत करीत असावे.

१३.

थायरोट्रोपीन स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (टीएसएच )

पोष ग्रंथीचा अग्रभाग

अवटू ग्रंथीस चेतविणे.

१४.

सोमॅटोट्रोपीन किंवा वृद्धी (वाढ) हॉर्मोन (एसटीएच)

पोष ग्रंथीचा अग्रभाग

प्रथिन उपचय, हाडे व स्नायूंची वाढ. कार्बोहायड्रेटे व मेद चयापचय.

१५.

प्रोलॅक्टिन (एलटीएच)

पोष ग्रंथीचा अग्रभाग

दुग्धस्रवण, काही सस्तन प्राण्यांमध्ये पीतपिंड टिकविणे व त्याच्या स्रवणावर नियंत्रण.

१६.

मेलॅनोफोर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन किंवा इंटरमेडीन (एमएसएच )

पोष ग्रंथीचा अग्रभाग

मासे, काही सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राणी यांच्या कोशिकेतील रंजकद्रव्याची वाटणी, सर्व पृष्ठवंशी प्राण्यांतील कृष्णरंजक द्रव्याचे उत्पादन (मेलॅनोजेनिसिस).

१७.

एपिनेफ्रिन किंवा ॲड्रिनॅलीन

अधिवृक्क ग्रंथीचा मध्यक

हृदयगती, रक्तदाब, डाव्या निलयातून दर मिनिटाला बाहेर पडणारे रक्त यांची वाढ. कंकाल (हाडांचा सांगाडा) स्नायू , यकृत आणि मेंदू यांच्यामधील रुधिराभिसरण वाढविणे. त्वचा फिकट बनविणे. रक्तातील शर्कराप्रमाण वाढविणे. आतड्यांची हालचाल कमी करणे.

१८.

नॉरएपिनेफ्रीन किंवा नॉरअड्रीनॅलीन

अधिवृक्क ग्रंथींचा मध्यक आणि ॲड्रिनर्जिक तंत्रिका (तंत्रिकांच्या प्रवर्धीची टोके)

वरील प्रमाणेच, परंतु सौम्य.

१९.

ग्लुकोकॉर्टिकॉइडे (कॉर्टिसोल किंवा कॉर्टिकोस्टेरोन)

अधिवृक्क ग्रंथी बाह्यक

कार्बोहायड्रेटांचे संश्लेषण. प्रथिन अपचय. कोणत्याही प्रकारच्या ताणामुळे उत्पन्न होणाऱ्या परिस्थितीस तोंड देण्याची सिद्धता (स्ट्रेस ॲडॅप्टेशन).

२०.

मिनरलोकॉर्टिकॉइडे (ॲल्डोस्टेरॉन )

अधिवृक्क ग्रंथी बाह्यक

मूत्रपिंडांना सोडियम साठविण्यास मदत व त्यामुळे पोटॅशियम उत्सर्जन वाढविणे.

२१.

अँड्रोजेने(पौरुषजने) (प्रामुख्याने टेस्टोस्टेरोन)

वृषण

पुरुषातील लैंगिक लक्षणे. प्रथिन उपचयास चेतावणी.

२२.

इस्ट्रोजेने (स्त्रीमदजने) (प्रामुख्याने इस्ट्राडिऑल)

अंडाशय

स्त्रियांतील लैंगिक लक्षणे.

२३.

प्रोजेस्टेरोन (प्रगर्भरक्षक)

अंडाशयातील पीतपिंड

गर्भावस्था टिकविणे. अंडमोचन थांबविणे.

२४.

इस्ट्रोजेने

अंडाशयातील पीतपिंड

(→) २२

२५.

रिलॅक्झीन (शिथिलीकारक)

अंडाशयातील पीतपिंड

श्रोणीचे बंध ढिले पाडणे. गर्भाशय ग्रीवा मऊ पाडून प्रसूतीस मदत करणे.

२६.

थायरॉक्झीन व ट्राय-आयोडो-थायरोनीन

अवटू ग्रंथी

नियततापी प्राण्यांमधील ऑक्सिजनाचा वापर व उष्णता उत्पादन, वाढ, जुनी पिसे किंवा कात झडून नवी येणे आणि उभयचर प्राण्यांमधील रूपांतरण.

२७.

थायरोकॅल्सिटोनीन

अवटू ग्रंथी

हाडांवर परिणाम करून रक्तरसातील कॅल्शियमाचे प्रमाण कमी करणे.

२८.

पॅराथायरॉइड हॉर्मोने (पीटीएच)

परावटू ग्रंथी

रक्तरसातील कॅल्शियम वाढविणे आणि फॉस्फेट कमी करणे.

२९.

इन्शुलीन

अग्निपिंडातील लांगरहान्स शिकापुंज

रक्तातील ग्लुकोज कमी करणे, ऊतकांना ग्लुकोज उपयोगात आणण्यास मदत करणे. मेद व प्रथिन संश्लेषणास मदत करणे.

३०.

ग्लुकागॉन

अग्निपिंडातील लांगरहान्स द्वीपके तृतीय नेत्र ग्रंथी

रक्तातील ग्लुकोज वाढविणे.

३१.

मेलॅटोनीन

वार

उभयचर प्राण्यांमधील त्वचा विवर्णित करणे.

३२.

कोरिऑनिक गोनॅडोट्रोपीन

वार

(→) ११

३३.

प्रोजेस्टेरोन

वार

(→) २३

३४.

इस्ट्रोजेने

वार

(→) २२

३५.

रिलॅक्झीन

जठरांत्र

(→) २५

३६.

गॅस्ट्रिन

जठरांत्र

श्लेष्मकलास्तर. जठररसाचे स्रवण वाढविणे.

३७.

सिक्रिटीन

जठरांत्र

श्लेष्मकलास्तर. अग्निपिंड रस व पित्त वाढविणे.

३८.

कोलेसिस्टोकिनीन (सीसीके)

जठरांत्र

श्लेष्मकलास्तर. पित्ताशयाचे आकुंचन करून ते रिकामे करणे.

३९.

पँक्रिओझायमीन (पीझेड)

जठरांत्र

श्लेष्मकलास्तर. अग्निपिंड रसातील एंझाइमांचे प्रमाण वाढविणे.

४०.

एरिथ्रोपोएटीन

मूत्रपिंड

अस्थिमज्जेस चेतावणी देऊन रक्तातील तांबड्या कोशिकांची वाढ करणे.

४१.

रेनिन अँजिओ-टेन्सिन प्रणाली

वृक्क व रक्त

ॲल्डोस्टेरोनाच्या मदतीने रक्तदाब नियंत्रित ठेवणे. ( →) २०

हॉर्मोन उत्पादक ग्रंथी शरीरात निरनिराळ्या ठिकाणी विखुरलेल्या असतात [→ अंतःस्रावी ग्रंथि]. या सर्वांमध्ये पोष ग्रंथी महत्त्वाची असून ती इतर सर्व ग्रंथींच्या कार्याशी निगडित असते. ऋतुचक्र, गर्भारपण व शारीरिक किंवा मानसिक ताण या शारीरिक क्रियांमधील गुंतागुंतीचे अनुक्रम आणि हॉर्मोने यांचा परस्परसंबंध आता माहीत होत आहे. केवळ एकदशलक्षांश ग्रॅम वजनापेक्षाही कमी वजन भरेल एवढे हॉर्मोन सबंध जीवनावर परिणाम करणाऱ्या प्रक्रियांना चेतावणी देऊ शकते. वाढीकरिता लागणारे आवश्यक पदार्थ म्हणून प्रत्यक्ष भाग न घेता वाढीकरिता लागणाऱ्या योग्य सूचना देणाऱ्या अधिकाऱ्याचे कार्य हॉर्मोने करतात. निरनिराळ्या ऊतक कार्यांवर आणि एंझाइमांद्वारे होणाऱ्या प्रक्रियांवर हॉर्मोनांचे नियंत्रण असते. शरीरक्रियांमधील विकृती व वार्धक्य यांमध्ये हॉर्मोनांचे महत्त्व स्पष्ट दिसून येते. याच कारणाकरिता वैद्यकीय चिकित्सेमध्ये त्यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. 

कोष्टक क्र. १ मधील हॉर्मोनांपैकी काही महत्त्वाच्या हॉर्मोनांविषयीची माहिती पुढे दिली आहे.


अवटू हॉर्मोन : (थायरॉक्झीन ). अवटू ग्रंथी मधील या हॉर्मोनाचे उत्पादन आणि त्याचे रक्तात मिसळणे ही कार्ये पोष ग्रंथीच्या थायरोट्रोपिक हॉर्मोनाच्या चेतावणीमुळे होतात. काही उभयचर प्राण्यांमध्ये विशेषेकरून बेडकामध्ये लांब शेपूट असलेल्या अवस्थेतून चतुष्पादीय स्थलवासी प्रौढावस्थेत होणाऱ्या रूपांतरणास अवटू हॉर्मोन मदत करते. मानवासहितसर्व वरिष्ठ पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये श्वसनीय चयापचयाची प्रखरता या हॉर्मोनामुळे वाढते व त्याकरिता शरीरातील कार्बोहायड्रेटे, वसाम्ले आणि प्रथिने यांच्या राखीव साठ्याचा उपयोग केला जातो. 

अवटू ग्रंथी प्रमाणापेक्षा जास्त कार्य करू लागल्यास आधारी चयापचयी प्रमाण वाढते आणि डोळ्यांच्या खोबणीतून बाहेर पडू पाहणारे डोळे असलेला गलगंड (नेत्रोत्सेध) होतो. प्रमाणापेक्षा हॉर्मोन कमी पडल्यास अवटुवामनता (लहान मुलांमध्ये) व प्रशोफ (प्रौढांमध्ये) उद्भवू शकतात. अनेक वेळा या विकृतींच्या मुळाशी पोष ग्रंथींच्या थायरोट्रोपिक हॉर्मोनाचे दोष असतात. उद्भवलेल्या विकृतीवर मात्र अवटू ग्रंथीवरील शस्त्रक्रिया, क्ष-किरण चिकित्सा किंवा औषधी रूपाने हे हॉर्मोन देऊनच इलाज करतात. 

अवटू ग्रंथी स्रावामध्ये आयोडिनाचे चार रेणू असतात. अन्न व पाणी यांमधून मिळणाऱ्या या मूलद्रव्याचे प्रमाण अनेक वेळा कमी पडून अवटू ग्रंथी कार्यातच बिघाड उत्पन्न होतो. अवटू ग्रंथिस्राव औषधी म्हणून चयापचय वाढविण्याकरिता किंवा वजन कमी करण्याकरिता देतात. कार्बिमॅझोल आणि प्रोपिल थायोयूरॅसिल किंवा तत्सम औषधे अवटू ग्रंथिस्रावाचे स्तंभन करतात. त्यांच्यामुळे रक्तातील या स्रावाचे प्रमाणजलद घटून तो नाहीसा होतो.

परावटू ग्रंथी स्राव : (पॅराथर्मोन ). अवटू ग्रंथीशी संलग्न असलेल्या परावटू ग्रंथीचा स्राव रक्तातील कॅल्शियम व फॉस्फरस यांचीपातळी नियंत्रित करतो. या ग्रंथी समूळ काढून टाकल्यास कॅल्शियम अल्परक्ततेमुळे आकडी (स्नायू आकुंचनाचे वारंवार झटके येणे) उत्पन्न होऊन स्रावाधिक्यामुळे हाडामध्ये विकृती उत्पन्न होते. हाडांच्या कठीण भागामध्ये लहानलहान पोकळ्या तयार होतात व पुष्कळ वेळा मूत्रपिंडात खडे तयार होतात. [→ मुतखडा]. 

ग्रहणी हॉर्मोने : अंतःस्रावी ग्रंथीशी काहीही साम्य नसणाऱ्या लहान आतड्याच्या ग्रहणी या जठरानंतरच्या सुरुवातीच्या भागातून स्रवणाऱ्या व हॉर्मोनाप्रमाणेच कार्यशील असणाऱ्या पदार्थास ‘सिक्रिटीन’ म्हणतात. जठरातील अम्लमिश्रित अन्न ग्रहणीत शिरताच श्लेष्मकलेतील विशिष्ट कोशिकांमधून दोन प्रकारचे स्राव बाहेर पडतात : (१) सिक्रिटीन आणि (२) कॉलिसिस्टोकिनीन. या दोन हॉर्मोनांमुळे अनुक्रमे अग्निपिंड व पित्ताशय यांमधून त्यातील रस अधिक प्रमाणात ग्रहणीत येऊन पचनक्रियेस मदत होते. [→ ग्रहणी]. 

इन्शुलीन व ग्लुकागॉन : अग्निपिंडातील विशिष्ट ऊतक पुंजक्यांना लांगरहान्स व्दीपके म्हणतात. या पुंजक्यांच्या कोशिकांमधून स्रवणाऱ्या स्रावास इन्शुलीन म्हणतात. हे हॉर्मोन सरळ रक्तप्रवाहात मिसळते व कार्बोहायड्रेट चयापचयावर नियंत्रण करते. रक्तातील ग्लुकोजाचे ग्लायकोजेनात रूपांतर करून ते यकृत आणि स्नायूंच्या कोशिकांत साठ-विण्यावर इन्शुलिनाचे साह्य असते. इन्शुलीनन्यूनता रक्तातील ग्लुकोजाची पातळी वाढविते. 

इन्शुलिनाच्या जोड हॉर्मोनास ग्लुकागॉन म्हणतात. तेही याच पुंजक्यात तयार होते. मात्र, ते उत्पन्न करणाऱ्या कोशिका वेगळ्या असतात. इन्शुलीन बीटा कोशिकांत व ग्लुकागॉन आल्फा कोशिकांत तयार होतात. बीटा कोशिकांपेक्षा आल्फा कोशिका अधिक टिकाऊ असतात. ग्लुकागॉनामुळे रक्तातील ग्लुकोजाचे प्रमाण वाढते. इन्शुलिनाच्या क्रियाशीलतेच्या संतुलनाचे कार्य ग्लुकागॉन करते. 

एकेकाळी भयप्रद वाटणारा व मृत्यूस कारणीभूत असणारा मधुमेह हा रोग इन्शुलिनाच्या शोधापासून संपूर्णपणे नियंत्रित करता येऊ लागला आहे. इन्शुलिनाच्या शोधाचे श्रेय नोबेल पारितोषिक विजेते सर फ्रेडरिक ग्रांट बँटिंग, ⇨ चार्ल्स हर्बर्ट बेस्टजॉन जेम्स रिकार्ड मॅकलाउड यांना मिळाले असून ग्लायकोजेन उत्पादनातील रासायनिक विक्रियांच्या शोधाबद्दल कार्ल फर्डिनांड कॉरीगर्टी थेरेसाकॉरी यांनाही नोबेल पारितोषिकाचा सन्मान मिळाला आहे. 

एपिनेफ्रीन व नॉरएपिनेफ्रीन (ॲड्रिनॅलीन व नॉर- ॲड्रिनॅलीन) : अधिवृक्क ग्रंथी दोन भागांची बनलेली असते : (१) बाह्यक व (२) मध्यक. हे भाग निरनिराळ्या भ्रूण ऊतकांपासूनतयार होतात. ज्या ऊतकांपासून अनुकंपी तंत्रिका तंत्रातील गुच्छिका तयार होतात, त्यांपासूनच मध्यक तयार होतो. त्यामुळे मध्यकाच्या स्रावातील एपिनेफ्रीन व नॉरएपिनेफ्रीन ही दोन हॉर्मोने अनुकंपी तंत्रिका तंत्राच्या चेतावणीमुळे होणारे सर्व परिणाम घडवून आणू शकतात. या तंत्रिकांपासून न्यूरोहॉर्मोन तयार होते व ते नॉरएपिनेफ्रिनाप्रमाणे कार्य करते. १९०४ मध्ये रासायनिक संरचना ज्ञात झालेल्या मध्यकाच्या या हॉर्मोनामुळे कार्य करीत असणाऱ्या स्नायूंनाच रक्ताचा योग्य तेवढा पुरवठा केला जातो. जरूर तेव्हा यकृतातील ग्लायकोजेन उपयोगात आणण्याचे कार्य ही हॉर्मोने करतात. भीती किंवा इतर मानसिक ताणांच्या वेळी एपिनेफ्रिनामुळे अधिक ग्लुकोज रक्तप्रवाहात येते. या जादा ग्लुकोजाच्या पुरवठ्यामुळे स्नायू अधिक कार्य करू शकतात. पोष ग्रंथींचा मध्यकाच्या स्रावाशी संबंध नाही. 


स्टेरॉइड हॉर्मोने : अधिवृक्क बाह्यक, वृषण व अंडाशय यांपासून स्रवणाऱ्या अंतःस्रावांना स्टेरॉइड हॉर्मोने म्हणतात. जवळजवळ तीस हॉर्मोने असलेल्या या गटास स्टेरॉइडे हे नाव रासायनिक संरचनेवरून दिले आहे [→स्टेरॉल व स्टेरॉइडे]. वर दिलेले शरीरभाग भ्रूणाच्या मध्यस्तरापासून तयार झालेले असतात. वृषण आणि अंडाशय जनन-कोशिका (शुक्राणू व अंड) उत्पादनाचेही कार्य करतात. अधिवृक्क ग्रंथी फक्त हॉर्मोन उत्पादनाचेच कार्य करते. शरीरक्रियात्मक दृष्ट्या ही तीस हॉर्मोने एकूण पाच गटांत विभागता येतात : (१) पौरुषजने (अँड्रोजेने), (२) स्त्रीमदजने (इस्ट्रोजेने), (३) प्रोजेस्टिने (गर्भधारणेसंबंधी), (४) ग्लुकोकॉर्टिकॉइडे व (५) मिनरलोकॉर्टिकॉइडे. 

पौरुषजने : (अँड्रोस्टेरोन, टेस्टोस्टेरोन वगैरे ). ही हॉर्मोने वृषणाचे वैशिष्ट्य असून ती पुरुषांच्या दुय्यम लैंगिक लक्षणाकरिता (उदा., पुरुषातील दाढी व मिशा) आवश्यक असतात. [→ पौरुषजने]. 

स्त्रीमदजने : (उदा., इस्ट्राडिऑल ). मुख्यत्वेकरून अंडाशयातील पुटकापासून तयार होणारी ही हॉर्मोने स्त्रियांच्या दुय्यम लैंगिक लक्षणाकरिता (उदा., स्तन वाढ) जरूरी असतात. या स्रावांच्या रक्तातील प्रमाणावर स्त्री–प्राण्यातील स्त्रीमदाचा चढ-उतार अवलंबून असतो. [→ स्त्रीमदजन]. 

प्रोजेस्टिने : (उदा., प्रोजेस्टेरोन ). अंडाशयातील पीतपिंडापासून स्रवणारे हे स्राव गर्भधारणेकरिता गर्भाशयाची तयारी करण्याचे व गर्भधारणा झाल्यानंतर ती टिकविण्याचे कार्य करतात. काही प्रोजेस्टिने संश्लेषणाने बनविता आली असून त्यांपैकी नॉरएथिनोड्रेल अंडमोचन क्रियेचे निरोधन करू शकते. संततीप्रतिबंधक उपायांमध्ये अशा प्रकारची प्रोजेस्टिने आता उपयुक्त ठरली आहेत.

ग्लुकोकॉर्टिकॉइडे : (उदा., कॉर्टिसोन, हायड्रोकॉर्टिसोन). अधिवृक्क ग्रंथींच्या बाह्यकाची ही हॉर्मोने प्रथिनांचे ग्लुकोज व यकृतातील ग्लायकोजेनात रूपांतर करतात (नवग्लुकोजनन निओग्लुकोजेनिसिस). डोळ्यातील कनीनिकाशोथ (रंगीत वर्तुळाकार तबकडीसारखा ऊतक-समूह व ज्याच्या मध्यभागी बाहुलीचे छिद्र असते, त्याला कनीनिका व तिच्या दाहयुक्त सुजेला कनीनिका शोथ म्हणतात) आणि संधिशोथ यांसारख्या शोथजन्य विकृतीत ही हॉर्मोने सूज कमी करून आराम देतात. 

मिनरलोकॉर्टिकॉइडे : (उदा., डेसोक्सिकॉर्टिकोस्टेरोन, ॲल्डोस्टेरोन). शरीरातील विद्युत् विच्छेद्य पदार्थ (सोडियम क्लोराइड) आणिपाणी यांच्या संतुलनाकरिता अधिवृक्क बाह्यकाची ही हॉर्मोने आवश्यक असतात. ॲडिसन रोग या विकृतीत अधिवृक्क बाह्यक सुकल्यामुळे हे संतुलन बिघडते व मुत्रातून अधिक पाणी व सोडियम क्लोराइड बाहेर टाकले जाते. एके काळी असाध्य समजला गेलेला हा रोग या हॉर्मोनामुळे नियंत्रित करता आला आहे. ॲल्डोस्टेरोनाचा शोध १९५४ मध्ये लागला. ग्लुकोकॉर्टिकॉइडांच्या स्रवणास पोष ग्रंथीतील ॲड्रीनो-कॉर्टिको-ट्रोपिक हॉर्मोन (एसीटीएच) चेतावणी देते. याउलट मिनरलोकॉर्टिकॉइडांच्या स्रवणास रक्तातील सोऽडयम व पोटॅशियम क्लोराइडे आणि पाणी यांचे प्रमाण चेतावणी देऊ शकते. 

स्टेरॉइड हॉर्मोने शरीरात सर्वदूर विखुरलेल्या (मेद, पित्त, तंत्रिका ऊतक आणि रक्त) कोलेस्टेरॉलापासून तयार होत असावीत. बहुतेक पृष्ठवंशी प्राण्यांच्या अंडाशयात पौरुषजनेही तयार होतात. पुरुषाच्या वृषणात तसेच घोड्याच्या वृषणात स्त्रीमदजने तयार होतात. अधिवृक्क ग्रंथीच्या बाह्यकात पौरुषजने नियमितपणे तयार होतात. ही हॉर्मोने स्त्रियांमध्येही तयार होतात व ती प्रमाणापेक्षा वाढल्यास स्त्रियांच्या चेहऱ्यावरील केस पुरुषांसारखे वाढू लागून आवाजही पुरुषी बनून पुरुषीकरण होते. 

पोष ग्रंथी हॉर्मोने : पोष ग्रंथीला अंतःस्रावी ग्रंथीमधील अधिपती ग्रंथी असे संबोधतात, कारण बहुतेक सर्व हॉर्मोनांच्या उत्पादनावर ही ग्रंथी नियंत्रण करते. अग्रभाग व पश्चभाग अशा दोन भागांची ती बनलेली असते. हे भाग एकमेकांशी सैल रीत्या जोडलेले असून कधीकधी त्यांच्यामध्ये आणखी एक भाग दिसतो, त्याला मध्यस्थ भाग म्हणतात. अग्रभाग ५-६ प्रकारच्या ग्रंथिकोशिकांचा बनलेला असून तो भ्रूणाच्या बाह्यस्तर पट्टिकेपासून तयार होतो. पश्चभाग अग्रमेंदूच्या तळापासून बनलेला असून त्यामध्ये तंत्रिका पुंज अधिक असतात, म्हणून त्यास तंत्रिका भाग असेही संबोधतात. 

पोष ग्रंथीची सर्व हॉर्मोने रासायनिक संरचनेप्रमाणे प्रथिने किंवा पॉलिपेप्टाइडे आहेत. या कारणामुळे त्यांचे वर्गीकरण कठीण बनते. त्याशिवाय ही हॉर्मोने एकूण किती आहेत, याविषयी अज्ञानच आहे. ही हॉर्मोने ज्या विशिष्ट क्रिया घडवून आणतात, त्यावरून त्यांना नावे दिली आहेत. उदा., थायरोट्रोपीन (टीएसएच)–अवटू ग्रंथी उद्दीपित करणारे हॉर्मोन. 

रासायनिक दृष्ट्या ही हॉर्मोने साधी प्रथिने व ग्लुकोप्रथिने या दोन गटांत विभागता येतात. त्यांचा रेणुभार २,००० – १,००,००० या दरम्यान असतो. सोमॅटोट्रोपीन किंवा वृद्धी हॉर्मोन आणि इंटरमेडीन (मेलॅनोफोर स्टिम्युलेटिंग) हॉर्मोन ही दोनच हॉर्मोने शरीरभागावर प्रत्यक्ष परिणाम करू शकतात. इंटरमेडिनामुळे उभयचर प्राणी व मासे परिसरास अनुरूप असे रंग बदलू शकतात. नियततापी प्राण्यांमध्येही इंटरमेडीन तयार होते, परंतु पक्षी किंवा सस्तन प्राण्यांच्या रंगावर ते परिणाम करू शकत नाही. बेडकामधील पोष ग्रंथीच्या मध्यस्थ भागातून ते स्रवत असल्यामुळे त्याला इंटरमेडीन हे नाव देण्यात आले परंतु ते या ग्रंथीच्या अग्र व पश्च भागांतही तयार होत असावे. 


सोमॅटोट्रोपीन किंवा वृद्धी हॉर्मोन प्रथिन चयापचयावर परिणाम करते. याचा नायट्रोजन उत्सर्जनावर परिणाम होऊन पूरक अशा मेदाच्या ऑक्सिडीकरणास मदत होते. हाडांच्या अग्रप्रवर्धांच्या (काही काळापर्यंत मृदू अस्थीच्या स्वरूपात असणारा भाग) वाढीवर परिणाम करते. या हॉर्मोनाची न्यूनता (उदा., पोष ग्रंथी काढून टाकणे) शरीर वाढीवर परिणाम करून वामनता (खुजेपणा) आणते. याउलट हॉर्मोनाधिक्य झाल्यास वाढत्या वयाच्या प्राण्यात बृहत्कायता (प्रमाणापेक्षा सर्व शरीराची अधिक वाढ) व पूर्ण वाढ झालेल्यांमध्ये विशालांगता (उंची न वाढता हात, पावले व चेहऱ्याच्या हाडांची प्रमाणापेक्षा अधिक वाढ होणे, तसेच उदरस्थ अवयवांचे आकारमान मोठे होणे) या विकृती उद्‌वतात. 

पोष ग्रंथींची इतर हॉर्मोने अप्रत्यक्ष परिणाम करतात. थायरॉक्सिनावर परिणाम होऊन नंतर चयापचयावर परिणाम होतो. उभयचर प्राण्यांमधील रूपांतरण अशाच प्रकारच्या परिणामांमुळे होते. प्रोलॅक्टीन अंडाशयातील पीतपिंड उद्दीपित करते आणि त्याशिवाय स्तनावर प्रत्यक्ष परिणाम करून दुग्धोत्पादन सुरू करून दुग्धस्राव टिकविते. पोष ग्रंथीच्या पश्चभागातून व्हॅसोप्रेसीन व ऑक्सिटोसीन ही दोन हॉर्मोने स्रवतात. यांपैकी पहिले प्रतिमूत्रल असून ते रक्तदाबही वाढविते व दुसरे काही अरेखित स्नायूंचे आकुंचन करते. उदा., गर्भाशय स्नायूंचे आकुंचन. [→ प्रसूतिविज्ञान]. 

तंत्रिका हॉर्मोने : (तंत्रिका कोशिकांची हॉर्मोने न्यूरोहॉर्मोने) : ई. शारर व आर्. कोलिन तसेच इतर शास्त्रज्ञांच्या शोधांवरून असे आढळून आले आहे की, वर सांगितलेली पोष ग्रंथीच्या पश्चभागातील ही दोन्ही हॉर्मोने त्या ठिकाणी तयार होत नसून फक्त साठविलेली असतात. त्यांचे उत्पादन अधोथॅलॅमसामधील विशिष्ट कोशिकांच्या स्रावापासून (तंत्रिका स्राव न्यूरोसीक्रिशन) होते. या कोशिकांच्या प्रवर्धांची टोके पोष ग्रंथीमध्ये असतात. तेथे हॉर्मोने साठविली जातात. हा तंत्रिका स्राव रक्तप्रवाहाद्वारे पोष ग्रंथीस पोहोचल्यानंतर तेथून स्रवणारी जनन ग्रंथी पोषक हॉर्मोने (गोनाडोट्रोपीन) विशिष्ट स्थानी पोहोचतो. त्यानंतर पक्षी व सस्तन प्राण्यांमधील विणीच्या हंगामात होणारे बदल उत्पन्न होतात. 

अंडाशय व वार यांची हॉर्मोने : शुक्राणू व अंड यांच्या मिलाफानंतर तयार होणाऱ्या निषेचित (फलित) अंडाची धारणा होण्याकरिता मातेच्या अंडाशयातून स्रवणारी हॉर्मोने जरूरी असतात. सुरुवातीस पुटकातील (फॉलिकल) स्त्रीमदजने आणि नंतर प्रोजेस्टेरोन (पीतपिंडाचे हॉर्मोन) गर्भाशयाचा अंतःस्तर गर्भधारणेस योग्य बनवितात. निषेचनानंतर सातव्या दिवशी बाह्यस्तर, आतील कोशिकापुंज व मधील पोकळी हे भाग असलेला गर्भ (ब्लास्टूला) गर्भाशय भित्तीस चिकटतो आणि मातेचे रक्त व ऊतक यांपासून पोषणद्रव्ये शोषून घेण्यास सुरुवात करतो. त्यानंतरचा आठवडा मातेच्या ऋतुचक्रातील शेवटचा असल्यामुळे गर्भाशयाच्या अंतःस्तराचा निचरा होणे, म्हणजेच मासिक पाळीचा रक्तस्राव सुरू होणे जवळ आलेले असते परंतु तत्पूर्वी झालेली गर्भधारणा टिकावयाची असल्यास निचरा होण्याचे टाळणे जरूरीचे असते. ती साध्य करण्याकरिता जरायू (भ्रूणवेष्टाची जनन ग्रंथी) पोषक हॉर्मोन (सीजीएच) मातेच्या रक्तप्रवाहात मिसळून पीतपिंडावर परिणाम करते. त्यामुळे प्रोजेस्टेरोनाचे उत्पादन गर्भधारणेच्या कालात अखंड चालू असते. परिणामी गर्धधारणेस योग्य अशी गर्भाशय अंतःस्तराची वाढ टिकून राहून मासिक पाळी बंद होते. निषेचनानंतर केवळ दोनच आठवड्यात हे हॉर्मोन मातेच्या रक्तात व मूत्रामध्ये भरपूर प्रमाणात सापडू लागते. गर्भधारणा ओळखण्याकरिता करण्यात येणाऱ्या अशाइम-झाण्डेड, ॲलनडॉइझी, फ्रीडमन इ. परीक्षा (चाचण्या) या शरीरक्रियात्मक क्रियेवरच आधारलेल्या आहेत. 

भ्रूणवेष्टातील जनन ग्रंथी पोषक हॉर्मोन हे पोष ग्रंथीच्या जनन ग्रंथी पोषक हॉर्मोनाप्रमाणेच (एलएच) एक ग्लुकोप्रथिन आहे रासायनिक आणि शरीरक्रियात्मक क्रियाशीलतेमध्ये दोन्ही फारशी निरनिराळी नाहीत. गर्भधारणेनंतर कालांतराने भ्रूणवेष्टाचा विशिष्ट भाग (वार गोल) जनन ग्रंथी पोषक हॉर्मोन, प्रोजेस्टेरोन व स्त्रीमदजन ही तीनही हॉर्मोने तयार करू लागतो. गर्भधारणा टिकविण्याचे अंडाशयाचे बहुतेक सर्व कार्य या विशिष्ट भागाकडे सोपविले जाते. प्रसूती होण्यापूर्वीच्या म्हणजे गर्भारपण संपुष्टात आणण्याकरिता होणाऱ्या सर्व घडामोडींवर वार नियंत्रण करते.

एफ्. एल्. हिसॉ यांनी अंडाशयाच्या अर्कापासून रिलॅक्झीन नावाचे एक हॉर्मोन मिळविले आहे. या हॉर्मोनामुळे श्रोणिबंध (विशेषेकरून जघनास्थींचे बंध) ढिले पडतात व त्यामुळे प्रसूतिमार्ग सैल होतो. प्रसूतीच्या वेळी होणाऱ्या जटिल शारीरिक क्रियांमध्ये हे हॉर्मोन भाग घेत असावे.

अर्बुदयुक्त अंतःस्रावी ग्रंथींची हॉर्मोने : काही वेळा अंतःस्रावी ग्रंथी (विशेषेकरून अवटू ग्रंथी) हॉर्मोन स्रवणारे ऊतक शरीराच्या इतर भागांमध्ये प्रक्षेपित करू शकतात. असा प्रक्षेप बहुधा कर्करोगाने ग्रासलेली ग्रंथी करते. फुप्फुस, हाडे इ. ठिकाणी अशा प्रक्षेपित ऊतकापासून हॉर्मोने उत्पन्न होऊ लागतात. असे स्थलांतरित ऊतक शोधून काढण्याकरिता तसेच त्याचा नाश करण्याकरिता किरणोत्सर्गी आयोडिनाचा उपयोग होतो. 

अंडाशयात तयार होणारे भ्रूणार्बुद (भ्रूणातील निरनिराळ्या ऊतक-समूहांपासून तयार होणारे अर्बुद यांमध्ये दात, केस इ. संपूर्ण वाढलेले शरीरभाग सापडतात) भ्रूणवेष्टजन्य जनन ग्रंथी पोषक हॉर्मोन (सीजीएच) गर्भधारणेप्रमाणे परंतु फार मोठ्या प्रमाणावर शरीरभाग तयार करते. हे अर्बुद बहुधा अनिषेकजनित अंडापासून तयार होते. अशा प्रकारचे अर्बुद तरुणांच्या वृषणातही तयार होते. ही अर्बुदे मारक स्वरूपाची असून फुप्फुस, मेंदू, हाडे इ. शरीरभागांत ऊतक प्रक्षेपण करतात. [→ अर्बुदविज्ञान]. 


अपृष्ठवंशी प्राण्यांतील हॉर्मोने : काही अपृष्ठवंशी प्राण्यांमध्ये पृष्ठवंशी प्राण्यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथी असून त्या हॉर्मोन उत्पादनाचे कार्य करतात. ही हॉर्मोने त्यांच्या शरीरद्रवात मिसळली जातात व शरीरा-तील तंत्रिका तंत्राच्या सहकार्याने निरनिराळ्या कोशिका व ऊतक समूहावर परिणाम करतात. अपृष्ठवंशी प्राण्यांमधील कवचधारी वर्ग व कीटक यांच्यामधील हॉर्मोनांवर अधिक संशोधन झाले आहे. पृष्ठवंशीय प्राणी व अपृष्ठवंशीय प्राणी यांच्यामधील अंतःस्रावी ग्रंथींच्या उत्पत्तीविषयी साम्य नसले, तरी दोन्ही वर्गांतील या ग्रंथीच्या कार्यात एकसारखेपणा निश्चित आढळतो. सर्व प्राणिवर्गात तंत्रिकांचा व हॉर्मोन उत्पादनाचा घनिष्ट संबंध आढळतो. 

कोष्टक क्र. २ मध्ये अपृष्ठवंशी प्राण्यांतील काही हॉर्मोनांची माहिती दिली आहे.

कोष्टक क्र. २. अपृष्ठवंशी प्राण्यांतील काही हॉर्मोन

प्राणी

हॉर्मोने

उत्पत्तिस्थान

परिणाम व कार्य

कीटक वर्ग

एकडायसोन (मोल्डिंग हॉर्मोन एमएच)

अग्रवक्ष ग्रंथी (प्रोथोरॅसिक ग्रंथी)

निर्मोचनास (बाह्यकवच, जुनी त्वचा, पिसे, शिंगे वगैरे शरीरापासून अलग होऊन नवीन तयार होणे) मदत करणे, वाढ व निरनिराळ्या ऊतकांचे विभेदन.

जुव्हेनाइल हॉर्मोन (जेएच) निओटेनीन

कॉर्पोरा ॲलाटा (अंडाकृती पांढऱ्या अंतःस्रावी ग्रंथी युगुल)

एकडायसोनाचे नियमन करणे. अळी अवस्थेतील मृदू उपचर्म याची निर्मिती चालू ठेवणे.

मायोट्रोफिक फॅक्टर्स

कॉर्पोरा कॉर्डिॲका (काही कीटकांतील तंत्रिकाभ ग्रंथी)

हृदयाच्या व इतर स्नायूंच्या लयबद्ध हालचालींवर नियंत्रण.

क्रोमॅटोफोरोट्रोपिने

कॉर्पोरा कॉर्डिॲका

रंगबदल घडवून आणणे.

मेटॅबोलिक हॉर्मोन

कॉर्पोरा कॉर्डिॲका

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढविणे.

प्रोथोरॅकोट्रोपीन ब्रेन हॉर्मोन (बीएच)

मध्यवर्ती तंत्रिका तंत्रातील स्रावक कोशिका

अग्रवक्षीय ग्रंथींना उद्दीपित करणे.

टॅनिंग हॉर्मोन

मध्यवर्ती तंत्रिका तंत्रातील स्रावक कोशिका

त्वचेचा रंग गडद करणे, त्वचा कठीण बनविणे.

मेटॅबोलिक हॉर्मोन

मध्यवर्ती तंत्रिका तंत्रातील स्रावक कोशिका

प्रथिन चयापचय.

कवचधारी वर्ग

अँड्रोजेने (पौरुषजने)

अँड्रोजेनिक (पुंजनक ग्रंथी)

शुक्राणू उत्पादन व पौरुषीय लैंगिक लक्षणे.

अंडाशयाची हॉर्मोने

अंडाशय

स्त्री लैंगिक लक्षणे.

एकडास्टेरोन

एक्स-ऑर्गन (तंत्रिकास्रावी कोशिकांचे समूह)

निर्मोचनास मदत करणे.

मेटॅबोलिक हॉर्मोन

मध्यवर्ती तंत्रिका तंत्रातील स्रावक कोशिका

कार्बोहायड्रेट चयापचय, जलतोल सांभाळणे, विद्युत् विच्छेद्य पदार्थांची उलाढाल, श्वसनक्रियेचे प्रमाण ठरविणे.

मृदुकाय प्राणी

जनन ग्रंथी पोषक हॉर्मोन

दृक् ग्रंथी

जनन ग्रंथींचे उद्दीपन

जनन ग्रंथींची स्टेरॉइड हॉर्मोने

जनन ग्रंथी

प्रजोत्पादन कार्ये.

वलय कृमी

जुव्हेनाइल हॉर्मोन

मध्यवर्ती तंत्रिका तंत्रातील स्रावक कोशिका

जनन ग्रंथींची पूर्ण वाढ होऊ न देणे.

वृद्धी हॉर्मोन (जीएच)

मध्यवर्ती तंत्रिका तंत्रातील स्रावक कोशिका

वाढ होऊ देणे, पुनर्जनन.

शल्यचर्मी प्राणी (काटेरी त्वचा असलेले प्राणी)

युग्मक मोचन पदार्थ (शेडिंग सबस्टन्स)

तारामिनांच्या मध्यवर्ती तंत्रिका तंत्रातील स्रावक कोशिका

युग्मक मोचनास उत्तेजन देणे.

युग्मक मोचनरोधी हॉर्मोन

तारामिनांच्या मध्यवर्ती तंत्रिका तंत्रातील स्रावक कोशिका

युग्मक मोचन थोपविणे.

अपृष्ठवंशी प्राण्यांमधील काही विशिष्ट हॉर्मोनांची माहिती पुढे दिली आहे.

रंगबदल घडवून आणणारी हॉर्मोने : ‘डिक्सिपास’ नावाचा कीटक झाडांच्या वाळलेल्या काटक्यांसारखा दिसतो. त्याला वॉकिंगस्टिक इन्सेक्ट (यष्टि-कीटक) असेही म्हणतात. हालचाल न करता स्तब्ध असल्यास हा कीटक परिसरीय खऱ्या काटक्यांपासून वेगळा ओळखणे अशक्य असते. कारण त्याचा रंग हुबेहूब काटकीसारखाच असतो. या कीटकाच्या त्वचेखालील कोशिकांमधील करडा व लाल रंग परिसराशी मिळण्याजोगा बनविण्याचे कार्य त्याच्या मेंदू, तंत्रिका गुच्छ व कॉर्पोरा ॲलाटा या भागांतून स्रवणाऱ्या हॉर्मोनांद्वारे होते. कवचधारी प्राण्यांपैकी खेकडा व कोळंबी यांमध्येही रंगबदल प्रामुख्याने आढळतात. या प्राण्यांच्या त्वचेमध्ये अनेक शाखा असलेल्या रंजकद्रव्य कोशिका विखुरलेल्या असतात. त्यांमध्ये अनेक प्रकारचे रंग पाहिजे तेथे व पाहिजे त्या वेळी पसरविण्याचे कार्य हॉर्मोनाद्वारे होते. 

रंगबदल घडवून आणणारी हॉर्मोने कवचधारी प्राण्यांच्या मेंदूजवळ किंवा दृक्देहावर असणाऱ्या ग्रंथीमधून स्रवतात. या ग्रंथीला कोटर ग्रंथी असेही म्हणतात. या ग्रंथीमध्ये तंत्रिकास्रावी कोशिकांचे जे गुच्छ असतात त्यांना एक्स-ऑर्गन म्हणतात. या गुच्छापासून स्रवणारी हॉर्मोने तंत्रिका तंत्रामधून शरीराच्या निरनिराळ्या भागी पोहोचविली जातात. या प्राण्यावरील प्रयोगान्ती रंगबदल घडवून आणणारी ही हॉर्मोने अनेक प्रकारची असल्याचे सिद्ध झाले आहे.


काही प्रकारचे खेकडे, कोळंबी व झिंगे यांमधील परिसरीय रंगाशी एकरूप होणारा रंग धारण करण्याची शक्ती निरनिराळ्या जटिल हॉर्मोनांमुळे, रंजकद्रव्ये एका जागी गोळा होण्याने किंवा ती पसरविण्यामुळे प्राप्त झालेली असते. 

काही कवचधारी प्राण्यांच्या डोळ्यांतील रंजकद्रव्याची हालचाल हॉर्मोननियंत्रित असते. तीन प्रकारची रंजकद्रव्ये या प्राण्यांच्या डोळ्यांत आढळतात : (१) पृष्ठभागावरील काळे, (२) त्यामागे परंतु दृक् पटला-जवळ असणारे काळे व (३) त्याजवळचे पांढरे. या तिन्ही रंजकद्रव्यांची नियंत्रित हालचाल निरनिराळ्या प्रकाशन पातळींमध्ये दृष्टीची कार्यक्षमता उत्तम ठेवण्यास प्रकाशपरिवर्तक रंजकद्रव्य मदत करते. 

वृद्धी व निर्मोचन हॉर्मोने : कवचधारी प्राणी व कीटक यांसारख्या अपृष्ठवंशी प्राण्यांमध्ये बाह्य कवच कठीण, चिवट व सलग असते. अशा प्राण्यांची वाढ उत्स्फूर्त, परंतु टप्प्याटप्प्याने होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे होते. प्रत्येक वेळी जुना बाह्य सांगाडा टाकून दिला जातो. निर्मोचन वृद्धी आणि शरीरभागांची रचना व कार्ये या दृष्टीने केले जाणारे विभेदन हे सर्व संधिपाद प्राण्यांमध्ये (पायांना सांधे असणारे प्राणी उदा., कवचधारी प्राणी, कीटक वगैरे) हॉर्मोन नियंत्रित असतात. कवचधारी प्राण्यांमध्ये निर्मोचन संख्या वाढत्या वयाबरोबर कमी होत जाते. काही प्राण्यांमध्ये (उदा., शेवंडा) निर्मोचन मरेपर्यंत चालू असते, तर काहींमध्ये (उदा., खेकडा) ते वाढ पूर्ण होताच थांबते. 

संपूर्ण निर्मोचन चक्र (ज्यामध्ये अनेक रासायनिक व आकृतिक बदल घडतात) कोटर ग्रंथीच्या निर्मोचन-रोधी व निर्मोचन-उद्दीपक अशा दोन हॉर्मोनांच्या मदतीने नियंत्रित केले जाते. कोटर ग्रंथींच्या या हॉर्मोनांवर शृंगिका ग्रंथीपासून स्रवणारी हॉर्मोने नियंत्रण करीत असावीत.

कीटकांमधील भ्रूणावस्थेनंतरच्या अळी व रूपांतरण अवस्था यांवर हॉर्मोनांचे नियंत्रण असते. अळी अवस्थेत वाढीला प्राधान्य असते. या अवस्थेतील काही निर्मोचने झाल्यानंतर लहान कीटक तयार होतो. त्यानंतर रूपांतरणाकरिता निर्मोचन होऊन शेवटी मोठा पूर्ण वाढ झालेला कीटक तयार होतो. कीटकातील हॉर्मोनस्रावक ग्रंथी शरीराच्या निरनिराळ्या भागांत विखुरलेल्या असून त्यांची रचनाही वेगवेगळ्या प्रकारची असते.

हॉर्मोने व प्रजनन : बहुतेक कवचधारी प्राण्यांमध्ये पौरुषीय प्रजनन हॉर्मोन रेतरज्जूच्या बाह्य मुखाजवळ असलेल्या ग्रंथींपासून स्रवते, ते वृषण व पौरुषीय लक्षणांच्या वाढीकरिता आवश्यक असते. ही ग्रंथी काढून टाकल्यास शरीराच्या आकारमानात हळूहळू फरक पडत जाऊन स्त्री सदृशता येते. कवचधारी प्राण्यांच्या अंडाशयाची क्रियाशीलता कोटर ग्रंथींच्या हॉर्मोनांवर अवलंबून असते. प्रत्यक्ष अंडाशयापासूनही हे हॉर्मोन तयार होत असावे, ज्यामुळे प्रजनन पिशव्या व अंड वहनास मदत करणारे केस यांसारखे पूरक शरीरभाग तयार होत असावेत. 

कीटकांमधील अंडाशयाची पक्वता तसेच इतर प्रजनन पूरक ग्रंथींचे कार्य, कॉर्पोरा ॲलाटापासून स्रवणाऱ्या हॉर्मोनामुळे नियंत्रित होते. या ग्रंथी युगुलावर मेंदूमधून स्रवणारे आणखी एक हॉर्मोन नियंत्रण करीत असावे. 

अन्य शरीरक्रियांवर परिणाम करणारी हॉर्मोने : वर दिलेल्या शरीरक्रियांशिवाय इतर शरीरक्रियांचा व हॉर्मोनांचा संबंध असावा. कवचधारी प्राण्यांच्या हृदयावरील पिशवीमध्ये तंत्रिकास्रावी कोशिकांचा गुच्छ असतो, त्याला परिहृद् ग्रंथी म्हणतात. या ग्रंथीचे हॉर्मोन हृदयाची गती वाढविते. अनेक अपृष्ठवंशी प्राण्यांमध्ये लैंगिक पूरक अवयव व दुय्यम लैंगिक लक्षणे यांसहित द्विरूपता आढळते. 

पहा : अंडकोश; अग्निपिंड; अधिवृक्क ग्रंथि; अवटु ग्रंथि; इन्शुलीन; एंझाइमे; कॉर्टिसोन; ग्रंथिद्रव्ये; चयापचय; जनन तंत्र; जीवनसत्त्वे; परावटु ग्रंथि; पुंस्त्वविद्या; पोष ग्रंथि; पौरुषजन; प्रगर्भरक्षी; प्रजोत्पादन; प्रसूतिविज्ञान; वार–२; वृद्धिनियंत्रण,वनस्पतींतील; स्टेरॉल व स्टेरॉइडे; हॉर्मोने, वनस्पतींतील. 

संदर्भ : 1. Bolander, F. F. Molecular Endocrinology, 2004.

           2. Greenspan, F. F.; Strewler, G. J., Eds., Basic and Clinical Endocrinology, 1997.

           3. Norman, A. W.; Litwack, G. Hormones, 1977. 

भालेराव, य. त्र्यं.