अंडकोश : ज्या ग्रंथीमध्ये स्त्रीबीजे उत्पन्न होतात तिला ‘अंडकोश’ म्हणतात.

शारीर : श्रोणिगुहेत (ओटीपोटात) उजव्या व डाव्या बाजूस प्रत्येकी एक असे दोन अंडकोश असून ते पुरूषातील ðवृषणाशी समजात असतात. गर्भाशयाच्या बाजूस श्रोणीभित्तीवरील विस्तृतबंधाच्या पश्चस्तराला (ओटीपोटाच्या बाजूपासून निघणाऱ्या रुंद अशा तंतुमय थराच्या मागच्या बाजूला) या ग्रंथी चिकटलेल्या असतात. अंडकोशाच्या वरच्या आणि पुढच्या बाजूस अंडवाहिनी असते. या ग्रंथीचा रंग भुरकट गुलाबी असून त्यांचा पृष्ठभाग आरंभी गुळगुळीत असतो पण पुढे अंडमोचन (अंड विलग) होऊ लागल्यानंतर मात्र तो खडबडीत, सुरकुतलेला व क्षतकिणांकित (वण असल्यासारखा) होतो. प्रत्येक अंडकोशाची लांबी ३ सेमी., रुंदी १.५ सेमी. व जाडी १ सेमी. असते. भ्रूणावस्थेत अंडकोश कटिभागात वृक्काजवळ असतात पण पुढे ते हळूहळू खाली सरकत जाऊन श्रोणीमध्ये स्थिर होतात. अंडकोशाची बाहेरची बाजू पर्युदराच्या (पोटातील इंद्रियावरील आवरणाच्या) भित्तीस्तरातील खोलगट भागात बसविलेली असते पण पहिल्या गर्भधारणेनंतर त्याची जागा बदलते व तो मूळ जागी कधीच येत नाही.

आ. १ अंडकोश. (१) अंडकोशबंध, (२) गर्भाशय-बुघ्न, (३) गर्भाशयशरीर, (४) गर्भाशय-ग्रीवेचा योनिमार्गातील भाग, (५) ‍योनिमार्ग, (६) विस्तृत-बंधाची (कापलेली) कडा, (७) अंडकोश, (८) अंडकोशाचा आलंबी बंध, (९) अंडहिनीचे उदरातील मुख, (१०) अंडवाहिनी.

अंडकोशाचा आकार बदामासारखा फुगीर व लांबटगोल असून त्याचे अंडवाहिनीकडील टोक बाह्यश्रोणिशिरेजवळ (ओटीपोटातील नीलेजवळ) असते. या टोकालाच अंडवाहिनीचे नरसाळ्यासारखे झालरयुक्त टोक पर्युदराची एक दुहेरी घडी चिकटलेली असते. या दुहेरी घडीला अंडकोशाचा ‘निलंबी बंध’ असे नाव आहे.

आ. २ अंडकोशाची सूक्ष्म रचना. (१) मोठे अंडपुटक, (२) लहान (अविकसित) अंडपुटक, (३) संघटित संश्लेषीजन-तंतूंनी बनलेले श्वेतकंचुक, (४) जननद-अधिस्तर.

त्या बंधाच्या दोन थरांमधूनच रक्तवाहिन्या, लसीकावाहिन्या [→ लसिकातंत्र] वगैरे अंडकोशाकडे जातात. ज्या जागी या वाहिन्या अंडकोशात जातात त्या जागेला ‘नाभिका’ असे म्हणतात. अंडकोशाचे दुसरे टोक अरुंद असून ते खाली श्रोणितलाकडे झुकलेले असते. हे टोक गर्भाशयाच्या बाह्यकोनास ‘अंडकोशबंधा’ ने बांधलेले असते. हा बंध दोरीसारखा गोल असून त्यात अनैच्छिक स्नायुतंतू असतात. हा बंध विस्तृतबंधाच्या दोन थरांमध्ये असतो. विस्तृतबंधाच्या दोन थरांमधूनही अंडकोशाला रक्त पुरवठा होतो. अंडकोशाच्या वरच्या बाजूस कमानीसारखी गोल अशी अंडवाहिनी असते.

ऊतकविज्ञान : अंडकोशाचे बाह्यक व मध्यक असे दोन भाग असून बाह्यकाचा सर्वांत बाहेरचा थर घनाकार कोशिकांचा बनलेला असतो. त्या कोशिकांपासूनच अंडपुटकांची उत्पत्ती होते म्हणून त्या थराला ‘जननद- अधिस्तर’ असे म्हणतात. या बाह्यकात तर्कूच्या आकाराच्या तंतु-जन-कोशिका आणि जालिकाकार संयोजी ऊतक [→ ऊतक] असते जननद-अधिस्तराच्या खाली संयोजी ऊतकाचा शुभ्र व नाजूक असा एक थर असतो, त्याला ‘श्वेतकंचुक’ असे म्हणतात.

श्वेतकंचुकाच्या खाली अंडकोशाचा मध्यक असून त्यात अनेक रक्तवाहिन्या, प्रत्यास्थ-तंतू आणि स्नायुतंतू असतात.
बाह्यकात उत्पन्न झालेली अंडपुटके विकसित होत होत मध्यकात जातात व तेथे अंडपुटकातील अंड परिपक्व होते. परिपक्व अंड अंडकोशाच्या बाह्यस्तराचा भेद करून बाहेर पडते व ते अंडवाहिनीच्या झालरयुक्त टोकातून गर्भाशयाकडे जाते.

शरीरक्रियाविज्ञान : यौवनावस्थेपासून मासिक ऋतुस्रावाच्या आधी १२ ते १६ दिवस अंडपुटकाची पूर्ण वाढ होऊन त्यातून परिपक्व अंड बाहेर पडते. पुटकाच्या उरलेल्या भागाचा पीतपिंड तयार होतो. गर्भधारणा झाल्यास या पीतपिंडाच्या अंत:स्रावाचा (आतच मुरणाऱ्या रसाचा) उपयोग गर्भवाढीसाठी होतो. गर्भधारणा न झाल्यास पीतपिंड अपकर्षित होतो. अंडकोशात अनेक प्रवर्तके [→ हॉर्मोने] उत्पन्न होतात. त्यांच्यामुळे जननेंद्रियांची वाढ व नियंत्रण, ऋतुचक्रनियंत्रण, लैंगिक गौणलक्षणनिर्मिती, स्तनांची वाढ, गर्भाचे पोषण आणि गर्भावस्थेत होणारे शारीरिक बदल वगैरे अनेक कार्ये होतात.

खुद्द अंडकोशातील कोशिकांची निर्मिती व परिपाक, ऋतुचक्रनियंत्रण वगैरे गोष्टी पोषग्रंथीत उत्पन्न होणाऱ्या अनेक प्रवर्तकांमुळे होतात.

पहा : अंत:स्रावी ग्रंथि पोषग्रंथि.

ढमढेरे, वा. रा.