औषधि स्वरूप विज्ञान : या विज्ञानात प्राणिज व वनस्पतिज अशा नैसर्गिक औषधिद्रव्यांचे उद्‌गम तसेच या औषधिद्रव्यांतील क्रियाशील घटकांचे जैव संश्लेषण (घटक द्रव्यांपासून सजीवांच्या शरीरात आवश्यक पदार्थ तयार करणे) व त्यांचे अभिज्ञान (अस्तित्व ओळखणे) यांच्या संबंधीच्या अभ्यासाचा समावेश होतो. ही संज्ञा गेल्या दीड शतकातच वापरात असली, तरी ह्या शास्त्राचा उगम मात्र फार प्राचीन काळी झालेला आहे. त्यामध्ये वनस्पती व औषधे ह्यांचे गुणधर्म व उपयोग वर्णिलेले आहेत. औषधी वनस्पतींचे ज्ञान मुख्यत्वे धर्मपीठ व विद्यालये ह्यांच्या द्वारेच प्रसारित झाले. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस वनस्पतिशास्त्रज्ञांनी वनस्पतींची वर्णने, त्यांने गुणधर्म व उपयोगांविषयी चर्चा केलेली आढळते. वनस्पतिविज्ञान व रसायनशास्त्र ह्यांच्या प्रगतीमुळे औषधिस्वरूपविज्ञान हे एक वेगळे शास्त्रच झाले.

ह्या विज्ञानाचा संबंध वनस्पतिज व प्राणिज कच्च्या औषधींशी येतो. या औषधी सुकविण्याच्या वा गोठविण्याच्या पद्धती व वनस्पतींच्या निरनिराळ्या भागांच्या गुणधर्मांचा साकल्याने अभ्यास करणे या विज्ञानात आवश्यक ठरतेच.

प्रथमतः औषध ज्या वनस्पतीपासून किंवा प्राण्यापासून मिळविण्यात आले असेल त्याचे लॅटिन भाषेतील नाव व कुल वर्णावे लागते. कुलच पुष्कळशा गुणधर्मांविषयी सांगू शकते. त्यानंतर कोणत्या भौगोलिक भागात ते आढळते व त्याची वाहतूक कशी करावयाची ते सांगावे लागते. नंतर लागवड व संवर्धन (वाढ), संग्रह करणे व बाजारपेठेसाठी योग्य ते स्वरूप देणे ह्या गोष्टींकडे काळजीपूर्वक पहावे लागते, कारण बाह्य स्वरूप व दर्जा ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. औषधांची स्थूल रचना व त्यातील लहानसहान बाबींचेही ज्ञान आवश्यक असते. तसेच सूक्ष्मदर्शीय गुणधर्म व त्यांचा विशेष अभ्यास हे औषधिस्वरूपविज्ञानाचे महत्त्वाचे अंग आहे. बाजारात विकल्या जाणाऱ्या औषधाचा नमुना अभ्यासावयाचा असेल तेव्हा त्याचा दर्जा ठरविणे, त्याऐवजी कोणता पदार्थ बेमालूमपणे वापरणे शक्य आहे त्याचे ज्ञान व भेसळ हे सर्व समजणे आवश्यक असते. औषधाची शुद्धता व गुणधर्म ठरविणे हेही महत्त्वाचे कार्य असते.

औषधिस्वरूपविज्ञानामध्ये वनस्पतिज व प्राणिज औषधींच्या उगमस्थानाविषयीच्या माहितीपासून बाह्य व आंतर गुणधर्म व शुद्ध आणि दर्जेदार औषध तयार करण्यास आवश्यक अशा प्रक्रियांचे ज्ञान अंतर्भूत असते.

काही औषधे केवळ योग्य लागवड व संवर्धनानेच प्राप्त केली जातात. वेलदोडे, दालचिनी, अफू, गांजा ही काही उदाहरणे देता येतील. अरण्यात वाढणाऱ्या वनस्पतींपासून त्यांच्या तुरळकपणामुळे व काही वेळा दुर्गमतेमुळे औषधे पुरेशा प्रमाणात प्राप्त होत नसल्यामुळे लागवड व संवर्धनाचा मार्ग स्वीकारावा लागतो. सरकारी नियंत्रण असलेली अफूसारखी औषधे देणाऱ्या वनस्पतीही मुद्दाम संवर्धित करणे श्रेयस्कर असते. ह्यामुळे औषधाची गुणवत्ताही वाढते कारण जमिनीची योग्य मशागत, वनस्पतींची निगा व किडीपासून संरक्षण ह्या गोष्टी वनस्पतींच्या वाढीला फारच उपकारक ठरतात. तसेच संग्रह केल्यानंतर ठराविक तापमानाला सुकविणे वगैरे गोष्टीही फार सुलभ होतात.

औषधांच्या मूळ स्थानावरून त्यांच्या काही जाती पाडता येतात. वनस्पतिज, प्राणिज, खनिज व संश्लेषणात्मक (कृत्रिमरीत्या तयार केलेले) असे वर्ग करता येतील. संश्लेषण पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या औषधांची संख्या अगणित आहे. रसायनशास्त्रज्ञाची प्रयोगशाळा हे औषधांचे प्रमुख उत्पत्तिस्थान होय. उदाहरणेच द्यावयाची तर अफू, डिजॉक्सिन, इन्शुलीन ही देता येतील. प्राणिज औषधांपैकी यकृतार्क अनेक वर्षे पांडुरोगाच्या (ॲनिमियाच्या) उपचारासाठी वापरण्यात येत होता. गंधक, लोह, आयोडीन ह्यांसारखी खनिज द्रव्येही चिकित्सेत वापरण्यात येतात, पण पूर्वीच्या काळातील पुष्कळशी औषधे वनस्पतींच्या निरनिराळ्या भागांपासून तयार करण्यात आलेली  आढळतात.

औषधी वनस्पतींपासून उपचारासाठी अनेक घटक उपलब्ध होतात. अनेकदा रासायनिकदृष्ट्या शुद्ध स्वरूपातील औषधे वापरली जातात असे नाही, तर रासायनिक संघटन माहीत नसतानाही ती वापरली जातात. वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाचे असलेले वनस्पति-घटक हे रासायनिकदृष्ट्या विविध प्रकारचे असतात. वनस्पती सुकविणे, साठविणे व त्यांचा अर्क काढणे ह्या सर्वांकरिता सर्वसाधारण वनस्पति-घटकांच्या गुणधर्मांविषयी माहिती असणे आवश्यक असते.

वसाम्‍ले, स्थायी तेले, वसा, मेण, फिनॉले, टॅनिने, प्रथिने, अल्कलॉइडे, कार्बोहायड्रेटे, ग्‍लायकोसाइडे, डिंक, म्युसिलेजे व पेक्टीनल, बाष्पनशील (लवकर उडून जाणारी) तेले, रेझिने, डिंक-राळ, रंजकद्रव्ये, व प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थ असे वनस्पति-घटकांचे वर्गीकरण करता येईल. ह्यांतील काही वनस्पति-घटकांविषयी विशेष माहिती खाली दिली आहे.

अल्कलॉइडे : हे नायट्रोजनयुक्त क्षारकीय (अम्‍लाशी विक्रिया झाल्यास लवण देण्याचा गुणधर्म असणारे) पदार्थ पुष्कळशा वनस्पतींमध्ये आढळतात. शुद्ध स्वरूपातील बहुतेक अल्कलॉइडे पांढऱ्या स्फटिकीय स्वरूपात असतात. ज्यांच्या रेणूंमध्ये ऑक्सिजनाचा अभाव असतो, ती द्रवरूप असतात. तंबाखूच्या पानांत असलेले निकोटीन हे अल्कलॉइड द्रवरूप असते. अम्‍लाशी विक्रिया होऊन त्यांची लवणे होतात. अल्कलॉइडे निरनिराळ्या विक्रियाकारकांशी (विक्रिया घडविण्यासाठी उपयुक्त असलेल्या पदार्थांशी) वैशिष्ट्यपूर्ण विविध रंगविक्रिया दाखवितात. ह्यांचा उपयोग विषतंत्रज्ञाला निरनिराळ्या ऊतकांमध्ये (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांमध्ये) असणारी अल्कलॉइडे शोधण्यास होतो. औषधशास्त्रीयदृष्ट्या औषधी वनस्पतींपासून मिळविलेली अल्कलॉइडे फार परिणामकारक असतात, हे परिणामही विविध प्रकारचे असतात. अफू मधील मॉर्फीन ह्या अल्कलॉइडामुळे केंद्रीय तंत्रिका तंत्राचे (मज्‍जासंस्थेचे) कार्य मंदावते. जास्त प्रमाणात ते शरीरात गेले तर गुंगी येते व शेवटी श्वसनकेंद्राचे कार्य बंद पडून मृत्यूही येतो. ह्याउलट चहामधील कॅफिनामुळे मेंदूला तरतरी येते व हेच कॅफीन जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास मेंदूच्या अति-उत्तेजनामुळे झटके येतात. ॲट्रोपिनाने स्वायत्त तंत्रिका तंत्राचे कार्य थंडावते तर पायलोकार्पिनाने ते उद्दीपित होते. अशा विविध क्रियांचा उपयोग चिकित्सेमध्ये फार चांगल्या प्रकारे करून घेता येतो, पण बरीच अल्कलॉइडे जहाल विषेही आहेत. स्ट्रिक्‍निन व निकोटीन अगदी कमी  प्रमाणात देखील  मृत्यू घडवून आणतात. पुष्कळ औषधी अल्कलॉइडे आता शुद्ध स्वरूपात मिळत असल्याने वनस्पतींचे  मूळ भाग औषध म्हणून वापरण्याची वेळ कमी येते. रसायनशास्त्रज्ञांनी काही अल्कलॉइडे  संश्लेषणानेही उपलब्ध करून दिलेली आहेत [→ अल्कलॉइडे].

ग्‍लायकोसाइडे : हे एक शर्करायुक्त कार्बनी संयुग आहे. डिजिटॅलीस ग्‍लायकोसाइडाच्या हृदयावर होणाऱ्या क्रियेमुळे ती अत्यंत महत्त्वाची आहेत. हृदयाच्या क्रियेचा जोर कमी झाल्यास ती पुन्हा जोमदार करण्यासाठी ह्यांचा उपयोग होतो.

स्थायीतेले : ही बरीचशी खाण्यालायक असतात. त्यांच्यामुळे शरीरात बरीच उष्णता व ऊर्जा निर्माण होऊ शकते. एरंडाचे तेल हे स्थायी तेल असून त्याचा उपयोग मात्र रेचक म्हणून होतो.


बाष्पनशीलतेले : ह्या तेलांना वास असतो. ती काही प्रमाणात जंतुनाशक असतात. पोटात गुबारा धरला असताना वायू निघून जाण्याकरिता ही वापरण्यात येतात. लवंगांचे तेल हे दुखणाऱ्या किडलेल्या दातांवर लावले तर वेदना थांबतात.

डिंक: वनस्पतीपासून स्राव होऊन मिळणारा पदार्थ. ह्याच्या जलीय विच्छेदनामुळे (पाण्याची संयुगावर विक्रिया झाल्यामुळे) साध्या शर्करा मिळतात. औषधशास्त्रीयदृष्ट्या डिंक निष्क्रिय असतात. त्यांच्या जलाकर्षण (पाणी शोषून घेण्याच्या) गुणामुळे त्यांचे आतड्यात आकारमान वाढते व म्हणून त्यांचा उपयोग सारक म्हणूनही करण्यात येतो. तेलांचे पायसीकरण (एकमेकात न मिसळणाऱ्या दोन द्रव्यांचे मिश्रण करण्याची क्रिया) करण्यासही ह्यांचा उपयोग होतो.

टॅनिने : नायट्रोजनविरहित वनस्पति-घटक असून श्लेष्मकलेवर (आतड्यासारख्या अंतर्गत इंद्रियाच्या आतील पृष्ठभागावर असणाऱ्या बुळबुळीत अस्तरावर) ह्यांची स्तंभक (आकुंचन करणारी) क्रिया दिसून येते. ह्यांचा उपयोग भाजलेल्या भागावर लावण्यासाठी व अतिसार थांबविण्यासाठी होतो.

प्रतिजैवपदार्थ : जीव कोशिकांपासून (पेशींपासून) उपलब्ध होणारे हे पदार्थ दुसऱ्या जंतूंची वाढ थांबवितात किंवा त्यांचा नाश करतात. प्रतिजैव पदार्थांचे चिकित्सेत फार महत्त्वाचे स्थान आहे [→ प्रतिजैव पदार्थ].

वनस्पतींपासून त्यांचे क्रियाशील घटक वेगळे करणे हे काही वेळा साधा रस कढण्याने व नंतर  त्याच्या बाष्पीकरणाने साध्य होते. पण बऱ्याच वेळा अतिशय किचकट व गुंतागुंतीच्या पद्धतीने अनेकविध रासायनिक प्रक्रिया करून क्रियाशील घटक वेगळा करावा लागतो. असे क्रियाशील घटक  वेगळे केल्यामुळे त्यांची स्थिरता, औषध देण्यातील सहजता व बिनचूक मात्रा देता येणे हे फायदे  होतात. जितका अर्थातच शुद्ध घटक मिळविण्याचा प्रयत्‍न करावा तितका खर्चही वाढत जातो. मोठ्या प्रमाणावर उत्पादन करावयाचे असेल तर मात्र संश्लेषणाने बनवलेली औषधे शुद्ध, सर्व  कसोट्या पार पाडणारी व किफायतशीर होतात. उदा., संश्लेषणाने बनविलेले क जीवनसत्त्व हे क जीवनसत्त्व असणाऱ्या सायट्रस फळांपेक्षा किती तरी स्वस्त असते.

वनस्पतीमध्ये एखादा वैद्यकीयदृष्ट्या अतिशय उपयुक्त असा क्रियाशील घटक असेल, तर त्याचा  रासायनिकदृष्ट्या अभ्यास केला जाऊन त्याची घटना व गुणधर्म तपासून तशाच प्रकारची रासायनिक  रचना असलेले संयुग बनविण्याचा प्रयत्‍न केला जातो. ह्याचे चांगले उदाहरण म्हणजे ॲट्रोपिनाची  प्रतियोजित संयुगे.

दिवसेंदिवस औषधिस्वरूपविज्ञानाचे महत्त्व कमी कमी होत असून शास्त्रज्ञांचे लक्ष  वनस्पतिरसायनशास्त्र (औषधी रसायनशास्त्र) ह्या शाखेकडे जास्त वळलेले असून संश्लेषण पद्धतीने  बनविलेली औषधे जास्त किफायतशीर पडत असल्याने वनस्पतिज औषधांवरचे लक्ष कमी होत चालले  असल्यास नवल नाही.

पहा : अल्कलॉइडे औषधि रसायनशास्त्र प्रतिजैवपदार्थ.

करंदीकर, श. म.