प्रधान, बजाबा रामचंद्र :(१८३८ – १८८६). इंग्रजी कवितेचा अनुवाद-अनुकरण करणारे पहिले मराठी कवी. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीचा. विदर्भात शिक्षणखात्यात त्यांनी नोकरी केली. तत्पूर्वी काही काळ त्यांचे वास्तव्य मुंबईत होते. तेथील मित्रोदय आणि नेटिव ओपिनिअन ह्या नियतकालिकांसाठी ते लेखन करीत असत. विदर्भातील शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या ज्ञासंग्रहनामक नियतकालिकातही ते लिहीत असत. सुप्रसिद्ध इंग्रज कवी सर वॉल्टर स्कॉट ह्याच्या लेडी ऑफ द लेक ह्या काव्याच्या आधारे त्यांनी रचिलेले दैवसेनी (१८६७) हे इंग्रजी वळणाने लिहिलेले मराठीतील पहिले खंडकाव्य होय. स्कॉटच्या मूळ काव्याचा काही ठिकाणी अनुवाद, तर काही ठिकाणी त्याचे अनुकरण दैवसेनीच्या रचनेत आढळते. प्रधानांचे काव्य मूळ काव्याच्या तोडीचे झालेले नसले, तरी साध्या, प्रसन्न शैलीमुळे ते वेधक झाले आहे. दिंडी, साकी, आर्या, श्लोक अशी विविध वृत्ते ह्या काव्यासाठी प्रधानांनी वापरलेली आहेत. रधुनाथपंडिताच्या दमयंती-स्वयंवराचा आदर्शही हे काव्य रचीत असताना त्यांच्या समोर असावा, असे वाटते. दैवसेनी म्हणजे मराठी कवितेला लागलेल्या नव्या वळणाचे प्रसादचिन्ह होय, अशा आशयाचा अभिप्राय विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी दिला होता. प्रधानांच्या अन्य लेखनात ‘सदगुणी स्त्री’, ‘फारा दिवसांची गोष्ट’ व ‘झाले ते ठीकच झाले’ ह्या गोष्टी आणि श्रीराम भिकाजी जठार ह्यांच्या साहाय्यानेकेलेले, शेक्सपिअरच्या द कॉमेडी ऑफ एरर्स ह्या नाटकाचे भ्रांतिकृत चमत्कार (१८७८) हे भाषांतर ह्यांचा समावेश होतो. शेक्सपिअरच्या मूळ नाट्यकृतीला, तिच्या सत्त्वाला धक्का न लावता, मराठी रूप देण्याची दृष्टी प्रधानांनी दाखविल्यामुळे ह्या भाषांतरात एक प्रकारचा सहजपणाही आलेला आहे.

संदर्भ : १. खानोलकर, गं. दे. अर्वाचीन मराठी वाड्मयसेवक, तृतीय खंड, मुंबई, १९४९. 

           २. जयवंत, विनायक सीताराम, संपा., कविवर्य बजाबा रामचंद्र प्रधान यांचे चरित्र, मुंबई, १९२०.

जोग, रा. श्री.