पांगारकर , लक्ष्मण रामचंद्र : (३१ जुलै १८७२–१०नोव्हेंबर १९४१). प्राचीन मराठी वाङ्मयाचे इतिहासकार, मराठी संतचरित्रकार, हरिभक्तपरायण भागवतधर्मप्रचारक आणि रसाळ वक्ते. जन्म चिपळूणचा. त्यांच्या घराण्याचे मूळ गाव पांगरी (ता. बार्शी जिल्हा सोलापूर). तथापि पुढे त्यांचे घराणे पुण्याजवळील पौड येथे स्थायिक झाले. पांगारकरांच्या वडिलांचे नाव कृष्णाजी. तथापि पांगारकर हे आपले चुलते रामचंद्रपंत ह्यांना दत्तक गेले होते. पांगारकरांचे प्राथमिक शिक्षण पौड येथे, माध्यमिक शिक्षण पुण्याच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’ मध्ये आणि उच्च शिक्षण मुख्यतः पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. १८९९ मध्ये ते बी. ए. झाले. त्यानंतर पंढरपूर, पुणे, अमरावती येथे ते शिक्षक म्हणून होते. हा व्यवसाय सोडून १९०७ मध्ये ‘भक्तिज्ञानवैराग्यविवर्धक विचारांच्या लहरी स्वधर्मबांधवात वाढीस लावाव्या’ ह्या हेतूने मुमुक्षु  नावाचे साप्ताहिक त्यांनी धुळे येथे काढले. पुढे ह्या साप्ताहिकाचे मासिकात रूपांतर करून ते त्यांनी पुण्यास आणले. मुमुक्षूचे १९३० पासूनचे अंक नासिकहून निघाले. मुमुक्षु  काढल्यानंतर लेखन-संशोधन-प्रवचन-हरिभक्तिप्रसार अशा कार्यांनाच त्यांनी वाहून घेतले. १९१६ ते १९२३ ह्या कालखंडात इंदूर संस्थानचे महाराज तुकोजीराव होळकर ह्यांच्याकडे परमार्थाचे शिक्षक म्हणून त्यांचे जाणे-येणे आणि वास्तव्य असे आयुष्यातली अखेरची बरीच वर्षे त्यांनी नासिकला काढली. वर्धा येथे ते निधन पावले.

लक्ष्मण सामच्रंद पांगारकरपांगारकर ह्यांना प्राचीन मराठी काव्याची गोडी होती त्यांचे पाठांतरही उत्तम होते. त्यांनी संकलित केलेली स्तोत्रे, भूपाळ्या, आरत्या, अभंग व पदे भक्तिमार्गप्रदीप ह्या नावाने प्रसिद्ध झालेली आहेत (१९०४). मोरोपंत हे त्यांचे एक अत्यंत आवडते कवी. त्यांची निवडक कविताही–मोरोपंती वेचे (१९०५)– पांगारकरांनी प्रसिद्ध केलेली आहे. मराठी भाषेचे स्वरूप हे पांगारकरांनी लिहिलेले पहिले पुस्तक. त्यात प्राचीन मराठी साहित्याचे थोडक्यात समीक्षण केलेले आहे. पांगारकरांचा पहिला मोठा ग्रंथ म्हणजे मोरोपंत–चरित्र – आणि काव्यविवेचन (१९०८) हा होय. पूर्वार्धात दिलेले पंतांचे चरित्र तसेच उत्तरार्धातील पंतकाव्याचे विवेचन लेखकाच्या रसाळ व सहृदय पंतभक्तीचा नमुनाच म्हणावा लागेल. या ग्रथांने पांगारकर चांगलेच प्रसिद्धीस आले. पुढे त्यांनी अनेक विषयांवर संशोधन व लेखन करून ग्रंथनिर्मिती केली. एकनाथी भागवत (१९१०) हा सार्थ व सटीप संपादित ग्रंथ, श्रीएकनाथ महाराजांचे संक्षिप्त चरित्र (१९११), श्रीज्ञानेश्वर महाराज-चरित्र व ग्रंथविवेचन (१९१२), श्रीतुकाराम चरित्र (१९२०) अशी संतचरित्रे त्यांनी लिहिली. संतचरित्रे लिहिण्यासाठी आवश्यक असलेली मनोभूमिका पांगारकरांच्या ठायी होती. उत्कट भक्तिभावामुळे ते संतांच्या जीवनाचे व कार्यांचे मर्म सहृदयपणे समजून घेऊ शकले. त्यांची भाविक वृत्ती चिकित्सकपणाला पारखी झालेली नव्हती त्यामुळे चरित्रांची साधने ते परिश्रमपूर्वक जमवीत. तथापि भाविकतेने त्यांच्या चिकित्सादृष्टीवर मात केल्याचा प्रयत्य त्यांचे चरित्रग्रंथ वाचताना अनेकदा येतो. संतांच्या जीवनातील आणि काव्यातील दोष दाखविणे त्यांना योग्य वाटत नसे. संतांनी केलेल्या चमत्कारांच्या पारंपारिक कथांवर अविश्वास दाखवू नये, अशीही त्यांची भूमिका होती. त्यांच्या भाविक वृत्तीचा ठसा त्यांच्या लेखनशैलीवरही उमटलेला आहे. कोणाही सत्पुरुषाचे वर्णन ते नम्रभावाने करतात, असा आक्षेप त्यांच्यावर घेतला जातो परंतु पांगारकरांच्या लेखनशैलीतील वाङ्मयगुणही त्यांच्यातील भाविकतेतूनच बव्हंशी आलेले आहेत. त्यांनी निरंजनमाधव ह्या कवीच्या काव्याचेही साक्षेपी संपादन केले आणि त्याचे तीन भाग प्रसिद्ध केले (भाग पहिला १९१९ दुसरा-तिसरा १९२७). कविवर्य मुक्तेश्वर–चरित्र आणि काव्यविवेचन (१९२२), संत–चरित्र–माला (१९२२) यांसारखे अभ्यासपूर्ण ग्रंथलेखन ते करीत होते. शिवाय समर्थ संजीवनी म्हणजेच समर्थांच्या शिकवणी ऊर्फ रामदासी वेंचे (१९२४), श्री समर्थ ग्रंथभांडार (समर्थ रामदासस्वामींचे समग्र ग्रंथ) हा पूर्वार्ध-उत्तरार्ध असलेला प्रचंड ग्रंथ (१९२७) आणि गद्य अनुवादासह संपादित केलेला सार्थ दासबोध (दुसरी आवृ. १९२९) हे समर्थकाव्यावरील ग्रंथही प्रसिद्ध केले. महाभारताचे मराठी अवतार, ज्ञानेश्वरांची प्रभावळ (१९२८) या त्यांच्या ग्रंथांनी अभ्यासकांची मोठीच सोय झाली.

अशा प्रकारे अनेक वर्षे प्राचीन मराठी कवी आणि त्यांचे काव्य यांच्याशी एकरूप झालेले पांगारकर प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास प्रसिद्ध करण्याच्या अवस्थेपर्यंत आले. त्या इतिहासाचे कालसापेक्ष असे तीन भाग कल्पून त्यांनी हे इतिहास–खंड प्रसिद्ध केले. मराठी  वाङ्मयाचा इतिहास–खंड १ ला (१९३२) यात ज्ञानेश्वर–नामदेव व त्यांचे समकालीन कवी खंड २ रा (१९३५) यात एकनाथ-तुकाराम व त्यांचे समकालीन कवी खंड ३रा (१९३९) यात रामदास आणि तत्कालीन कवी यांची माहिती आली आहे. ह्या खंडाची अखेरची १२९ पृष्ठे ज. र. आजगावकर ह्यांच्या हातची आहेत. वृद्धापकाळाने थकून गेल्याने हा ग्रंथ पांगारकर स्वतः पूर्ण करू शकले नाहीत. पाल्हाळ, पुनरुक्ती असे दोष ह्या इतिहासलेखनात असले, तरी ते खंड माहितीपूर्ण आहेत. चरित्रचंद्र (१९३८) हे पांगारकरांचे आत्मचरित्र. 

मुमुक्षु  या पत्रात पांगारकरांनी पारमार्थिक, संशोधनपर तसेच सामाजिक व राजकीय अशा विषयांवरील अनेक लेख लिहिले. राजकारणात ते लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. पहिल्या दोन वर्षांतील लेखांचे दोन भाग मुमुक्षुचे उद्गार (१९०८ व १९०९) या नावाने प्रसिद्ध झाले. सरकारने ते जप्त केले. तसेच रामदासी बोवा (१९०७) हे पुस्तकही जप्त झाले. मुमुक्षूत आलेल्या लेखांवरून पुढे बरीच पुस्तके प्रसिद्ध झाली. उदा., पारिजातकाची फुले (१९१३) नारदभक्तिसूत्रे, सार्थ व सटीक (१९१४) नवविधा भक्ति (दुसरी आवृ.१९२६), भक्तिमणिमाला (१९२४), टिळकांचे अल्प चरित्र आणि संस्मरणीय उक्ति (१९०८) मुमुक्षूचे सिंहावलोकन म्हणजेच मुमुक्षूतील निवडक निबंध–भाग १ (१९२३), भाग२ (१९२३) आणि भाग ३ (१९२९). 

पांगारकरांनी प्राचीन मराठी वाङ्मयाचे अत्यंत आवडीने आणि समरसतेने अध्ययन केले होते. मराठी भाषा आणि इतिहास यांचा साक्षेपी व्यासंग करून, आपल्या लेखणीचा आणि वाणीचा प्रभावी वापर करून, जनमानसात या विषयांची गोडी निर्माण करण्याचे कार्य त्यांनी आमरण केले. ते श्रद्धाळू, भक्तिपरायण आणि एकनिष्ठ अभ्यासक होते. मराठी भाषेचा इतिहास ‘स्वराज्यातील कवी’ या चौथ्या खंडाने पूर्ण करण्याचा त्यांना प्रयत्न होता तथापि त्यांच्या निधनामुळे तो अपूर्ण राहिला.

गोखले, म. वि.