मोरोपंत :(१७२९–१७९४)­­ : प्राचीन मराठी पंडीत कवींचे अग्रणी, आर्याभारतकार. संपूर्ण नाव मोरेश्वर रामचंद्र पराडकर. जन्मस्थान पन्हाळगड. शिक्षण तेथेच केशव पाध्ये व गणेश पाध्ये या बंधुद्वयाकडे झाले. त्यांच्याजवळ मोरोपंतांनी काव्य, व्युत्पत्ती, अलंकार, वेदान्त इ. विषयांचे अध्ययन केले व शिक्षणक्रम पूर्ण करून ते पन्हाळगडावरून बारामतीस आले आणि तेथे पेशव्यांचे जावई व सावकार बाबूजी नाईक यांच्याकडे त्यांचे आश्रित पुराणिक म्हणून राहिले. त्यांच्या ठिकाणी कवित्वशक्ती मूळची होतीच तिला या पुराणिकाच्या व्यवसायामुळे अधिक चालना मिळाली. बारामतीस येऊन स्थायिक झाल्यावर त्यांनी पुराणकथन, ग्रंथावलोकन आणि काव्यरचना यांशिवाय अन्य उद्योग केला नाही. वयाच्या साठाव्या वर्षी मोरोपंतांनी काशीयात्रा केली आणि त्यानंतर लौकरच त्यांचे निधन झाले.

मोरोपंतांची काव्यरचना विपुल असून तिचे कालक्रमानुसार पाच खंड पडतात. काव्यरचनेला प्रारंभ त्यांनी वयाच्या बाविसाव्या-तेविसाव्या वर्षी केला असे मानल्यास पहिली दहा वर्षे (सु.१७५० ते १७६०) त्यांनी उमेदवारीत घालवली असे म्हणता येईल. विविध वृत्तांमध्ये रचिलेले कुशलव्याख्यान हे त्यांचे पहिले काव्य. त्याशिवाय या प्रारंभीच्या कालखंडात त्यांनी शिवलीलांचे वर्णन करणारा ब्रम्होत्तर खंड आर्यावृत्तात लिहिला आणि भागवताच्या दशम स्कंधाच्या आधारे आर्यागीतावृत्तात कृष्णविजय लिहिण्यास सुरुवात केली. याच काळात प्रल्हादविजयाची रचनाही त्याच वृत्तात केली. यापुढील पाच वर्षांचा काळ (१७६१ ते १७६५) त्यांच्या श्लोकबद्ध रचनेचा कालखंड होय. पूर्वी आर्यागीतिवृत्तात आरंभिलेला कृष्णविजय हा काव्यग्रंथ त्यांनी या काळात श्लोकबद्ध रचनेने पुढे चालविला. त्यापुढील तिसरा कालखंड १७६६ ते १७७२ पर्यंतचा सहा वर्षांचा असून या काळातील रचनेचा मुख्य विशेष म्हणजे आर्यावृत्ताचे पूर्णपणे प्रस्थापित झालेले प्राबल्य होय. कृष्णविजयाची समाप्ती या कालखंडात झाली. त्याशिवाय सीतागीत, सावित्रीगीत आणि रुक्मिणीगीत ही तीन ओवीबद्ध काव्ये याच काळात लिहिली गेली. मंत्ररामायण, आर्याकेकावली, संशयरत्नावली, नामसुधाचषक इ.ईशस्तोत्रे व काही भागवती स्तोत्रेही याच काळातील होत. यापुढील दहा वर्षांचा (१७३३ ते १७८३) कालखंड मोरोपंतांच्या काव्यजीवनात अत्यंत महत्त्वाचा असून त्याला महाभारतरचनेचा कालखंड म्हणता येईल. आतापर्यंत घटवून चांगले तयार केलेले आर्यावृत्त त्यांनी महाभारताच्या रचनेसाठी योजिले व महाराष्ट्राच्या हाती आपले मराठी आर्याभारत दिले. या दहा वर्षांत त्यांनी त्याशिवाय विशेष काही लिहिले नाही. त्यांच्या काव्यरचनेचा अखेरचा कालखंड म्हणजे महाभारताच्या समाप्तीपासून ते त्यांच्या निधनापर्यंतचा काळ. या अखेरच्या सु. बारा वर्षांत मंत्रभागवत, हरिवंश, संकिर्ण रामायणे आणि मुख्य म्हणजे श्लोककेकावली हे त्यांचे अखेरअखेरचे काव्य असावे असे त्यातील ‘कृतान्तकटकामलध्वजजरा दिसो लागली’ या उद्‌गारांवरून वाटते.

ह्याप्रमाणे मोरोपंताच्या काव्यार्णवाची रूपरेषा आहे. तो खरोखरच अर्णव आहे, नाना प्रकारच्या काव्यरत्नांनी समृद्ध आहे. मोरोपंत स्वतः रामभक्त आणि सत्त्वशील वृत्तीचे गृहस्थाश्रमी असले, तरी त्याबरोबर त्यांच्या ठिकाणी पांडित्यही होते. त्यांची बहुश्रुतता त्यांच्या काव्यात पदोपदी दिसते. आर्यावृत्त त्यांनी अतिकौशल्याने वापरले यात शंकाच नाही. पण त्याचबरोबर यमक रचनेतील चमत्कृतीचा हव्यास आणि अट्टाहास यांमुळे त्यांची आर्या अनेकदा क्लिष्ट आणि नीरस होते हेही मान्य केले पाहिजे. तसेच रामभक्त असल्यामुळे १०८ रामायणे रचण्याच्या प्रतिज्ञापूर्तीसाठी आपण औचित्यविचाराला, प्रसादगुणाला, सरसपणाला फाटा देतो, याचे भान त्यांना राहिलेले नाही. त्यामुळे त्यांची ही रामायणे संख्येने विपुल दिसली, तरी गुणांनी ती तशी नाहीत. रा. श्री. जोग म्हणतात त्याचप्रमाणे ‘कसरत आणि कला यांमध्ये असणारा फरक येथे चांगलाच जाणवतो’. पण चमत्कृतीच्या व्यसनापायी येणारे असे काही दोष सोडले, तर मोरोपंतांनी काव्यरचनेचा उच्चांक गाठला असेच म्हणावे लागेल. त्यांचे वृत्तप्रभुत्व, शुद्ध भाषा, रसाळ निवेदन, प्रत्ययकारी वर्णनशैली आणि प्रभावी व्यक्तीदर्शन हे सर्व काव्यगुण विशेषेकरून त्यांच्या आर्याभारतात एकवटलेले दिसतात. तसेच संयम हाही त्यांच्या काव्याचा एक मोठा गुण आहे. पण या संयमामुळेच कधी-कधी रसोत्कर्ष व्हावा तितका उत्कट होत नाही.

मोरोपंतांच्या कवितेचा प्रसार त्यांच्या काळात विठोबादादा चातुर्मासे, शाहीर रामजोशी वगैरेंनी पुष्कळ केला. त्यानंतरही हरिदासांनी व किर्तनकारांनी त्यांची कविता लोकप्रिय केली. परंतु त्यांच्या कवितेविषयी टिकाकारांत मतैक्य नाही. त्यांच्या काव्यातील यमकजन्य क्लिष्टतादी दोषांची चर्चा आजवर पुष्कळ झाली आहे. परंतु विशेषतः त्यांच्या केकावलीवर न्या. रानडे यांच्यासारख्यांनी आक्षेप घेतल्यामुळे मोरोपंतांची कविता हा एक वादविषय होऊन राहिला. त्याचे संपूर्ण दर्शन व मोरोपंतांचे प्रभावी समर्थन विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेतील ‘मोरोपंतांची कविता’ या प्रदीर्घ लेखात होते. त्यानंतरही ल. रा. पांगारकर आणि श्री. ना. बनहट्टी यांनी स्वतंत्र ग्रंथ लिहून मोरोपंती कवितेचे रसिकावलोकन पुष्कळ केले. पण शेवटी ‘मोरोपंतांनी आपल्या वाक्‌कन्यकेला नानाविध अलंकारांनी नटवून सजवून आपल्या रसिक वाचकांबरोबर तिचे सालंकृत कन्यादानच करून दिले आहे’, हा महाराष्ट्रसारस्वतकार भावे यांचाच अभिप्राय योग्य वाटतो. मोरोपंतांच्या सुसंस्कृत व समृद्ध काव्यरचनेमुळे मराठी भाषा श्रीमंत झाली यात संशय नाही. मोरोपंतांचे समग्र काव्य रा. द. पराडकर ह्यांनी संपादित केले (९ खंड, १९१२–१६). त्याचे पुनर्मुद्रण १९६४–७२ ह्या काळात करण्यात आले.

संदर्भ : १. पांगारकर, ल. रा. मोरोपंत-चरित्र्य आणि काव्यविवेचन, मुंबई, १९०८.

            २. प्रियोळकर, अ. का. पराडकर, मो. दि. जोशी, दामोदरपंत, कविवर्य मोरोपंतांचे समग्र ग्रंथ (९ खंड, मुंबई १९६४–७२).

            ३. बनहट्टी, श्री. ना. मयूरकाव्यविवेचन, पुणे, १९२६.

तुळपुळे, शं. गो.