सगनभाऊ : (सु. १७७८- सु. १८५०). मराठी शाहीर व लावणीकार. तो मुसलमान असून धंदयाने शिकलगार म्हणजे हत्यारांना धार लावणारा कारागीर होता पण या पिढीजाद धंदयात त्यास विशेष रस नव्हता, म्हणून तो पुण्याला गेला. मूळ गाव जेजुरी असूनही त्याचे बहुतेक सारे आयुष्य पुण्यातच गेले. तो नाथसंप्रदायी असून मराठी संत व हिंदू धर्मपरंपरा यांचा जाणकार व आदरकर्ता होता. सिंधू रावळ हा नाथपंथी शाहीर त्याचा गुरू होता. आपल्या लावण्यांत तो विठ्ठल, पंढरी, ज्ञानेश्वर, जनाबाई, तुकाराम ह्यांचा उल्लेख अनेकदा करतो. दुसऱ्या बाजीरावाचा त्याला आश्रय होता. दुसऱ्या बाजीरावाच्या विलासावर त्याने लावण्या रचिल्या आहेत. शाहीर ⇨ होनाजी बाळा याच्याशी त्याची चुरस असे. होनाजीप्रमाणे यानेही रागदारीत रचना केली आहे. त्याच्या फडात गाणाऱ्या साथीदारांपैकी रामा गोंधळी हा उत्कृष्ट आणि विशेष प्रसिddhहोता. सगनभाऊच्या अनेक लावण्या कमालीच्या शृंगारिक आहेत तथापि त्या भेदिक आहेत असाही दावा करण्यात येतो. त्याने पोवाडेही रचिले आहेत. त्यांतील ‘ पानपतचा पोवाडा ’ व ‘ खडकीची लढाई ’ (पोवाडा) हे उल्लेखनीय आहेत. पेशवाई बुडाल्यानंतर तो साताऱ्यास प्रतापसिंह महाराजांच्या आश्रयाला आलेला दिसतो. प्रतापसिंह महाराजांवर त्याने काही पोवाडे लिहिले आहेत. प्रतापसिंह महाराजांना इंग्रजांनी पदच्युत केल्यानंतर ‘प्रतापसिंह महाराजांची काशीस रवानगी ’ हा पोवाडा त्याने लिहिला.
सगनभाऊच्या लावण्या आजही तमाशात व बैठकीत गायिल्या जातात. त्याच्या रचना भावनोत्कट व प्रत्ययकारी वर्णनांनी सजलेल्या असून भाषा सहजसुंदर आहे. लावणीची जुनी परंपरा सगनभाऊच्या मृत्यूनंतर प्राय: संपुष्टात आली, असे त्या क्षेत्रातील विव्दान मानतात. सगनभाऊकृत लावण्या व पोवाडे : भाग १ हा संग्रह चि. सी. जहागीरदार व गो. गो. अधिकारी यांनी संपादून प्रसिद्ध केला आहे (१९२४).
संदर्भ : १. ढेरे, रा. चिं. मुसलमान मराठी संतकवी, पुणे, १९६७.
२. मोरजे, गंगाधर, मराठी लावणी वाङ्मय, पुणे, १९७४.
धोंड, म. वा.