दामाजीपंत : (चौदावे शतक). मराठी संत. बीदरच्या बादशहाच्या पदरी, मंगळवेढे येथे तो कमाविसदास (ठाणेदार) होता. दुर्गादेवीच्या दुष्काळात सरकारी कोठारांतील धान्य त्याने गोरगरिबांकडून लुटविले आणि त्यांचे प्राण वाचविले. बादशहाने त्याला पकडून आणण्याचा हुकूम काढला. तथापि मंगळवेढ्याच्या विठ्या महाराने स्वतःजवळचे सर्व द्रव्य गोळा करून लुटविलेल्या धान्याची किंमत सरकारात चुकती केली आणि दामाजीपंताच्या नावे पावती घेतली. वि. का. राजवाडे ह्यांना मिळालेल्या एका जुन्या महजरावरून ही घटना ऐतिहासिक दृष्ट्या सत्य असल्याचे दिसून येते. ह्या प्रसंगावर खुद्द दामाजीपंताने लिहिलेले एक पदही मिळते. ह्या विठ्या महाराची बादशहाने अगत्याने चौकशी करून ‘हकदर उपकार पोटास भाकरी व बसावयास जागा करून दिल्ही. धडुत पांघरूण कृपा करून दिल्हे’ असे उपर्युक्त महजरात म्हटले आहे. पंढरीच्या विठ्ठलानेच विठ्या महाराचे रूप घेऊन दामाजीपंताचे प्राण आणि अब्रू वाचविली अशा भावनेने ह्या प्रसंगावर काव्ये रचिली गेली आहेत. पुढे दामाजीपंत नोकरी सोडून आपल्या कुटुंबियासह पंढरपुरास आला आणि तेथेच विठ्ठलभक्तीत त्याने आपला काळ घालविला.

सुर्वे, भा. ग.