स्टीफन्स, फादर : (१५४९—१६१९). जेझुइट पंथीय मराठी कवी. जन्माने इंग्रज. इंग्लंडच्या बुल्टशर परगण्यातील बोस्टन येथे जन्म. शिक्षण विंचेस्टर येथे. टॉमस स्टीव्हन्स तसेच पाद्री एस्तवाँ या नावांनीही परिचित. ग्रीक-लॅटिन भाषांचा अभ्यास त्यांनी खाजगी रीत्या केला असावा. त्यांचे वडील व्यापारासाठी लंडनला आले होते तथापि राणी पहिली एलिझाबेथ हिच्या कारकीर्दीत कॅथलिकांचा छळ सुरू झाला, तेव्हा स्टीफन्स रोमला आले. तेथे त्यांनी जेझुइट पंथाची दीक्षा घेतली (१५७५). तसेच ख्रिस्ती धर्मशास्त्राचा अभ्यास केला. पोतुर्गीज भाषाही ते शिकले आणि पोतुर्गीज मिशनतर्फे ते गोव्याला आले (१५७९). धर्मप्रचार हा त्यांचा हेतू होता. मराठी भाषा ते केव्हा आणि कशी शिकले हे निश्चितपणे सांगता येत नाही तथापि वसईच्या प्रचारकेंद्रात त्यांनी वर्षभर मराठीचे अध्यापन केले होते ( सु. १६११ ). ह्या वर्षभराचा अपवाद सोडता, सु. ४० वर्षे ते गोव्याच्या सासष्टी प्रांतात धर्मप्रचार करीत होते. रायतूरच्या ( तालुका साष्टी, गोवा ) जेझुइट कॉलेजचे रेक्टर म्हणूनही त्यांनी काम पाहिले (१५९०—९४).

फादर स्टीफन्स ह्यांनी तीन ग्रंथांची रचना केली : (१) दौत्रीन क्रिश्तां (१६२२), (२) ⇨ क्रिस्तपुराण व (३) कोकणीचे भाषेचे व्याकरण.

दौत्रीन क्रिश्तां हे पुस्तक ( पृष्ठे ६४) प्रश्नोत्तररूप असून ख्रिस्ती धर्मतत्त्वावर पाद्री मार्कुस जॉर्ज ह्याने पोर्तुगीज भाषेत लिहिलेल्या पुस्तकाचे हे भाषांतर असल्याचा निर्देश आढळतो. हे पुस्तक गोव्यातील ब्राह्मणांच्या बोलीत — ब्राह्मण कानारीत — लिहिलेले आहे. कानारी म्हणजे कोकणी वा किनार्‍यावरील बोली. लहान मुलांना तसेच ग्रांथिक मराठी ज्यांना येत नाही अशांना ख्रिस्ती धर्माची ओळख व्हावी, हा हे पुस्तक लिहिण्याचा हेतू. रायतूरच्या जेझुइट कॉलेजात हे पहिल्यांदा छापले गेले. ह्या पुस्तकाची एक प्रत लिस्बनच्या सरकारी ग्रंथालयात ठेवण्यात आली आहे. रोमला पोपच्या ग्रंथालयातही त्याची एक प्रत मिळाली आहे. ह्या पुस्तकाची लिपी रोमन आहे. १९६५ मध्ये हिची नागरी आवृत्ती निघाली ( संपा. अ. का. प्रियोळकर ).

क्रिस्तपुराणाचे मूळ नाव दिष्कुर्सु सोब्रि अ व्हिन्द द जेजू क्रिश्तु नॉस्सु साल्वादोर द मुन्दु असे आहे. ‘ पैले पुराण ’ ( ओल्ड टेस्टामेंट ) आणि ‘ दुसरे पुराण ’ ( न्यू टेस्टामेंट ) असे याचे दोन भाग आहेत ( प्रथमावृत्ती १६१६). पोर्तुगीजांनी गोव्यात हिंदूंचे सक्तीने धर्मांतर घडवून आणले, तरी ह्या नवख्रिश्चनांना ख्रिस्ती धर्माची काहीच माहिती नव्हती. ह्या धर्माचे ग्रंथही लॅटिन व पोर्तुगीज भाषांत होते आणि ह्या भाषा त्यांना येत नव्हत्या. त्यामुळे त्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी स्टीफन्सनी हा ग्रंथ लिहिला. १६४९ व १६५४ मध्ये त्याची अनुक्रमे दुसरी व तिसरी आवृत्ती निघाली तथापि ह्यांपैकी एकही आवृत्ती आज उपलब्ध नाही. ग्रंथाची लिपी रोमन होती. त्याची देवनागरी लिपीतली प्रत १९५६ मध्ये निघाली ( संपा. शांताराम बंडेलू ). ह्या ग्रंथात स्टीफन्सनी मराठी भाषेचा गौरव केलेला आहे.

कोकणीचे भाषेचे व्याकरण ह्या ग्रंथाचे पोर्तुगीज नाव आर्ति द लिंग्व कानारी. हे पोर्तुगीज भाषेत लिहिलेले आहे. १६४० मध्ये रायतूर येथे त्याचे मुद्रण झाले. हे परदेशी मिशनर्‍यांच्या उपयोगासाठी लिहिण्यात आले. ह्या व्याकरणाचे कर्ते फादर स्टीफन्स असले, तरी त्यावर काही संस्कार इतरांनी केलेले आहेत. प्रथम ⇨ दिओगु पाद्री रिबैरु ह्यांनी त्यात काही भर घातली. त्यानंतर चार पाद्र्यांनी काही सुधारणा केल्या. देशी भाषांचे मुद्रित झालेले हे पहिले व्याकरण. ह्याची दुसरी आवृत्ती १८५७ मध्ये निघाली.

जेझुइट मिशनर्‍यांच्या मराठी वाङ्मयनिर्मितीस फादर स्टीफन्स ह्यांच्यापासून आरंभ झाला असे म्हणता येईल. धर्मप्रसाराच्या हेतूने गोव्यात येऊन तेथील लोकांची कोकणी भाषा ते शिकले मराठीचाही त्यांनी अभ्यास केला आणि त्या भाषांवर मनापासून प्रेमही केले.

पहा : क्रिस्तपुराण भारतविद्या.

संदर्भ : पिंगे, श्रीनिवास मधुसूदन, यूरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा, पुणे, १९६०.

कुलकर्णी, अ. र.