नाथपंचक : संत ⇨एकनाथ आणि त्यांचे समकालीन चार प्रमुख ग्रंथकार मिळून ‘नाथपंचक’ मानले जाते. विठा रेणुकानंदन, जनीजनार्दन, रामाजनार्दन आणि ⇨दासोपंत हे नाथपंचकातील एकनाथांबरोबरचे चार ग्रंथकार. विठा रेणुकानंदन हे राजवाड्यांच्या मते सोळाव्या शतकातले. त्यांची काही पदे उपलब्ध आहे. त्यांच्या एका पदात ‘विठ्याचा स्वामी रेणुकानंदन’ असा उल्लेख आहे. त्यावरून ‘रेणुकानंदन’ हे त्यांच्या गुरूंचे नाव असावे, असा एक तर्क केला जातो. हे देवी-उपासक होते आणि रेणुकादेवीचे एक मंदिरही त्यांनी बांधले होते, असे म्हणतात. ते रामभक्तही होते आणि सीतास्वयंवर नावाचे एक काव्य त्यांनी लिहिलेले आहे. त्याशिवाय काही पदे, अभंग, धावा (२० कडवी) आणि उत्तर (२१ कडवी) अशी त्यांची काही स्फुट रचनाही आढळते. जनीजनार्दनांचे स्वतःचे नाव जनार्दन. त्यांना त्यांच्या आईच्या ‘जनी’ या नावाची जोड देऊन लोक ‘जनीजनार्दन’ म्हणून ओळखू लागले. आपल्या पदांतून ते स्वतःचा उल्लेख बहुशः ‘जनार्दन’ असा करतात. त्यांचे उपनाव ‘गोसावी’ असे होते. ते भूम ह्या गावचे. तेथे त्यांची एक समाधी आहे. त्यांची दुसरी समाधी बीड पाटांगण येथे आहे. तीवर १५२४ असा शकाचा उल्लेख आहे. गणपती हे जनीजनार्दनांचे उपास्य दैवत. निर्विकल्प हा कृष्णउद्धवसंवादरूपाने विविध आध्यात्मिक प्रश्नांचे विवरण करणारा ग्रंथ, गोड आणि प्रासादिक अशी काही हिंदी-मराठी पदे, महावाक्यविवरण हे वेदान्तरपर प्रकरण आणि सीतास्वयंवर हे पौराणिक आख्यान जनीजनार्दनांनी लिहिले आहे. ह्यांखेरीज जानकी-सैंवर हे कोणा जनार्दनाने लिहिलेले एक ओवीबद्ध काव्य धुळ्याच्या राजवाडे संशोधन मंदिरात आहे. ते जनीजनार्दनांचेच असल्याचे एक मत आहे. रामाजनार्दनांविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यांनी रचिलेली ज्ञानेश्वरांची आरती मात्र प्रसिद्ध आहे. ह्या आरतीखेरीज त्यांनी अनंतभुजाची आरती लिहिल्याचे उल्लेख आढळतात. त्याशिवाय त्यांचे ५ अभंगही आहेत. त्यांनी ज्ञानेश्वरीची प्रत केल्याची माहिती मिळते. दासोपंत हे नाथपंचकातील सर्वांत महत्त्वाचे कवी. ते दत्तभक्त होते. गीतार्णव ही गीतेवरील विस्तृत टीका, पदार्णव (मधुर, भावपूर्ण पदे ), ग्रंथराज हा अध्यात्मपर ग्रंथ आणि एका पासोडीवर लिहिलेले पंचीकरणनामक १,६०० ओव्यांचे एक प्रकरण ह्या दासोपंतांच्या प्रमुख कृती होत. त्यांच्या ग्रंथराजाचा समर्थांच्या दासबोधावरील प्रभाव लक्षणीय आहे. दासबोधातील अनेक विषय ग्रंथराजात विवेचिलेले आहेत.

उपास्य दैवत, गुरुपरंपरा, ग्रंथरचना ह्या बाबींत नाथादी पाचजणांत विशेषसे साम्य आढळत नसल्यामुळे ‘नाथपंचक’ ही संज्ञा मात्र फारशी अन्वर्थक नाही, असे मत काही अभ्यासकांकडून व्यक्त झालेले आहे.

कुलकर्णी, अ. र.