ब्राह्मी लिपि : भारतातील एक अत्यंत महत्त्वाची प्राचीन लिपी. भारतातील सर्व लिपींची ही जननी आहे. साक्षात ब्रह्मदेवाने ही लिपी शोधली म्हणून हिचे नाव ‘ब्राह्मी’ पडले, अशी आख्यायिका आहे.

उत्पत्ती : ब्राह्मी लिपीच्या उत्पत्तीविषयी विद्वानांत मतमतांतरे आहेत. ⇨ अलेक्झांडर कनिंगहॅम (१८१४-९३) यांच्या मताप्रमाणे भारतीय चित्रलिपीवरून ब्राह्मी लिपीची उत्पत्ती झाली असावी तथापि सिंधू संस्कृतीच्या चित्रलिपीमधून ब्राह्मी लिपी उत्पन्न झाली असण्याची शक्यता दिसत नाही. सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाचा काल इ. स. पू. १७०० हा धरला, तर या संस्कृतीच्या लिपीचा काळ आणि ब्राह्मी लिपीचा प्राचीनतम काळ यांमध्ये जवळजवळ १,५०० वर्षांचे अंतर पडते. इ. स. पू. ३२० पूर्वीच्या काळातील ब्राह्मी लिपीचे नमुने आजतरी उपलब्ध नाहीत. तसेच लेखनाचेही पुरावे भारतामध्ये अद्याप तरी सापडले नाहीत.⇨ गेओर्ख ब्यूलर (१८३७-९८) यांना एरण येथे इ. स. पू. तिसऱ्या शतकातील नाणे सापडले. त्या नाण्यावरील अक्षरे उजवीकडून डावीकडे लिहिलेली आहेत. येर्रागड्डा येथील अशोकाचा लेख नांगरटीप्रमाणे म्हणजे एक ओळ डावीकडून उजवीकडे आणि दुसरी ओळ उजवीकडून डावीकडे असा लिहिला आहे. परंतु अहमद हसन दानी यांच्या मते, एरण येथील नाणे टाकसाळीतच चुकीने पडले आहे आणि येर्रागड्डा येथील लेख धेडगुजरी पद्धतीने लिहिला आहे. त्यामुळे कोणताही कयास त्यावरून करणे चुकीचे ठरेल. ए. वेबर यांच्या मते ब्राह्मीची उत्पत्ती प्राचीन सेमिटिक लिपीपासून, तर डब्ल्यू. डीके आणि आय्. टेलर यांच्या मते ती दक्षिण सेमिटिक लिपीपासून झाली. जोझेफ हालेव्ही यांच्या मताप्रमाणे ब्राह्मी लिपी ही इ. स. पू. चौथ्या शतकातील ॲरेमाइक, खरोष्ठी आणि ग्रीक लिपींची खिचडी आहे. एडवर्ड क्लॉड यांच्या मते फिनिशियन लिपीपासून सेबिअन लिपी उत्पन्न झाली आणि तिच्यापासून ब्राह्मी निर्माण झाली. तथापि सेबिअन लिपी भारतीय लिपीपेक्षा प्राचीन आहे व तिच्याशी तुलना करण्यासाठी त्या काळातील भारतीय लिपीचे पुरावे अस्तित्वात नाहीत. त्यामुळे ब्राह्मी लिपीची सेबिअन लिपीशी सांगड घालता येत नाही. जोझेफ हालेव्ही यांचे मतही संपूर्णतया निराधार आहे कारण ॲरेमाइक व ग्रीक लिपींच्या कितीतरी शतके आधी ब्राह्मी लिपीचा लोक उपयोग करीत होते. गेओर्ख ब्यूलर आणि अहमद हसन दानी यांच्या मते ब्राह्मी लिपी फिनिशिया ते मेसोपोटेमिया यात अस्तित्वात असलेल्या उत्तर सेमिटिक लिपीपासून उत्पन्न झाली.

नॉर्थ सेमिटिक

 

ब्राह्मी

 अक्षराचे नाव 

 नॉर्थ सेमिटिक अक्षर 

 

 ब्राह्मी अक्षर 

 सदृश मराठी अक्षर 

अलेफ्

 

गिमेल्

 

तेथ्

 

योद्

 

लामेद्

 

पे

 

शिन्

 

ताव्

 

कोफ्

 

अयिन्

 

झयिन्

 

नॉर्थ सेमिटिक व ब्राम्ही यांतील साम्यदर्शक तक्ता


राजबली पांडे आणि ⇨ गौरीशंकर ओझा (१८६३-१९४०) यांच्या मते ब्राह्मीच्या निर्मितीचे श्रेय सर्वस्वी भारतीय पंडितांकडेच जाते. गौरीशंकर ओझा यांनी उपनिषदे, आरण्यके यांमधील स्वर, व्यंजने, व्यंजनांचे घोष, अघोष, दन्तव्य, तालव्य, मूर्धन्य यांसारखे बारकावे लेखनविद्येशिवाय येणार नाहीत, असे साधार दाखवून दिले. ऐतरेय ब्राह्मणात अकार, उकार आणि मकार प्रकार यांच्या एकत्रीकरणाने ‘ओम्’ या अक्षराची निर्मिती होते, असे दाखवून दिले आहे. ब्राह्मणवर्गाने वेदमंत्र जतन करून ठेवले ते काटेकोर उच्चारण पद्धतीमुळेच हे जरी खरे असले, तरी आर्यांच्या लेखनविद्येविषयीचा कसलाही पुरातत्त्वीय पुरावा उपलब्ध नाही.

या मतमतांतराच्या गलबल्यातून सर्वसामान्यपणे ब्राह्मीची उत्पत्ती उत्तर सेमिटिकपासून झाली, हेच मत ग्राह्य धरले जाते. भारतीय पंडितांनी  या लिपी मध्ये स्वर, व्यंजने, गुण, वृद्धी, ऱ्हस्वदीर्घपद्धती, पाच वर्ग, अक्षरांचे घोष, अघोष इ. भेद अनुनासिके य, र, ल, व हे अर्धस्वर श, ष, स हे उष्म वर्ण हा हा महाप्राण कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दन्तव्य आणि ओष्ठव्य हे अक्षरभेद इ. गोष्टींची नंतर घातलेली भर मौलिक आहे.

ब्राह्मी अक्षरांचे वैशिष्ट्य म्हणजे बहुतेक अक्षरांच्या आकारामध्ये उभा दंड आहे. उभ्या दंडाच्या तळाशी अर्धवर्तुळात्मक आकार अक्षराला पदकाप्रमाणे उजवीकडे अगर डावीकडे लावलेले आहेत. या नियमाल जो अपवाद आहे, तो म्हणजे ग, ज, म, झ इत्यादी अक्षरांचा.

बाजूच्या तक्त्यावरून ब्राह्मी अक्षरांचे उत्तर सेमिटिक अक्षरांशी असलेले साम्य दिसून येते.

ब्राह्मी लिपीमध्ये अ, इ, उ हे तीन स्वर आणि एकोणीस व्यंजने अशी बावीस अक्षरे आहेत. नॉर्थ सेमिटिक लिपीमध्ये तेवढीच अक्षरे आहेत. या बावीस अक्षरांपैकी अकरा अक्षरांचे परस्परांशी साम्य आहे, ही गोष्ट बाजूच्या तक्त्यावरून स्पष्ट होते.

नॉर्थ सेमिटिक लिपीपासून ब्राह्मी लिपी उत्पन्न झाली, हा सिद्धांत मांडताना ब्यूलर यांनी अनेक कारणे दिली आहेत. नॉर्थ सेमिटिक लिपी पॅलेस्टाइन आणि सिरिया या प्रदेशांत अस्तित्वात होती. पॅलेस्टाइनमधील लोकांना फिनिशियन असे नाव होते. ऋग्वेदातील पणी म्हणजेच फिनिशियन लोक असावेत. हे लोक हरहुन्नरी म्हणून प्रसिद्ध होते. भारताचा सुमेरियन आणि बॅबिलोनियन संस्कृतींच्या लोकांशी व्यापारी संबंध होता, ही गोष्ट मोहें जो दडो, हडप्पा, कालिबंगा इ. ठिकाणच्या उत्खननांमध्ये सापडलेल्या मुद्रांवरून सिद्ध झाली आहे. ज्याप्रमाणे व्यापारी वस्तूंची देवाण घेवाण होते त्याचप्रमाणे सांस्कृतिक संबंधांत लिपींचीही देवाण घेवाण झाल्यास नवल नाही. नाईल नदीच्या काठी असलेली ईजिप्शियन संस्कृती आणि सुमेरियन संस्कृती यांच्यामध्ये व्यापारी दळणवळण होते. या दोन संस्कृतींना जोडणारा पॅलेस्टाइन आणि सिरिया हा एक दुवा होता. ईजिप्तमधील ⇨ चित्रलिपीतून रेखालिपीचा उगम झाला. चित्राकृती संकुचित झाल्या आणि त्या कालांतराने अक्षरखुणा ठरल्या. या अक्षरखुणांच्या निर्मितीचे श्रेय पॅलेस्टाइनमधील लोकांनाच द्यावे लागेल. पॅलेस्टाइनमध्ये गेझर येथे इ. स. पू. आठव्या शतकातील लेख सापडला आहे. या लेखात प्रत्येक महिन्यामध्ये शेतकऱ्याने कोणते काम करावे, याबद्दलची नोंद आहे. हा लेख अक्षरलिपीत लिहिलेला आहे. यावरून अक्षरलिपीचे प्रयत्न पॅलेस्टाइनमध्ये झाले, ही गोष्ट निर्विवाद आहे. मोआबचा राजा मेष याचाही लेख अक्षरलिपीत म्हणजेच नॉर्थ सेमिटिक लिपीत असून तोही पॅलेस्टाइनमध्येच सापडला.मेष सम्राट अशोकाच्या गिरनार लेखातील ब्राह्मी लिपि : इ. स. पू. ३ रे शतक. राजाच्या या लेखातील अक्षरांशी ब्राह्मी लिपीतील अक्षरांचे असलेले साम्य ब्यूलर यांनी दाखविले आहे. बावेरू जातकामध्ये भारतीय व्यापाऱ्यांचा बॅबिलनशी व्यापार होता, असा उल्लेख आहे.

सातवाहन राजा पुळुमावी याच्या नाशिक लेखांतील ब्राम्ही लिपी : इ.स २ रे शतक.


इ. स. पू. सहाव्या शतकात इराणचा (पर्शियाचा) राजा क्षयार्ष आणि ग्रीस यांच्यामध्ये युद्ध झाले. या युद्धात भारताने इराणशी हातमिळवणी केली होती. त्याच वेळी भारताचा ग्रीक संस्कृतीशी परिचय घडला. या कालखंडातच नॉर्थ सेमिटिक लिपीचे भारतात आगमन झाले असावे, असा तर्क ब्यूलर यांनी केला. इ. स. सातव्या शतकात ज्याप्रमाणे संभोटाने मगध देशातून तिबेटमध्ये लेखनकला नेली, त्याप्रमाणे भारतीय व्यापाऱ्यांनी मेसोपोटेमियामधील सेमिटिक लिपी हस्तगत केली. भारतीय पंडितांनी आपल्या बुद्धिकौशल्याने मूळ सेमिटिकवर आधारलेल्या ब्राह्मी लिपीत इतकी भर घातली, की तिचे मूळ स्वरूप बदलून ती संपूर्णपणे भारतीय झाली. सेमिटिक लिपीतील मूळ ‘मेम’ आणि ‘नून’ या अनुनासिकांवरून पाच वर्गांतील पाच अनुनासिके ब्राह्मीत तयार केली. सेमिटिकमधील ‘सामेख’वरून स, ष भारतीयांनी घेतले. परंतु गुण, वृद्धी, संप्रसारण, ऱ्हस्व-दीर्घ स्वर, हलन्त व्यंजने, जोडाक्षरे इ.संशोधन संपूर्णतया भारतीय पंडितांचे आहे.ब्राह्मी लिपीमधील अक्षरांची संख्या त्यामुळे सेहेचाळीस झाली.

ब्राह्मी लिपीचा विकास : भारतातील प्राचीन लेखनकलेचा ज्ञात असलेला पुरावा म्हणून अशोकाच्या (इ. स. पू. सु. ३०३ -सु. २३२) ब्राह्मी लेखांचा उल्लेख करावा लागेल. [⟶ अशोक -२]. अशोकाच्या लेखांचे एकूण मुख्य दोन गट आहेत : (१) प्रस्तरलेख आणि (२) स्तंभलेख. याचेच लघुप्रस्तरलेख आणि लघुस्तंभलेख असे भेद आहेत. सम्राट अशोकाने ब्राह्मी लिपीमध्ये ज्या राजाज्ञा कोरविल्या, त्यांमध्ये एकजिनसीपणा होता. तसा एकजिनसीपणा नंतरच्या काळात राहिला नाही. नंतरच्या काळात अशोकाचा नातू दशरथ याचे लेख, महास्थान सोहगौरा येथील लेख, पश्चिम घाटातील नाणेघाट-लेख, हाथीगुंफा येथील लेख यांमधील लिपी पुष्कळच भिन्न आहे. अशोकाच्या अक्षरांमध्ये जे उभे दंड होते, त्यांची उंची नंतर कमी झाली अक्षरांच्या वळणात फरक झाला. तो फरक देशविशेषाप्रमाणे भिन्न स्वरूपाचाही झाला. हे देशविशेष पुढीलप्रमाणे (१) पूर्व भाग -मगध, कौशांबी, भारहूत, बोधगया, हाथीगुंफा, अयोध्या. (२) उत्तर भाग -तक्षशिला, मथुरा, माळवा. (३) पश्चिम भाग -यामध्ये पश्चिम घाटाचा समावेश होतो. (४) दक्षिण भाग -दक्षिण भारतातील पूर्व भाग, अमरावती शैलगृहातील लेख.

(१) पूर्व भागातील लिपिविशेष : बिहारमध्ये नागार्जुन शैलगृहामध्ये सम्राट अशोकाच्या नातवाचे -दशरथाचे -तीन लेख आहेत. या लेखांतील अक्षरे अशोकाच्या लिपीतील अक्षरांहून भिन्न आहेत. भारहूत, बोधगया, हाथीगुंफा, अयोध्या, पभोसा येथील लेखांचा काळ इ. स. पू. दुसरे शतक हा आहे. या कालखंडात भारतावर शकांच्या स्वाऱ्या झाल्या. नवीन संस्कृतीशी संपर्क आल्यामुळे लेखपद्धतीतही फरक झालेला दिसून येतो. या काळामध्ये ज्या अक्षरांमध्ये कोन होते, त्या ठिकाणी अक्षरांना गोलाई प्राप्त झाली. ज्या अक्षरांत गोलाई होती, त्या अक्षरांची उंची कमी होऊन त्यांची जागा कोनांनी घेतली. घ, प, म यांसारख्या तळाशी गोलाकार असणाऱ्यां अक्षरांमधील गोलाई जाऊन त्यांची जागा कोनाने घेतली. इकार झोकदार वेलांटीने दाखविला गेला.

(२) उत्तर भागातील लिपिविशेष : मथुरेच्या शकांच्या लेखांतून नवीन पद्धती दिसून येते. बोरूने लिहिताना अक्षरांना कमी -अधिक जाडी प्राप्त होते, त्याप्रमाणे मथुरेच्या लेखांतून अ, आ, च, छ, त, भ, य, ल, ह इत्यादी अक्षरांना बोरूने लिहिल्यासारखे वळण प्राप्त झाले. या लेखांचा काळ साधारणपणे इ. स. पू. पहिले शतक आहे. सांचीला जे लेख सापडतात, त्यांचाही काळ साधारणपणे हाच आहे.

(३) पश्चिम भागातील लिपिविशेष : पश्चिम भागातील लिपिविशेषांचा विचार करताना त्यात सातवाहन सम्राज्ञी ⇨नागनिका (इ. स. पू. दुसरे शतक) हिचा नाणेघाटातील लेख, पितळखोरे, कोंडाणे, भाजे, कार्ले, नासिक, अजंठ्याच्या सहाव्या शैलगृहातील लेख यांचा विचार करावा लागेल. या लेखांचा काळ इ. स. पू. पहिले शतक ते इ. स. पहिले शतक हा आहे.

(४) दक्षिण भागातील लिपिविशेष : याच कालखंडातील ब्राह्मी लेख आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील भट्टिपोलू येथील स्तूपावर सापडले आहेत. ब्यूलर यांनी या लेखांचा बारकाईने अभ्यास केला आणि उत्तरेकडील लिपीपेक्षा दक्षिणेकडील लिपी भिन्न होती, असे मत प्रतिपादन केले. मदुरा आणि तिरुनेलवेल्ली या ठिकाणी तमिळ लेख सापडले आहेत.

दक्षिण भारतातील लिपींवर १८७४ मध्ये ए. सी. बर्नेल यांनी साऊथ इंडियन पॅलिओग्राफी हा ग्रंथ प्रसिद्ध केला. १९२२ मध्ये सी. शिवराममूर्ती यांनी इंडियन इपिग्राफी अँड साऊथ इंडियन स्क्रिप्ट्स हा ग्रंथ प्रसिद्ध केला. कुशाण व क्षत्रपकालीन (इ. स. ची सुरुवात ते इ. स. तिसरे शतक)

ब्राह्मी लिपी : परकीय स्वाऱ्या आणि नव्या सांस्कृतिक संबंधांमुळे लेखनशैली देशकालविशेषाप्रमाणे बदलत गेली. तिच्यातील अशोककालीन साचेबंदपणा नष्ट झाला. अक्षरांच्या डोक्यावर बारीक आडवी खूण झाली. हिला ब्यूलर यांनी ‘सेरीफ’ असे नाव दिले आहे. पुढे पुढे या खुणेचे रूपांतर अक्षराच्या डोक्यावरील पोकळ चौकोनात झाले. माळव्यामधील गुप्तांच्या लेखातील अक्षरांवर भरीव चौकोन आहेत. वाकाटक राजांच्या लेखांमध्ये लिपी पेटिकाशीर्षक झाली. दक्षिणेकडे याच कालखंडातील अमरावती, नागार्जुकोंडा, जगय्यपेटा, सालिहुंडम् या ठिकाणी बौद्ध शिलालेख सापडले आहेत. नागार्जुनकोंडा येथील लेखांतील अक्षरांच्या डोक्यावर भरीव त्रिकोण दिसून येतात. उभे दंड लांबलेले आढळतात.


गुप्तकालीन (इ. स. सु. ३०० ते ५५०) ब्राह्मी लिपी : गुप्तकाळात जी ब्राह्मी लिपी प्रचलित होती, त्या लिपीला ‘गुप्तलिपी’ हे नामाभिधान आहे. गुप्तांचे समकालीन परिव्राजक, राजर्षितुल्य, उच्चकल्प या राजवंशातील राजांची दानपत्रे याच लिपीमध्ये लिहिलेली आहेत. गुप्तलिपीचे पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील असे दोन भेद आहेत. गुप्त काळामध्ये काही अक्षरांमध्ये नागरी अक्षरांचे पूर्वस्वरूप पहावयास मिळते. उदा. ‘ल’, ‘श’ आणि ‘ह’.

गुप्तसम्राट समुद्रगुप्त याच्या अलाहाबाद-स्तंभलेखावरील ब्राह्मी लिपी: इ.स.सु. ४ थे शतक.

कुटिल लिपी : इ. स. सहाव्या शतकामध्ये उत्तर भारतात गुप्तलिपीमध्ये अक्षरांच्या डोक्यावर लहानसा त्रिकोण असल्यामुळे या लिपीला ‘कुटिल लिपी’ असे नाव पडले. यात अक्षरामधील उभा दंड डावीकडे झुकलेला असून स्वरमात्रा वाकडी आणि लांब आहे. या लिपीमध्ये मंदसोर येथील यशोधर्म्याचा लेख, बुद्धगया येथील राजा महानामन याचा लेख, मौखरी राजांचे लेख, राजा मेरुवर्म्याचे लेख यांचा समावेश होतो.

जेम्स बर्जेस (१८३२ – १९१६), जे. एफ्. फ्लीट (सु. १८४७ -१९१७), ब्यूलर या संशोधकांनी  गुप्तकाळानंतरच्या लिपीचे उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील असे भेद केले.

आठव्या शतकामध्ये या लिपीचे (१) उत्तर हिंदुस्थानातील लिपी, (२) गुजरात, राजस्थान आणि मध्य भारतातील लिपी, (३) दक्षिणेकडील लिपी आणि (४) अतिदक्षिणेकडील लिपी असे भेद आढळून येतात. यांचेच दानी यांनी नऊ भौगोलिक भेद केले. भारताच्या निरनिराळ्या भागांत जसजशी स्वतंत्र राज्ये उदयाला आली, तसतसे त्या त्या भागात स्थानिक लिपीचे वर्चस्व वाढले आणि त्यामधून सध्याच्या प्रादेशिक लिपींचा उदय झाला.

पहा : नागरी लिपि सेमिटिक लिपि.

संदर्भ :

1. Buhler, Georg, On The Origin of the Indian Brahma Alphabet, Varanasi, 1963.

2. Buhler, Georg Trans. Fleet, J. F. Indian Palaeography. Calcutta, 1962.

3. Dani, A. H. Indian Palaeography, Oxford, 1963.

4. Diringer, David, The Alphabet, 2. Vols., London. 1968.

5. Pandey, Rajbali, Indian Palaeography, Part I, Varanasi, 1957.

6. Upasak,C.S. TheHistory and Palaeograpy of Mauryan Brahmi Script, Nalanda, 1960.

7. Venimadhava B. Old Brahmi Inscriptions, Calcutts. 1929.

8. ओझा, गौरीशंकर, भारतीय प्राचीन लिपिमाला, दिल्ली,  १९५९  

गोखले, शोभना.