रूमानियन साहित्य: आरंभापासून सतराव्या शतकाच्या अखेरपर्यंत : मौखिक परंपरेने जतन करण्यात आलेले रूमानियन लोकसाहित्य विपुल आहे. त्यात महाकाव्ये, भावकविता, बोधवादी साहित्य, नाट्यात्म संवाद ह्यांचा अंतर्भाव होतो. पंधराव्या शतकात, धर्मसुधारणेच्या चळवळीच्या प्रेरणेतून काही धार्मिक साहित्य चर्च स्लाव्हॉनिकमधून रूमानियन भाषेत अनुवादिले गेले. रूमानियन भाषेतील लौकिक स्वरूपाच्या लेखनाचा आज उपलब्ध असलेला सर्वात जुना लिखित पुरावा म्हणजे १५२१ मध्ये, ब्रासॉव्हच्या न्यायाधीशास लिहिले गेलेले एक पत्र. तुर्कांकडून आक्रमण होण्याची शक्यता त्या पत्रात व्यक्त करण्यात आलेली आहे. सोळाव्या शतकाच्या आरंभीच वालेकीया येथे मुद्रणाची सोय झालेली होती. रूमानियन भाषेतील पहिले मुद्रित पुस्तक १५४४ सालचे. ते धर्मतत्वविषयक आहे.

सोळाव्या व सतराव्या शतकांत धार्मिक आणि इतिहासविषयक साहित्य मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात डिकन कोरेसी ह्याने लिहिलेली सु. बावीस धार्मिक पुस्तके उपलब्ध आहेत. व्हारलाम, अल्बा, यूलिया, दोसोफ्तई ह्यांनीही धार्मिक स्वरूपाचे लेखन केले. दोसोफ्तईने रूमानियनमध्ये लिहिलेले पहिले छंदोबद्ध सॉल्टर (द बुक ऑफ साम्स) म्हणजे रूमानियन भाषेत लिहिले गेलेले पहिले काव्य होय. इतिहासविषयक लेखनात ग्रिगोर युरेची (१५९०–१६४६), मिरॉन कॉस्तिन (१६३३–९१) यॉन नेस्यूल्स (१६७२–सु.१७४४) निक्यूलाय कॉस्तिन (सु. १६६०–१७१२) निक्यूलाय मायलेस्क्यू (१६३६–स. १७०९) आणि ⇨डिमीट्रीये कांटेमीर (१६७३–१७२३) ह्यांचा अंतर्भाव होतो. युरेचीन इतिवृत्ते लिहिली (१६४२–४७) त्यात मॉल्डेव्हियाचा १३५९ ते १५९४ पर्यंतचा इतिहास आला आहे. ‘आम्ही रोमनांचे वंशज आहोत ’, असे युरेची म्हणत असे. मिरॉन कॉस्तिनच्या इतिहासलेखनातून त्याची विद्वत्ता आणि ऐतिहासिक घटनांकडे पाहण्याची वस्तुनिष्ठ दृष्टी दिसून येते. डौलदार आणि पारदर्शी भाषाशैली हे यॉन नेक्सूल्सच्या इतिवृत्तलेखनाचे एक लक्षणीय वैशिष्ट्य. निक्यूलाय कॉस्तिन हा मिरॉन कॉस्तिनचा पुत्र. त्याने आपल्या वडिलांनी लिहिलेल्या इतिवृत्ताचा विस्तार केला. निक्यूलाय कॉस्तिन ह्याने इतिहासलेखनाबरोबरच प्रवासवर्णने लिहिली ईश्वरविद्याविषयक लेखनही केले. त्याने रूमानियन ,रशियन आणि ग्रीक अशा तीन भाषांत लेखन केले आहे. डीमीट्रीये कांटेमीर ह्याने रूमानियनांचा इतिहास लॅटिन भाषेत लिहिला होता. त्याने स्वतःच त्याचा रूमानियन भाषेत अनुवाद केला. (१७१०, Hornicul Vechinrl RomanoMoldoVlahilor). कन्स्तातीन कांताकूझीनो (१६१५–१७१६) ह्याने वॉलेकियाचा इतिहास लिहिला आहे (सु. १७१०).

१६८८ मध्ये बायबलचे रूमानियन भाषातंर तयार झाले. अलेक्झांडरचे चरित्र इसापच्या नीतिकथा असे काही साहित्यही रूमानियन भाषेत ह्या कालखंडात झाले.

अठरावे शतक : ह्या शतकात ग्रीक फनॅरिऑटांच्या (कॉन्स्टँटिनोपलमधील ग्रीक व्यापारी) सत्तेमुळे (१७१६–१८२१) रूमानियन साहित्याच्या विकासात अडथळा आला. आधुनिक ग्रीक ही शिष्टसंमत भाषा ठरली. १८२१ नंतर रूमानियन राज्यकर्ते येताच राष्ट्रीय अस्मितेची जाणीव तीव्रतेने व्यक्त होऊ लागली. ट्रान्ससिल्व्हेनियातील रूमानियनांनी तर ह्याआधीच ती व्यक्तविली होती. तेथे अठराव्या शतकात रूमानियन यूनिएट चर्चच्या धर्मोपदेशकांनी रूमानियन भाषा लॅटिनपासून झाल्याचा विचार आग्रहीपणे मांडला. लॅटिनवादी संप्रदायाचे प्रमुख प्रतिनिधी म्हणून सॅम्युएल मायक्यू-क्लेन (१७४५–१८०६) द्येओर्ग सिन्काई (१७५४–१८१६) आणि पेत्रू मायॉर (१७६०–१८२०) हे उल्लेखनीय आहेत. माय्क्यू -क्लेन आणि द्येओर्ग सिन्काई ह्यांनी रूमानियन भाषेचे पहिले व्याकरण तयार केले. (Elementa language daco-romanae sive Valachicae, १७८०). पेत्रू मायॉर ह्याने रूमानियन भाषेच्या लेखनासाठी लॅटिन वर्णाक्षर माला असावी, ह्यासाठी धडपड केली आणि रूमानियन लोकांचा इतिहासही लिहिला (१८१२).

ह्या शतकात लिहिण्यात आलेले संतचरित्रांचे २४ खंड (Minei) हे समृद्ध भाषाशैलीच्या दृष्टीने महत्वाचे ठरतात. भावकविताही लिहिली गेली. ग्रीक भावकवी आनाक्रेऑन ह्याचा प्रभाव असलेली प्रेमगीते आलेकू व्हाकारेस्क्यू (मृ.१७९८) ह्याने लिहिली. त्याचे वडील यॉनाके व्हाकारेस्क्यू (१७३०–९६ ॽ) ह्यांनी नैतिक उद्बोधनपर कविता लिहिली आणि रूमानियन भाषेत रूमानियन भाषेचे पहिले व्याकरण लिहिले (१७८७). यांकू व्हाकारेस्क्यू (१७९२–१८६३) हा श्रेष्ठ कवी. यॉन बुदाई-दिलिआनू (१७६०–१८२०) ह्याने महाकाव्यरचनेचा प्रयत्न केला. त्याने ‘जिप्सी सागा’ (१८१२, इं. शी.) ह्या नावाचे एक उपरोधप्रचुर महाकाव्य रचिले.

एकोणिसावे शतक : हे शतक म्हणजे रूमानियाचा प्रबोधनकाल होय. परकीय सत्तेचे जोखड ह्या कालखंडात दूर झाले. ग्यॉर्गे लाझार (१७९९–१८२३) ग्यॉर्गे आसाची (१७८८–१८६९) आणि एल्यादे राहूलेस्क्यू (१८०२–७२) हे ह्या कालखंडातील विशेष उल्लेखनीय विद्वान होत. एल्यादे रादूलेस्क्यू हा गॉर्ने लाझार ह्याचा शिष्य रादूलेस्क्यूने वॉलेकिया येथे पहिले रूमानियन पत्र –Curierul Romanesc – काढले. रूमानियामध्ये इटलीचा सांस्कृतिक प्रभाव पडू लागला, रादूलेस्क्यूच्यामार्फत. रूमानियन अकॅडमीचा तो पहिला अध्यक्ष १८२८ मध्ये त्याने रूमानियन व्याकरणावरील आपला ग्रंथ प्रसिध्द केला. इटालियन संस्कृतीचा स्त्रोत मॉल्डेव्हियात आणला ग्यॉर्गे आसाची ह्याने. त्याने रूमानियन आणि इटालियन अशा दोन्ही भाषांत कविता लिहिल्या ऐतिहासिक विषयांवरील लघुकथा लिहिल्या. मीहाईल कॉगलनीचानू (१८१७–९१) हा राजकारणी आणि इतिहासकार. एकात्म रूमानियाचा पहिला पंतप्रधान. मॉल्डेव्हियाची जुनी इतिवृत्ते त्याने संपादून प्रसिद्ध केली. व्ही. सिर्लोव्हा आणि ग्रिगोर अलेक्सांद्रेस्क्यू (१८१२–८५) हे कवी. अलेक्सांद्रेस्क्यूने काही बोधकथाही (फेबल्स) लिहिल्या. निकलाय बाल्सेस्क्यू (१८१९–५२) हा थोर इतिहासकार कोस्ताक नेग्रूझ्झी (१८०८–६८) हा कवी, कथाकार. ‘ Alexandru Lapusneanu ’ ही त्याची कथा एकूण रूमानियन साहित्यातील एक उत्कृष्ठ कथा. Aprodul Purice हे महाकाव्य त्याने रचिले. निकलाय फिलिमन ह्याच्या ‘अप्स्टार्टस, ओल्ड अँड न्यू’ (इं.शी.) ह्या कादंबरीमध्ये तत्कालीन रूमानियन समाजाचे प्रभावी चित्रण आढळते. बॉगदान हाशड्यू (१८३६ॽ–१७०७) हा भाषाशास्त्रज्ञ, इतिहासकार, कवी आणि नाटककार. ‘रझवान अँड व्हिद्रा’ (१८६९ इं.शी.) हे त्याचे पद्य नाटक रूमानियन साहित्यात ख्याती पावले आहे. अलेक्सांद्रू ओदोबेस्क्यू (१८३४–९५) हा पुरातत्वविद्यावेत्ता आणि इतिहासकर. डौलदार आणि मिश्किल गद्यलेखनासाठी तो प्रसिद्ध त्याने काही काव्यरचनाही केली आहे. ⇨व्हासीले आलेक्सांड्री (१८२१–९०) ह्याने सु. ३०० कविता व ५० नाटके लिहिली आहेत. Pasteluri (१८६७) हा त्याचा सर्वोत्कृष्ठ काव्यसंग्रह. आपल्या मायभूमीच्या निसर्गसौंदर्यांचे रंग त्यातून त्याने उमटविले आहेत. Fantana Blandusiei (१८८४) हे त्याचे ऐतिहासिक नाटक विशेष उल्लेखनीय. आपल्या नाट्यसाहित्यातून त्याने रूमानियातील सत्ताधारी वर्गाच्या मागास वृत्तीवर टीका केली. रूमानियन साहित्यात त्याला मानाचे स्थान आहे. ⇨मीहाईल एमीनेस्कू (१८५०–८९) ह्याच्या कवितांत वैचारिक प्रगल्भता, उत्कट देशाभिमान, सामाजिक विसंगतीवरील प्रखर टीका ह्यांच्या जोडीला काव्यतंत्रावरील प्रभुत्वही दिसून येते. यॉन क्रीआंगा (१८३७–८९) ह्याने लेखन थोडे केले तथापि त्याची लोकप्रियता मोठी होती. त्याने लिहिलेल्या काही परीकथा जागतिक परीकथासाहित्यात मान्यता पावलेल्या आहेत. फोक टेल्स फ्रॉम रूमानिया (१८९०, इं. भा. १९५२) ह्या त्याच्या पुस्तकात सु. १५ कथा अंतर्भूत आहेत आणि त्याच्या बालपणीच्या आठवणींवर आधारित अशा चार प्रकरणे त्याच्या रिफलेक्शन्स (१८९२, इ. भा. १९३०) मध्ये समाविष्ट आहेत. मॉल्डेव्हियातील ग्रामीण भागाचे घडणारे प्रत्ययकारी दर्शन, त्या प्रदेशातील शब्दांचा क्रीआंगाने केलेला वापर आणि त्याचा वैशिष्टपूर्ण विनोद ह्यांमुळे रूमानियन वाचकांना रिकलेक्शन्य विशेष प्रिय आहेत. यॉन ल्यूका कारागीएल (१८५२–१९१२) हा सर्वश्रेष्ठ रूमानियन नाटककार, आपल्या उपरोधप्रचुर सुखात्मिकांतून व्यावसायिक राजकारणी, सरकारी आधिकारी, समाजातील धनाढ्य लोक इत्यादींवर त्याने टीका केली. ए स्टॉर्मीनाइट (१८७९, इं. भा. १९५६), ए लॉस्ट लेटर (१८८४, इं. भा. १८८४), कार्निव्हल सीन्स (१८८५, इं. शी.) ह्या त्याच्या उल्लेखनीय सुखात्मिका. ‘कलॅमिटी’ (१८९०, इं. शी.) ही त्याने लिहिलेली शोकात्मिका. गरीब आणि गांजलेल्या कृषकांचे जीवन तीत आपणास पाहावयास मिळते. व्यक्तिरेखांचा अस्सलपणा, प्रगल्भ मनोविश्लेषण, प्रत्ययकारी उपरोध आणि रचनातंत्रावरील प्रभुत्व ही कारागीएलच्या नाट्यकृतींची लक्षणीय वैशिष्ट्ये होत. यॉन स्लाव्हिसी (१८४८–१९२५), बार्बू देलाव्ह्रान्सीआ (१८५८–१९१८), दुलिऊ झामफेरेस्क्यू (१८५८ –१९२२), गेओर्ग कॉस्बक (१८६६–१९१६) हे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीअखेरीचे साहित्यिक. स्लाव्हिसीची कीर्ती त्याने लिहिलेल्या कथांवर अधिष्ठीत आहे. त्याची शैली अनलंकृत नेमकी आणि प्रांजळ आहे. मानवी आत्माचा संघर्ष हा त्याच्या कथांचा मुख्य विषय. त्याने काही नाटके आणि इतिहासग्रंथही लिहिले आहेत. देलाव्ह्रान्सीआ हा कथाकार आणि नाटककार. त्याच्या कथांमधील अद्भुतरम्य वातावरणाला साजेशी भाषाशैली त्याचापाशी होती. झामफिरेस्क्यूची ‘कोमानेस्ती सागा’ (१८९८–१९११) ही पंचखंडात्मक कादंबरी प्रसिद्ध आहे. एका कुटुंबाची ही कहाणी. कॉस्बक हा कृषकांचा कवी. त्यांची सुखदुःखे त्याने आपल्या कवितेतून गायिली.

विसावे शतक : विसाव्या शतकारंभी टिटू मायोरेस्क्यू (१८४०–१९१७) ह्याच्या नेतृत्वाखाली ‘यूथ’ (इं. अर्थ) ह्या वाडःमयीन संघटनेने रूमानियन संस्कृतीच्या संवर्धनाचे कार्य केले ह्या संघटनेच्या आधाराने काही लेखक उदयास आले. अलेक्सांद्र मॅसेदोन्की (१८५४–१९२०) हा रूमानियन कवितेतील प्रतीकवादी प्रवाहाचा प्रवर्तक यॉन मिनूलेस्क्यू (१८८१– ) हाही एक उल्लेखनीय प्रतीकवादी कवी.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मीहाईल सादोव्हीनू (१८८०– ) ह्याने रूमानियन गद्यावर प्रभाव गाजवला. सादोव्हीनूने कथा आणि कादंबऱ्या विपुल लिहिल्या. स्वच्छंदतावादी प्रवृत्ती त्याच्या आरंभीच्या लेखनात आढळतात तथापि पुढे तो वास्तववादाकडे वळला.

दोन महायुध्दांच्या दरम्यान ज्या रूमानियन लेखकांनी रूमानियन साहित्यात मोलाची भर घातली, त्यात लिव्हीऊ रेब्रिआनू (१८८५–१९४४) हा विशेष उल्लेखनीय होय. यॉन (२ खंड, १९२०) ही त्याची पहिलीच कादंबरी रूमानियन कादंबरीच्या इतिहासातला एक महत्वाचा टप्पा ठरली. द फॉरेस्ट ऑफ द हँग्ड (१९२२, इं.भा. १९३०) ही त्याची कादंबरीही श्रेष्ठ दर्जाची आहे. यॉनमध्ये गरीब कृषकांची भूमीसाठी चाललेली धडपड अत्यंत वास्तववादी पद्धतीने त्याने चित्रित केली आहे, तर द फॉरेस्ट…. मध्ये पहिल्या महायुध्दाची भीषणता प्रत्ययकारीपणे उभी केली आहे. यॉन आगारबिसिआनू (१८८२–१९६३) हा कथा कादंबरीकार. हंगेरियनांच्या सत्तेखालील ट्रान्सिल्व्हेनियातील रूमानियनांना भोगावे लागलेले दुःख त्याच्या कादंबऱ्यातून प्रत्ययास येते. त्याच्या उत्कृष्ट कथा गरीब लोकांच्या जीवनाचे दर्शन घडवितात. बूर्झ्वा समाजातील बुद्धिमंतांचे भवितव्य हा कामिय पेत्रेस्क्यू (१८९४–१९५७) ह्याच्या कांदबऱ्यांचा आणि नाट्यकृतीचा एक प्रमुख विषय. सेझार पेत्रेस्क्यू (१८९२–१९६१) ह्याची Intunecave (३ खंड ,१९२७) ही कांदबरी रेब्रिआनूकृत यॉनच्या तोडीची मानली जाते. जी. कालिनेस्क्यू (१८९९–१९६५) ह्याने रूमानियन साहित्याचा इतिहास लिहिला. त्याने कादंबरीलेखनही केले. गाला गालसिऑन (१८७९–१९६१) ह्याच्या कथा-कांदबऱ्यांतून नैतिक उद्बोधनाची प्रेरणा दिसून येते, तर नागी इस्तव्हानच्या कथांतून रूमानियातील श्रमजीवी वर्गाचे जीवन उभे केलेले दिसते.

ह्या शतकातील कवितेच्या संदर्भात त्यूदोर आर्देझी (१८८०–१९६७) ह्याचे नाव सर्वात महत्वाचे. तात्विक, सामाजिक ,उपरोधप्रचुर आणि प्रेमविषयक अशी विविध प्रकारची कविता त्याने लिहिली. मानवी जीवनाच्या समस्यांच्या तात्विक अर्थाचा शोध घेण्याचा ध्यास त्याच्या प्रतिभेला होता. रूमानियाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात त्याने १९०७ ही काव्यमाला लिहिली. १९०७ ह्या शीर्षकाला रूमानियात त्या साली झालेल्या कृषकांच्या बंडाचा संदर्भ आहे. ‘साँग टू मॅन’ (इं.शी.) ह्या काव्यकृतीत संस्कृतीच्या निर्मितीसाठी मनुष्यजातीने केलेल्या धडपडीचे दर्शन त्याने तात्विक दृष्टीकोणातून घडविले आहे. अन्य उल्लेखनीय कवींत ल्यूशन ब्लागा (१८९५–१९६१), गेओर्ग तोपीर्सीनू (१८८६–१९३७), अलेक्सांद्र फिलिप्पीदी (१९०० – ) आणि गेओर्ग बाकोव्हीआ (१८८१–१९५७) ह्यांचा अंतर्भाव होतो. परंपरेचे आध्यात्मिक मूल्य ब्लागाला महत्वाचे वाटते. तोपीर्सीनूने मुख्यतः विनोदी कविता लिहिली. समकालीन रूमानियन साहित्यिकांचे त्याने आपल्या कवितांतून विडंबन केले. फिलिप्पीदीने केलेली स्तोत्ररचना महत्वाची आहे. विख्यात फ्रेंच कवी बोदलेअर ह्याच्या २५ कवितांचा त्याने रूमानियन भाषेत अनुवाद केला. बाकोव्हीआ हा प्रतीक्रवादी कवी.

फॅसिस्ट राजवटीच्या जोखडाखालून रूमानियाची मुक्तता झाल्यानंतर रूमानियन साहित्याला विशेष बहर आला. झहारिआ स्टान्सू (१९०२– ) हा कवी आणि कादंबरीकार. विसाव्या शतकारंभीचे, रूमानियाच्या ग्रामीण विभागातील जीवनाचे नाट्यमय चित्रण त्याने केले. बेअरफूट (१९४९, इं.भा. १९५०) ही त्याची गद्यकृती त्या दृष्टीने उल्लेखनीय. दुसऱ्या महायुद्धाच्या आधीची वर्षे इ. कामीलार (१९१०) ह्याने आपल्या ‘मिस्ट’ (इं.शी.) ह्या गद्यकृतीत सशब्द केली आहेत. एम. बेनिउक (१९०७– ) ह्याने रूमानियातील समाजवादाच्या उभारणीच्या कालखंडात समाजवादी स्वरूपाची कविता लिहिली. ई. जाबेलीनू ह्याने आपल्या कवितांतून दुसऱ्या महायुध्दाच्या भीषणतेचे दर्शन घडविले. उदा., सर्व इं.शी.– ‘हिरोशिमाज स्माइल’ आणि ‘साँग्ज अगेन्स्ट डेथ’ सारख्या काव्यकृती एम्.आर्. पारास् चिव्हेस्क्यू ह्याने समाजवादाने मिळविलेल्या भव्य यशांची स्तोत्रे गाइली, तर एम्. बानूसने शांतीचा उद्घोष केला. गद्यलेखकांपैकी एम्.प्रेदा याने समकालीन बुध्दीमंतांच्या संदर्भात लिहिले. सूतो आंद्रास, यॉन लांक्रांजन व्हासिल रेब्रिआनू (गद्यलेखक) दान देस्लीऊ, एन्लेबिस, ए.ई. बाकोन्स्की, व्हेरोनिका पोरूंबाकू, मिहू त्रागोमीर, नीना कासिऊन (कवी) डी. मिकू. पॉल गेओर्गेस्क्यू (समीक्षक) हे चालू शतकातील काही प्रमुख रूमानियन साहित्यिक होत.

कुलकर्णी, अ. र.