यर्जेनसेन, युहानेस : (६ नोव्हेंबर १८६६–२९ मे १९५६). डॅनिश साहित्यिक. जन्म स्व्हेंडबोर्ग येथे. कोपनहेगन येथे तो वयाच्या सोळाव्या वर्षी आला आणि तेथे मॅट्रिक झाला (१८८४). यर्जेनसेनची ख्याती आज मुख्यत: त्याने लिहिलेल्या चरित्रग्रंथांवर अधिष्ठित आहे. त्यांपैकी विशेष उल्लेखनीय चरित्रग्रंथ (सर्व इं. भा.) असे : सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी (१९०७) आणि सेंट कॅथरीन ऑफ सिएना (१९१५). चरित्रांतल्या घटना जिवंतपणे उभ्या करणे, हे त्याच्या चरित्रलेखनाचे एक लक्षणीय वैशिष्ट्य होय. यर्जेनसेनने उत्कृष्ट भावकविताही लिहिली असून त्याचे ‘ब्लॉसम्स अँड फ्रूट्स’ (१९०७, इं. शी.) व ‘फ्यूनेन अँड अदर पोएम्स’ (१९४८, इं. शी.) हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्याच्या आरंभीच्या कवितांवर इंग्रज कवी स्विनबर्न ह्याचा प्रभाव दिसून येतो. पुढे फ्रेंच प्रतीकवाद्यांचा प्रभाव त्याच्यावर पडला. १८९६ मध्ये रोमन कॅथलिक पंथाचा त्याने स्वीकार केल्यानंतर त्या धार्मिक दृष्टीचा खोल परिणाम त्याच्या साहित्यावर झाला. ‘द लेजंड ऑफ माय लाइफ’ (७ खंड, १९१६–२८, इं. शी.) हे आत्मचरित्रही त्याने लिहिले आहे. स्व्हेंडबोर्ग येथेच तो निधन पावला.

यानसेन, बिलेस्कॉव्ह एफ्‌. जे. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)