ब्लेन, सर गिलबर्ट: (२९ ऑगस्ट १७४९ – २६ जून १८३४). स्कॉटिश वैद्य. नौदलातील आरोग्य विज्ञानासंबंधीच्या सुधारणांचे प्रणेते.

ब्लेन यांचा जन्म स्कॉटलंडमधील ब्लेनफिल्ड येथे झाला. एडिंबरो विद्यापीठात त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले पुढे त्यांनी १७७८ मध्ये ग्लासगो विद्यापीठाची एम्. डी. पदवी मिळविली. आरमार प्रमुख ॲडमिरल रॉड्नी (पुढे लॉर्ड रॉड्नी) यांचे वैयक्तिक वैद्य म्हणून ते यांच्याबरोबर १७७९ मध्ये वेस्ट इंडीजला गेले. या प्रवासात नौदलातील खलाशी आजारी पडू नयेत म्हणून त्यांनी काही खास उपाय योजिले होते. त्या काळात लांबच्या सागरी प्रवासात बहुसंख्य खलाशी ⇨ स्कर्व्ही (क जीवनसत्वाच्या त्रुटीमुळे उद्भवणारी पोषणज विकृती) या रोगाने पछाडले जात. प्रवासात प्रत्येकाल दैनंदिन आहारातून लिंबाचा रस आणि ताजे अन्न मिळण्याची त्यांनी व्यवस्था केली होती. त्यामुळे या विकृतीचे प्रमाण बरेच कमी झाले. नौदल वैद्यकीय सल्लागार मंडळाचे ते प्रमुख असल्यामुळे त्यांनी नौदलात अनेक आरोग्यविज्ञानविषयक सुधारणा केल्या. १७८३ – ९५ या काळात ते लंडनमधील सेंट टॉमस रुग्णालयात काम करीत होते. १७९५ मध्ये त्यांच्या प्रयत्नांमुळे नौदलात लिंबूरसपानाची सक्ती करण्यात आली.

इंग्लंडचे राजे चौथे जॉर्ज आणि चौथे विल्यम यांचे ते वैद्य होते. १७९९ च्या विलग्नवासाविषयीच्या (संसर्गजन्य रोग असलेल्या बंदरातून येणार्‍या जहाजांना त्यांवरील प्रवांशासहित काही दिवसपर्यंत अलग ठेवण्याच्या) कायद्याचे नियम ठरविण्यात त्यांनी काही भाग घेतला होता. १८०९ मध्ये ब्रिटिश आरमाराने नेदर्लड्समधील व्हाल्खारान बेटावर कब्जा मिळवला होता व तेथे सैनिकी तळ उभारला होता. या तळावरील पंधरा हजार सैनिकांपैकी सात हजार हिवतापाने मरण पावले. उरलेल्यांची सुखरूप सुटका करण्यामध्ये ब्लेन यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या या कार्याबद्दल १८१२ मध्ये त्यांना ‘बरनिट’हा किताब मिळाला.

ब्लेन यांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकी ऑन द मोस्ट इफेक्च्युअल मीन्स फॉर प्रिझर्विंग द हेल्थ ऑफ सीमेन (१७८०), ऑब्झर्वेशन्स ऑन द डिसीझेस ऑफ सीमेन (१७८५) आणि द एलिमेंट्स ऑफ मेडिकल लॉजिक (१८१९) हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. ते लंडन येथे मरण पावले.  

 भालेराव, य. त्र्यं.