यंत्र – २ : (आयुर्वेद). शरीरातील शल्य बाहेर काढण्याचे साधन म्हणजे यंत्र. मूर्त शल्ये काढावयाच्या यंत्रांचे मुख्य सहा प्रकार-स्वस्तिक, संदंश, ताल, नाडी, शलाका, यंत्र व उपयंत्र. स्वस्तिक यंत्रे २४, संदंश २, ताल यंत्रे २, नाडी २०, शलाका २८ व उपयंत्रे २५ आहेत. ही यंत्रे नाना प्रकारच्या पशु-पक्षी यांच्या तोंडांसारख्या तोंडांची असतात. ही बळकट, धरण्यास सोईची, उपयोगाला अनुसरून चिकण वा खरखरीत तोंडाची व दिसण्यात सुंदर असावीत. वरील पहिली ३ प्रकारची यंत्रे क्रमशः १८, १६, १२ अंगुले असावीत. यंत्राची कामे प्रामुख्याने २४ प्रकारची असतात, शल्ये असंख्य प्रकारची असतात व त्यांना अनुसरून यंत्रे असंख्य प्रकारांची असतात. यंत्राचे दोष १२ आहेत. अतिस्थूल, असार, अतिलांब, अति-आखूड, धरता न येणारे, नीट धरता न येणारे, वाकडे, दिले, अती उंचावलेले, मऊ खिळा असलेले, मऊ तोंडाचे, मऊ पकड असलेले यंत्र निरुपयोगी असते.

जोशी, वेणीमाधवशास्त्री.