ब्रोकन हिल – २ : काबवे. झँबियाच्या मध्य विभागाची राजधानी व महत्त्वाचे खाण व वाहतूक केंद्र. लोकसंख्या १,४७,००० (१९८० अंदाज). हे लूसाकाच्या उत्तरेस ११३ किमी. अंतरावर असून झँबिया रेल्वेज व सेंट्रल आफ्रिकन रेल सर्व्हिसेस यांचे मुख्य ठाणे आहे. येथे शिसे, जस्त, सोने व व्हॅनेडियम यांच्या खाणी आहेत. दगडी कोळसा, नायट्रेट, बिस्मथ हे खनिज पदार्थ येथे सापडतात. मुलुंगुशी नदीवरील जलविद्युत् प्रकल्प मुख्यतः येथील खाणींसाठीच १९२४ मध्ये चालू झाला. याच्या परिसरात मका व तंबाखू यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. १९२१ मध्ये येथे प्राण्यांचे व मानवाचे अश्मीभूत अवशेष सापडले. त्यांत ‘ऱ्होडेशियन मानवा’ ची म्हणून ओळखली जाणारी कवटीही आहे.

कुमठेकर, ज. व.