लायनेन, फेओडोर : (६ एप्रिल १९११ – ८ ऑगस्ट १९७९). जर्मन जीवरसायनशास्त्रज्ञ. ⇨कोलेस्टेरॉल व ⇨वसाम्ले यांच्या चयापचयाची (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडींची) यंत्रणा व नियमन यासंबंधीच्या संशोधनासाठी त्यांना १९६४ सालचे शरीरक्रियाविज्ञान किं वा वैद्यक विषयाचे नोबेल पारितोषिक ⇨कॉनरॅड एमिल ब्लॉक यांच्या समवेत विभागून मिळाले. या दोघांनी जिवंत कोशिकेच्या (पेशीच्या) चयापचयाच्या मध्यस्थ टप्प्यांसंबंधी संशोधन केले आणि कोशिका साध्या संयुगांत कशा तऱ्हेने बदल करून त्यांचे स्टेरॉले [⟶ स्टेरॉले व स्टेरॉइडे] व ⇨लिपिडे यांच्या जटिल रेणूंत रूपांतर करते याचा शोध घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. त्यांनी स्वतंत्रपणे पण निरनिराळ्या मार्गांनी कार्य केले. लायनेन यांनी वसाम्लांकडे अधिक लक्ष दिले, तर ब्लॉक यांनी स्टेरॉलांवर भर दिला.
लायनेन यांचा जन्म म्यूनिक येथे झाला. त्यांनी म्यूनिक विद्यापीठात रसायनशास्त्राचे अध्ययन केले. हाइन्रिख व्हीलांट यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून १९३७ मध्ये त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळविली. म्यूनिक विद्यापीठात ते १९४२ मध्ये रसायनशास्त्राचे अध्यापक व १९४७ मध्ये प्राध्यापक झाले आणि त्याच विद्यापीठात १९५३ मध्ये जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. याखेरीज म्यूनिक येथील माक्स प्लांक इन्स्टिट्यूट फॉर सेल केमिस्ट्री या संस्थेच्या संचालकपदावर १९५४ मध्ये त्यांची नेमणूक झाली.
स्टेरॉले व लिपिडे बनविण्यातील प्रारंभिक घटक हे द्वि-कार्बनयुक्त रेणू आहेत असा काही काळ विश्वास वाटत होता. ब्लॉक व डेव्हिड रिटेनबर्ग यांनी उंदरांमध्ये कोलेस्टेरॉल बनविण्यासाठी ॲसिटिक अम्लाचा उपयोग केला जातो, असे १९४२ मध्ये दाखविले. १९५१ पावेतो लायनेन यांनी को-एंझाइम-ए बरोबर [⟶ एंझाइमे] ॲसिटेट मूलकाची विक्रिया होऊन को-एंझाइम-ए चे ॲसिटिल थायॉल एस्टर तयार होणे ही शेवटी स्टेरॉले व वसाम्ले यांचा जैव संश्लेषणात (सजीवाच्या शरीरात जैव घटक द्रव्यांपासून तयार होणाच्या प्रक्रियेत) निष्पन्न होणाऱ्या विक्रिया मालेतील पहिली आवश्यक पायरी होय, असे दाखविले. जैव व रासायनिक परीक्षांवरून लिपिड संश्लेषणाच्या प्रारंभासाठी आवश्यक असलेल्या मध्यस्थ संयुगाचे गृहीत संघटन बरोबर असल्याचे दिसून आले. लायनेन यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तथाकथित वसाम्ल चक्रातील वसाम्ल निम्नीकरणाची (कार्बनी अणूंची संख्या कमी असलेल्या संयुगांत रूपांतर होण्याच्या क्रियेची) यंत्रणा उलगडण्यात यश मिळविले तसेच कोलेस्टेरॉल, स्क्वॅलीन, टर्पिने व नैसर्गिक रबर यांसारख्या पॉलिआयसोप्रिनॉइड संयुगांच्या जैव संश्लेषणाच्या मार्गांचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मॅलोनिल-को-एंझाइम-ए पासून वसाम्लांचे संश्लेषण होण्याच्या यंत्रणेविषयी संशोधन करताना त्यांनी वसाम्ल सिंथेटेज हे बहु-एंझाइमी जटिल द्रव्य अलग केले. या को-एंझाइम जटिलाचा सहघटक असलेले ⇨ बायोटीन हे जीवनसत्त्व कार्बन डाय-ऑक्साइडाबरोबर बद्ध होऊन सक्रियित (अधिक क्रियाशील असलेला) कार्बन डाय-ऑक्साइड बनतो आणि तो १-एन-कॉर्बाक्सिबायोटीन या संयुगरूपात असतो, असे त्यांना आढळून आले. बायोटिनाचे हे कार्य लिपिक चयापचयात मूलभूत महत्त्वाचे आहे, असे जीवरसायनशास्त्रज्ञ मानतात. लायनेन यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ⇨ सिस्टीन या ॲमिनो अम्लाचे जैव संश्लेषण व ॲसिटोॲसिटिक अम्लाची यकृतात होणारी निर्मिती यासंबंधीही संशोधन केले.
स्टेरॉले व वसाम्ले यांचे संश्लेषण शुद्ध रसायनशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे असण्याबरोबरच हृदयविकारातील कोलेस्टेरॉलाच्या संभाव्य कार्यावरही प्रकाश टाकते. नोबेल पारितोषिक समितीने लायनेन व ब्लॉक यांची पारितोषिकाकरिता निवड करताना असे प्रतिपादन केले की, रक्ताभिसरण विकारांमुळे होणाऱ्या बहुतांश मृत्यूंमध्ये सामान्यतः लिपिड चयापचयात गंभीर बिघाड झालेला आढळतो आणि यावरील उपाय लायनेन व ब्लॉक यांच्या कार्यातून सापडू शकेल.नोबेल पारितोषिकाखेरीज लायनेन यांना न्यूबर्ग पदक (१९५४), लीबिग स्मृती पदक (१९५५), कारूस पदक (१९६१), ओटो व्हारबुर्ख पदक (१९६३), ऑर्डर पूर ला मेरिट (१९७१) वगैरे सन्मान मिळाले. ते अमेरिकेची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, लंडनची रॉयल सोसायटी, रशियाची ॲकॅडेमी ऑफ मेडिकल सायन्सेस इ. अनेक वैज्ञानिक संस्थांचे सदस्य होते. ते म्यूनिक येथे मृत्यू पावले.
भालेराव, य. त्र्यं.