औद्योगिक वैद्यक : उद्योगधंद्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रकृतिस्वास्थ्यासाठी जी व्यवस्था करणे जरूर असते तिला ‘औद्योगिक वैद्यक’ म्हणतात.

कर्मचारी आजारी पडल्यास किंवा काम असताना त्याला अपघात झाल्यास त्या कर्मचाऱ्याचे नुकसान तर होतेच शिवाय कारखान्यातील उत्पादन घटल्यामुळे कारखान्याचे व परिणामतः समाजाचेही फार नुकसान होते. अशा कारणांनी दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पादन कमी होते. कामगार दिवसाचे आठ तास तरी कारखान्याच्या परिसरात घालवितो. त्या वेळेपुरती त्याच्या आरोग्याची निगा राखणे ही जबाबदारी कारखान्यातील व्यवस्थापकाची समजली जाते. ह्यात अनेक गोष्टींचा समावेश होतो. उदा., कामगाराचे शरीरमान, कामाचा परिसर, कामाचे तास, विशिष्ट कामामुळे उद्‍भवणारे उपद्रव इत्यादी. ह्या सर्वांचा अभ्यास म्हणजेच औद्योगिक वैद्यकअसेही म्हणता येईल.

इतिहास : सतराव्या शतकापासून यूरोपमध्ये यंत्रयुगास सुरुवात झाली व लौकरच त्याचे रूपांतर औद्योगिक क्रांतीत झाले. तेच लोण पुढे अमेरिकेत पोहोचले व आशिया खंडात जपानने ह्यात उच्चांक गाठला. स्वातंत्र्यपूर्व कालात भारतात काही कारखाने होते, पण त्यांची पुष्कळशी वाढ स्वातंत्र्यानंतरच्या कालातील आहे. कामगार हा कारखान्यातील एक महत्त्वाचा घटक आहे, ही जाणीव १९४५ नंतरच्या कालात होऊ लागली. सरकारने वेळोवेळी कायदे करून कामगारांची वैद्यकीय पूर्वतपासणी, आठवड्याचे कामाचे तास, लहान मुले व स्त्रिया ह्यांना विशिष्ट काम करण्याला बंदी इत्यादींविषयी नियम ठरवून दिले तसेच काही उद्योगपतींनी ह्यापलीकडे जाऊन स्वयंस्फूर्तीने कामगारांना विशेष सवलती देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला कामगार व व्यवस्थापक यांची औद्योगिक वैद्यकाकडे पहाण्याची दृष्टी संशयाची होती. नोकरीपूर्व तपासणी व वांरवार तपासणी करून कामगाराला नोकरीस अयोग्य ठरवावयाचे आहे असा कामगारांचा समज होता, तर व्यवस्थापकांना या व्यवस्थेवर होणारा खर्च अनावश्यक आहे असे वाटत होते. कालांतराने कामगारांच्या आरोग्य परिस्थितीत सुधारणा झाल्यावर व त्यांच्या अनुपस्थितीत घट होऊन उत्पादन वाढू लागल्यावर या विषयाचे महत्त्व प्रस्थापित झाले. ब्रिटनमध्ये कामगारांच्या आरोग्यविषयक कायद्यांत वरचेवर सुधारणा होत गेल्या आणि १९३७ व १९४८ ह्या साली त्यात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. भारतात १८८१ मध्ये ‘फॅक्टरी ॲक्ट’ प्रथम प्रसृत झाला व त्यात वेळोवेळी सुधारणा होत गेल्या. १९४८ मध्ये कायदेमंडळाने एक सर्वंकष कायदा, ज्याला ‘फॅक्टरीज ॲक्ट १९४८’ म्हणतात. तो मंजूर केला. ह्या कायद्याचे अनेक विभाग आहेत. त्यांपैकी काही विभाग (१) कामगाराचे आरोग्य, (२) सुरक्षितता, (३) स्वास्थ्य, (४) मुले व स्त्रिया ह्यांना काही कामांची बंदी इ. विषयांना धरून आहेत. ह्या विभागांतील नियमांचे पालन करण्यासाठी कारखानदारांना वैद्यकीय सल्ला घेणे जरूर असते तसेच सरकारदेखील कारखान्यासाठी खास वैद्यकीय अधिकारी नेमून त्याच्या कक्षेत येणाऱ्‍या कारखान्यांची पहाणी करते आणि कोठे ढिलाई किंवा कायद्याचे उल्लंघन झाल्यास कारखानदाराच्या नजरेस आणून देते.

यांशिवाय १९५९ मध्ये भारत सरकारने ‘कर्मचाऱ्यांच्या नुकसान भरपाईचा कायदा’ करून कारखान्यांतील कामामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीला अपाय झाल्यास त्याची भरपाई कारखान्याने केली पाहिजे असे ठरविले. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनाला मदत होते.

 उद्योगधंद्यांना लागणारा वैद्यकीय सल्ला देणाऱ्या व्यक्तीस ‘औद्योगिक वैद्यकीय सल्लागार’  रोगाचे निदान करून औषधोपचार करणाऱ्यास ‘कुटुंबीय डॉक्टर’ असे म्हणण्याची यूरोपमध्ये पद्धत आहे. ह्या दोघांचे कार्यक्षेत्र भिन्न असते व सहसा ते एकमेकांच्या कामात ढवळाढवळ करीत नाहीत. भारतात मात्र अजून कारखान्यातून काम करणाऱ्या डॉक्टरास दोन्ही प्रकारचे काम करावे लागते, पण हलकेहलके ‘कामगार विमा योजना’ जास्त उपयुक्त ठरून औषधोपचार करण्याचे काम कारखान्यातील वैद्याला करावे लागणार नाही.

औद्योगिक वैद्यकीय सल्लागार व त्याचे कार्यक्षेत्र : कर्मचारी काम करता करता एकाएकी आजारी पडला किंवा त्यास दुखापत झाली तर त्याला ताबडतोब वैद्यकीय मदत मिळणे आवश्यक असते. ज्या कारखान्यात पाचशेहून अधिक कर्मचारी असतात तेथे दवाखाना ठेवणे कायद्याने जरूर असते. हा दवाखाना योग्य पात्रता असलेल्या डॉक्टराच्या देखरेखीखाली असावा व मदतनीस म्हणून एक परिचारिका वा परिचारक असावा. डॉक्टर संपूर्ण वेळेचा किंवा अंश वेळेचा असावा. अर्थात हे कारखानदाराने ठरवावयाचे असते. कारखान्याचा विस्तार मोठा असल्यास डॉक्टर संपूर्ण वेळेचा ठेवणेच योग्य असते. काही मोठ्या उद्योगपतींनी कारखान्याला जोडून अद्ययावत रूग्णालयाची व्यवस्था केलेली आढळते.

ज्या ठिकाणी डॉक्टर थोड्या वेळेपुरता असतो तेथे त्याच्या गैरहजेरीत दवाखाना मदतनीसाच्या ताब्यात असतो. डॉक्टराच्या स्वतःचा दवाखान्याचा पत्ता व रहाण्याचे ठिकाण तसेच दूरध्वनीची सोय असल्यास क्रमांक ठळकपणे लावतात म्हणजे जरूर पडल्यास त्याला ताबडतोब बोलावता येते किंवा रोग्यास डॉक्टराच्या खाजगी दवाखान्यात पाठविणे सुलभ होते. रोगी अत्यवस्थ असेल तर नजीकच्या रूग्णालयात पाठविण्याची व्यवस्था असते.

डॉक्टराचे कामकाज: रोग्यास औषधोपचार करणे हे मुख्य काम असले तरी मुळात कर्मचारी आजारी पडू नये ह्याची दक्षता त्याने घ्यावी. ह्यासाठी कारखान्यातील आरोग्यमान सुधारण्याकडे त्याने लक्ष द्यावे. वेळोवेळी देवी, विषमज्वर, पटकी, धनुर्वात इ. रोगप्रतिबंधक लसी टोचाव्या. आजारामुळे किंवा दुखापत झाल्यामुळे कामगारास रजेसाठी दाखला भरून देणे व परत कामावर रूजू होण्यापूर्वी त्याला तपासून ‘काम करण्यास लायक’ असा शेरा मारणे ही डॉक्टराची कामे आहेत. प्रत्येक कामगाराच्या आजारी रजेची नोंद ठेवावी. ह्यावरून आजाराच्या कारणास्तव गैरहजेरीमुळे कामाचे किती दिवस बुडाले हे ठरविता येते. काही कालमर्यादेत ही संख्या अचानक वाढली तर त्याचे कारण शोधून काढून त्यावर योग्य उपाय योजावा. सर्वसाधारण आजारीपणामुळे गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या तीन ते चार टक्क्यांहून अधिक नसावी. गरोदर स्त्रीकामगारांची प्रसवपूर्व तपासणी करून त्यांना बाळंतपणासाठी बारा आठवड्यांची रजा द्यावी. स्त्रीकामगारांची संख्या पन्नासहून अधिक असल्यास बालसंगोपन केंद्र असावे. तेथे मूल सहा वर्षांचे होईपर्यंत ठेवता येते. त्या मुलाची वैद्यकीय तपासणी, आजारी पडल्यास औषधोपचार, प्रतिबंधक लसी टोचणे, त्यांना मिळणाऱ्या आहारावर लक्ष ठेवणे वगैरे कामे डॉक्टराला करावी लागतात.

कारखान्यातील निरनिराळ्या विभागांतून प्रथमोपचाराच्या पेट्या ठेवाव्यात व मधूनमधून त्यांची पहाणी डॉक्टराने करावी. पन्नास कर्मचाऱ्यांसाठी एक पेटी असे साधारणपणे प्रमाण असावे. प्रथमोपचाराचे शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्याच्या ताब्यात प्रत्येक पेटी असावी. काही मोठ्या कारखान्यांतून क्ष-किरण व्यवस्था, मलमूत्र व रक्त तपासण्याची व्यवस्था असते व ह्यामुळे डॉक्टराला रोगाचे निश्चित निदान करणे सुलभ होते. एखाद्या कामगारास आजारामुळे कामावर येणे शक्य नसेल व त्याने डॉक्टराला आपल्या घरी तपासण्यासाठी निरोप पाठविल्यास डॉक्टराने त्याच्या घरी जाऊन त्याला तपासावे व औषधोपचार करावा.

कामगारांना देण्यात येणारे अन्न सकस व पौष्टिक असावे. खाणावळी व उपहारगृहे ह्यांतील स्वच्छता, आचारी, वाढपी व इतर नोकर ह्यांचे आरोग्य ह्या गोष्टींवरही डॉक्टराने देखरेख ठेवावी. विशेषतः हगवण, आतड्यातील कृमी इ. रोग नसल्याबद्दल मल तपासून खात्री करून घ्यावी व संशय आल्यास त्यांना खाद्यपदार्थ हाताळू देऊ नये, तसेच स्वच्छ, जंतुविरहित थंड पिण्याचे पाणी मिळण्याची व्यवस्था असावी. पाण्याचे नमुने वेळोवेळी तपासून घ्यावेत. पिण्याचे पाणी व वापरण्याचे पाणी अशी निराळी व्यवस्था असावी जलाशयावर व नळावर तसा स्पष्ट उल्लेख असावा. सांडपाण्याची व्यवस्था उत्तम असावी. कामगारांसाठी संडास व मोऱ्या योग्य प्रमाणात व स्त्री आणि पुरूष वर्गांसाठी स्वतंत्र असावे, क्वचित प्रसंगी जमिनीखालून नेलेले पाण्याचे नळ खराब झाल्यास पिण्याचे पाणी व सांडपाणी मिश्रित होऊन पटकी, विषमज्वर, कावीळ वगैरे साथीचे रोग उद्‍भवतात.


वरील कामे आधुनिक वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉक्टराला करता येतात, पण अलीकडे औद्योगिक वैद्यकशास्त्र हा एक स्वतंत्र विषय मानतात व कित्येक पाश्चात्त्य विद्यापीठांतून या विषयाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम ठेवण्यात आलेला आहे. असे शिक्षण घेतलेल्या डॉक्टराची विशेष कामे पुढे दिली आहेत. नोकरीपूर्व वैद्यकीय तपासणीचे दोन उद्देश असतात. (अ) कामावर रूजू होण्यापूर्वी कामगाराचे आरोग्य सुस्थितीत आहे ह्या विषयीची खात्री करून कामगाराच्या आरोग्यासंबंधी माहिती देणारा तक्ता भरावा व फेरतपासणीच्या वेळी पुन्हा तक्ता भरून काही फरक आढळल्यास त्या कामामुळे आरोग्यास धोका आहे किंवा कसे ते ठरविता येते. (आ) पूर्वतपासणीत काही दोष आढळून आल्यास, अशा कामगारास तो दोष आड न येता कोणते काम देता येईल ते बघावे. उदा., एखाद्याची दृष्टी अधू असल्यास डोळ्याला ताण पडणार नाही असे काम द्यावे. शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तीस वेतन मिळवता यावे म्हणून एखाद्या सार्वजनिक संस्थेने शिफारस केल्यास निदान एक टक्का कामगार असे व्यंग असूनसुद्धा कामावर घ्यावेत, असा सरकारी आदेश आहे. त्याचे व्यंग बघून कोणते काम देता येईल ते वैद्यकीय तपासणीनंतर ठरविता येते. ह्यासाठी डॉक्टराला कारखान्यातील कामाची बरीच माहिती असावी लागते.

अमूक काम, अमूक वेळ केल्यावर त्याचा प्रकृतीवर काय परिणाम होतो हे शास्त्रीय दृष्ट्या ठरविता येते. ह्या शास्त्रास ‘कार्यमापनशास्त्र’ असे म्हणतात. ह्याच्या आधाराने एखाद्या होतकरू कामगारास देऊ केलेले काम त्याच्या शरीरप्रकृतीस झेपेल की नाही हे शास्त्रोक्त पद्धतीने ठरविता येते. सर्वसाधारणपणे कामाला लागल्यापासून पहिली फेरतपासणी सहा महिन्यांनी व नंतर दर दोन वर्षांनी करावी. आरोग्याला विशेष धोका असेल त्या विभागातील कामगारांची तपासणी दर सहा महिन्यांनी करावी. काही रोगांची सुरुवात इतक्या संथपणे असते की, बराच कालपर्यंत त्यांचे अस्तित्व लक्षातच येत नाही. फेरतपासणीत असले रोग हुडकून काढता येतात शिवाय जर शक्य असेल तर सर्व कामगारांची छोटी क्ष-किरण छायाचित्रे, दर दोन वर्षांनी काढावीत. अशा तपासणीत छातीच्या विकाराने (बव्हंशी क्षय) आजारी असलेले नवे रोगी निदान एक टक्का तरी आढळतात.

एखाद्या कामगारास स्‍नायूंचे काठिण्य किंवा संधिवात झाल्यास काम करणे अवघड होते. अशावेळी व्यावसायिक उपचारकेंद्राची मदत घ्यावी. ज्या कामगारांना बसूनच काम करणे शक्य असेल त्यांना खुर्च्या द्याव्यात. प्रत्येक व्यक्तीच्या उंचीप्रमाणे खुर्ची वरखाली करण्याची व्यवस्था असावी. पाठ सरळ राहून मान टेकण्यासाठी टेकू असावा. पाय लोंबकळत असतील तर त्यांनासुद्धा टेकू असावा. डॉक्टराने वेळोवेळी कारखान्यात फिरून कामगार कामाच्या वेळी योग्य अंगस्थिती ठेवतात किंवा नाही तेही पहावे तसेच व्यक्तिगत संरक्षणसाधने वापरतात किंवा नाही तेही पहावे. एखाद्या कामात कामगारास विशेष मेहनत पडत असेल तर त्या विभागाच्या अधिकाऱ्याशी विचारविनिमय करून यंत्रात काही सुधारणा करणे शक्य असल्यास व्यवस्थापकांना तशी सूचना करावी.

वरील कार्याशिवाय वैद्यकीय सल्लागाराला कारखान्यातील आरोग्याला विशेष धोकादायक विभागाची वरचेवर पहाणी करून रोग टाळण्यासाठी शक्य ते उपाय सुचवावे लागतात, तसेच कारखान्यातील नवीन इमारत बांधताना त्याचा परिसर, त्यात खेळणारी हवा, प्रकाश वगैरे गोष्टींचा विचार करण्यासाठी स्थापत्य शास्त्रज्ञांस मदत करावी लागते. कित्येक प्रसंगी कृत्रिम प्रकाश व कृत्रिम वातानुकूलता (कृत्रिमरीत्या अनुकूल हवामान परिस्थिती ठेवण्याची व्यवस्था) ह्यांचे साहाय्य घ्यावे लागते. आरोग्यदृष्ट्या हवामान, प्रकाश, तापमान, आवाज इ. बाबतींतही वैद्यकीय सल्ला घेतात.

प्रकाश : योग्य प्रकारचा व योग्य प्रमाणात प्रकाश उपलब्ध असल्यास काम करण्यास उमेद व उत्साह उत्पन्न होतो व कार्यक्षमता वाढते अर्थात प्रकाशझोत डोळ्यावर पडणे उपयोगी नाही.

स्वाभाविक प्रकाश : हा आदर्श समजतात कारण सर्वांत जास्त तीव्रता, समानता, विखुरण्याची क्षमता व झोत-अभाव हे त्याचे मुख्य गुण आहेत. त्याचा दोष म्हणजे त्याचा उपयोग फक्त दिवसा होतो व त्यातून हवा ढगाळल्यास त्याची तीव्रता कमी होते. दिनमानानुसारही त्यात पुष्कळ फरक पडतो म्हणून स्वाभाविक प्रकाशावर पूर्णपणे विसंबून रहाता येत नाही. उत्तर गोलार्धात खिडक्या व छपरातील गवाक्ष उत्तरेकडे ठेवल्याने ऊन कमी येऊन समतोल प्रकाश मिळतो. हा सर्वांत स्वस्त व मनाला आल्हाददायक असतो. मधूनमधून खिडकीतून बाहेर डोकावल्यास कामात विरंगुळा मिळतो व ह्या सर्वांचा परिणाम कार्यक्षमता वाढविण्यात होतो.

कृत्रिम प्रकाश : यासाठी अनुस्फुरक (फ्ल्युओरेसेंट) नलिका दिव्यांचा वापर होऊ लागला आहे. या दिव्यांचा प्रकाश सर्व बाजूंस समप्रमाणात पडतो व व्यवस्थित रीतीने बसविल्यास स्थिर रहातो. तथापि या दिव्यांमुळे जरूर तितका प्रखर प्रकाश मिळू शकत नाही म्हणून विशिष्ट व अतिसूक्ष्म कामांसाठी तसेच रंगांतील फरक चटकन लक्षात येणे आवश्यक आहे अशा ठिकाणी तंतुदीप वापरतात.

प्रकाशाच्या मापनासाठी ल्यूमेन हे एकक वापरतात. निरनिराळ्या कामांसाठी प्रकाशमान किती असावे हे कोष्टक क्रमांक १ वरून लक्षात येईल:

कोष्टक क्र. १. विविध ठिकाणी लागणारे प्रकाशमान 

ठिकाण 

ल्यूमेन 

जाण्यायेण्याची घरातील दालने व बोळ 

सर्वसाधारण कचेरी 

नकाशे व चित्र आरेखनाची जागा 

कच्चे मुद्रित तपासणे 

गिरणीतील विणकाम खाते 

कापड तपासणी खाते 

अभियांत्रिकी व ओतीव धातू कारखाने 

६ 

२० 

५० 

५० ते १०० 

४० ते ७० 

३०० ते ४०० 

१०० 

कारखान्यांतील किंवा कचेऱ्‍यांतील प्रकाशव्यवस्था करण्यासाठी इमारत बांधण्याच्या वेळीच प्रकाश तज्ञांचा सल्ला घ्यावा [→प्रदीपन अभियांत्रिकी].

हवामान: कारखान्यातील हवामान ठरविताना प्रामुख्याने उष्णता, आर्द्रता व हवेची गती या तीन गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात. जितकी आर्द्रता जास्त त्यामानाने घाम जास्त येतो. हवेतील आर्द्रता सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त असू नये. स्वच्छ हवा खेळती नसली तर कोंदट वाटते, विशेषतः आर्द्रता जास्त असेल तर हा परिणाम लौकर भासतो. हिवाळ्यात हवेची गती मिनिटाला सहा ते नऊ मीटर असावी उन्हाळ्यात थोडी जास्त असावी, पण मिनिटाला बारा ते पंधरा मीटरपेक्षा जास्त झाल्यास वाऱ्याचा झोत अंगाला झोंबतो. विशेषतः झोत पायावर आल्यास जास्त त्रास होतो, तसेच डोक्याच्या पातळीवरील हवा पायाच्या पातळीवरील हवेपेक्षा जास्त गरम असल्यास कोंदटपणा वाढतो.


काम करण्यास सुलभ असे परिणामकारक तापमान ठरविताना कोरड्या तापमापकाने दाखविलेले हवेचे तापमान,आर्द्रता व हवेची गती या तिघांचा समन्वय लावून आराखडा करावा. देशोदेशींचे हवामान भिन्न असल्यामुळे एकच प्रमाण सगळीकडे लावता येणार नाही (पहा: कोष्टकक्र.२).

मूलभूत पातळीचे तापमान २४·० से. पेक्षा जास्त असल्यास व आर्द्रता ५५ टक्के असल्यास काम करण्यास उत्साह वाटतो. हवा खेळती असावी.

अति-उष्णता असलेल्या जागी काम करणारास (उदा., काचकारखान्यातील भट्टी, ओतीव धातू कारखान्यातील भट्टी, बॉयलर, आगगाडी किंवा आगबोट ह्यातील यांत्रिक खोली इ.) सुरुवातीस त्रास होतो.  विशेषतः थंड प्रदेशातून उष्ण प्रदेशात नोकरीसाठी जाणारास हा त्रास जास्त जाणवतो, पण साधारण महिन्याभरात तो ह्या वातावरणाला रुळतो. घाम आल्यामुळे शरीराची उष्णता कमी होण्यास मदत होते जितका जास्त घाम येतो तितके बरे वाटते. घामावाटे जे पाणी व लवणे बाहेर टाकली जातात त्यांची भरपाई वरचेवर पाणी पिऊन करावी व जरूर पडल्यास लवणयुक्त पेये किंवा मिठाच्या गोळ्या घ्याव्या. शरीरातील लवणे फार कमी झाल्यास अती थकवा वाटतो, पायांत गोळे येतात. नवीन कामाला लागलेल्या कामगारात सुरुवातीस घामाच्या वाटे जाणार्‍या लवणाचे प्रमाण जास्त असते. पुढे तो कामगार त्या वातावरणाला रुळला म्हणजे हे प्रमाण बरेच कमी होते. कामाच्या जागी आर्द्र तापमापकाची नोंद २४ते २७ पेक्षा जास्त गेल्यास कामगाराची कार्यक्षमता कमी होते. ह्याउलट अती थंड हवेमुळे कामात व्यत्यय येत नाही. ह्या वातावरणाला तो लौकर रुळतो. हाताच्या बोटांकडे जास्त रक्तपुरवठा होऊन त्यांना ऊब येते व काम करणे सुलभ होते.

कोष्टक क्र. २. निरनिराळ्या देशांमधील परिणामकारक तापमान 

देश 

परिणामकारक तापमानसे. 

मलाया 

भारत (कलकत्ता) 

इराण 

ऑस्ट्रेलिया 

अमेरिका (हिवाळा) 

अमेरिका (उन्हाळा) 

ब्रिटन (हिवाळा) 

ब्रिटन (उन्हाळा) 

२६·११ 

२५·०० 

२५·०० 

२४·४४ 

२१·६७ 

२३·८९ 

१७·२२ 

२१·६७ 

आवाज : आवाजाच्या तीव्रतेचे मापन डेसिबेलमध्ये करतात. श्रवणमापकाने कर्णेंद्रियाची क्रियाशीलता ठरविता येते. उदा., एखाद्या कामगाराच्या कामाच्या जागी काढलेल्या श्रवणालेखाची तुलना त्याच वयाच्या एखाद्या निरोगी माणसाच्या ध्वनिबंदिस्त खोलीत काढलेल्या श्रवणालेखाशी करतात. कोष्टक क्र. ३ मध्ये विविध परिस्थितींतील आवाजमानाचे आकडे दिले आहेत :

कोष्टक क्र. २. विविध परिस्थितींतील आवाजमान

विशिष्ट परिस्थिती 

आवाजमान डेसिबेल 

खेडेगावातील रात्रीची शांतता 

घरातील दिवसाचे संभाषण 

हमरस्त्यावरील वाहनांची वर्दळ 

टरेट लेथवरचे काम 

वायवीय छिद्रण यंत्राचे काम 

पायाने चालविण्याची चक्की (ग्राइंडर) 

जेट विमान (३० मी. उंचीवर) 

२० 

६० 

८० 

९० 

१०० 

१०५ 

१२० 

तरूणपणी (२० ते ४० वयाच्या दरम्यान) कानावर पडणार्‍या वीस ते दहा हजार ह्या कंप्रता (दर सेकंदास होणाऱ्या कंपनांची संख्या) कक्षेतील ध्वनितरंग समजू शकतात. जसजसे वय वाढत जाते तसतसे दीर्घ ध्वनितरंग ऐकणे कठीण होते. संभाषणाचे ध्वनितरंग तीनशे ते तीन हजार ह्या कंप्रता कक्षेतील असतात.

जितका मोठा आवाज व त्याची जितकी जास्त कालमर्यादा तितका बहिरेपणा लौकर येतो. वयोमानाबरोबर ह्याचा परिणाम वाढत जातो. एखाद्या फार मोठ्या आवाजामुळे तात्पुरता बहिरेपणा येतो (उदा., दिवाळीतील ॲटमबाँब फटाका), पण असे वरचेवर होत गेल्यास कायमचा बहिरेपणा येण्याचा संभव असतो. प्रथम चार हजार कंप्रतेचे ध्वनितरंग ऐकू येत नाहीत. ही कक्षा संभाषणाच्या कक्षेपेक्षा फक्त एक हजार आवर्तनांनीच जास्त आहे. हा इशारा समजून अशा कामगारास आवाजापासून दूर ठेवावे नाही तर थोड्याच कालात त्याची संभाषण ऐकण्याची शक्ती कमी होईल. ३००—६०० कंप्रता असलेल्या कक्षेतील ध्वनितरंगच मुख्यतः बहिरेपणा आणतात अर्थात वैयक्तिक फरक असू शकतो पण एखाद्या कारखान्यातील ८० टक्के कामगारांच्या कानांचे रक्षण करावयाचे असेल, तर ३००—६०० कंप्रतेच्या कक्षेतील तीव्रता ८५ डेसिबेलपेक्षा जास्त असू नये. मिश्र तरंगांच्या आवाजापेक्षा एकाच तरंगाचे आवाज (उदा., हातोड्याचा आवाज, रिव्हेट मारण्याचा आवाज, मोटारीच्या एंजिनाचा निष्कास म्हणजे जळालेले इंधन वायू बाहेर पडणे वगैरे) हे जास्त अपायकारक असतात व ते ७५ डेसिबेलपेक्षा जास्त झाल्यास त्रास होतो. कारखान्यातील कोठलाही आवाज (जरी थोडाच वेळ झाला तरी) १३० डेसिबेलपेक्षा जास्त नसावा. इतक्या मोठ्या आवाजाने कान दुखतात व कामगाराचे लक्ष उडून कामावरही त्याचा परिणाम होतो. कित्येक कारखान्यांत प्रचंड कंपने निर्माण करणारी विविध वायवीय (दाबाखालील हवेच्या साहाय्याने चालणारी) हत्यारे वापरण्यात येतात व ही हत्यारे वापरणाऱ्या कामगारांत रक्तवाहिन्या, स्‍नायू व सांधे यांच्या विकृती निर्माण होणे शक्य असते असे दिसून आले आहे.

आवाज कमी करण्याचे पुष्कळ उपाय आहेत. यंत्राची घडण करण्याच्या वेळी आवाज कमी करण्याचे उपाय लक्षात घेणे आवश्यक असते. आवाज होत असेल तर त्या भागावर झाकण असावे, आतून नमद्यासारख्या (फेल्टसारख्या) कापडाचे आच्छादन असावे व कोठलाही भाग ढिला नसावा. आवाज सरळ रेषेत फार चटकन पसरतो, तो तोडण्यासाठी नागमोडी भागातून जाऊ द्यावा (उदा., मोटारीचा ध्वनिशामक). कारखान्यातील भिंतींना दोन मीटर उंचीपर्यंत लाकडी आवरण असावे किंवा सूक्ष्म भोके असलेले जाळ्यांसारखे आच्छादन असावे म्हणजे ह्या भोकांत ध्वनितरंग अडकले जाऊन आवाजाची तीव्रता कमी होते. ज्या विभागांत आवाज जास्त होण्याचा संभव ते अलग बांधावे म्हणजे इतर सर्व कर्मचार्‍यांना त्रास होणार नाही. कारखान्याचा कचेरी विभाग स्वतंत्र इमारतीत असावा.


ह्या सर्व उपायांनी आवाज विशेष कमी होत नसेल तर कामाच्या वेळी कामगारांना कानांत घालण्यासाठी बुचे द्यावीत. सतत मोठ्या आवाजामुळे एकदा आलेला बहिरेपणा कायमचा असतो, म्हणून कानबुचे घालणे आवश्यक आहे असे त्यांना समजावून सांगावे. प्लॅस्टिकची बुचे स्वस्त व परिणामकारक असतात, पण बराच वेळ घातल्यास ती गरम होतात व मळकट दिसतात. ह्यामुळे बरेच कामगार ती घालण्याची टाळाटाळ करतात. दुसरा उपाय म्हणजे दूरध्वनीच्या शिरःश्रवणीसारखे (हेडफोनसारखे) डोक्यावरून घालण्याचे व कानावर घट्ट बसविण्याचे चाप उपलब्ध आहेत पण ते बरेच महाग व अवजड असतात म्हणून कामगार ते घालण्याचे टाळतात. वेळोवेळी काढलेल्या श्रवणालेखावरून कामगाराची श्रवणशक्ती झपाट्याने कमी होत आहे, असे आढळल्यास त्या कामावरून त्याची बदली करावी. बहिरेपणा येण्यापूर्वी एकसारखा घंटानादासारखा आवाज येऊ लागल्यास ते बहिरेपणाचे पूर्वचिन्ह समजून त्यांना अशा कामावरून दूर ठेवावे.

थकवा:कामगारांना सतत एकाच अंगस्थितीत, तेच तेच काम केल्याने थकवा व कंटाळा येतो. त्यामुळे उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. याकरिता कामाचे तास, विश्रांतीच्या वेळा व सुट्ट्या यांची योग्य सांगड घालणे आवश्यक असते. थकव्यामुळे कामगाराची शारीरिक तसेच मानसिक स्थिती बिघडणे शक्य असते. या दृष्टीने कारखान्यातील सर्वसाधारण वातावरण आल्हाददायक असणे तसेच उपहारगृह व करमणुकीची साधने यांची सोय असणे आवश्यक ठरते[→औद्योगिक मानसशास्त्र कामाचे तास].

इतर आरोग्यविषयक बाबी : विविध प्रकारच्या खाणी, पारा, शिसे, रंगाचे कारखाने, क्रोमियम धातूचे काम, विषारी वायूंचा संबंध येणारे काम इ. विशेष धोक्याच्या जागी काम करणाऱ्या कर्मचाऱ्‍यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष पुरवावे लागते. फॅक्टरीज ॲक्ट १९४८ मध्ये अशा कारखान्यांची यादी आहे व सरकारने नेमलेला अधिकारी ह्या विभागांची कसून तपासणी करतो [→औद्योगिक धोके व्यवसायजन्य रोग].

कामगाराचे आरोग्यसंरक्षण: धोकादायक कामापासून होणारे अनिष्ट परिणाम टाळण्यासाठी सर्वसाधारण उपाय योजावेत. जेथे धुळीचे कण किंवा विषारी वायू असतील ते परस्पर बाहेर जाण्यासाठी हवा खेचणारे पंखे बसवावेत. पाऱ्याचे काम स्वतंत्र खोलीत करावे व जमिनीवर पाण्याचा मारा करावा म्हणजे सांडलेले पाऱ्याचे कण पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जातात. ज्या कामगारांचा संबंध किरणोत्सर्गी (भेदक किरण वा कण बाहेर फेकणाऱ्या) वस्तूंशी येत असेल त्यांना स्वतंत्र खोलीत काम करावयास देणे व छातीवर किरणोत्सर्ग परिणाम दर्शविणारी छोटी फिल्म बसविलेला बिल्ला कामाच्या वेळी अडकविणे आवश्यक ठरते. असे केल्यामुळे दर महिन्यास ही फिल्म तपासून त्या कामापासून कामगारास धोका आहे किंवा नाही हे ठरविता येते.

व्यक्तिश: वापरण्याचे संरक्षक उपाय : खाण कामगारास डोक्यास इजा होऊ नये म्हणून शिरस्त्राण देतात. धातू सांधणाऱ्या कामगारांस ऑक्सि ॲसिटिलीन ज्योतीपासून डोळ्याचे संरक्षण करण्यासाठी खास चष्मा देतात. क्ष-किरणांशी ज्यांचा संबंध येतो त्यांना शिसे असलेला अंगरखा व हातमोजे देतात. तीव्रअम्‍ल किंवा क्षार (अल्कली) हाताळणारांना रबरी अंगरखे, हातमोजे व गुडघ्यापर्यंतचे रबरी बूट देतात. भट्टीवर काम करणारांच्या बुटांना लाकडी तळवे बसवतात, कारण रबर किंवा चामडे उष्णतेमुळे खराब होते. काही रासायनिक द्रव्ये त्वचेस लागल्यास इजा होते म्हणून एखादे विशिष्ट मलम वापरतात.कामाच्या वेळी घालण्याचे कपडे स्वतंत्र असावेत व ते बदलून, जमल्यास स्‍नान करून, मग घरी गेल्यास त्यावर चिकटलेले विषारी कण घरात येणार नाहीत. हे कपडे धुण्याची व्यवस्था कामाच्या जागी असावी तसेच जेवणापूर्वी कामगाराने हातपाय व तोंड स्वच्छ धुवावे. आवाजाचा त्रास कमी करण्यासाठी कानातील बुचांविषयी वर उल्लेख आलेला आहे. ज्या विभागात धुळीचे कण (उदा., काचकारखान्यातील मिश्रण विभाग) वातावरणात पसरतात तेथील कामगारांना नाकावर, तोंडावर घट्ट बसणारे मुखवटे द्यावेत. त्यातील बारीक छिद्रे असलेल्या पडद्यामुळे हवा गाळली जाते. काही कालापर्यंत हा मुखवटा घातल्यानंतर कामगारास श्वासोच्छ्‌वासास त्रास होऊ लागला तर ही छिद्रे पूर्णतः बंद झाली असे समजावे व पडदा बदलावा. वायूपासून बचावासाठी असेच मुखवटे असतात. पाणबुड्यांचा एक खास पोशाख असतो आणि ऑक्सिजनाचा पुरवठा करण्यासाठी पाठीला नळकांडे बांधलेले असते. वर सुचविलेली व्यक्तिगत उपाय सामग्री कारखानदारांनी कामगारांना पुरवणे आवश्यक असते, पण अनुभव असा आहे की, एकंदरीत कामगार ते वापरण्याची टाळाटाळ करतात. म्हणून कामगारांना त्यांसंबंधी विशेष शिक्षण देणे जरूर असते.

औद्योगिक आरोग्यविषयक सरकारी यंत्रणा : कामगाराचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी बरेच कायदे अस्तित्वात आहेत. हा विषय मजूर मंत्रालयाच्या कक्षेत येतो. कायद्यातील मुख्य तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत: (१) स्वच्छता, रोजचा कचरा नेण्याची व्यवस्था, रंगसफाई वा सफेदी वेळोवेळी करणे. (२) प्रत्येक कामगारास १४ घ.मी. जागा असावी. तीत जमिनीपासून ४·२५ मी. उंचीवरचा भाग येत नाही. प्रत्येक विभागात एकावेळी किती कामगार काम करतात याची नोंद ठेवणे व कामाच्या जागी स्वच्छ हवा, भरपूर प्रकाश व बेताचे तापमान राखावे. (३) प्रथमोपचाराची व्यवस्था करणे, अल्पवयी कामगारांची वैद्यकीय तपासणी करणे. (४) पुरेशा मोऱ्या, संडास (पुरूष व स्त्री कामगारांसाठी निराळे) असावेत. (५) अपघात टाळण्याचे सर्व उपाय योजणे. आग विझविण्याची व्यवस्था व प्रसंग पडल्यास बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र दरवाजे ठेवावेत. (६) कामगार कल्याणविभागात विश्रांतीसाठी सोय, पिण्याचे स्वच्छ पाणी, पौष्टिक आहार, स्‍नानाची व्यवस्था, कपडे धुण्यासाठी साबण व कपडे ठेवण्यासाठी व्यवस्था असावी.

ह्या सर्व कायद्यांचे पालन व्यवस्थितपणे केले जाते किंवा नाही ह्यासाठी सरकारी औद्योगिक तपासनीस असतो. सध्या कामगार आरोग्य विमा योजनादेखील सरकारने स्वतःकडे घेतली आहे व योग्य पात्रता असलेल्या डॉक्टरांची यादी करून कामगारास त्यांतील एकाची निवड करता येते. एका डॉक्टराने किती कामगार आपल्याकडे नोंदवावेत ह्याची कमाल मर्यादा ठरलेली आहे.

कामगारांचे आरोग्यविषयक संशोधन करण्यासाठी एक मध्यवर्ती कामगार संस्था भारत सरकारने सुरू केली आहे. कारखानदार व औद्योगिक वैद्यकीय सल्लागार यांच्या सहकार्याने ही संस्था संशोधन कार्य करीत आहे.

 कामगार आरोग्य विमा योजना:कामगार आजारी पडल्यास त्याचे दुहेरी नुकसान होते. गैरहजेरीमुळे कामात खंड पडून पगारकपात होते व औषधाचा खर्च होतो तो निराळाच. ही परिस्थिती सुधारण्यासाठी आरोग्य विमा योजना अंमलात आली. भारतात सध्या विशिष्ट उत्पन्न गटातील कामगारांचा आरोग्य विमा उतरविण्याची कारखानदारांना सक्ती केली आहे. विम्याचा हप्ता कामगार, कारखानदार व सरकार अशा तिघांकडून घेण्यात येतो. वैद्यकीय व्यवस्थेचा सर्व खर्च यातून होतो. आजारपणात कामगारास वैद्यकीय मदत विनामूल्य मिळते व ह्या गैरहजेरीत त्याच्या पगाराची भरपाई झाल्यास व ते काम करणे पुढे शक्य नसल्यास नुकसान भरपाई दिली जाते. बाळंतपणाची भरपगारी रजा पण ह्या योजनेखाली मिळते. काही देशांत ही योजना कर्मचाऱ्यांपुरतीच नसून सर्व प्रजेला तिचा फायदा मिळतो (उदा., ब्रिटन), तर काही देशांत खाजगी विमा कंपन्या अशा तऱ्हेचा विमा उतरवितात (उदा., अमेरिकेची संयुक्त संस्थाने). पुष्कळ कारखानदार व व्यापारी संस्था आपल्या नोकरवर्गास आजारपणात आर्थिक मदत देतात. केंद्र सरकारने आपल्या नोकरवर्गासाठी अशीच योजना अंमलात आणली आहे.

 


पहा: अपघात, औद्योगिक औद्योगिक धोके औद्योगिक मानसशास्त्र कामगार राज्य विमा योजना व्यवसायजन्य रोग सामाजिक सुरक्षा सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य.

संदर्भ : 1. Johnstone, R. T. Occupational Medicine and Industrial Hygiene, St. Louis, 1948.

    2. Johnstone, R. T. Miller, S. E. Occupational Diseases and Industrial Medicine, 1960.

    3. Merewether, E. R. A. Ed., Industrial Medicine and Hygiene, 3 Vols., 1954-56.

    4. Page, R.C.Occupational Health and Man-talent Development, St. Louis, 1968.

    5. Schilling, R.S.F. Modern Trends in Occupational Health, 1961.

तळवलकर, चिं. वा.