फ्रांक (फ्रँक), इल्या म्यिखायलव्हिच : (२३ ऑक्टोबर १९०८– ). रशियन भौतिकीविज्ञ. ⇨पाव्ह्ये चेरेनकॉव्ह व ⇨ ईगॉऱ्‍य टाम यांच्याबरोबर फ्रांक यांना १९५८ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.

त्यांचा जन्म लेनिनग्राड येथे झाला. मॉस्को विद्यापीठातून १९३० मध्ये पदवी मिळाविल्यानंतर १९३१ मध्ये ते लेनिनग्राड येथील सरकारी प्रकाशकीय संस्थेत वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी आ‌णि १९३४ मध्ये रशियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या पी. एन्. ल्येब्येड्येव्ह इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स या संस्थेत वैज्ञानिक अधिकारी झाले. १९४१ मध्ये ते ॲकॅडेमीच्या अणुकेंद्रीय प्रयोगशाळेचे प्रमुख व १९४४ मध्ये मॉस्को विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक झाले. १९५७ पासून ते अणुकेंद्रीय संशोधनाच्या संयुक्त संस्थेच्या न्यूट्रॉन प्रयोगशाळेचे संचालक म्हणूनही काम करीत आहेत.

सुरुवातीला त्यांनी प्रकाश-संदीप्ती [दृश्य, अवरक्त जंबुपार प्रारणमुळे उद्‌भवणारी संदीप्ती ⟶ संदीप्ति] व प्रकाशरसायनशास्त्र या विषयांत संशोधन केले. १९३४ मध्ये त्यांनी अणुकेंद्रीय भौतिकीवरील संशोधनास प्रारंभ केला. एखाद्या माध्यमातून विद्युत् भारित कण त्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक वेगाने जात असतील, तर त्यांपासून एक विशिष्ट प्रकारचे प्रारण (तरंगरुपी उर्जा) उत्सर्जित होते, असा चेरेनकॉव्ह यांनी १९३४ मध्ये शोध लावला आणि हे प्रारण ‘चेरेकॉव्ह प्रारण’ या नावाने (किंवा एस्. आय्. व्हॅव्हिलॉव्ह यांच्या मार्गदर्शनाखाली यासंहबंधीचे संशोधन झालेले असल्यामुळे ‘व्हॅव्हिलॉव्ह-चेरेकॉव्ह प्रारण’ नावानेही) ओळखण्यात येते. या शोधामुळे उच्च गती असलेल्या कणांचा वेग मोजण्याच्या व या कणांचे अस्तित्व ओळखण्याच्या नवीन पद्धती उपलब्ध झाल्या. या पद्धती अणुक्रेंद्रीय भौतिकीतील तसेच विश्वकिरणांवरील (बाह्य अवकाशातून पृथ्वीवर पडणाऱ्या अतशिय भेदक किरणांवरील) संशोधनात अतिशय महत्त्वाच्या ठरल्या आहेत. फ्रांक व टाम यांनी या परिणामाचे सैद्धांतिक स्पष्टीकरण १९३७ मध्ये दिले आणि या कार्याकरिताच त्यांना नोबेल पारि‌तोषिकाचा बहुमान ‌मिळाला. इलेक्ट्रॉन प्रारणसंबंधीही फ्रांक यांनी चेरेनकॉव्ह व टाम यांच्याबरोबर संशोधन केले आणि त्याबद्दल त्या तिघांना १९४६ मध्ये स्टालिन पारितोषिक देण्यात आले. वरील संशोधनाखेरीज फ्रांक यांनी गॅमा किरणांमुळे होणारी इलेक्ट्रॉन-पॉझिट्रॉन युग्माची निर्मिती आणि गॅमा किरणांचे मापन व अनुप्रयोग यासंबंधीच्या इतर समस्यांविषयीचे प्रायोगिक कार्य, न्यूट्रॉन भौतिकी, हलक्या अणुकेंद्रांसंबंधीच्या ‌‌विक्रिया व मेसॉनांद्वारे अणुकेंद्रीय भंजन (अणुकेंद्राचे तुकडे पडणे) यांविषयी संशोधन केलेले आहे.

ते रशियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे १९४६ मध्ये सदस्य झाले. वरील सन्मानाशिवाय त्यांना भौति‌क-गणितीय शास्त्रातील डॉक्टरेट पदवी (१९३५), ऑर्डर ऑफ लेनिन (दोन वेळा), ऑर्डर ऑफ द ऑक्टोबर रेव्होल्युशन (१९७८), व्हॅव्हिलॉव्ह सुवर्णपदक (१९७९) इ. सन्मान मिळालेले आहेत.

भदे, व. ग.