नेत्रपेढी: (आय बॅंक). ज्या संस्थेत मृतांचे किंवा जिवंत माणसांचे काढून घेतलेले डोळे जतन करून ठेवण्याची आणि गरजेनुसार पुरविण्याची व्यवस्था असते तिला नेत्रपेढी म्हणतात. महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण संस्थांशी संलग्न अशा बहुतेक सर्व रुग्णालयांत नेत्रपेढ्या स्थापन झाल्या आहेत.

स्वच्छमंडलावर (बुबुळाच्या पुढच्या पारदर्शक भागावर) जखम झाल्यामुळे किंवा फूल पडल्यामुळे त्याच्या पारदर्शकत्वावर परिणाम होऊन दृष्टिमांद्य येते. कधीकधी दृष्टी एवढी अधू बनते की, जवळ–जवळ अंधत्वच येते. अशा व्यक्तींना दृष्टी प्राप्त करून देण्याकरिता स्वच्छमंडलाचा अपारदर्शी बनलेला भाग काढून टाकून त्या जागी चांगला पारदर्शक भाग बसविण्याची कल्पना बरीच जुनी आहे. या उद्देशाने प्रथम जनावरांच्या डोळ्यांतील स्वच्छमंडल वापरून बघण्यात आले. १८४० मध्ये मूलबॉवर आणि १८४४ मध्ये वुट्‌झर या जर्मन शास्त्रज्ञांनी पहिले प्रयोग केले, परंतु ते अयशस्वी ठरले. त्यानंतर काही वर्षे याबाबतीत प्रयत्न मागे पडले. १८८८ मध्ये एर्न्स्ट फुक्स या जर्मन नेत्रवैद्यांनी केलेले प्रयोग आशादायक ठरले. १९०८ मध्ये प्लॅंग नावाच्या नेत्रवैद्यांनी एक अभिनव प्रयोग केला. त्यांच्या एका रोग्याच्या दोन डोळ्यांपैकी एक डोळा पूर्ण आंधळा होता, परंतु त्याचे स्वच्छमंडल चांगले होते. दुसऱ्या डोळ्यास केवळ स्वच्छमंडलाच्या विकृतीमुळे अंधत्व आले होते. या दुसऱ्या डोळ्यातील स्वच्छमंडलाचा विकृत भाग काढून टाकून त्या जागी आंधळ्या डोळ्यातील चांगल्या स्वच्छमंडलाचा भाग बसविण्यात आला. ही शस्त्रक्रिया फारच यशस्वी ठरून त्या रुग्णास त्या डोळ्याने चांगले दिसू लागले. मानवी डोळ्याचा भाग बसविण्याच्या या यशस्वी प्रयोगानंतर रशियन नेत्रवैद्यांनी याबाबतीत अधिक प्रगती केली व लवकरच ही शस्त्रक्रिया जगाच्या इतर भागांतही प्रसृत झाली.

वरील यशामुळे उत्तेजन मिळाल्यामुळे मृत माणसाच्या डोळ्यांतील स्वच्छमंडलाचा पाहिजे तेवढा तुकडा कापून घेऊन तो जिवंत माणसाच्या विकृत स्वच्छमंडलाच्या जागी कलम करण्याचे प्रयत्न झाले आणि तेही यशस्वी ठरले. आजच्या नेत्रवैद्यकात ही शस्त्रक्रिया एक रूढ शस्त्रक्रिया बनली असून तिला ‘स्वच्छमंडल–कलम शस्त्रक्रिया’ (कॉर्नियल ग्राफ्टिंग किंवा केरॅटोप्लॅस्टी) म्हणतात.ही शस्त्रक्रिया फक्त स्वच्छमंडल अपारदर्शकत्वामुळेच अंधत्व आले असल्यास उपयुक्त असते. इतर कारणांमुळे आलेल्या अंधत्वावर [→ अंधत्व] तिचा उपयोग होत नाही.

जिवंत माणसाच्या किंवा मृतांच्या डोळ्यांतील स्वच्छमंडले मिळण्यात व वापरण्यात अनेक अडचणी आहेत. जिवंत माणसाचा डोळा मिळण्याचे प्रसंग फारच अल्प प्रमाणात येतात. मृत माणसाचा डोळा मिळाल्यास त्याचा भाग मृत्यूनंतर केवळ तीन तासांच्या आतच वापरावा लागतो. मृत माणसाच्या देहाला इजा करण्यास परवानगी देणारे नातेवाईक दुर्लभच असतात. शिवाय दात्याला कोणताही गुप्तरोग असता कामा नये. एवढे मात्र निश्चित की, इतर ऊतक (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींचा समूह) किंवा अवयव (मूत्रपिंड वगैरे) दान करणाऱ्या दात्याचा आणि रोग्याचा रक्तगट जमावा लागतो तसास्वच्छमंडल-कलम शस्त्रक्रियेच्या वेळी लागत नाही कारण स्वच्छमंडलात रक्तवाहिन्याच नसतात.

मृतांचे डोळे मिळण्यामध्ये काही कायदेशीर अडचणी आहेत. ब्रिटनमध्ये ‘कॉर्नियल ग्राफ्टिंग ॲक्ट १९५२’ नावाचा कायदा करण्यात आला असून मृत माणसांचे डोळे चिकित्सात्मक उपयोगाकरिता काढता येण्याची तरतूद केली आहे. महाराष्ट्र सरकारनेही अशा प्रकारचा कायदा केला आहे.

डोळे काढण्यास मेलेल्या व्यक्तीची किंवा तिच्या नातेवाईकांची हरकत असता कामा नये. ब्रिटनमधील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द ब्लाइंड’ या संस्थेने नेत्रदान करणाऱ्याकरिता खास प्रपत्रे भरून देण्याची व्यवस्था केली आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयातील ‘दिवाणबहादूर एस्‌. के. नायमपल्ली सरकारी नेत्रपेढी’ या संस्थेतर्फे नेत्रदात्यांकडून भरून घेण्यात येणाऱ्या प्रपत्रात ‘मी मरणोत्तर माझे डोळे ससून रुग्णालयाच्या नेत्रपेढीस दान करीत आहे. या डोळ्यांचा उपयोग सदर नेत्रपेढीने कुणाही अंधास दृष्टी परत मिळविण्याकरिता किंवा अंधत्वावरीलसंशोधनाकरिता किंवा डोळ्यांच्या रोगावरील परिणामकारक इलाज शोधून काढण्याकरिता करावा’ अशा अर्थाचा मजकूर समाविष्ट करण्यात आलेला असून त्यावर दात्याचा कायदेशीर वारस तसेच एखादा नातेवाईक किंवा मित्र यांची साक्षीदार म्हणून सही लागते.

असे काढून घेतलेले डोळे प्रशीतक (रेफ्रिजरेटर) वगैरे वापरून जास्तीत जास्त एक महिना वापरण्यायोग्य टिकू शकतात. ते अधिक काळ टिकावेत म्हणून संशोधन चालू आहे.

संदर्भ : पटवर्धन, द. गो. आपले डोळे (त्यांची रचना, कार्य आणि आरोग्य), पुणे, १९६४.

भालेराव, य. त्र्यं.