गार्टोक : काएर. तिबेटच्या पश्चिम सरहद्दीवरील एन् गारी जिल्ह्याचे ठाणे. हे कैलास पर्वतरांगेच्या पश्चिम टोकावर, समुद्रसपाटीपासून ४,६३३ मी. उंचीवर, ल्हासाच्या पश्चिमेस १,२८७ किमी. आहे. प्राचीन बॉन धर्माचे उगमस्थान म्हणून तिबेटच्या सांस्कृतिक इतिहासात याला विशेष महत्त्व आहे. येथून शिपकी खिंडीद्वारे सिमला, ब्रह्मपुत्रा नदीमार्गे मध्ये तिबेट आणि सिंधू नदीमार्गे लेह हे रस्ते लमाणी तांड्यांनी शतकानुशतके व्यापारासाठी वापरले आहेत. १९०४ च्या यंग हजबंड स्वारीपासून गार्टोकमार्गे ब्रिटिशांचा तिबेटशी व्यापार सुरू झाला. १९६२ पर्यंत भारतीय व्यापार कचेरीही तेथे होती. हल्ली चिनी सैन्याचा मोठा तळ येथे असून दवाखाना, शाळा, पोस्ट, बँका वगैरेंमुळे गार्टोकला आधुनिक स्वरूप आले आहे. येथे विमानतळ असून उत्तम सडकांनी हे चीनच्या विविध भागांशी जोडलेले आहे. उन्हाळ्यात येथे मोठा बाजार भरतो व लाखो रुपयांची उलाढाल होते.

ओक, द. ह.