अश्मरी : अश्मरी म्हणजे काही विशिष्ट इंद्रियांत सामान्यत: अजैव (वा खनिज) द्रव्य एकत्र गोळा होऊन तयार होणारा खडा. वृक्क (मूत्रपिंड), मूत्राशय, अग्निपिंड (पचनव्यूहातील एक ग्रंथी,→ अग्निपिंड), अष्ठीला ग्रंथी, लालग्रंथी व पित्ताशय आणि त्यांच्या वाहिन्या यांमध्ये अश्मरी उत्पन्न होऊ शकतो.

मूत्रतंत्रातील (मूत्रव्यूहातील) वृक्क व मूत्राशय या ठिकाणी मूत्राश्मरीचे प्रमाण अधिक दिसते. प्राकृतांवस्थेतही (सर्वसाधारण अवस्थेतही ) मूत्रातून कित्येक वेळा विविध संयुगांचे स्फटिक असतात,

आ. २. मुख्यतः कॅल्शियम ऑक्झॅलेटाचा बनलेला वृक्कातील अश्मरी.
आ. १. मूत्राशयातील अश्मरीचा छेद.

पण त्यांच्यापासून अश्मरी उत्पन्न होत नाही. अश्मरी तयार होण्यासाठी त्याच्या मध्यभागी रक्तक्लथ (गोठलेल्या रक्तांची गुठळी ), जंतुपुंज किंवा अधिस्तरातील (अगदी जवळजवळ असलेल्या, शरीरातील सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या पटलांच्या एक वा अनेक थरांमधील रचनेतील) मृत कोशिकांचा समूह असावा लागतो. असे केंद्रस्थानी असलेले पदार्थ असतील,

तर त्यांवर मूत्रातील लवणे अवक्षेपित होतात (पुटे चढतात). अशा अवक्षेपणामुळे अश्मरी तयार होऊन त्याच्यावर निरनिराळ्या वेळी निरनिराळी लवणे अवक्षेपित झाली म्हणजे अश्मरी मोठा होत जाऊन त्यात लवणांचे एकावर एक असे थर उत्पन्न होतात.

संप्राप्ती : मूत्रतंत्रातील अश्मरीच्या उत्पत्तीबद्दल निश्‍चित सांगता येत नाही, पण जंतुसंसर्ग, मूत्रातील लवणांची संहती (एकक घनफळातील प्रमाण), अ जीवनसत्त्वन्यूनता, ⇨परावटू ग्रंथीचे अर्बुद (कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणारी निरुपयोगी गाठ) व फार काळापर्यंत निजून राहावे लागणे या गोष्टींचा मूत्राश्मरींच्या उत्पतीशी संबंध आहे असे मानले जाते.

याशिवाय उष्ण हवामान व त्या मानाने पाणी कमी प्रमाणात जाणे तसेच निकृष्ट आहार यांमुळेही मूत्राश्मरी उत्पन्न होण्याचा संभव असतो. सिंध, खानदेश वगैरे अती उष्ण भागांत मत्राश्मरीचे प्रमाण अधिक दिसते.

वृक्काश्मरी : वृक्काश्मरी वृक्कशरीरात किंवा वृक्कद्रोणात (वृक्काच्या बाहेरच्या वाटीसारख्या भागात) प्रथम उत्पन्न होतो. स्त्रियांपेक्षा त्याचे प्रमाण पुरुषांत अधिक दिसते. बहुधा एका वेळी एकच अश्मरी असतो, पण क्वचित प्रसंगी एका वेळी अनेक अश्मरीही असू शकतात. असा अश्मरी लहान असेल तर तो मूत्रवाहिकेमधून खाली सरकू लागतो. मोठा अश्मरी लहान असेल तर तो मूत्रवाहिकेमधून खाली सरकू लागतो. मोठा अश्मरी असल्यास तो वृक्कात किंवा वृक्कद्रोणात राहून हळूहळू मोठा होत जाऊन त्याचा आकार वृक्कद्रोण व त्याला येऊन मिळणारे वृक्ककटीर (वृक्कद्रोणाच्या आधी सूक्ष्म मूत्रनलिका वृक्कद्रोणाला येथे मिळतात त्या जागा) यांसारखा शाखान्वित दिसतो.

वृक्काश्मरी यूरिक अम्‍ल, यूरिक अम्‍लाची लवणे, सिस्टीन, कॅल्शियम ऑक्झॅलेट, कॅल्शियम फॉस्फेट, कॅल्शियम कार्बोनेट इत्यादींचे बनलेले असतात. त्यांपैकी ऑक्झॅलेटाचे अश्मरी खडबडीत व पांढरट पिंगट रंगाचे असतात. बाकीचे गुळगुळीत व पिवळट रंगाचे असतात.

वृक्काश्मरी जसजसा मोठा होत जातो तसतसा वृक्कातून व वृक्कद्रोणातून मूत्र वाहून जाण्याला रोध उत्पन्न होऊन मागे मूत्र तुंबते. अशा तुंबलेल्या मूत्राचा दाब वृक्कातील ऊतकांवर (समान रचना न कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांवर) पडून त्या ऊतकांचा हळूहळू नाश होत जातो व शेवटी वृक्क म्हणजे द्रव पदार्थाने भरलेली एक पिशवी व तिच्या तोंडाशी असलेला अश्मरी असे स्वरूप येते. या अवस्थेला ‘जलवृक्क’ असे म्हणतात. अशा स्थितीतच जर जंतुसंसर्ग झाला तर त्या पिशवीत पू भरून राहतो. त्या अवस्थेला ‘पूयवृक्क’ अशी संज्ञा आहे. क्वचित प्रसंगी अश्मरीमुळे वृक्कात व्रण उत्पन्न होऊन त्यातून अश्मरी वृक्काच्या आवरणात जाऊन तेथे विद्रधी (गळू) उत्पन्न होऊ शकतो. या अवस्थेला ‘परिवृक्क-विद्रधी’ असे म्हणतात.

लक्षणे : फार मोठा अश्मरी वृक्कात रुतून बसला तर काहीच लक्षणे दिसत नाहीत, पण वर सांगितल्याप्रमाणे रोध किंवा जंतुसंसर्ग झाल्यास पाठीत दुखणे, मूत्रात पूय-कोशिका व रक्त सापडणे ही लक्षणे दिसतात. क्ष-किरण परीक्षेने निदान स्पष्ट होते. विशेषत: विशिष्ट रंजकद्रव्ये वापरून वृक्कद्रोण-परीक्षा क्ष-किरणांनी केली असता वृक्क व अश्मरी स्पष्ट दिसू लागतात.

अश्मरी लहान असेल तर तो मूत्रवाहिकेमधून खाली उतरू लागला म्हणजे त्या वाहिकेच्या अंतःस्तराला घासून तीव्र वेदना होतात. वृक्कद्रोण व मूत्रवाहिनी यांचा संयोग जेथे होतो, त्या ठिकाणी किंवा वाहिनी मूत्राशयात उघडते त्या ठिकाणी बहुधा अश्मरी अडकून राहतो.

कारण त्या दोन्ही ठिकाणी वाहिनी बारीक असते. या अवस्थेला ‘विरामी वृक्कशूल’ (वारंवार होणार्‍या मूत्रपिंडाच्या तीव्र वेदना) असे म्हणतात. घाम सुटणे, ओकारी होणे व ⇨अवसादाची (शॉकची) इतर लक्षणे दिसतात. शूल पाठीपाशी सुरू होऊन खाली मांडी व त्या बाजूचे वृषण (पुरुषांचे जननेंद्रिय) या दिशेने जातो. वारंवार मूत्रोत्सर्ग करावासा वाटतो. मूत्रात रक्तकोशिका व क्वचित विविध संयुगांचे स्फटिक सापडतात. जंतुसंसर्गे झाला तर वारंवार थंडी भरणे, ज्वर येणे वगैरे लक्षणे दिसतात.

चिकित्सा : तात्पुरती वेदना कमी करण्यासाठी मॉर्फीन व ॲट्रोपीन यांचे वेदनानाशी अंतःक्षेपण (इंजेक्शन) करतात. तसेच अंगग्रहरोधक औषधांनी मूत्रवाहिकेचा संकोच कमी करतात. पण एकदा तयार झालेला मोठा खडा विरघळत नाही. अश्मरी मोठा असेल तर किंवा जलवृक्क, पूयवृक्क किंवा परिवृक्क विद्रवी असल्यास, शस्त्रक्रिया हा एकच उपाय आहे.

मूत्राशयातील अश्मरी : या प्रकाराचा अश्मरी वृक्कातून खाली उतरलेल्या अश्मरीमुळे किंवा खुद्द मूत्राशयातच अश्मरी उत्पन्न झाला तर दिसतो. अष्ठीलावृद्धी (अष्ठीला ग्रंथीची वाढ), मूत्रमार्गसंकोच वगैरे कारणांनी किंवा पक्षाघातासारख्या विकारात सारखे निजून राहिल्यामुळे मूत्राशयात अश्मरी उत्पन्न होतो. हा अश्मरी बहुधा एक व मोठा असून, तो पुटांवर पुटे चढत गेल्यामुळे अधिकच मोठा होतो. हा बहुधा फॉस्फेटचा पांढरा शुभ्र असून ठिसूळ असतो. एका वेळी अनेक अश्मरीही होऊ शकतात. उन्हाळी लागणे, रक्तमूत्र व संसर्ग झाल्यास ज्वरादी लक्षणे दिसतात. शस्त्रक्रियेने अश्मरी फोडून काढणे हाच एक निश्‍चित उपया आहे.

अग्निपिंड अश्मरी : अग्निपिंडाच्या वाहिनीत अश्मरी उत्पन्न होऊ शकतो. तो बहुधा कॅल्शियम फॉस्फेटाचा असून पांढरा असतो. क्वचित तो मऊ व करड्या रंगाचाही असू शकतो.

लक्षणे : या अश्मरीची लक्षणे म्हणजे चिरकारी (दीर्घकालिक )शोथाची (दाहयुक्त सुजेची) लक्षणे होत. अपचन, अरुची, अशक्तता, अतिसार व मलामध्ये न पचलेले वसात्मक पदार्थ जात असल्यामुळे दुर्गंधी वगैरे लक्षणे दिसतात. पोटात वरच्या बाजूस मध्यभागी सारखे दुखत असते. या अश्मरीचे क्ष-किरण परीक्षेने निदान होते. शस्त्रक्रियेने अश्मरी काढून टाकणे हा उपाय शक्य तितक्या लवकर केल्यास अग्निपिंडाचा अपकर्ष (ऱ्हास) टाळता येतो [→ अग्निपिंड].

अष्ठीला अश्मरी : अष्ठीलेमध्ये तयार होणारे लहान लहान अनेक अश्मरी असू शकतात. ते कॅल्शियम फॉस्फेटाचे असून क्वचित प्रसंगी मूत्रतंत्रातून खाली उतरलेला एखादा लहान अश्मरी अष्ठीलेमध्ये येऊ शकतो. लहान अश्मरी कित्येक दिवस काही लक्षणे उत्पन्न न करता राहू शकतो पण केव्हा केव्हा उन्हाळी लागणे, गुदद्वाराच्या पुढच्या भागात दुखणे वगैरे लक्षणे दिसतात. लहान अश्मरी गुदद्वारात बोट घालून अष्ठीलेवर दाबून चोळले असता बाहेर पडू शकतात [→ अष्ठीला ग्रंथी].

लालाश्मरी : कर्णपूर्व लाला ग्रंथी ( कानाच्या पुढे व खाली असलेली लाला ग्रंथी ) व अधोहून लाला ग्रंथी ( हनुवटीच्या खालील भागातील लाला ग्रंथी ) यांपैकी अधोहून ग्रंथीचे अश्मरी अधिक प्रमाणात दिसतात. हे अश्मरी कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम फॉस्फेटाचे असून ते वाहिनीत अडकले तर वेदना होतात. विशेषतः अन्न खाण्याच्या वेळी या वेदना अधिक प्रमाणात होतात. ग्रंथीवर फुगवटी दिसते.

शस्त्रक्रियेने अश्मरी काढून टाकणे व जर ग्रंथीचा अपकर्ष झाला असेल तर सर्व ग्रंथीच काढून टाकणे, हाच एक उपाय आहे.

पित्ताश्मरी: पित्तातील घटकद्रव्यांचे अवक्षेपण होऊन त्यांचे पित्ताशयात किंवा पित्तवाहिनीत खडे बनतात. त्यांना पित्ताश्मरी म्हणतात[→ पित्ताशय].

प्रतिबंधक उपाय : मूत्राश्मरी होऊ नये म्हणून मूत्रमार्गातील जंतुसंसर्गावर योग्य वेळीच उपचार करणे, रोज पिण्याच्या पाण्याचे प्रमाण योग्य राखणे, अ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात देणे वगैरे प्रतिबंधक उपाय आहेत. तसेच मूत्र फार अम्‍लीय वा क्षारीय (अल्कलीचे गुणधर्म असणारे, → क्षार) होऊ न देण्याची खबरदारी घेणे ही गोष्ट ही महत्त्वाची आहे. इतर अश्मरींच्या बाबतीत प्रतिबंधक उपाय विशेषत्वाने सांगण्यासारखे नाहीत.

आयुर्वेदीय चिकित्सा : पहा : शल्यतंत्रअश्मरी.

सलगर, द. चि.

पशूंतील अश्मरी : शरीरातील निरनिराळ्या स्रावांत पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम व मॅग्नेशियम यांच्या लवणाचे (योग्य शोषण न होण्यामुळे) प्रमाण जास्त वाढल्यामुळे परिणामी त्यांची पुटावर पुटे चढतात, तसेच चुकून गिळलेला धातूचा लहान तुकडा, खिळा, बारीकसा दगड, केसांचा गुतां, शेणाचा गोळा वगैरेंवर लवणांची पुटे चढून आंत्रात (आतड्यात) जो कठीण पदार्थ तयार होतो, त्याला ‘अश्मरी’ किंवा ‘खडा’ म्हणतात. क्वचित अंतस्त्यांतील (शरीराच्या अंतर्गत भागातील इंद्रियांतील) जखमेच्या व्रणाची जागा अश्मरीचा केंद्रबिंदू झालेली आढळते.

सामान्यतः अश्मरी मूत्रोत्सर्जक तंत्रातील अवयवांत, आंत्रात व पित्ताशयात होऊ शकत असला तरी अग्निपिंड, लाला ग्रंथी, स्तन किंवा आचळातही तो बनू शकतो. अश्मरीचे खालील प्रकार आहेत :

मुतखडा किंवा मूत्राश्मरी : हा एकच लहानसा किंवा वाळूसारख्या लहान कणांनी बनलेला असतो. तो गुळगुळीत किंवा कंगोरेदार असून फॉस्फेट, युरेटे, ऑक्झॅलेटे व कॅल्शियमाची लवणे यांनी बनलेला आढळतो. तो मूत्रपिंडातील पोकळीत मूत्राशयाकडे जाणाऱ्या नलिकेत, मूत्राशयात किंवा मूत्रवाहिनीत आढळतो. बैलाची मूत्रनलिका इंग्रजी S अक्षरासारखी असल्यामुळे तिच्या आतील टोकाशी असणारा अश्मरी शस्त्रक्रिया करूनच काढतात.

आंत्रातील अश्मरी : चुकून गिळलेला लहान दगड, लोखंडाचा वा पोलादाचा तुकडा, खिळा, वगैरेपैकी एखादा अश्मरीचा केंद्रबिंदू बनून, त्यावर विशेषेकरून फास्फेट लवणाची पुटे चढून आंत्रातील अश्मरी बनतो. घोड्याच्या मोठ्या आतड्यात तो विशेषकरून आढळत असून त्याचे वजन १० किग्रॅ.पर्यंतही असू शकते. पोटात गेलेला केसांचा गुंता किंवा शेणाचा गोळाही अशा प्रकारचा अश्मरी बनण्यासाठी केंद्रबिंदू होऊ शकतो.

पित्ताशय किंवा पित्तवाहिनीतील अश्मरी : हा अश्मरी पित्तातील लवणांच्या पुटांनी बनलेला किंवा पित्त साठून राहिल्यामुळे त्याचाच बनलेला असतो. कार्बोनेटे, फॉस्फेटे व कॅल्शियमाच्या लवणांबरोबरेच पित्तारुणाच्या (पित्तामध्ये असणार्‍या लालसर रंगद्रव्याच्या, → पित्तारुण ) संयुगांचाही तो झालेला असतो. तो रंगाने पिवळा, तपकिरी किंवा बदामी, लाल, हिरवा किंवा खडूसारखा पांढरासफेद–असा निरनिराळ्या रंगांचा असू शकतो.

लाला ग्रंथीतील अश्मरी : घोड्यांमध्ये कानाच्या बाजूने लाळ तोंडात नेऊन सोडणाऱ्या  लाला ग्रंथीत विशेषेकरून हा आढळतो. गाई-बैलांत व कुत्र्यांत तो क्वचितच आढळतो.

अग्निपिंडातील अश्मरी : क्वचित आढळणारा अशा प्रकारचा अश्मरी अग्निपिंडाच्या स्राववाहिनीत तयार होतो.

स्तनातील अश्मरी: स्तनास इजा झाल्यामुळे फाटलेल्या अंतस्त्वचेवर (नलिकेच्या आतल्या कोशिकांच्या थरावर) दुधाची पुटे किंवा कॅल्शियम फॉस्फेट लवणाची पुटे चढून अश्मरी बनतो. हा गाईच्या कासेच्या दुग्धकोटरात किंवा स्तनाच्या नलिकेत होतो. त्यामुळे दूध काढण्यास अडथळा होतो.

कारणे : लवणयुक्त पदार्थांचे आहारात जास्त प्रमाण, निरनिराळी लवणे शरीरात शोषून घेण्यासाठी असमर्थता व अ जीवनसत्त्वाचा अभाव यांमुळे हा विकार विशेषेकरून होतो. भारतातील चाऱ्यात कॅल्शियमाचे प्रमाण फॉस्फरसापेक्षा अधिक असल्यामुळे तसेच हिरव्या चाऱ्यातून मिळण्यासारखे अ जीवनसत्त्व आवश्यक तेवढ्या प्रमाणात मिळत नसल्यामुळे रवंथ करणाऱ्या जनावरांतील अश्मरी प्रामुख्याने कॅल्शियम कार्बोनेटाचा बनलेला असतो.

लक्षणे : अश्मरीचा लहान-मोठा आकार व त्याचे शरीरातील ठिकाण व अवयव यांवर लक्षणे अवलंबून असतात. मुतखडा झाला म्हणजे जनावर वारंवार लघवी करण्याचा प्रयत्‍न करते, पण प्रत्येक वेळी थोडे थेंब लघवी होते किंवा मुळीच होत नाही. जनावराला वेदना होतात ते अस्वस्थ बनून चालताना अडखळते. अश्मरी लहान रेतीसारख्या कणाच्या स्वरूपात असेल, तर असे कण लघवीतून बाहेर पडतात. लघवी पूर्णपणे बाहेर पडणे अशक्य बनते, तेव्हा मूत्राशय भरत जाते व शेवटी अधिक ताणले गेल्यामुळे मूत्राशयाचा रक्तपुरवठा बंद होण्याने मूत्राशय सडत जाऊन जनावर मरते.

कधीकधी करडांच्या उदरात तसेच शरीराच्या खालच्या भागात पुष्कळ पाणी साठणे हे लक्षण आढळते. मूत्राशय व मूत्रवाहकातील अश्मरीमुळे ही अवस्था संभवते. ती मादीपेक्षा नरात जास्त प्रमाणात आढळते. अती थंड ऋतुमानानंतरही अशी लक्षणे असलेला रोग आढळतो.

चिकित्सा : मुतखडा कोठे आहे, हे मूत्र-विमोचिकेच्या (मूत्र बाहेर काढण्याच्या उपकरणाच्या) साहाय्याने नक्की करून शस्त्रक्रिया करतात व खडा काढून टाकतात. बैलाच्या मूत्रनलिकेच्या विशिष्ट आकारामुळे विमोचिका आतापर्यंत घालता येत नाही म्हणून नक्की जागा सापडणे कठीण असते. मुतखड्याच्या उपचारासाठी हायलुरोनिडेज या औषधाचा उपयोग फायेदशीर ठरतो, असे काही तज्ञांचे मत आहे.

रोगप्रतिबंध : पिण्यासाठी भरपूर शुद्ध पाणी, आहारात लवणयुक्त पदार्थांचे योग्य प्रमाण व त्यासाठी उत्तम कसदार चारा, अ जीवनसत्त्वांचा भरपूर पुरवठा या बाबी रोगप्रतिबंधक इलाज म्हणून हितावह ठरतात. कुत्री व मांजरांत अम्‍लीय मूत्रात तयार होणारा अश्मरी खाण्याचा सोडा देऊन व क्षारीय मूत्रात तयार होणारा अश्मरी अमोनियम क्लोराइड देऊन, प्रतिबंधक उपचार करतात. असे केल्याने अम्‍ल व क्षार यांच्या रासायनिक संयोगाने अश्मरी बनण्यास प्रतिबंध होतो. कत्तल करण्यासाठीच लठ्ठ केलेल्या गुरांमध्ये मुतखड्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी धान्य व अल्फाल्फा गवत बदल म्हणून खाण्यासाठी देतात.

गद्रे, य. त्र्यं.

संदर्भ : 1. Beckman, H. Pharmacology, The Nature, Action and Use of Drugs, Philadelphia, 1961.2. Best, C. H. Taylor, N. B. The Physiological Basis of Medical Practice, Baltimore, 1961.  3. Boyd, W. Textbook of Pathology, Philadelphia, 1961.4. Rose, W. Carless, A. Manual of Surgery,London, 1960.

श्रोणी व मांड्या यांतील अस्थिमार्दव दाखविणारे क्ष-किरण-चित्र.