गुरुत्वीय अवपात : गुरुत्वामुळे एखाद्या वस्तूच्या शीघ्रतेने होणाऱ्या आकुंचनाला गुरुत्वीय अवपात असे म्हणतात. गुरुत्वीय प्रेरणेने वस्तू संकोचत जाऊन तिची घनता अनंत होईपर्यंत म्हणजेच अतिघनबिंदूची स्थिती येईपर्यंत तिचा अवपात एकसारखा चालू राहू शकतो, हे जे. ओपेनहायमर आणि एच्. स्नायडर यांनी १९३९ सालीच दाखवून दिले होते. १९६३ च्या सुरुवातीला ⇨क्वासार  ह्या अतिसंकुचित पण अतितेजस्वी ज्योतींच्या खगोलशास्त्रीय शोधामुळे गुरुत्वीय अवपात ह्या विषयातील संशोधनाला विशेष चालना मिळाली. क्वासाराप्रमाणेच अतिदीप्त नवतारे [ → नवतारा व अतिदीप्त नवतारा], तीव्र रेडिओ उद्‌गम व तारामंडळांच्या गाभ्यात होणारे स्फोट यांच्या आविष्कारातील स्फोटक ऊर्जा वस्तुमानाच्या बऱ्याच मोठ्या भागाइतकी असते. यांच्या तुलनेत ताऱ्यांच्या केंद्रभागात होणाऱ्या अणुगर्भीय प्रक्रियांद्वारे जास्तीत जास्त ०·९% वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर होऊ शकते. त्यामुळे ऊर्जा मुक्त करणाऱ्या याहून अधिक शक्तिमान यंत्रणांचा शोध घेण्यात येत असून गुरुत्वीय अवपात ही अशी सर्वाधिक संभाव्य पर्यायी यंत्रणा असावी, असे शास्त्रज्ञांना वाटते.

न्यूटन यांचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत : न्यूटन यांच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांताप्रमाणे m1 आणि m2 वस्तुमान असलेल्या आणि एकमेकांपासून r अंतरावर असणाऱ्या दोन वस्तूंमध्ये गुरुत्वाकर्षणाची F ही प्रेरणा

         F = G ․ m1X m2 या सूत्राप्रमाणे असते.
r2

येथे G या गुरुत्वीय स्थिरांकाचे मूल्य ६·६८ X १०-८ सेंमी. ग्रॅ. से. एकक आहे. ज्ञात प्रेरणांपैकी गुरुत्व ही सर्वांत दुर्बल प्रेरणा असली, तरी तिच्या व्यापक क्षेत्रामुळे मोठ्या वस्तुमानाच्या व अधिक घनतेच्या वस्तूत ती इतर प्रेरणांवर मात करते आणि अतिविरल अशा वायुमेघापासून तारे, तारकासमूह व तारामंडळे तयार होण्यास हातभार लावते. अशा तऱ्हेने विश्वाला आकार देणाऱ्या यंत्रणेत गुरुत्वीय प्रेरणा महत्त्वाची ठरते.

गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार कोणत्यादी वस्तूच्या वेगवेगळ्या घटकांमधील परस्पर आकर्षणामुळे त्या वस्तूची आकुंचन पावण्याची प्रवृत्ती असते. परंतु औष्णिक, प्रारणिक (तरंगरूपी ऊर्जेमुळे निर्माण होणाऱ्या), प्रक्षोभनात्मक इ. आंतरिक दाबांमुळे हे आकुंचन रोखले जाते. आंतरिक दाब नसेल, तर सूर्याएवढी वस्तू काही मिनिटांतच संकोच पावून बिंदुवत होईल. परंतु प्रत्यक्षात तसे घडत नाही कारण आकुंचनामुळे स्थितिज ऊर्जेचे गतिज ऊर्जेत रूपांतर होऊन केंद्रभागातील तापमान वाढत जाते. ते ४०–५० लाख अंशांपर्यंत पोहोचले म्हणजे अणुगर्भीय प्रक्रिया सुरू होतात व मोठ्या प्रमाणात ऊर्जा उत्पन्न होऊन दाब वाढतो. हा औष्णिक दाब गुरुत्वाकर्षणामुळे होऊ घातलेल्या आकुंचनाला प्रतिकार करण्यात समर्थ होतो. एवढेच नव्हे तर प्रारणदाबाच्या साहाय्याने १०० सौर वस्तुमानांहून भारी वायुगोलाचे लहान लहान तुकडे करण्यातही त्याला यश येते. अशा रीतीने समतोलावस्था प्राप्त होऊन तारे, तारकासमूह व तारामंडळे उत्पन्न होतात व ती कोट्यवधी वर्षे चमकत राहतात.

एक कोटी किंवा अधिक सौर वस्तुमान असलेल्या वायुगोलाचे स्वगुरुत्वाकर्षणाने आकुंचन सुरू झाले, तर त्यात गुरुत्वाकर्षणाची शक्ती इतकी अधिक असते की, तिच्यापुढे अणुगर्भीय प्रक्रियांद्वारे निर्माण झालेले दाब फिके पडतात. त्यामुळे आकुंचनाला प्रतिरोध होत नाही आणि गुरुत्वीय अवपाताला सुरुवात होते. गुरुत्वीय अवपाताला कारणीभूत होणारी दुसरी परिस्थिती म्हणजे अति-उत्क्रांत अवस्थेत ताऱ्यातला अणुगर्भीय ऊर्जेचा साठ संपुष्टात येणे ही होय. अशा ताऱ्याच्या आकुंचनामुळे त्याची घनता १० ग्रॅ./घ. सेंमी. एवढी झाली की, पुंजसिद्धांताच्या नियमानुसार घनातीत अवस्थेतील ऱ्हसित (डीजनरेट) अवस्थेतील [पुंजयामिकीमध्ये जेव्हा गतीच्या निरनिराळ्या अवस्था एकाच ऊर्जापातळीशी निगडित असतात, तेव्हा त्या अवस्थांना ऱ्हसित अवस्था म्हणतात, → पुंजयामिकी] इलेक्ट्रॉनांचा दाब निर्माण होतो व त्यामुळे गुरुत्वीय अवपात थांबतो. अशा रीतीने केवळ काही हजार किमी. त्रिज्या असलेले लघुतम तारे निर्माण होतात. घनतम अवस्थेतील लघुतम ताऱ्याचे वस्तुमान १·४४ सौर वस्तुमानापेक्षा अधिक असू शकत नाही, असे १९३९ मध्ये सुब्रह्मण्यन् चंद्रशेखर यांनी सिद्ध केले. ताऱ्याचे वस्तुमान चंद्रशेखर सीमेपेक्षा अधिक असले, तर स्फोट होऊन वाजवीपेक्षा अधिक पदार्थ बाहेर फेकला जाईल किंवा त्या स्फोटाची प्रतिक्रिया म्हणून केंद्रभागात झालेल्या अंतःस्फोटाने ताऱ्याच्या गाभ्यात गुरुत्वीय अवपात पुन्हा सुरू होईल, कारण मग अवपात थांबविण्यास ऱ्हसित अवस्थेतील इलेक्ट्रॉनांचा दाबही अपुरा पडतो. परंतु गाभ्याचे वस्तुमान सूर्याच्या तिपटीपेक्षा कमी असले, तर आकुंचनामुळे १०–२० किमी. त्रिज्येच्या गोलात घनता १०१४ ग्रॅ./ घ.सेंमी. म्हणजेच अणुगर्भीय घनतेपर्यंत पोहोचली की, ताऱ्यातील सर्व पदार्थांचे न्यूट्रॉनांमध्ये रूपांतर होते व ‘न्यूट्रॉन तारा’ तयार होतो. त्यात ऱ्हसित अवस्थेतील न्यूट्रॉनांचा दाब गुरुत्वीय अवपात रोखून धरू शकतो. तीन सौर वस्तुमानांपेक्षा भारी ताऱ्याचे आकुंचन मात्र कशानेच थांबू शकत नाही आणि तो तारा गुरुत्वीय अवपाताने अनंत घनतेच्या बिंदूकडे वाटचाल करतो, असा तज्ञांचा कयास आहे. व्यापक सापेक्षता सिद्धांत : गुरुत्वीय अवपातामध्ये उत्पन्न होणाऱ्या अत्यंत घनावस्थेत गुरुत्वीय क्षेत्र इतके तीव्र होते की, त्याच्या परिणामांचे विवरण करण्यासाठी न्यूटन यांच्या सिद्धांताऐवजी ॲल्बर्ट आइन्स्टाइन यांनी १९१५ साली मांडलेल्या व्यापक ⇨ सापेक्षता सिद्धांताचा उपयोग करावा लागतो. ह्या सिद्धांतात गुरुत्वाकर्षणाचा अवकाश-कालाच्या चतुर्मिती भूमितीशी घनिष्ट संबंध जोडलेला असतो. ज्या ठिकाणी गुरुत्वीय क्षेत्र अधिक तीव्र असते, त्या ठिकाणी अवकाशकाल भूमिती यूक्लिडीय भूमितीपेक्षा त्या मानाने अधिक भिन्न असते. गुरुत्वीय अवपातात आकुंचनामुळे घनता वाढत जाऊन वस्तूच्या पृष्ठभागाजवळील गुरुत्वीय क्षेत्र अधिक तीव्र होते व त्यामुळे त्या वस्तूच्या आसपासची अवकाश-काल भूमिती बदलत जाते. तिचा दृश्य परिणाम पुढील काल्पनिक प्रयोगाद्वारे स्पष्ट करता येईल :

त्या वस्तूच्या पृष्ठभागावर एक शास्त्रज्ञ (त्याला आपण म्हणू) आहे व तो त्या वस्तूपासून दूर असलेल्या दुसऱ्या शास्त्रज्ञाशी (त्याला म्हणू) प्रकाशसंदेशांचे आदानप्रदान करीत आहे असे समजा. त्यांच्या प्रयोगाप्रमाणे दोघांनी एकमेकांकडे दर सेकंदाला संदेश पाठवायचे ठरले आहे. अवपाताच्या सुरुवातीस ती वस्तू फार संकुचित झालेली नसते, तेव्हा चे संदेश ला आणि चे ला सेकंदाला पोचतात. परंतु हळूहळू च्या आसपासची भूमिती बदलू लागते. त्यामुळे ला चे संदेश पोचायला अधिक अधिक वेळ लागतो. जे सेकंदाच्या अंतराने मिळायला पाहिजेत ते संदेश मिनिटांनी, तासांनी, दिवसांनी असे पोचू लागतात. शेवटी एक अशी परिस्थिती येते की, चे संदेश कडे येणे बंदच होते.

वरील परिस्थिती यायला त्या आकुंचन पावणाऱ्या वस्तूचा पृष्ठभाग एका विशिष्ट मर्यादेपलीकडे गेला पाहिजे. त्या मर्यादेला घटना-क्षितिज म्हणतात. या मर्यादेच्या आत गेलेली वस्तू बाहेरच्या निरीक्षकाला कधीही दिसणे शक्य नसते, कारण त्या वस्तूतून बाहेर पडू इच्छिणारे प्रकाशकिरण घटना-क्षितिज पार करू शकत नाहीत. त्या वस्तूचे प्रचंड गुरुत्वाकर्षण त्यांना परत आत खेचून घेते. ह्या परिस्थितीला पोचलेल्या वस्तूला कृष्णविवर म्हणतात.


कृष्णविवर : M वस्तुमानाच्या गोलाकार वस्तूचे कृष्णविवर होण्यासाठी तिची त्रिज्या Rs इतकी कमी असावी लागते.

Rs = 2 GM सेंमी. = 3 M किमी.
c2 M

येथे c म्हणजे प्रकाशाचा वेग व M हे सूर्याचे वस्तुमान होय. Rs ला श्व्हार्त्सशिल्ड त्रिज्या म्हणतात, कारण तिचा शोध के. श्व्हार्त्सशिल्ड यांनी १९१६ च्या सुमारास लावला. सूर्याचे कृष्णविवर करायचे असल्यास त्याचे आकुंचन होऊन त्याची त्रिज्या ३ किमी. झाली पाहिजे. त्यावेळी त्यांची सरासरी घनता १०१७ ग्रॅ./घ.सेंमी. असेल. ही घनता न्यूट्रॉन ताऱ्याच्या घनतेपेक्षा हजारपट व लघुतम ताऱ्याच्या घनतेच्या कोटीपट अधिक आहे.

बाहेरून पाहणाऱ्याला गुरुत्वीय अवपातामुळे आकुंचन पावणारी वस्तू कृष्णविवराच्या दिशेकडे जाताना दिसेल, परंतु प्रत्यक्ष तिचे कृष्णविवर झालेले मात्र दिसणार नाही. कारण बाहेरच्या निरीक्षकाच्या कालगणनेप्रमाणे हे दिसायला अपरिमित कालावधी लागेल. आकृतीत अक्षभ्रमणविरहित गोल ताऱ्याचा श्व्हार्त्सशिल्ड त्रिज्येतून अतिघनबिंदूकडे होणाऱ्या अवपाताचा अवकाश-काल आलेख क्रुस्कल आणि झेकेरिस यांनी १९६० मध्ये वापरलेल्या पद्धतीप्रमाणे काढलेला दाखविला आहे. गुरुत्वामुळे उद्‌भवणारे अवकाश-काल पृष्ठ वक्र असते. त्यामुळे बाह्य निरीक्षकाचा मार्ग व ताऱ्याचे पृष्ठ वक्र दाखविले आहे. ताऱ्याच्या पृष्ठावरील माणूस () बाह्य निरीक्षकाला () ला पाठवीत असलेले रेडिओ संदेश ४५ अंशांचा कोन करणाऱ्या नागमोडी रेषांनी दाखविले आहेत. जसजसा अवपात प्रगत होत जातो, तसतसे ने सारख्या कालांतराने पाठविलेले संदेश बाह्य निरीक्षकाला अधिकाधिक कालावधीने मिळतात. या श्व्हार्त्सशिल्ड

ताऱ्याच्या श्व्हार्त्सशिल्ड त्रिज्येतून अनंत घनतेच्या सापेक्षीय अतिघनबिंदूच्या दिशेने होणाऱ्या गुरुत्वीय अवपाताची क्रूस्कल-झेकेरिस पद्धतीची अवकाशकाल आकृती : (१) ताऱ्याचे पृष्ठ, (२) रेडिओ संदेश, (३) अतिघनबिंदू, (४) बाह्य निरीक्षक, श–श्व्हार्त्सशिल्ड त्रिज्या.

त्रिज्येलगतच्या बाहेरील भागातून पाठविलेले संदेश ला त्याच्या घड्याळानुसार अनंत काळाने मिळतील. परंतु त्रिज्येच्या आतील भागातून पाठविलेला कोणताही संदेश किंवा अवपातातून उद्‌भवणारी कोणतीही ऊर्जा बाह्य निरीक्षकापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. त्यामुळे तारा या त्रिज्येपलीकडे अवपातित झाल्याचे कधीच कळणार नाही. जसजसा तारा त्या त्रिज्येनजिक येऊ लागेल तसतसा तो अधिक मंद गतीने अवपातित होत असल्याचे आणि त्याच्यापासून येणाऱ्या प्रकाशाची अधिकाधिक ताम्रच्युती (वर्णपटातील रेषांचे तांबड्या रंगाकडे होणारे स्थलांतर) होत गेल्याचे दिसून येईल. म्हणजे तारा श्व्हार्त्सशिल्ड त्रिज्येजवळ घुटमळणारा काळा होत जाणारा गोळा वाटेल. ताऱ्याच्या पृष्ठावरून पाहणाऱ्या या निरीक्षकाला मात्र तारा सेकंदापेक्षा फार कमी अवधीत श्व्हार्त्सशिल्ड त्रिज्येपलीकडील अतिघनबिंदूत अवपातित झालेला दिसेल. वस्तुतः अतिघनबिंदूजवळील तीव्र गुरुत्वीय प्रेरणांमुळे तो निरीक्षकच चुरडला जाऊन त्याची घनता अनंत होईल.

कृष्णविवर ओळखणे : कृष्णविवर प्रकाशहीन व अतिशय लहान असल्याने ते शोधून काढणे अवघड आहे. वाय्. बी. झेल्डाव्हिच व ओ. एच्. गुस्येनॉव्ह यांच्या मते ताऱ्यांच्या ज्ञात तारकायुग्मांत कृष्णविवरे असू शकतील. तारकायुग्मांतील प्रकाशहीन ताऱ्याचे कृष्णविवरीय अस्तित्व व त्याचे वस्तुमान यांचा अंदाज त्याच्या प्रकाशमान सहचराच्या बदलत्या डॉप्लर च्युतीवरून [→ डॉप्लर परिणाम] करता येईल. व्ही. एल्. ट्रिंबल व के. एस्. थॉर्न यांनी अशा सर्व तारकायुग्मांचा पद्धतशीर अभ्यास केला असून त्यांचे गुणधर्म स्पष्ट करण्यासाठी कृष्णविवराच्या परिकल्पनेचा आधार लागत नाही, असे त्यांना आढळले. परंतु अलीकडे सिग्नस एक्स–१ ह्या क्ष-किरण उद्‌गमाच्या मुळाशी कृष्णविवर असावे, असा काही तज्ञांचा तर्क आहे. हा उद्‌गम म्हणजे एक तारकायुग्म असून त्यात एक महत्तम श्रेणीतला दृश्य तारा व दुसरा प्रकाशहीन अदृश्य तारा आहे, असे आढळले आहे. त्यांपैकी दृश्य ताऱ्याचे वस्तुमान सूर्याच्या वीसपट व अदृश्य ताऱ्याचे वस्तुमान सूर्याच्या पाच-सहापट असावे, असा कयास आहे. हे दुसरे वस्तुमान लघुतम तारे किंवा न्यूट्रॉन तारे यांच्या वस्तुमानापेक्षा अधिक असल्याने अदृश्य तारा कृष्णविवराच्या रूपात असला पाहिजे. दृश्य ताऱ्यातून बाहेर फेकलेला वायू कृष्णविवरात ओढला जातो व प्रवेगित होऊन त्याचे तापमान इतके वाढते की, त्यातून क्ष-किरण व गॅमा किरण बाहेर पडतात. हेच क्ष-किरण उद्‌गमाचे मूळ होय. न्यूट्रॉन ताऱ्यात पडणाऱ्या वायूतून उत्पन्न होणारे क्ष-किरण कृष्णविवरात पडणाऱ्या वायूतून निघणाऱ्या क्ष-किरणांहून भिन्न असतात. म्हणून उत्सर्जित क्ष-किरणांच्या अभ्यासावरून कृष्णविवराच्या अस्तित्वाबद्दलचा निष्कर्ष पडताळता येईल.

गुरुत्वीय अवपातात कृष्णविवर निर्माण होते त्यावेळी गुरुत्वीय प्रारण तरंगांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होईल. जोसेफ वेबर हे अशा गुरुत्वीय तरंगांचा शोध घेत आहेत. त्यांना अंधुकपणे सापडलेले गुरुत्वीय प्रारण निश्चितपणे गुरुत्वीय अवपाताशी निगडित असावे. काहींच्या मते आकाशगंगेच्या केंद्रभागी खूप पूर्वी गुरुत्वीय अवपाताने निर्माण झालेल्या प्रचंड कृष्णविवरांमध्ये तारे ओढले जाऊन गुरुत्वीय प्रारणे निर्माण होत असावीत. परंतु इतर शास्त्रज्ञांना अनेक प्रयोग करूनही वेबर यांच्याप्रमाणे गुरुत्वीय प्रारण अजून सापडलेले नाही.


गुरुत्वीय अवपाताचा शेवट : गुरुत्वीय अवपातामुळे वस्तू बाहेरून पाहणाराला कृष्णविवर होताना आढळते, पण तिचे पुढे काय होते ? वरील उदाहरणात हा शास्त्रज्ञ अवपातामुळे आत आत जात शेवटी अपरिमित घनत्वाच्या स्थितीला पोहोचतो. हा निष्कर्ष न्यूटन यांच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांतातूनही निघतो, पण सापेक्षता सिद्धांतात त्याला विशेष महत्त्व आहे. कारण अपरिमित घनत्वाच्या दशेला पोहोचणाऱ्या वस्तूत अवकाश-कालाच्या भूमितीचे नियम परम सीमेला पोचून शेवटी कोलमडून पडतात. सापेक्षता सिद्धांताचे गणित ह्या परिस्थितीचे चित्रण करायला असमर्थ ठरते. त्या आत्यंतिक परिस्थितीला एकमेवाद्वितीय स्थिती म्हणतात. ही परिस्थिती पृष्ठावरील या निरीक्षकालाच पहाण्यास मिळते, ह्या बाह्य निरीक्षकाला नाही.

आइन्स्टाइन यांच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांतात एका विशिष्ट परिस्थितीपलीकडे गेलेल्या गुरुत्वीय अवपाताचे पर्यवसान ह्या आत्यंतिक परिस्थितीत होते हे पेनरोज, हॉकिंग आणि गेरोश ह्या शास्त्रज्ञांच्या कार्यामुळे सिद्ध झाले आहे. हा अवपात थांबविण्यासाठी वापरलेली कोणतीही शक्ती अवपात वाढविण्यासच हातभार लावते. कारण त्या शक्तीमागे असलेला ऊर्जेचा साठा धनात्मक असून त्या वस्तूचे आंतरिक गुरुत्वाकर्षण वाढते. ऋणात्मक ऊर्जा असलेल्या शक्तींना हा नियम लागू नाही. फ्रेड हॉईल आणि जयंत नारळीकर यांनी १९६४ मध्येच ऋणात्मक ऊर्जेची शक्ती वापरून गुरुत्वीय अवपात थांबविता येतो, हे दाखविले होते. गुरुत्वाकर्षणातील ऋणात्मक ऊर्जेला तोंड देणारी दुसरी ऋणात्मक शक्ती हॉईल-नारळीकर यांनी तर्क केल्याप्रमाणे विश्वात असेल काय, हा अद्याप न सुटलेला प्रश्न आहे. अशा शक्तीमुळे गुरुत्वीय अवपात थांबवला जाऊन उलट त्याचे स्फोटात रूपांतर होईल.

स्फोट पावणाऱ्या अनेक मोठ्या वस्तू विश्वात सापडतात. अतिदीप्त नवतारे त्यांत समाविष्ट आहेत. गुरुत्वाकर्षणामुळे होणारे आकुंचन, त्यामुळे वाढत जाणारे तापमान व अणुगर्भीय प्रक्रियांतून निर्माण होणारी ऊर्जा यांच्यातील तोल बिघडून ताऱ्याचा स्फोट होतो, असे अतिदीप्त नवताऱ्याचे चित्रण करतात. परंतु त्याहून लाख-कोटी-अब्ज पटींनी मोठे स्फोट तारामंडळांच्या उदरांत घडत आहेत. त्यांची कारणमीमांसा अद्याप झालेली नाही. गुरुत्वीय अवपाताची दिशा उलटली, तर त्याचे रूपांतर स्फोटात होते. अशा अतिशय घनत्वाच्या परिस्थितीतून स्फोट पावणाऱ्या वस्तूंना ‘श्वेतविवर’ म्हणतात. श्वेतविवर दिसू शकते आणि त्यातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडू शकते. वरील आविष्कार हे श्वेतविवरांचे प्रतीक आहेत काय, हे ठरविण्यासाठी श्वेतविवरांच्या गुणांसंबंधीचे संशोधन चालू आहे. संपूर्ण विश्वच महास्फोटातून जन्माला आले असे अनेक खगोलशास्त्रज्ञ मानतात. तसे असले, तर विश्व म्हणजे सर्वांत मोठे श्वेतविवर म्हटले पाहिजे.

गुरुत्वीय अवपातापासून मिळणारी ऊर्जा : अणुगर्भीय प्रक्रियांपेक्षा अधिक कार्यक्षम ऊर्जा उद्‌गम या दृष्टीने गुरुत्वीय अवपाताकडे पाहिले जाते. ही ऊर्जा कृष्णविवर तयार होण्यापूर्वी किंवा कृष्णविवराशी होणाऱ्या प्रतिक्रियेत उत्पन्न होऊ शकते. कृष्णविवरात संग्रहित होऊन अदृश्य होणाऱ्या पदार्थापासून त्याच्या वस्तुमानाच्या ६ टक्के ऊर्जा मिळू शकते, असे दिसून येते. दोन कृष्णविवरे एकमेकांत मिसळल्यास वस्तुमानाच्या २९ टक्के ऊर्जा बाहेर पडू शकते आणि कृष्णविवरास महत्तम संभाव्य कोनीय संवेग (कोनीय प्रवेग व निरूढी परिबल यांचा गुणाकार निरूढी परिबल म्हणजे कोनीय प्रवेगाला वस्तूने केलेल्या रोधाचे मान) असल्यास त्यात अदृश्य होणाऱ्या पदार्थापासून सर्वांत अधिक म्हणजे वस्तुमानाच्या ४३ टक्के ऊर्जा निघू शकते. गुरुत्वीय अवपातात याहून अधिक ऊर्जा मिळण्याची शक्यता नाही. परंतु ही यंत्रणा एक लाख सौर वस्तुमानांइतकी ऊर्जा उत्सर्जित करणाऱ्या रेडिओ-तारामंडळांना आणि दहा कोटी सौर वस्तुमानांबरोबर ऊर्जा बाहेर टाकणाऱ्या क्वासार ज्योतींना लागू पडेल, असे वाटते. त्यासाठी अतिघनबिंदूजवळ पदार्थाचे गुणधर्म कसे असतात, यासंबंधीचे भौतिकी नियम समजणे आवश्यक आहे. कोणताही भौतिक सिद्धांत त्यातील आत्यंतिक स्थितीमुळे मोडून पडतो, असे मानतात. यामुळे अतिघनबिंदूजवळ पुंज गुरुत्वीय परिणाम महत्त्वाचे होतील काय आणि त्यामुळे गुरुत्वीय अवपातातील आत्यंतिक अवस्थेला प्रतिबंध होईल काय, याचा विचार केला पाहिजे, त्यासाठी गुरुत्वीय सिद्धांत व ⇨पुंज क्षेत्र सिद्धांत  यांना एकत्र आणणारा नवा सिद्धांत उपलब्ध झाला पाहिजे.

नारळीकर, जयंत वि. ठाकूर, अ. ना.