सॅन डिएगो : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी कॅलिफोर्निया येथे एक नैसर्गिक बंदर, औद्योगिक शहर आणि देशातील महत्त्वाचे लष्करी व आरमारी केंद्र. लोकसंख्या १३,०१,६१७ उपनगरांसह ३०, ९५, ३१३ (२०१०). राज्याच्या दक्षिण भागात पॅसिफिक महासागराच्या सॅन डिएगो उपसागर किनाऱ्यावर हे शहर वसले आहे. ते मेक्सिको सीमेपासून जवळच असून सॅन डिएगो परगण्याचे मुख्य ठाणे आहे. लॉस अँजेल्सच्या आग्नेयीस ते सु. १६० किमी. वर आहे.

यूरोपियांची कॅलिफोर्नियातील ही पहिली स्थायी वसाहत होय. स्पेनच्या सेवेत असणाऱ्या ह्वान रॉद्रीगेथ काब्रीयो या पोर्तुगीज समन्वेषकाने २८ सप्टेंबर १५४२ रोजी सॅन डिएगो उपसागराचा शोध लावला. त्यास त्याने सान मीगेल हे नाव दिले. पुढे १० नोव्हेंबर १६०२ रोजी दॉन सेबासत्यान व्हीथ्काईनो हा या उपसागरात आला. त्याने याचे सॅन डिएगो द अल्कला द हेनारेस असे नामकरण केले. गॅस्पर द पॉर्तोला याने १६ जुलै १७६९ रोजी येथे लष्करी ठाणे स्थापन केले. अमेरिकन इंडियन जमाती आणि गलबतावरील सैनिक यांच्यात वारंवार संघर्ष होत असत, त्यामुळे फादर हुनीपेरो सेरा यांनी विद्यमान सॅन डिएगो येथे वसाहत स्थापन केली. तेथेच सॅन डिएगो द अल्कला या धर्मप्रचार केंद्राची स्थापना (१७६९) करून संरक्षणार्थ किल्ला बांधला. समन्वेषक जॉर्ज व्हँकूव्हर याने २७ नोव्हेंबर १७९३ रोजी डिस्कव्हरी या गलबतातून येथे प्रवेश केला. त्यानंतर अमेरिकन जहाजे प्रसंगोपात्त तेथे जाऊ लागली. १८३४ मध्ये मेक्सिकोने यावर हक्क सांगितला, तोपर्यंत ही वस्ती लष्करी ठाण्याच्या संरक्षक भिंतींच्या अंतर्गत भागातच होती. मेक्सिकन युद्घानंतर (१८४६) हा परिसर पूर्णपणे अमेरिकेच्या अखत्यारीत आला. अमेरिकेने १८५० मध्ये कॅलिफोर्नियास राज्याचा दर्जा दिल्यानंतर सॅन डिएगोचा एक शहर म्हणून त्यात अंतर्भाव झाला. अलाँझो हॉर्टन या अमेरिकेतील श्रीमंत व्यापाऱ्याने मूळ वसाहतीच्या दक्षिणेस पाच किमी.वर तेथील सु. ४०० हे. जमीन खरेदी करून नव्या सॅन डिएगो शहराची स्थापना केली. तसेच तेथे गोदी बांधली, रस्त्यांची आखणी करून बांधकाम केले, चर्चना जागा दिली आणि एक आलिशान हॉटेल बांधले. त्याने संपूर्ण सॅन डिएगोची आधुनिक रचना व मांडणी केली (१८६७). आरोग्यवर्धक हवामानामुळे आणि १८८५ मध्ये सँता फे लोहमार्ग शहरात आल्याने शहराचा विकास झपाट्याने झाला.

सॅन डिएगोची अर्थव्यवस्था मुख्यत्वे पर्यटन व्यवसायावर अवलंबून असून परिसरात पशु व कुक्कुटपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी यांचा मोठा व्यापार चालतो. याशिवाय शहरात इलेक्ट्रॉनिकी उपकरणे, जहाजबांधणी, विमान बांधणी व त्याचे सुटे भाग, अग्निबाण, वस्त्रोद्योग, क्षेपणास्त्रे निर्मिती इत्यादींचे कारखाने आहेत. परिसरात मंडई बागशेती (ट्रक फार्मिंग) चालत असून त्यातील उत्पादनांची ही घाऊक बाजारपेठ आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील कृषी उत्पादने तसेच ‘इम्पीरिअल व्हॅली’ प्रदेशात पिकणाऱ्या कापसाची निर्यात या बंदरातून मोठ्या प्रमाणात केली जाते.

भूभागाने वेढलेल्या सॅन डिएगो उपसागरावरील (५७ चौ. किमी.) हे बंदर जगातील मोठ्या खोल नैसर्गिक बंदरांपैकी एक आहे. अमेरिकेच्या नाविक क्रियाशीलतेचे हे एक प्रमुख आरमारी केंद्र असून तिच्या अकराव्या आरमाराचा मुख्य तळ येथे आहे. हे भूसेना, नाविक व सागरतीर संरक्षक दलाचे अधिष्ठापन केंद्र असून येथे लष्करी विमानतळही आहे. या सर्वांमुळे लष्करी दृष्ट्या सॅन डिएगोला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सॅन डिएगो येथे बाल्बोआ पार्क (५६७ हे.) हे विस्तृत अभयारण्य असून त्यातील ४०.५ हे. क्षेत्रात ‘सॅन डिएगो झू’ हे जगातील मोठ्या प्राणिसंग्रहालयांपैकी एक आहे. याची स्थापना १९१६ मध्ये करण्यात आली. त्यात ७०० पेक्षा अधिक जातींचे सु. ३,५०० प्राणी व २,५०० पेक्षा अधिक प्रकारच्या वनस्पती जतन केलेल्या आहेत. बाल्बोआ पार्कमध्येच अनेक वस्तुसंग्रहालये असून म्यूझीयम ऑफ मॅन, फाइन आर्ट्स गॅलरी, नॅचरल हिस्टरी म्यूझीयम, स्पॅनिश व्हिलेज अँड द इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट, एरोस्पेस म्यूझीयम इ. ख्यातनाम आहेत. याशिवाय येथील कृत्रिम तारामंडळ, न्यू हॉल ऑफ सायन्स व हॉल ऑफ चॅम्पियन्स (स्थानिक खेळाडूंच्या स्मृतींचा संग्रह) प्रसिद्घ आहेत. प्रेसिडिओ पार्कमधील सॅन डिएगो द अल्कला, फोर्ट स्टॉकटोन ही पर्यटकांची आकर्षणे आहेत. बंदर परिसरात १८६३ मधील स्टार ऑफ इंडिया नावाचे मोठे जहाज असून त्यात धाडशी दर्यावर्दींच्या वस्तूंचे संग्रहालय आहे. मिशन बे उपसागराच्या किनाऱ्यावरील पुळणींजवळच मत्स्यालय व ॲक्वेटिक (जलचर प्राण्यांसाठी) पार्क आहे. येथील जलक्रीडा आणि मत्स्यपारध हे क्रीडाप्रकार प्रसिद्घ आहेत. याशिवाय पूर्वेकडील पर्वतश्रेणींत स्किईंग क्रीडा प्रकार चालतो.

सॅन डिएगो हे उच्च शिक्षणासाठी प्रसिद्घ आहे. येथे सॅन डिएगो स्टेट युनिव्हर्सिटी (स्था. १८९७), युनायटेड स्टेट्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, द युनिव्हर्सिटी ऑफ सॅन डिएगो (१९४९), पॉईंट लोमा कॉलेज, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (१९५८), कॅलिफोर्निया स्कूल ऑफ प्रोफेशनल सायकॉलॉजी, स्क्रीप्स इन्स्टिट्यूशन ऑफ ओशनॉग्रफी इ. प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आहेत. शहराजवळच एका डोंगरावर पॅलोमार वेधशाळा असून तेथे जगप्रसिद्घ हॅले दुर्बिण आहे. आरोग्यवर्धक समशीतोष्ण हवामान आणि करमणुकीची विविध साधने यांमुळे हे शहर पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. पर्यटन हा येथील महत्त्वाचा उद्योग आहे.

देशपांडे, सु. र.