अश्रु ग्रंथि : लाला ग्रंथीप्रमाणेच अश्रू ग्रंथी संयुक्त लहान लहान खंडिकांची बनलेली असते. ही डोळ्याच्या वरील व बाहेरील कोपऱ्यात, अक्षिकुहराच्या (डोळ्याच्या खोबणीच्या) खाचेत असते. तिचा स्राव सहा ते बारा नलिकांनी बाहेर पडून पापणीच्या आतील भागावर पसरतो. साधारणत: अशा क्रियेने डोळ्यास योग्य ओलावा मिळतो. डोळ्यातील अश्रू पापणीच्या आतील कोपऱ्यातून दोन लहान छिद्रांमधून नलिकांवाटे अश्रुकोशात जातात व तेथून नासाश्रुवाहिनीने (अश्रुकोशापासून नाकात अश्रू आणून सोडणाऱ्या नलिकेने) नाकात खालच्या विवरात जातात. अश्रू फार झाल्यास खालच्या पापणीवरून बाहेर पडतात. पाचवी मस्तिष्क-तंत्रिका (मेंदूतील मज्‍जातंतू) व मानेतील अनुकंपी तंत्रिका ह्यांत अश्रुस्रावावर नियंत्रण ठेवणाऱ्या तंत्रिका असतात. [→ तंत्रिका तंत्र ].

डोळ्याचा आतला कोपरा व नाक यांमध्ये जी जागा असते तेथे अश्रुकोश असतो. डोळ्यातील श्लेष्मकला (समान रचना व कार्य असणाऱ्या शरीराच्या सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या विशिष्ट समूहाचा आतील नाजूक थर) व नाकातील श्लेष्मकला ह्या दोहींचा संयोग अश्रुकोशाने व नासाश्रुवाहिनीने झालेला असतो.

अश्रुमार्ग बंद झाला म्हणजे अश्रुकोशात अश्रू साठतात, तो फुगतो, नासाश्रुवाहिनीत अश्रू ढकलण्याची त्याची नैसर्गिक क्रिया बंद होते. त्यामुळे डोळा व नाक यांमध्ये एक टेंगूळ आलेले दिसते. हे टेंगूळ बोटाने दाबले म्हणजे त्यात साचलेले अश्रू छिद्रांवाटे बाहेर येतात व डोळ्यातून बाहेर पडतात. याचा अर्थ असा की, नासाश्रुवाहिनीच काही कारणांमुळे बंद झालेली असते. अश्रुमार्ग बंद झाला म्हणजे डोळ्यास फार धोका असतो कारण अश्रुकोशात न्यूमोकॉकस नावाचे न्यूमोनिया होण्यास कारणीभूत होणारे सूक्ष्मजीव नेहमीच असतात. स्वच्छमंडळाचे (डोळ्याच्या पुढच्या पारदर्शक भागाचे) साधे घृष्टव्रण (घासल्याने होणारी दुखापत) त्याने दूषित होऊन उग्र जातीचा पूयव्रण (पूयुक्त जखम) होण्याचा संभव असतो. अशा स्थितीत डोळ्यावर कोणतीही शस्त्रक्रिया करणे तर फारच धोक्याचे असते. सबंध डोळ्यालाच अपाय होण्याचा संभव असतो. यासाठीच डोळ्यावर अंतर्गत शस्त्रक्रिया करण्यापूर्वी अश्रुमार्ग खुला आहे किंवा नाही याची खात्री पिचकारीने करून घ्यावी लागते. मार्ग बंद असल्यास अश्रुकोशच काढून टाकावा लागतो व त्यानंतरच शस्त्रक्रिया करतात.

कधीकधी आगंतुक दोषामुळे अश्रूकोशाचा शोथ (दाहयुक्त सूज) होतो. असे झाले म्हणजे अश्रुकोश सुजतो व पुवाळतो. एक मोठे टेंगूळ नाकाच्या बाजूस येते. त्याला ‘नासूर’ असे म्हणतात. शस्त्रक्रियेने ते फोडले नाही, तर ते आपोआप फुटते. त्यातून पू वाहून जातो, पण ते पूर्णपणे बरे होत नाही. त्यातून पू झिरपतच राहतो. अशा वेळी मोठी शस्त्रक्रिया करून अश्रुकोशच काढावा लागतो.

मूल जन्मल्यानंतर अश्रू ग्रंथीतून काही आठवडे तरी अश्रुनिर्मिती होत नाही, पण काही वेळा मात्र मुलाच्या डोळ्यांतून अश्रुस्त्राव होऊ लागतो. नासाश्रुवाहिनी पूर्णपणे पोकळ झालेली नसते. तीमध्ये जन्मजात दोष असण्याचा संभव असतो. योग्य उपचार करून डोळ्यांतून होणारा अश्रुस्त्राव थांबविता येतो. फार वेळ असा अश्रुस्त्राव चालू राहिला, तर नासाश्रुवाहिनीत सळई घालून ती मोकळी करण्याचा प्रयत्‍न करणे फार धोक्याचे असते, कारण सळई खऱ्या अश्रुमार्गात न गेल्यास त्यामुळे अनैसर्गिक अश्रुमार्ग तयार होण्याचा संभव असतो. केवळ अनुभवी व कुशल नैत्रवैद्यालाच हे काम करणे शक्य असते. (चित्रपत्र ६१)

चिटणीस, व. के.