हिंदुधर्म : कोणत्याही एका व्यक्तीला ईश्वरी साक्षात्कार होऊनया धर्माची स्थापना झालेली नाही किंवा कोणत्याही एकाच धर्मग्रंथाचे निरपवाद प्रामाण्य स्वीकारून हा धर्म उदयास आलेला नाही. हिंदू धर्म हा विशिष्ट धर्मग्रंथ व विशिष्ट धर्मसंस्थापक यांस प्रमाण मानीत नाही. त्यामुळे या धर्माचा उदय केव्हा व कसा झाला, हे निश्चितपणे सांगता येत नाही. हिंदू धर्म या संज्ञेच्या व्याख्या अनेक विद्वानांनी केल्या आहेत. त्यांतील काही व्यवहार्य, आशय व व्याप्ती व्यक्त करणाऱ्या व्याख्या खालील होत : 

 

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, ‘हिंदू धर्म हा बहुरूपी आणि परस्परविरोधी प्रवृत्तींचे संमिश्रण होऊन बनलेला आहे. या धर्माच्या दोन बाजू आहेत. विशिष्ट प्रकारच्या सामाजिक चालीरीती किंवा समाज-रचनेचे विशिष्ट कायदे ही याची सर्वांत प्रमुख अशी बाजू आहे आणि परस्परविरोधी अनेक पारमार्थिक संप्रदाय ही त्याची दुसरी प्रमुख बाजूहोय.’ तसेच ‘हिंदू धर्म ही विविध सामाजिक आचारविचारांची एक गठडी किंवा एक संग्रह आहे आणि विसदृश आध्यात्मिक व पारलौकिकविविध कल्पनांचाही त्यात भरणा आहे.’ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् म्हणतात, ‘अनेक उपासनामार्ग, विविध उपास्य देवता, बहुविध धर्मद्रष्टे यांचा त्यात संग्रह आहे. हा धर्म व्यक्तिनिष्ठ नाही हा विशिष्ट पंथाचा आग्रह धरीतनाही हा धर्म अधिकारभेदाने सगळे धर्म संग्राह्य आहेत, असे मानतो… अनेक प्रकारचे पारमार्थिक उन्नतीचे पंथ यांच्यामुळे हिंदू धर्म परमतसहिष्णू झाला आहे.’ ‘वेदांविषयी प्रामाण्यबुद्धी, साधनांची अनेकता आणि उपास्य दैवत कोणते असावे यांविषयी निश्चित नियम नसणे, हे हिंदू धर्माचे लक्षण होय. ‘प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु’ हे तत्त्व स्वीकारून पारंपर्यागत व श्रुतिस्मृति-पुराण-प्रतिपादित विधिसंस्कार किंवा आचार पाळणारा तो हिंदू होय’, असे लोकमान्य टिळक म्हणतात. इह व पर किंवा प्रपंच व परमार्थ साधण्याचा मार्ग हेच हिंदू धर्माचे स्वरूप होय. परधर्माविषयी सहिष्णुता हे हिंदू धर्माचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तो सत्य, अहिंसा, दया, प्रेम इ. सद्गुणांवर आधारलेला आहे. 

 

हिंदू धर्माचा अभ्यास तीन अंगांनी करता येतो. पहिल्या भागात हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास आपण करतो. ह्या विश्वाचा उगम कधी झाला सृष्टीची उत्पत्ती कोणी केली विश्वाच्या बुडाशी कोणते तत्त्व आहे चर प्राणी अचर वस्तूंपासून वेगळे कशामुळे पडतात मनुष्य व सृष्टी आणि मनुष्य व जगत्कर्ता यांचा संबंध काय, अशा प्रकारचाविचार जेव्हा धर्माच्या चौकटीत राहून केला जातो, तेव्हा त्या धर्माचे तत्त्वज्ञान तयार होत जाते. [→ भारतीय तत्त्वज्ञान]. 

 

मनुष्याच्या ऐहिक व पारलौकिक अशा आकांक्षा असतात. देवदेवतांना प्रसन्न करून घेऊन त्या आकांक्षांची पूर्तता होऊ शकते, असे मनुष्याला वाटते. देवांना प्रसन्न कसे करावे, त्यासाठी कोणती व्रते आचरावी हा विचार धर्माच्या परीक्षणाच्या दुसऱ्या भागात येतो. या उपासनांच्या अनुषंगानेच दैवतांच्या कथा, त्यांचे उत्सव, तीर्थयात्रा इत्यादींचा पसारा निर्माण होतो. दैवते व उपासनामार्ग हे धर्माच्या विचाराचे दुसरे अंग होय. 

 

प्रत्येक धर्म आपल्या अनुयायांसाठी वर्तणुकीचे नियम घालून देतो. धर्माच्या अनुयायाने अमुक गोष्टी कराव्यात, अमुक वर्तन निषिद्ध आहे, अशा स्वरूपाचे हे नियम असतात. अशा नियमांना अनुसरून धर्माचे अनुयायी नांदतात. धर्माने लोकसंग्रह–म्हणजेच समाजव्यवस्था–व्हावी यासाठी जी वागणूक प्रशंसिली व जी वागणूक त्याज्य मानली, त्यासंबंधीचा विचार हा धर्माच्या अभ्यासाचा तिसरा भाग आहे. 

 

हिंदू धर्माच्या अभ्यासाचे तीन भाग केले असले, तरी ते एकमेकां-पासून वेगळे नाहीत व एका भागातील विषयांचा संबंध दुसऱ्या भागातील बाबींशी अपरिहार्यपणे येतो, हे सहजच दिसून येईल. उदा., धर्माने घालून दिलेली नीती व धर्माने स्वीकारलेला अध्यात्मविचार हे परस्परांशी निगडित आहेत. ‘मी नीतीने का वागावे ?’ या प्रश्नाचे उत्तर धर्माने घडविलेल्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून मिळते. 

 

धर्माची वर जी तीन अंगे सांगितली, त्यांचा व्यक्तीशी व व्यक्तिसमूहांशी संबंध आहे. व्यक्ती व समाज हे काही विशिष्ट भौगोलिक परिसरात नांदत असतात. ह्या परिसरावर नैसर्गिक व मानवनिर्मित बदलांचा परिणाम होतो. त्या परिसरात राहणाऱ्या माणसांच्या जीवनशैलीत व राहणीमानात फरक पडतो. जीवन सुखावह करण्यासाठी ज्या अडचणींवर मात करण्याचीजरूरी एकेकाळी वाटत होती, त्यापेक्षा वेगळ्याच प्रश्नांना कालांतरानेतोंड देण्याची पाळी येते. समाजाची घडी बदलते. असे होताना प्रथम समाजधारणेचे नियम, नंतर दैवतशास्त्र व अखेरीस तत्त्वज्ञान यांची मांडणी बदलते. सारांश, धर्माची जी तीन अंगे वर सांगितली, त्यामुळे कोणतेचअंग अपरिवर्तनीय आणि शाश्वत असत नाही. 

 

साहजिकच ‘अ’ या टप्प्यावरचा समाज व त्याचा धर्म आणि कालांतराने ‘ब’ या टप्प्यावर आढळणारा समाज व त्याचा धर्म यांच्या स्वरूपात प्रचंड तफावत दिसून येते. असे असले, तरी या दोन्ही टप्प्यांवरील समाज व धर्म हे एकच आहेत, असे आपण म्हणतो. इतकेच काय पण भारतीयांनी आपल्या देशात घडविलेला हिंदू धर्म दूरच्या जावा, बाली वगैरे बेटांत नेला व तिथल्या समाजाने तो स्वीकारला, तरी आपण दोन्ही ठिकाणी हिंदू धर्मच आहे, असे म्हणतो. याला आधार हा असतो की, ‘अ’ व ‘ब’ टप्प्यांवरील स्थितींना धरून ठेवणारी एक परंपरा आहे, असे आपण दाखवू शकतो. ‘अ’ टप्प्यापासून ‘ब’ टप्प्यापर्यंत झालेल्या बदलांची अशी एक साखळी लावून देता येते की, जिच्या साहाय्याने या दोन टप्प्यांवरील धर्माच्या स्थितींमध्ये आपणास साम्य दिसून येते. हीपरंपरा म्हणजे धर्माच्या अभ्यासाचा चौथा भाग होय. 

 

(१) हिंदू हा शब्द फार जुना आहे. प्राचीन ग्रीक वाङ्मयात आणि पारशी लोकांच्या ⇨ अवेस्ता या ग्रंथात हा शब्द येतो. पंजाबातून सात नद्या वाहतात. त्यांतील सर्वांत पश्चिमेकडची नदी ‘सिंधू’ होय. सिंधूच्या पूर्वेकडील प्रदेशात राहणारे लोक ते सिंधू किंवा हिंदू. या हिंदूंचा धर्म तो ‘हिंदू धर्म ‘ मात्र हिंदूंचे धार्मिक ग्रंथ अगर शास्त्रग्रंथ या धर्माला ‘हिंदू धर्म’ म्हणत नाहीत. ते ग्रंथ या धर्माला आर्य धर्म, वैदिक धर्म, सनातन धर्म किंवा वर्णाश्रमधर्म असे संबोधतात. 

 

हिंदू हे नाव वर पाहिल्याप्रमाणे, मुळात प्रदेशवाचक होते. हे प्रदेश-वाचक नाव धर्माचे नाव म्हणून कसे ओळखले जाऊ लागले ⇨ आपण पाहिले की, धर्माचे काही तत्त्वज्ञान असते, दैवते व उपासनामार्ग असतात, लोकव्यवस्थेचे नियम धर्माने घालून दिलेले असतात, धर्माने आपल्या अनुयायांसाठी काही संस्कारांची योजना केलेली असते. एका प्रदेशात राहणाऱ्या लोकांनी या साऱ्याची जोड आपल्या जगण्याला मिळवून दिल्याने त्यांचा विशिष्ट असा धर्म बनून राहिला. हे कसे घडले, याचा शोध घेतला पाहिजे. 


 

सिंधू प्रदेशात अनेक जमाती एकमेकांच्या निकट पण आपले वेगळेपण सांभाळत राहत होत्या. त्यांतील एका जमातीचे नाव ‘आर्य’ असे होते(‘आय ‘र् नावाची जमात बाहेरून आक्रमक म्हणून सिंधू प्रदेशात आलीकी, ती मूळ इथलीच जमात होती, याविषयी वाद आहे) . या आर्यांच्या आगमनापूर्वी भारतात प्रचलित असलेले लौकिक धर्म आणि आर्यांचा वैदिक धर्म यांच्या संमिश्रणामुळे हिंदू धर्म उदयास आला, असे विद्वान मानतात. सिंधू संस्कृतीच्या अवशेषांतून सिंधू धर्माचे जे रूप प्रकट झाले आहे, ते हिंदू धर्माचे एक प्राचीन रूप होय. या आर्यांनी स्वतःचे वाङ्मय तयार केले होते. या वाङ्मयाला ‘वेद’ असे नाव आहे. सध्याच्या हिंदू धर्माची परंपरा आपणाला मागे वेदांपर्यंत नेता येते. 

 

वेदांच्या चार संहिता आहेत. त्यांना ⇨ ऋग्वेद, ⇨ यजुर्वेद, ⇨ सामवेद व ⇨ अथर्ववेद अशी नावे आहेत. प्रत्येक संहितेशी संलग्न अशी ⇨ ब्राह्मणे असतात. उदा., ऋग्वेदाशी संलग्न ऐतरेय ब्राह्मण आणि कौषितकी ब्राह्मण ही दोन ब्राह्मणे किंवा ब्राह्मणग्रंथ आहेत. प्रत्येकवेदाने काही यज्ञविधी सांगितले आहेत. ऋग्वेदाने सांगितलेले यज्ञविधीकसे करायचे, हे ऋग्वेदाच्या ब्राह्मणात सांगितले आहे. वेदात सांगितलेला महत्त्वाचा विधी म्हणजे यज्ञ होय. आपली जी इच्छा पुरी करून हवीअसेल, तिच्या पूर्तीसाठी त्या प्रकारचा यज्ञ करावा लागत असे. उदा पुत्र हवा असेल, तर पुत्रकामेष्टी हा यज्ञ करावा. [→ यज्ञसंस्था]. 

 

वेद हे शब्दबद्ध व त्यामुळे स्थिर असले, तरी हिंदू धर्माच्या संदर्भात या वाङ्मयाकडे ‘घटित’ म्हणून न पाहता त्यांच्याकडे एक परंपरा म्हणून पाहणे योग्य होईल. ‘प्राचीन श्रुतिपरंपरा’ हे नाव जास्त योग्य दिसेल. वेदांकडे या दृष्टीने पाहिले म्हणजे वेदवाङ्मय, त्याच्या छायेत निर्माण झालेले विधी व आचार, वर्ण आणि आश्रम या संकल्पना, चार पुरुषार्थ, सृष्टीची उत्पत्ती व विकासासंबंधी मांडलेल्या कल्पना या सर्वांनी ज्याला एक परिपूर्ण जीवनक्रम मिळालेला आहे, अशा समाजाचे चित्र आपल्याला मिळते. [→ वेद व वेदांगे]. 

 

वैदिक काळातील सिंधू प्रदेशात आर्य ही एकच जमात होती असे नाही. निषाद, नाग, शबर अशा अनेक जमाती आर्यांच्या आसपास होत्या. त्यांचे स्वतःचे असे वाङ्मय नसले, तरी त्यांच्यातही दैवतविचार व उपासनेचे नियम होते. हा वेदपूर्व धर्मविचार शिव या दैवताला केंद्रस्थानी ठेवणारा होता, असे अभ्यासक सांगतात. आर्य या इतर जमातींच्या संपर्कात पिढ्यान्पिढ्या राहिले होते. वैदिक धर्मीय आर्य व निषाद यांच्यात विवाह होत असत, असे उल्लेख आहेत. वेदवाङ्मय निर्माण होत असताना व पुढे झाल्यावर आर्य ही जमात अधिक सुसंस्कृत व स्पृहणीय समजली गेली असावी. आर्यांचा प्रभाव वाढला व निषाद (आणि इतर जमाती) आर्यांच्या संस्कृतीत समाविष्ट झाले. त्यांनी आर्यांची इंद्र, वरुण, यम, अग्नी इ. दैवते व यज्ञाचा उपासना-मार्ग स्वीकारला. त्याचबरोबर आर्यांनीही त्यांच्या शिव व इतर दैवतांचा समावेश आपल्या दैवतसमूहात करून घेतला. वैदिक परंपरा केंद्रस्थानी ठेवून व इतर जमातींवर जबरदस्ती न करता त्यांना आत्मसात करून घेऊन हा विस्तारित धर्म निर्माण झाला. त्याला हिंदू धर्म असे नाव मिळाले. 

 

इतर जमातींना आपल्या संघटनांतून प्रभावित करून, त्यांची दैवते व उपासनापरंपरा यांचा मान राखून आपल्या धर्माचा विस्तार करण्याची आर्यांची शैली होती. तिला समन्वित संमिश्रण अशी संज्ञा अभ्यासकांनी दिली आहे. येथून पुढे व आजवरही हिंदू धर्माचा प्रसार याच मार्गाने होत राहिला. बाहेरून आक्रमण करून शक, कुशाण, हूण, ग्रीक अशा अनेक जमाती भारतात आल्या. समन्वित संमिश्रणाच्या प्रक्रियेने या जमाती हिंदू होऊन गेल्या. अनेक परकीय लोक हिंदूंच्या तत्त्वज्ञानाने व जीवनशैलीने आकर्षित होऊन स्वतःस हिंदू म्हणवून घेऊ लागले. मध्य प्रदेशात ‘संबा बाबा’ म्हणून एक ठिकाण आहे. तेथे ‘हेलिओडोरस’ नावाच्या ग्रीकाने आपण हिंदू झालो याचे स्मृतिचिन्ह म्हणून एक स्तंभ उभारलाआहे (अकरावे शतक) . अठराव्या व एकोणिसाव्या शतकांतही भारताच्या निरनिराळ्या भागांत पसरलेल्या जमातींवर हिंदुत्वाचा संस्कार करण्याचे कार्य चालत होते व आजही चालले आहे. 

 

(२) वेद व ब्राह्मणे यांत देवतांची स्तोत्रे व यज्ञविधींविषयीचे नियम यांनी मोठाच भाग व्यापलेला असला, तरी वेदांमध्ये विश्वाला पायाभूत असे कोणते तत्त्व आहे, मनुष्याच्या ठिकाणी असणाऱ्या चैतन्याचे स्वरूप कोणते, मृत्यूनंतर ते चैतन्य कोठे जाते अशा तात्त्विक प्रश्नांचा खलही केलेला आहे. विश्वाच्या बुडाशी एक तत्त्व आहे व त्याच्या स्फुरणातून विश्वाची उत्पत्ती कशी झाली, याचे भव्य व रोमांचकारी वर्णन ऋग्वेदातील नासदीय सूक्तात आले आहे. 

 

हे सूक्त सांगते की, या मूलतत्त्वाचे वर्णन सत्-असत्, उजेड-अंधार, मर्त्य-अमर्त्य, चेतन-जड अशा द्वंद्वात्मक जोड्यांतील शब्दांनी होऊ शकत नाही. असे शब्द बाजूला ठेवून आदिम तत्त्व हे निर्भेळ, चिद्रूपी, विलक्षण परब्रह्म स्वरूपाचे होते, असे वर्णन सूक्ताचा कर्ता करतो. या अनिर्वाच्य, निर्गुण व एकाकी तत्त्वापासून नामरूपात्मक विविध भावांनी बहरून गेलेली सृष्टी कधी निर्माण झाली, हे कोडे मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडले आहे. सृष्टी हा त्रिगुणात्मक प्रकृतीचा विलास आहे, इथवर आपण जाऊ शकतो पण प्रकृती व परब्रह्म ही दोन स्वतंत्र मूलतत्त्वेआहेत, असे मानणे चुकीचे होईल. हिंदू तत्त्वपरंपरेत द्वैत विरुद्ध अद्वैत हा वाद सतत चालत आला आहे. त्याचे उद्घाटन नासदीय सूक्तानेकेले आहे. 

 

वेदांनंतर ज्याला ⇨ वेदान्त म्हणून गौरविण्यात येते, त्या उपनिषद-ग्रंथांनी तत्त्वविचार पुढे नेला. वेदांत व ब्राह्मणांत यज्ञविधी व त्यांच्या-भोवती गोळा झालेले कर्मकांड यांचा बडिवार पुरोहितांनी माजवला होता. त्याला प्रतिक्रिया म्हणून क्षत्रियांनी उपनिषदांतील अमूर्त व तर्ककठोर तत्त्वविचार मांडला, असे एक मत आहे पण हे लक्षात घेतले पाहिजेकी, (अ) उपनिषदे वेदांचा आदरानेच उल्लेख करतात (आ) उपनिषदां-तील अनेक विचार व उक्ती यांचा शोध वेदांतील विचार आणि उक्तीयांच्यापर्यंत पोहोचविता येतो व (इ) उपनिषदांत आलेल्या भक्ती, तपश्चर्या, आत्मा, पुनर्जन्म, मुक्ती, कर्मवाद इ. संकल्पना उपनिषदपूर्वकाळातच हिंदू तत्त्वविचारात स्थिरावल्या होत्या.


उपनिषदे पुष्कळ आहेत. सृष्टीच्या बुडाशी ब्रह्म नावाचे एकटे एक तत्त्व आहे. त्याने स्वतःपासून प्रकृती नावाचे दुय्यम तत्त्व निर्माण केले. प्रकृतीने ब्रह्म्याची मदत न घेता सृष्टी निर्माण केली. प्रकृतीने चर प्राण्यांची शरीरे निर्माण केली त्यांत ब्रह्म्याने ‘अनुप्रवेश’ करून चैतन्य निर्माण केले. चर प्राण्यांतील चैतन्यशील तत्त्वालाच आत्मतत्त्व म्हणतात. ब्रह्म हे तत्त्व प्रकृतीने निर्माण केलेल्या चर तसेच अचर भावांना व्यापून राहिले आहे. हे ब्रह्मतत्त्व व आत्मतत्त्व ही दोन्ही एकच आहेत, हा उपनिषदांचा श्रेष्ठ सिद्धान्त आहे. 

 

या सिद्धान्तापासून निघणारा उपसिद्धान्त असा की, व्यक्तीच्या ठिकाणी असलेल्या आत्मतत्त्वाने परब्रह्माशी आपण एकरूप आहोत, याची प्रचिती घेतली पाहिजे. ह्यासाठी पद्धतशीर उपासना करावी लागते. या उपासने-तील मुख्य टप्पे असे : वैराग्य, ज्ञानलालसा, गुरूचे मार्गदर्शन, चित्ताची एकाग्रता आणि शेवटी निदिध्यास. सर्वत्र आपल्यासारखाच आत्मा भरून राहिला आहे, हा विचार ठेवून वर्तन करणे म्हणजे निदिध्यास होय. 

 

भगवद्गीतेने उपनिषदांतील तत्त्वज्ञानच अधिक संगतवार सांगितले आहे. ब्रह्म आणि प्रकृती यांच्या पलीकडे गीतेने स्थिरचर व्यापून उरलेला पुरुषोत्तम उभा केला. प्रकृतीपासून सृष्टी कशी निर्माण होते, याचे वर्णनकेले. क्षेत्र-क्षेत्रज्ञ विचारात व्यक्तिमत्त्वाचा आत्मा व त्याच्याभोवती पडलेली प्रकृतीची आवरणे यांचा खुलासा केला. प्रकृतीच्या आवरणात गुरफटलेला आत्मा आपली सुटका करून घेण्यासाठी हालचाल करू लागतो, तेव्हा तो स्वतंत्र निर्णय घेतो. आत्मा भलेही शरीरातच राहिला, तरी तो अहंकार, बुद्धी व मन या आवरणांपासून मोकळा झाला की, पुरुषोत्तमाशी त्याचे एकरूपत्व होते. यालाच ⇨ मोक्ष असे म्हणतात. धर्म, अर्थ व काम हे व्यावहारिक जगातील पुरुषार्थ आहेत. त्यांनागीतेने मोक्ष या पुरुषार्थाची जोड दिली. धर्मशास्त्राने घालून दिलेल्यानीतिनियमांवर अर्थ व काम यांच्या लालसेने कुरघोडी करणे कसेचुकीचे आहे, हे आत्मौपम्य (परब्रह्माच्या रूपाशी एकरूपता) व लोकसंग्रह या तत्त्वांच्या आधारे दाखवून दिले. 

 

(३) वेदांमध्ये इंद्र, वरुण, यम, अग्नी इ. देवता आहेत. त्याचबरोबर अनेक नैसर्गिक शक्तींनाही दैवतांची रूपे देऊन त्यांची स्तवने वेदांमध्येदिलेली आहेत. मनुष्याला ऐहिक व पारलौकिक आकांक्षा असतात. आपल्याला मुलेबाळे असावीत, संपत्ती मिळावी, मरणानंतर स्वर्गात जावे अशा प्रकारच्या इच्छा असतात. या इच्छा पुऱ्या व्हाव्यात, यासाठी मनुष्य व्यावहारिक प्रयत्न करीतच असतो पण या प्रयत्नांना दैवी शक्तींची जोड मिळावी, अशी गरज त्याला वाटते. या शक्ती अंतरिक्षात वास करतात, अशी आर्यांची समजूत होती पण या दैवी शक्तींची ऐहिक रूपे पार्थिव वस्तूंतही दिसतात व अशा वस्तूंपैकी मुख्य वस्तू म्हणजे अग्नी होय.त्यामुळे वेदकाळात अग्नीच्या द्वारे विविध दैवतांना प्रसन्न करून घेण्याची, म्हणजेच यज्ञाची, प्रथा सुरू झाली. यज्ञ हा आर्यांच्या जीवनपद्धतीचा प्रधान भाग होऊन बसला होता. अग्नी आत्मतत्त्वाचे स्वरूप म्हणून मानला गेला.

 

थोडक्यात, वैदिक धर्माचा विस्तार होऊन आर्येतर जमातींनी आर्यांची जीवनव्यवस्था स्वीकारली. तेव्हा त्या जमातींच्या देव-देवता व उपासना-पद्धती यांचा समावेश करून घेऊन वैदिक धर्माचा हिंदू धर्म बनला. त्यामुळे वैदिक धर्माच्या इंद्र-वरुणादी देवता मागे पडून त्यांच्या जागी शिव, विष्णू अशा देव-देवतांची स्थापना झाली. मूळ वेदांत व नंतर उपनिषदांत असा बळकट विचारप्रवाह होता की, देव-देवतांची उपासना हा गौण मार्ग असून कैवल्यस्वरूपी ब्रह्म हे विश्वाचे मूलतत्त्व आहे पण हिंदू धर्माने व्यक्ति-विशिष्ट देवतांचे (ज्या वेदांतही होत्याच) पुनरुज्जीवन केले. लोक देवतांकडे तारकसखा व उद्धारकर्ता या नात्याने पाहू लागले. निर्गुण, निराकार, सर्वव्यापी पुरुषोत्तमाला गीतेने आदिम स्थान दिले होते, तरी लोक देवांच्या मूर्ती करून त्यांची पूजा करू लागले. वैदिक व अवैदिक द्राविड धर्माचे एकीकरण झाल्यानंतर निर्माण झालेल्या हिंदू धर्मात होम व यज्ञ यांना दुय्यम स्थान मिळून पूजेला प्राधान्य प्राप्त झाले. यज्ञविधीचे मध्यवर्ती स्थान गेले व मूर्तिरूप ईश्वर, त्याचे देऊळ, त्याच्या पूजेचे यमनियम, देवांच्यायात्रा या गोष्टींना हिंदूंच्या जीवनात महत्त्व आले. अध्यात्मशास्त्र व त्याचा अभ्यास विद्वानांपुरता राहिला आणि गीता व भागवत यांनी प्रवर्तित केलेला भक्तिमार्ग प्रभावशाली ठरला. इतिहास-पुराणांनी भक्तिमार्गाची स्थापना केली. भक्ति-मार्गाचा उदय इतिहासपुराणांच्या योगानेच झाला. भक्ती हे धार्मिक भावनेचे उच्चतम स्वरूप होय. 

 

ख्रिस्तपूर्व सुमारे दुसऱ्या शतकापासून ख्रिस्तोत्तर दुसऱ्या शतका-पर्यंतच्या कालखंडात हिंदूंतील उपासना व दैवते यांचा भरपूर विस्तार झाला व हिंदू धर्म हा अधिक प्रभावी व सामर्थ्यशाली झाला. याचकाळात रामायण व महाभारत या आर्ष महाकाव्यांची रचना झाली. महाभारतातील कृष्ण हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या आकर्षक पैलूंमुळे व त्याच्याभोवती गुंफलेल्या कथांमुळे जनसामान्यांपर्यंत पोहोचला. कृष्णपंथहा हिंदू धर्माचा प्रमुख घटक बनला. कृष्णाने अशा आध्यात्मिक व व्यावहारिक जीवनपद्धतीचा पुरस्कार केला की, जिच्यात सर्व लोक सहभागी होऊ शकत होते. त्यामुळे सगुण व समूर्त ईश्वराची भक्ती हिंदू धर्मात श्रेष्ठ मानली गेली. 

 

याच काळात एका बाजूने हिंदू धर्माचे शैव, वैष्णव या मुख्य पंथांत विभाजन झाले. या धर्मांनी बाह्य धार्मिक क्रियेला साधे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे धार्मिक क्रियेला लाक्षणिक महत्त्व आले. शैव व वैष्णव धर्मांनी पतितपावन परमेश्वराच्या भक्तीचा झेंडा उभारला. हे विश्व-संस्कृतीचे धार्मिक रूप होय. या दोन मुख्य पंथांतून अनेक उपपंथनिर्माण झाले आणि प्रत्येक उपपंथाची संघटना निर्माण होऊन दुसऱ्याबाजूने धर्म अधिक दृढही बनला. या कालखंडात निवृत्ती, ऋणत्रय, पुरुषार्थ-चतुष्टय, लोकसंग्रह, कर्मवाद इ. कल्पना उदयाला आल्या व त्यांच्या योगाने दैवत-उपासना व ऐहिक-जीवनक्रम या दोहोंनाही नवीन पद्धती व शिस्त मिळाली. कर्मवाद, पुनर्जन्म, स्वर्ग-नरक, कर्मफलामुळे सुरू होणारे कर्मचक्र व कर्मयोगाने आलेले कर्म करतानाचे कुशलत्वआणि त्यातून साधणाऱ्या लोकसंग्रह व मुक्ती या ऐहिक व पारलौकिक श्रेयांच्या स्थिती अशी संकल्पनांची एक साखळीच निर्माण झाली. 


 

(४) आपण वेदकाळापासून इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापर्यंतच्या कालखंडात झालेली हिंदू धर्माची जडणघडण विचारात घेत आहोत. आता- पर्यंत आपण तत्त्वज्ञानाचा विकास नासदीय सूक्तापासून भगवद्गीतेपर्यंत कसा घडला हे पाहिले. नंतर दैवते व त्यांच्या उपासना यांच्याबाबत झालेल्या घडामोडींचा आढावा घेतला. आता हिंदू धर्माने लोकव्यवस्थेच्या बाबतीत काय विचार केला, त्याचा मागोवा घ्यावयाचा आहे. 

 

हिंदू धर्माचा विस्तार समन्वित संमिश्रणाच्या प्रक्रियेतून झाला, हे आपण पाहिलेच आहे. या प्रक्रियेत जशी बलस्थाने होती, त्याचप्रमाणे काही दोष- स्थानेही होती. निषाद ही जमात हिंदूंमध्ये समाविष्ट कशी झाली, ते आपण पाहिले. मात्र निषाद व्यक्तीचे हिंदू समाजात कोणते स्थानराहिले? ऋग्वेदात ‘पंचजनाः’ अशी संज्ञा येते. म्हणजे समाजात पाच प्रकारचे मनुष्यसमूह आहेत. या कल्पनेचे विवरण करताना ‘निषादपञ्चमाः’ असा निषादांचा निर्देश होतो. याचा अर्थ असा की, आर्यांच्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चार वर्णांच्या बाहेरचे जे लोकत्यांपैकी निषाद होत. 

 

वैदिक आर्य संस्कृतीत चार वर्ण होते, हे वेदांतील पुरुषसूक्तावरून स्पष्टच आहे (काही अभ्यासक ‘पुरुषसूक्त’ हे प्रक्षिप्त आहे, असेमानतात) . नंतर वैदिक नसलेल्या लोकांनी (उदा., निषाद) वैदिक आर्यांच्या समाजात प्रवेश घेतला, तेव्हा त्यांना चातुर्वर्ण्याच्या बाहेरठेवण्यात आले. आर्यांतील चातुर्वर्ण्य जन्मावर ठरत होते की गुणकर्मावर, हा वादाचा विषय आहे. गीता स्पष्ट सांगते, की वर्ण हा गुणकर्माच्याआधारे ठरत असे. कालांतराने चातुर्वर्ण्याची संकल्पना दृढ होऊन वर्ण हा जन्मावरच ठरू लागला. वैदिकेतर जमाती या जातिरूपाने हिंदू समाजाचा, पण चातुर्वर्ण्याच्या बाहेरचा, भाग झाल्या होत्याच. आता वर्णही जन्मावर ठरू लागल्यावर चातुर्वर्ण्यही जातिजातींत विभागले जाऊन लोप पावले. [→ वर्णव्यवस्था]. हिंदू समाज हा आता जातींचा समूह होऊन गेला. या सर्व परिवर्तनात निषादांचे काय झाले, हे पाहणे बोधप्रद आहे. निषाद हे चातुर्वर्ण्याच्या बाहेर होतेच. आता समाज जातिबद्ध झाल्यावर निषाद ही निकृष्ट जाती ठरली. ब्राह्मण पुरुष व शूद्र स्त्री यांच्या संबंधातून ही जात निर्माण झाली, असे मनुस्मृती सांगते. या जातीला ‘पारशव’ असे नाव मिळाले. आजही या नावाची जात केरळात आहे. हीच स्थिती इतर अवैदिक समाजांची झाली असावी. 

 

आपण जो कालखंड विचारात घेत आहोत, त्या काळात हिंदू समाजाचे विविध जातींत विघटन झाले, हे आपण पाहिले तथापि जातिव्यवस्थेचा सर्वांत निंद्य असा परिणाम जी अस्पृश्यता, ती याच काळात निर्माण झाली का, याविषयी नक्की सांगता येत नाही. ज्या जाती निर्माण झाल्या, त्यांतील प्रत्येक जात स्वतःला इतर काही जातींपेक्षा उच्च समजत होती, त्यात शंका नाही. मुळात चातुर्वर्ण्यातही उच्च-नीचत्व यज्ञांच्या संबंधाने प्रत्येक वर्णाला जी कार्ये करण्याची परवानगी होती त्यावरून ठरले होतेच. जातीयता व त्यांचे उच्च-नीचत्व ह्या कल्पना पुढच्या काळात अधिक दृढमूल झाल्या. 

 

जातींच्या अस्तित्वामुळे समाजाचे विघटन झाले हे खरेच पणत्याचमुळे हिंदू समाजाला हिंद्वेतरांचा आपल्यात समावेश करून घेण्याचे साधन मिळाले, ही गोष्टही खरीच आहे. शक, कुशाण, हूण इ. परके लोक व्यापारासाठी म्हणून किंवा प्रदेश जिंकण्यासाठी म्हणून सिंधूच्या पूर्वेला आले. त्यांनी तेथील आचार स्वीकारला, की ते नकळतच हिंदू होत व त्यांची स्वतंत्र जात बने. सारांश, हिंदूंचे जातिजातींत झालेले विभाजन हिंदुत्व भावना वा भारतीयत्व भावना निर्माण होण्याच्या आड आले, असे म्हटले तरी त्या विभाजनामुळेच परकीयांचे समावेशन शक्य झाले, हे लक्षातघेतले पाहिजे. [→ जातिसंस्था]. 

 

(५) इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून ते अगदी चौदाव्या शतकापर्यंत हिंदू तत्त्वज्ञानाने तत्त्वप्रतिपादनाची नवीन शैली स्वीकारली. भगवद्गीता तयार झाली तोपर्यंत तत्त्वज्ञानाचे रूप सर्वबोधक होते पण ग्रंथरचना सूत्रबद्ध होऊ लागल्यावर तत्त्वज्ञान क्लिष्ट व तार्किक पद्धतीने मांडले जाऊ लागले. मूळचा सूत्रग्रंथ समजावून सांगायला त्या ग्रंथावर भाष्ये, वार्तिके इ. मार्गदर्शक ग्रंथ लिहिले जाऊ लागले. मूळ तत्त्वांचा विस्तार व निरूपण करण्याचीही पद्धती रूढ झाली. 

 

ज्यांना षड्दर्शने म्हणतात, त्यांचे मूळ ग्रंथ सूत्रबद्ध पद्धतीनेच लिहिलेले आहेत. या सहा तत्त्वज्ञानांच्या तीन जोड्या होतात त्या अशा : न्याय--वैशेषिक, सांख्य-योग, पूर्वमीमांसा-उत्तरमीमांसा. यांचे मूळ ग्रंथ न्यायसूत्रे, वैशेषिक सूत्रे, सांख्यकारिका, योगसूत्रे, मीमांसासूत्रे आणि वेदान्तसूत्रेअसे आहेत. 

 

⇨ न्यायदर्शनाने तर्कशास्त्राची मांडणी करून प्रत्यक्ष, अनुमान, उपमान व शब्द अशी ज्ञान मिळण्याची चार साधने सांगितली. नंतर या साधनांचा उपयोग करून सृष्टीचा कर्ता या स्वरूपात ईश्वराचे अस्तित्व सिद्ध केले. सृष्टीच्या मुळाशी मूलकण किंवा अणू आहेत असा सिद्धांत वैशेषिकांनी मांडला. [→ वैशेषिक दर्शन]. सांख्यांनी पुरुष व प्रकृती अशी दोन तत्त्वे मानून त्यांच्यापासून विश्वातील स्थिर-चर निर्माण झाले, असे सांगितले. [→ सांख्यदर्शन]. चित्तवृत्तींचा निरोध करून आत्मा प्रकृतीच्या पकडीतून स्वतंत्र होऊ शकतो, असे योगाचे प्रतिपाद्य आहे. सकृत्दर्शनी परस्पर-विरोधी वाटणाऱ्या वेदवचनांची संगती बनविण्याचे शास्त्र म्हणजे ⇨ पूर्व-मीमांसा, तर उपनिषदांचे तत्त्वज्ञान सुसंगत व संक्षिप्त रीतीने सांगण्यासाठी ⇨ बादरायणाचार्यांनी वेदान्तसूत्र हा ग्रंथ रचला. त्यालाच उत्तरमीमांसा असे म्हणतात. [→ भारतीय तत्त्वज्ञान]. 

 

अर्थात यांतील प्रत्येक दर्शन हे त्या त्या सूत्रग्रंथांनी निर्माण केले असे नाही. सूत्रग्रंथांच्या पूर्वीही त्या प्रकारची चिंतने संकीर्ण स्वरूपात होतीच. असे एका स्वरूपाचे विचार एकत्र आणून व त्यांना पद्धतशीर रूप देऊन सूत्रग्रंथ निर्माण झाले. सांख्यांचे ब्रह्म व प्रकृती ही मूलतत्त्वे सांगणारे विचार वेदकाळापासून विचारवंतांच्या चर्चेत होते, हे आपण पाहिलेच आहे. तेच विचार सांख्यकारिकेत गोळा करण्यात आले. वेदान्तसूत्रांनी उप-निषदांच्या शिकवणुकीला नीट रूप दिले. यानंतर झालेल्या विचारवंतांनी वेदान्तसूत्रांवर भाष्ये लिहिली व आपापल्या मताला अनुसरून त्या शिकवणीला डूब दिली. ⇨ आद्य शंकराचार्यांचे भाष्य सांगते की, ब्रह्म हेच खरे आपण त्याच्यावर सृष्टीतील वैविध्याचा आरोप करतो. या भूमिकेला ⇨ केवलाद्वैतवाद म्हणतात. ⇨ रामानुजाचार्यांची भूमिका विशिष्टाद्वैती आहे. ⇨ वल्लभाचार्यांनी शुद्ध-अद्वैत स्वीकारले, तर ⇨ मध्वाचार्यांनी निखळ द्वैताचा पुरस्कार केला. 


 

बाराव्या शतकापासून आत्मोन्नती व मुक्ती यांच्यासाठी संसारत्याग न करता, किंबहुना नेटका संसार करून, पण मनाने विरक्त राहून भजन--पूजन-नामस्मरण यांच्याद्वारे परमात्म्याशी लीन व्हावे व मोक्ष मिळवावा, हा विचार जोमाने पुढे आला. ईश्वरविषयक श्रद्धा ही परम सत्याचे नैसर्गिक भावनारूप आविष्करण होय अशा मानसिक स्थितीत प्राप्त होणारी परमेश्वराची अथवा परमतत्त्वाची जाणीव हे भक्तिमार्गाचे अंतिम साध्यहोय. हिंदू धर्मसंस्थेचा सगळ्यात वरिष्ठ व श्रेष्ठ असा एक थर आहे.त्यात ब्रह्मवाद, एकेश्वरवाद व सर्वेश्वर हे तीन प्रकार येतात. या तीन धर्म-शाखांपैकी एकेश्वर व सर्वेश्वर मानणारा भक्तिसंप्रदाय धर्मसंस्थेची खरी परिणती होय. खरे तर या भक्तिमार्गाचे दिग्दर्शन भगवद्गीते नेच करून दिलेले होते. निर्गुण, निराकार व सर्वांभूती व्यापून राहिलेल्या परमेश्वराचे चिंतन करणे सामान्य मनुष्याला अवघड जाते. म्हणून प्रतीकरूपाने त्याचे ध्यान करावे आणि व्यवहारात नीतीने चालावे असा धडा घालून देणारे नाना जातिधर्मांचे संत स्त्री-पुरुष हिंदुस्थानच्या विविध भागांत निर्माण झाले. त्यांनी आपापल्या परीने भक्तिमार्गात उत्पन्न होणाऱ्या तात्त्विक प्रश्नांचा विचार केला. परमपुरुषाचे चिन्ह म्हणून त्यांनी जी जी देवता भक्ती करण्यासाठी स्वीकारली व जो उपासनामार्ग निश्चित केला, त्यानुसार ⇨ शैव, ⇨ वैष्णव, ⇨ गाणपत्य, ⇨ दत्तात्रेय इ. संप्रदाय निर्माण झाले. त्यांतले बहुतेक संप्रदाय विष्णू किंवा कृष्णाच्या स्वरूपातील विष्णू या देवतेची उपासना करणारे होते. त्यामुळे या भक्तिमार्गाला ⇨ भागवत धर्म असे मोघम किंवा सर्वसमावेशक नाव पडले.

 

(६) आपण इ. स. २०० पासून इ. स. १४०० पर्यंतच्या काळातहिंदू तत्त्वज्ञानाची वाटचाल कशी झाली, ते पाहिले. त्याच काळातदैवतशास्त्र व उपासनामार्ग यांच्यात कोणते फेरफार झाले, ते आता पाहावयाचे आहे. 

 

या विषयाबाबत ह्या काळात निर्माण झालेले अग्रगण्य वाङ्मय म्हणजे पुराणे. ह्या पुराणांची नक्की संख्या सांगता येत नसली, तरी परंपरेने पुराणे अठरा असल्याचे मानले आहे. शिव, विष्णु, ब्रह्मदेव, शिवाचा पुत्र स्कंद, शिवाची पत्नी दुर्गा अशा अनेक देवतांचे पराक्रम, त्यांची उपासना करण्याच्या पद्धती, त्यांची वसतिस्थाने यांविषयीची माहिती त्या त्या देवाचे पुराण देते. आपण पाहिले आहे की, एकेका देवालाच सर्वव्यापी परमेश्वर मानणारे ‘एकेश्वरी’ धर्मपंथ या कालखंडात निर्माण झाले होते. प्रत्येक पंथाने आपल्या देवतेचे माहात्म्य वर्णन करणाऱ्या कथा रचल्या. या कथाच पुढे एकत्र करून त्या त्या देवतेचे पुराण तयार झाले असावे. [→ पुराणे व उपपुराणे]. 

 

या काळातील हिंदू धर्माचा इतिहास म्हणजे निरनिराळ्या हिंदू धर्मपंथांचा इतिहासच होय. या धर्मपंथांव्यतिरिक्त हिंदू धर्माला निराळी अशी ओळखच उरली नाही तथापि हे धर्मपंथ परस्परांशी सहिष्णू वृत्तीने संबंध ठेवून असल्याने इतर धर्मांच्या अनुयायांत ज्याप्रमाणे सांप्रदायिक वाद व हिंसाचारही माजले, तशी गोष्ट या हिंदू धर्मपंथांमध्ये झाली नाही. उलट, प्रत्येक पंथ आपापली पंथसंघटना बांधून आपल्या अनुयायांना एकत्रठेवीत असल्याने व आपला विस्तार करीत असल्याने संपूर्ण हिंदू धर्मही विस्तारला. त्या काळातले पुराणिक (म्हणजे आपल्या पंथातील देवांच्या कथा सांगणारे लोक) व कीर्तनकार आपापल्या पंथाने ठरवून दिलेल्या तीर्थांच्या यात्रा करीत आणि प्रवचने, कीर्तने, पुराणकथांचे विवरणकरीत हिंदू धर्माचा संदेश हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रदेशांत पोहोचवीत होते. इतकेच नव्हे, तर हे धर्मप्रसारक हिंदुस्थानच्या बाहेरही–पूर्वेकडील ब्रह्मदेश (आताचा म्यानमार), कंबोडिया, व्हिएटनाम, इंडोनेशिया यादेशांत आणि पश्चिमेकडील काही देशांतही – जाऊन तेथे आपल्या धर्माची प्रतिष्ठापना करून आले. पूजा व भक्तिमार्ग हा हिंदू धर्माचा गाभा असून पुराणांनी त्याचा प्रसार-प्रचार केला. त्यामुळे हिंदू धर्माचे धार्मिक अधिष्ठान पुराणेच होत, असे म्हणावयास हरकत नाही. 

 

एका बाजूने हिंदू धर्माचा हा विस्तार होत होता. त्याच वेळी अनेक पंथोपपंथांत हिंदू धर्माचे विखंडन होत होते. प्रत्येक पंथ हा एकाच देवतेला वाहिलेला, एका पंथसंघटनेच्या शिस्तीने बांधलेला असल्याने प्रत्येकपंथाचे दृढीकरण होत होते पण हे पांथिक दृढीकरण एकूण हिंदू धर्माला बाधक ठरत नव्हते कारण प्रत्येक पंथाने मूळ हिंदू धर्माचा त्याग न करण्याचे धोरण कटाक्षाने पाळले होते. हे धर्मपंथ काही विशिष्ट तात्त्विक सिद्धांताचा पुरस्कार करण्यासाठी उदयाला आले नव्हते. प्रत्येक पंथाने ईश्वरवादाचा आपला पृथक आदर्श व उपासनेचा पृथक मार्ग स्वीकारला होता. अशा तर्‍हेचे पृथकत्व हिंदू परंपरेला कधीच अमान्य नव्हते.सारांश, चौदाव्या शतकाच्या अखेरीला हिंदू धर्म हा नाना पंथांचा एकसमूह म्हणून नांदत होता. 

 

(७) ह्या कालखंडात हिंदूंच्या समाजव्यवस्थेत काय फेरफार झाले ते पाहू व लोकसमजुती काय होत्या, याचा आढावा घेऊ. 

 

(अ) आपण पाहिलेच आहे की, महाभारताच्या काळीदेखील चातुर्वर्ण्यव्यवस्था लोप पावत होती व जातिव्यवस्था दृढ होत चालली होती. आपण जो कालखंड विचारात घेत आहोत, त्या काळात जन्मा-धारित जाती तर राहिल्याच परंतु व्यवसाय, आचार, आहार, उपास्यदेव, देशभेद, पंथ यांच्या आधाराने आणखीही कित्येक जाति-उपजाती निर्माण झाल्या. 

 

जातिजातींत उच्चनीच भावना पूर्वीपासून होतीच आता व्यवसायानुरूप जातींचा उद्भव झाल्यावर काही व्यवसाय अशुद्ध व हीन ठरविण्यातआले. त्यातून हिंदू समाजात अतिशय घातक अशी अस्पृश्यता जन्माला आली. अस्पृश्यतेचा उगम कोठे झाला, तिचा स्रोत काय, या विषयांवर निरनिराळ्या पंडितांनी विविध मते व्यक्त केली आहेत. अनेक उपपत्त्या सांगण्यात येतात पण त्यांपैकी एकही तर्कशुद्ध नाही. ते कसेही असले, तरी अस्पृश्यतेच्या प्रथेमुळे समाजातील फार मोठ्या विभागाला अतिशय अपमानित जीवन जगावे लागले व त्यामुळे समाज दुर्बल झाला, हेस्पष्टच आहे. 

 

(आ) ⇨ कर्मवाद व ⇨ पुनर्जन्म ह्या हिंदूंच्या दोन समजुतीआहेत. हिंदू धर्मातील सर्व पंथ या समजुती मानतात. प्राणी या जन्मातज्या नीतीला धरून किंवा नीतीचे उल्लंघन करून कामे करतो, त्याकर्मांची फळे याच जन्मात भोगून संपली तर ठीकच आहे नाहीतर तीफळे त्याला पुढच्या जन्मात भोगावी लागतात, असा हा कर्मसिद्धान्त आहे. प्राण्याचा पुढचा जन्म म्हणजे प्राण्याच्या आत्म्याचे मरणानंतर सध्याच्या शरीरातून नवीन शरीरात जाणे होय. या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तहोणे यालाच मोक्ष म्हणतात. मोक्ष मिळविण्याची युक्ती म्हणजे कर्म अशा कुशलतेने करावयाचे की, कर्माचे फळ आपल्या हिशेबी राहणार नाही. ⇨ कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग हे अशा प्रकारची कुशलता मनुष्याला मिळवून देतात. [→ भक्तिमार्ग मोक्ष ज्ञानमार्ग]. 


 

(इ) मनुष्याने आपले आयुष्य ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य, वानप्रस्थ व संन्यास अशा चार आश्रमांतून किंवा टप्प्यांतून घालवावयाचे असते, अशी कल्पना आहे. ब्रह्मचर्यात मनुष्याने गृहस्थधर्म पाळण्यासाठीचे व्यावहारिक व नैतिक सामर्थ्य मिळवावे गार्हस्थ्यात आपली कौटुंबिक व सामाजिक कर्तव्ये पार पाडावीत वानप्रस्थाश्रमात मनुष्याने गृहस्थाश्रमातून निवृत्ती घ्यावी व समाजाबाहेर जाऊन तपाचरण करावे शेवटी ऐहिक उला-ढालींपासून वेगळे राहून भक्तीच्या व लोकसंग्रहाच्या मार्गात राहावे, अशी ही योजना होती. [→ आश्रमव्यवस्था]. 

 

(ई) हिंदू व्यक्तीचा आचारधर्म, तिची दैनंदिन कर्तव्ये व नैमित्तिक कर्तव्ये, तिचे समाजातील आचरण निरनिराळ्या जातींचे समाजातील स्थान, अधिकार व कर्तव्ये व्यक्तिगत व सामाजिक नीती आणि या नीतीचे उल्लंघन केल्यास भोगावयाची शिक्षा, थोडक्यात लोकस्थितीचे नियमन करणारे ग्रंथ आपण ज्या कालखंडाचा विचार करीत आहोत, त्या काळात निर्माण झाले त्यांना स्मृतिग्रंथ असे म्हणतात. त्यांतील मनुस्मृती व याज्ञवल्क्यस्मृती या प्रसिद्ध आहेत. अर्थात या स्मृतींनी आचरणाचे नियम बनवले असे म्हणण्यापेक्षा जे नियम प्रचलित होते, ते व्यवस्थित सूत्ररूपाने एकत्रित करून मांडले, असे म्हटले पाहिजे. देशाच्या सर्व भागांत एकाच स्मृतीने घालून दिलेल्या नियमांनी निवाडे होत, असे नाही. निरनिराळ्या प्रदेशांत परंपरेने ज्या स्मृतीला मान्यता दिलीहोती, त्या स्मृतीचा अंमल चाले. [→ स्मृतिग्रंथ व स्मृतिकार]. रूढ हिंदू धर्म स्मृतींत व पुराणांतच पुष्कळ अंशाने आहे. वेदांत त्याचे काही अल्पांश आहेत. उपनिषदांत ब्रह्मज्ञान आहे. सांख्यशास्त्रात सत्त्व, रजस् आणि तमस् यांच्या कल्पना आहेत व योगदृष्टी, त्रिकालज्ञता, समाधी, सिद्धी, चमत्कार इ. कल्पनांची पोषक विचारसरणी पतंजलीच्या योगशास्त्रात आहे. वेद, उपनिषदे, स्मृती, भारत, ब्रह्मसूत्रे, पूर्वमीमांसा, सांख्यशास्त्र, योगशास्त्र व पुराणे हे प्रचलित हिंदू धर्माचे प्रमाणग्रंथ होत. 

 

(८) अकराव्या शतकापासून हिंदू समाजाचा संपर्क इस्लाम धर्माशी आला आणि पुढे सोळाव्या शतकापासून तो ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांशी प्रकर्षाने आला. खरे तर या दोन धर्मांशी हिंदूंची ओळख व्यापाराच्या व इतर निमित्तांनी पूर्वीच झाली होती परंतु निराळी उपास्यदेवता व उपासना-विधी मानणारे हे पंथ आहेत, एवढ्यावरच ती ओळख राहिली असावी. त्यानंतर ज्यू व पारशी या जमाती भारतात आल्या.त्याअगदीच अल्पसंख्यअसून आश्रयार्थी असल्याने त्यांनी हिंदूंबरोबरचे शांततामय सहजीवन स्वीकारले होते. अकराव्या शतकापासून इस्लाम धर्माच्या अनुयायांची ( मुसलमानांची) आक्रमणे सुरू झाली व त्यांनी हिंदूंच्या मूर्ती व देवळे यांचा विध्वंस मांडला, तेव्हा हिंदूंना आपल्या पंथोपपंथांच्या पलीकडेजाऊन स्वतःची ‘हिंदू’ म्हणून ओळख पटवून घेण्याची जरूरी भासू लागली. यासाठी आपले तत्त्वज्ञान व दैवतविचार यांत फेरफार करण्याची जरूर नाही पण आपली समाजव्यवस्था बदलली पाहिजे पंथ कायम ठेवूनही आपण मुसलमान, ख्रिस्ती यांच्यापेक्षा निराळे व परस्परांना अधिक जवळचे आहोत, ही भावना बळावली पाहिजे असा विचार पुढे आला.या विचाराला इस्लाम व ख्रिस्ती धर्मीयांनीही आपल्या वागणुकीने हात-भारच लावला कारण मूर्तिपूजेला विरोध व एकेश्वरी आणि ग्रंथनिष्ठसंप्रदाय या दोन गोष्टी या दोन्ही धर्मांत सामाईक होत्या व त्याच कारणा-स्तव ते हिंदूंतील सर्वच पंथांचा तिटकारा करीत असत तथापि संसार-विरक्ती, ईश्वरशरणता व अनन्यभक्ती हेच धर्मरहस्य शिल्लक राहिले. बाराव्या शतकापासून हिंदू राज्यांचा अंत होऊ लागल्यावर मायावाद, भक्तिवाद व जातिभेदात्मक आचरण हाच खरा हिंदू धर्म बनला. तो मुसलमान व इंग्रज यांच्या राजवटीतून अव्याहत राहिला आहे. 

 

मुसलमान व ख्रिस्ती यांच्यातील आक्रमकता ओसरल्यावर समन्वित संमिश्रणाने त्यांचा हिंदूंमध्ये समावेश होणे किंवा ज्यू व पारशांसोबत जे सहजीवन अस्तित्वात आले, तसे सहजीवन निर्माण होणे असे दोन पर्याय हिंदूंच्या बाजूने होते. त्यांपैकी पहिला पर्याय अनेक कारणांनी अशक्य होता व आता स्वतंत्र भारतात शांततामय सहजीवन सुरू असल्याचे आपण पाहत आहोत. अर्थात, आपला मुख्य विषय इथे असा आहे की, या दोन धर्मांच्या संपर्कामुळे हिंदू धर्मात व हिंदू समाजात काय परिवर्तन झाले. 

 

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदुस्थानात समाजसुधारकांची नवी धार्मिक चळवळ सुरू झाली. त्यात माणसाच्या सामाजिक जबाब-दारीचे तत्त्व जाणले गेले होते. त्याचबरोबर ही क्रांतिकारक जबाबदारीची जाणीव सफल होण्यास आध्यात्मिक शक्तीची आवश्यकता आहे, याही गोष्टीचा प्रत्यय त्या चळवळीच्या धुरीणांस पूर्ण आला होता. त्यामुळे हिंदू विचारवंतांवर पहिला परिणाम हा झाला की, मूळच्या वैदिक चिंतनात अमूर्त व सर्वव्यापी परमेश्वराची किंवा परब्रह्माची जी कल्पना केली होती, तिच्याकडे परत जावे हा विचार त्यांना आकर्षक वाटू लागला. तसेच अशा परमात्म्याची उपासना करण्यासाठी पुरोहितवर्गाची व कर्मकांडाची गरज नाही. प्रार्थना, सामूहिक चिंतन यांच्याद्वारे आपण अशा परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो, हाही विचार पुढे आला. यातूनच ⇨ ब्राह्मो समाज, ⇨ प्रार्थनासमाज अशा पंथांची निर्मिती झाली. आपल्या वैदिक मूल-तत्त्वांकडे परतले पाहिजे, याचा जोरदार आग्रह ⇨ आर्यसमाजा ने धरला. 

 

ब्राह्मो समाज आणि आर्यसमाज यांनी मांडलेल्या विचारांपेक्षा निराळी भूमिका ⇨ स्वामी विवेकानंदां नी मांडली व हिंदू धर्माची त्या भूमिकेवर आधारलेली पुनर्घटना करण्याचा प्रयत्न स्वामी विवेकानंदांच्या रामकृष्ण मिशन या संस्थेने केला. विवेकानंदांनी वेदान्त तत्त्वज्ञान, म्हणजेच अद्वैत, हा हिंदू तत्त्वज्ञानाचा गाभा आहे असे प्रतिपादन केले. ‘आत्मा हाच ब्रह्म आहे’, याची मनोमन जाणीव होणे हे प्रत्येक व्यक्तीचे ध्येय असले पाहिजे. ज्ञान, योग, कर्म, भक्ती हे सर्व मार्ग आत्मा व ब्रह्म यांच्या ऐक्याच्या साक्षात्काराकडे नेणारेच आहेत. द्वैत, विशिष्टाद्वैत व अद्वैत हे ब्रह्म व आत्मा त्यांच्यातील ऐक्यांच्या जाणिवेकडे वाटचाल करताना लागणारे टप्पे आहेत. त्यामुळे त्यांचा विरोध मानणे व त्याविषयी वाद घालणे हे निष्फळ आहे. ‘ब्रह्म व आत्मा यांचे ऐक्य’ हे खरे तर वैश्विक तत्त्वज्ञान आहे. ते काही हिंदूंपुरते मर्यादित नाही. कोणत्याही धर्मातील व्यक्तीला आपले वाटावे असेच हे तत्त्वज्ञान आहे. हे तत्त्वज्ञान कोणा एका धर्मगुरूने, प्रेषिताने किंवा महात्म्याने निर्माण केलेले आणि उपदेशिलेले तत्त्वज्ञान नाही. निरनिराळ्या विचारवंतांनी वारंवार विचार करून परिपुष्ट केलेली ही वैचारिक परंपरा आहे. ती कोणा एकाव्यक्तीच्या नावावर मोडत नाही. त्यामुळेच या अद्वैताचे उपासक कोणाही ज्ञात्या पुरुषाला किंवा तत्त्वविवेचकाला गुरू मानून त्याच्या शिकवणुकी-नुसार या तत्त्वज्ञानाला अपेक्षित असणारा साक्षात्कार मिळवू शकतात. हिंदू धर्मात अनेक पंथोपपंथ आहेत, दैवतेही आहेत. त्यांचे उपासनेचे अनेक प्रकार आहेत परंतु त्या पंथांत वैर आहे किंवा विरोध आहे, असे मानण्याचे कारण नाही. कारण ते सर्व पंथ एकाच परब्रह्माकडे पोहोचण्याचे मार्ग आहेत. सारांश, हिंदूंतील नानाविध देवता व त्यांच्या उपासनांचा बडिवारही जिच्याविषयी संकोच बाळगावा अशी गोष्ट नाही उलट, त्यामुळे हिंदूधर्म हा केवढा उदार व समावेशक धर्म आहे, याचे प्रत्यंतर या विविधतेतून मिळत असते. 


 

वेदान्ताने घालून दिलेल्या तत्त्वज्ञानामुळे नीतीला भक्कम पाया मिळतो. उदा., ‘स्वतःवर करतो तितकेच प्रेम शेजाऱ्यावर करा’, ह्या उपदेशाला तार्किक पाठिंबा अद्वैताच्या सिद्धान्ताने मिळतो. माझा शेजारी व मी यांचा आत्मा एकच असेल, तर आमच्यात फरक असा नाहीच. मी शेजाऱ्याशी दुष्टावा करीन तर मी मलाच इजा पोहोचवत आहे, असा त्याचा अर्थ होईल आणि हे केवळ शेजाऱ्यापुरतेच खरे नाही. सर्व प्राणिमात्र व वनस्पती यांच्यावरही मी दया दाखविली पाहिजे. ‘जो सहिष्णू, शांत, शुद्ध, निश्चल आणि चिंतनमग्न असतो’, तोच आदर्श पुरुष होय, असे विवेकानंद सांगतात. या तत्त्वज्ञानाचे आणखी दोन विशेष असे की, मनुष्याचा आत्मा हा परब्रह्माचा अंश आहे असे सांगून वेदान्ताने मनुष्याला फार मोठादिलासा व उमेद दिली आहे. मनुष्य कितीही पापी, दीनदुबळा असू द्या त्याच्या आत्म्यामुळे तो पवित्र आणि प्रतिष्ठाप्राप्त राहतोच. दुसरा विशेष म्हणजे या तत्त्वज्ञानामुळे मनुष्याला आत्मिकबळाचा प्रत्यय मिळतो. आत्मा व परब्रह्म यांच्या ऐक्याची जाणीव येरागबाळ्याला होत नसते. ती जाणीव किंवा साक्षात्कार होतो, तेव्हा मनुष्य पुरा हादरून जातो. खुद्द विवेकानंदांनी हा अनुभव घेतला होता. ‘नायमात्मा बलहीनेन लभ्यः।’ हे विवेकानंदांचे आवडते वचन होते. शारीरिक, मानसिक बळाची उपासना हीदेखील आध्यात्मिक उन्नतीला आवश्यक असते, हे स्वामी विवेकानंद वारंवार सांगत. 


ह्या तत्त्वज्ञानाचा घट्ट आधार घेऊन रामकृष्ण मिशनने आपल्या कार्याची आखणी केली. जातिभेद, अस्पृश्यता, पंथभेद या साऱ्यांना मिशनने गौण आणि त्यापुढे जाऊन त्याज्य ठरविले. शिक्षणसंस्था काढून नव्या पिढीला नैतिक, आध्यात्मिक व शारीरिक दृष्ट्या सामर्थ्यशाली बनविण्याचे व्रत स्वीकारले. हिंदू समाज सामर्थ्यशाली झाला की, तो पाश्चात्त्यांच्या सांस्कृतिक व धार्मिक आक्रमणाला धडाडीने तोंड देईल व स्वतःची मान ताठ ठेवून प्रगतीकडे जाईल. 

 

दुसरा परिणाम म्हणजे हिंदू समाजाचे जे जातिजातींत विभाजन झाले होते व दुष्ट अशा अस्पृश्यतेचा जो कलंक समाजाला चिकटला होता, त्याच्या विरुद्ध लोकमत जोर धरू लागले. इंग्रजी राजवटीमुळे शिक्षण अगदी तळागाळातील जातींपर्यंत थोड्याफार प्रमाणात झिरपत गेले. आधुनिकहिंदू तत्त्ववेत्ते विशेषतः राजा राममोहन रॉय, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, सर्वपल्ली राधाकृष्णन्, विनोबा भावे प्रभृतींनी सर्वधर्मसमन्वयाचा सिद्धान्त भगवद्गीतेचीच तात्त्विक भूमिका घेऊन विस्ताराने प्रतिपादिला आहे. त्यांनी समानतेचा सिद्धान्त मांडला. त्यामुळे अस्पृश्य जातींकडूनही अस्पृश्यतेच्या विरोधात मोठ्या चळवळी उभ्या राहिल्या. विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वा-खाली तसेच दक्षिणेतील जस्टिस पार्टीने जातीयता व अस्पृश्यता यांनाप्रखर विरोध केला. स्पृश्य हिंदूंतील सुशिक्षितांनीही ही मागणी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली उचलून धरली. भारतीय घटनेने १९५० मध्ये अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा ठरविला. अस्पृश्यता दैनंदिन व्यवहारातून नाहीशी झाली, त्याप्रमाणे लौकिक व्यवहारात जातींचा अडथळाही विरत चालला आहे तथापि विचारातून जातीयता व अस्पृश्यता निसटली गेली आहे, असे म्हणता येत नाही. 

 

गेल्या सुमारे साडेतीन हजार वर्षांत, सिंधू घाटीतील आर्य या जमातीने निर्मिलेल्या वैदिक वाङ्मयापासून जे चिंतन सुरू झाले, त्याला अनेक धुमारे व पारंब्या फुटल्या. दैवत कल्पना, उपासनापद्धती, समाजव्यवस्था अशा सर्वांगांना या चिंतनाने वेढून टाकले. समन्वित संमिश्रण, सहिष्णुता, सह-जीवन, दैवतकथा व दंतकथा अशा विविध साधनांचा उपयोग करूनहा धर्म विस्तारला. आपत्तींना तोंड देत टिकून राहिला व त्याने एकसंपन्न संस्कृती निर्माण केली. नवनवीन विचारांना त्याने अनुकूल वळणदेऊन आपल्या समाजात शिरलेले अस्पृश्यतेसारखे दोष काढून टाकले. जागतिकीकरणाच्या नव्या युगाला हा धर्म कसा सामोरा जातो, हे आता पहावयाचे आहे. 

 

पहा : आश्रमव्यवस्था तंत्रमार्ग व तांत्रिक धर्म तीर्थक्षेत्र व तीर्थयात्रा धर्म भारत (धर्म) भारतीय तत्त्वज्ञान यज्ञसंस्था वर्णव्यवस्था वेद व वेदांगे.

 

संदर्भ : 1. Brockington, J. L. The Sacred Thread Hindusim in its Continuity and Diversity, New York, 1981.

           २. जोशी, लक्ष्मणशास्त्री, वैदिक संस्कृतीचा विकास (तिसरी आवृ.) वाई, १९९८.

           ३. जोशी, लक्ष्मणशास्त्री, हिंदु धर्माची समीक्षा आणि सर्वधर्मसमीक्षा (चौथी आवृ.) वाई, २००५

           ४. स्वामी विवेकानंद, अनु. स्वामी शिवतत्त्वानंद हिंदू धर्माचे पुनरुत्थान, नागपूर, २०००

भावे, श्री. मा.