व्हिन्डाउस, आडोल्फ (ओटो राइनहोल्ट) : (२५ डिसेंबर १८७६ – ९ जून १९५९). जर्मन कार्बनी रसायनशास्त्रज्ञ. जन्म बर्लिन येथे. स्टेरॉलांची संरचना आणि त्यांचा निसर्गात आढळणाऱ्या इतर द्रव्यांशी (जीवनसत्त्वांशी) असलेला संबंध यांविषयी विशेष संशोधन कार्य [→ स्टेरॉले व स्टेरॉइडे]. ⇨ कोलेस्टेरॉलावरील त्यांच्या संशोधनामुळे हे क्षेत्र कार्बनी रसायनशास्त्र व जीवरसायनशास्त्र यांची प्रमुख शाखा बनले. जीववैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या ड जीवनसत्त्वाच्या संशोधन काऱ्याबद्दल त्यांना १९२८ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. शरीरक्रियात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असलेले संयुग हिस्टामीन त्यांनीच शोधले. त्यामुळे हिस्टामिनाचे व्यापारी उत्पादन करणे शक्य झाले. त्यांनी यीस्टपासून जीवनसत्त्व ब शुद्ध रूपात वेगळे काढले. ⇨ डिजिटॅलिस पुर्पुरिया या वनस्पतीवरील त्यांच्या संशोधनामुळे ह्रदयविकारांवरील विविध औषधांच्या निर्मितीत प्रगती झाली.

  व्हिन्डाउस यांना १८९७ मध्ये बर्लिन विद्यापीठाची पदवी मिळाली. फ्रायबर्ग विद्यापीठातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक किलिआनी यांनी सुचविल्यावरून व्हिन्डाउस यांनी डिजिटॅलिस पुर्पुरियामधील ग्लायकोसाइडांवर प्रबंध लिहून पीएच. डी. पदवी मिळविली (१८९९). फ्रायबर्ग, इन्सब्रुक आणि गटिंगेन या ठिकाणी त्यांनी अध्यापन केले.

इ. स. १९०८ मध्ये व्हिन्डाउस यांना आढळून आले की, कोलेस्टेरॉलाचे डिज़िटोनिनाबरोबर अविद्राव्य संयुग तयार होते. ⇨ सॅपोनिनापैकी डिजिटोनीन हे एक संयुग आहे. यावरून सॅपोनिनांमुळे होणाऱ्या रक्तविलयनक्षमतेविरुद्ध (हीमोग्लोबिन मुक्त झाल्याने रक्तातील तांबड्या कोशिकांचा विनाश होण्याच्या क्षमतेविरुद्ध) कोलेस्टेरॉल कार्य करते हे स्पष्ट झाले. त्यांनी सॅपोनिनांच्या संरचनेवर संशोधन केले. १९१९मध्ये त्यांनी कोलेस्टेरॉलापासून कोलॅनिक अम्ल तयार केले. त्यांनी स्टराइने आणि पित्ताम्ले यांच्यामध्ये रासायनिक संबंध असल्याचे दाखविले. त्यांनी १९३२ मध्ये स्टेरॉल वलयाची अचूक संरचना निश्चित केली.

सुरुवातीच्या कोलेस्टेरॉल नमुन्यातील अल्पशी अशुद्धी असलेले कवक स्टेरॉल म्हणजे अरगोस्टेरॉल असल्याचे व्हिन्डाउस यांनी ओळखले. जंबुपार प्रारणाने (तरंगरूपी ऊर्जेने) कोलेस्टेरॉलचे ड जीवनसत्त्वात रूपांतर होते की नाही हे शोधून काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यातून १९३२ मध्ये व्हिन्डाउस व त्यांच्या सहकार्यांतनी ७–डीहायड्रोकोलेस्टेरॉल तयार केले आणि ते प्रो-व्हिटॅमीन (जीवनसत्त्वपूर्व पदार्थ) असल्याचे दाखविले. पुढे स्टेरॉलाच्या सांरचनिक वैशिष्ट्यांचेही व्हिन्डाउस यांनी संशोधन केले. त्यांनी प्रकाशरासायनिक [→ प्रकाश रसायनशास्त्र] विक्रियांमध्ये तयार होणारी लुमिस्टेरॉल, टॅकिस्टेरॉल आणि सुप्रास्टेरॉल ही संयुगे ओळखली.

स्टेरॉल वलयाची संरचना निश्चित झाल्यानंतर (१९३२) जटिल अल्कोहॉलांच्या म्हणजे स्टेरॉलांच्या संरचना ठरविणे शक्य झाले. व्हिन्डाउस यांनी अधिवृक्क बाह्यक हॉर्मोने, सॅपोनिने, ग्लायकोसाइडे आणि काही भेकांच्या (उभयचर प्राण्यांच्या) त्वचेवर आढळून येणारी विषारी द्रव्ये एका गटातील असल्याचे सिद्ध केले. त्यांनी या गटास ‘स्टेरॉइड’ असे नाव दिले.

व्हिन्डाउस यांनी ⇨ हिस्टिडीन हे ॲमिनो अम्ल इमिडॅझोलाचे अनुजात असल्याचे दाखविले व याच पद्धतीने ⇨ हिस्टामीन संयुगाचा शोध लावला.

नोबेल पारितोषिकाखेरीज व्हिन्डाउस यांना बायर, पाश्चर, गेट इ. पदके मिळाली. त्यांनी Justus Liebigs Annalen der Chemie या नियतकालिकाच्या संपादकीय मंडळावरही काम केले.

व्हिन्डाउस गटिंगेन येथे मरण पावले.                        

सूर्यवंशी, वि. ल.