ग्राक, ज्युलियां : (२७ जुलै १९१o —      ). अतिवास्तववादी फ्रेंच कादंबरीकार व कवी. मूळ नाव लुई प्वार्ये. जन्म सँ. फ्लॉरां ल व्ह्ये येथे इतिहासाचा पदवीधर होऊन शिक्षक झाला. दुसऱ्या महायुद्धात जर्मनांच्या हाती सापडून १९४o-४१ च्या दरम्यान त्यांच्या कैदेत होता. ओ शातो दार्गोल (१९३८) ही त्याची पहिली कादंबरी. सूचक व वेधक अशी शैली वापरून त्याने ह्या कादंबरीत एका भयंकर स्वप्नाचे वातावरण निर्माण केले आहे. त्याच्या इतर कादंबऱ्या अशा : अं बो तेनेब्र (१९४५), ल् रिव्हाज दे सीर्त (१९५१), अं  बाल्काँ  आं  फॉरॅ (१९५८), लेत्रीन (१९६७). ह्यांखेरीज लिबॅर्‌ते ग्रांद (१९४६) हे गद्यकाव्य, ल् र्‌वा पॅशर (१९४८) हे नाटक, आंद्रे ब्रताँवरील समीक्षणात्मक प्रबंध (१९४७), प्रेफेरांस (१९६१) हा टीकालेखसंग्रह असे लेखन त्याने केले आहे.

ग्राकचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने आपल्या कादंबरीलेखनात संगीत व चित्रकला ह्यांचे तंत्र वापरले. त्याचप्रमाणे आपली कलासृष्टी व वाचक ह्यांच्यामध्ये बुद्ध्याच अंतर राखण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे वाचकाला अतिशय जागृत राहून शोधकाची भूमिका घ्यावी लागते.

ल् रिव्हाज दे सीर्त  ह्या कादंबरीला मिळालेले गाँकूर पारितोषिक ग्राकने स्वीकारले नाही.

टोणगावकर, विजया