ल्यॉने, प्येअर : (२२ जुलै १७०७-१० ऑक्टोबर १७८९). डच निसर्गवैज्ञानिक. कीटकांचे कौशल्यपूर्ण विच्छेदन करणे व त्याच्या शरीररचनेची उत्तम चित्रे काढणे यांबद्दल प्रसिद्ध. त्यांचा जन्म मास्ट्रिख्ट (नेदर्लड्स) येथे झाला. १७२४ मध्ये लायडन विद्यापीठात प्रवेश घेऊन त्यांनी धर्मशास्त्र, गणित, न्यूटनीय भौतिकी, सैनिकी वास्तुशिल्प व शारीर (शरीररचनाशास्त्र) या विषयांचा दोन वर्षे अभ्यास केला. १७३० मध्ये पुन्हा तेथेच प्रवेश घेऊन व De justoqu aestionis usu हा प्रबंध लिहून ते कायद्याचे पदवीधर झाले. त्याच वर्षापासून द हेग येथे ते यशस्वीपणे वकिली करू लागले. इतर बहुतेक सर्व वेळ ते कीटकांचा अभ्यास करीत. भाषांतरकार व सांकेतिक लिपिकार म्हणूनही त्यांनी काम केले. प्लुच यांचा नॅचरल हिस्टरी हा ग्रंथ वाचून ल्यॉने कीटकांचे अध्ययन करू लागले. रेओम्यूर यांच्या Memoires (१७३४)  या ग्रंथाचाही ल्यॉने यांच्यावर परिणाम झाला. ओम्यूर यांच्याकडून ल्यॉने यांनी कार्यपद्धती व अतीव कोटेकोरपणा या दोन्ही गोष्टीचे महत्त्व शिकून घेतले.

इ. स. १७३६ मध्ये ल्यॉने यांनी कीटकांच्या पद्धतशीर निरीक्षणांस, १७३८ मध्ये एफ. सी. लेझर यांच्या Insectotheologia ग्रंथाच्या अनुवादास आणि १७४५ मध्ये Traite anatomique  de la Chenile qui ronge le bois de saule च्या लेखनास सुरुवात केली. द हेगच्या जवळच्या परिसरातील सर्व कीटकांवर विवेचक ग्रंथ लिहिण्याची ल्यॉने यांची यामागील मूळ कल्पना होती. सामान्य बोकड पतंगाच्या अळीचा (कॉसस लिग्निपर्डा) तसेच तिच्या क्रायसॅलिस व इमॅगो या अवस्थांच्या शारीराची त्यांनी निरीक्षणे केली. याच्या पुढील खंडांत कीटकांच्या रूपातंरणाची रेखाटने करण्याचा त्यांचा मानस होता  परंतु अधू दृष्टीमुळे ते त्यांना जमले नाही.  Traite anatomique हा पूर्ण ग्रंथ वरील अळीच्या शारीरावर असून त्यातील ल्यॉने यांची चित्रपत्रे, रेखाचित्रे व तांब्यावरील उत्कीर्णित काम यांमध्ये स्नायू, मज्जातंतू, श्वासनलिका, हृदय, अंत्यस्त्ये, रेशीम पात्र (तनित्र) व डोक्याच्या आतील अवयव ही सर्व अत्यंत काटेकोरपणे काढली आहेत. या चित्रांमुळे व आभासी बारकावे दाखवून ल्यॉने सत्य लपवीत आहेत, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये (१७७३) त्यांनी आपल्या चित्रे काढण्याच्या हत्यारांची चित्रे काढून व आपल्या पद्धतीचे वर्णन करून वरील आरोपाला प्रत्युत्तर दिले. त्यांचा हा व्याप्तिलेख कीटकांच्या शरीरचनेवरील एक उत्कृष्ट ग्रंथ आहे.

आयुष्याच्या अखेरीस त्यांनी द हेगच्या आसपासच्या कीटकांवरील माहिती जमविली. १७८७ मध्ये त्यांचे यावरील हस्तलिखित तयार होते पण ते १८३२ मध्ये Recherches या शीर्षकाखली डब्ल्यू. दे हान यांनी प्रसिद्ध केले. ल्यॉने द हेग येथे मरण पावले.

जमदाडे, ज. वि.