पॅरासेल्सस, फिलिपस ऑरीओलस : (१० – १४ नोव्हेंबर १४९३–२४ सप्टेंबर १५४१). स्विस वैद्य आणि किमयागार [⟶किमया]. कायचिकित्सक, शस्त्रक्रियाविशारद आणि रसायनतज्ञ असल्यामुळे औषधिविज्ञानविषयक रसायनशास्त्राच्या प्रगतीत नवी औषधे शोधून व वापरून त्यांनी मोलाची भर घातली. त्यांचे मूळ नाव टेओफ्रास्टुस बोम्बास्टुस फोन होयेनहाइम असे होते परंतु पहिल्या शतकात होऊन गेलेल्या ‘सेल्सस’ नावाच्या रोमन वैद्यांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत हे दर्शविणारे ‘पॅरासेल्सस’ हे नाव त्यांनी १५१६ पासून वापरावयास सुरुवात केली असावी. ‘बॉम्बॅस्टिक’(bombastic) हे इंग्रजी भाषेतील ‘पोकळ भपक्याचे’ अशा अर्थाचे विशेषण त्यांच्याच नावापासून बनले आहे.

त्यांचा जन्म हल्ली स्वित्झर्लंडमध्ये असलेल्या आयंझीडेल्न नावाच्या गावाजवळ झाला. त्यांचे वडील एक गरीब वैद्य व रसायनज्ञ होते. टेओफ्रास्टुस लहान असतानाच ते दक्षिण आॅस्ट्रेलियातील फिलाख या गावी राहावयास गेले. तेथे एका शाळेत ते रसायनशास्त्र शिकवीत व तेथेच टेओफ्रास्टुस यांच्या शिक्षणास सुरुवात झाली. या शाळेत तरुणांना खाणकामविषयक शिक्षण दिले जात असे. तेथेच त्यांचा सोने, पारा, तुरटी, मोरचूद वगैरे खनिजांशी संबंध आला. रसायनशास्त्र आणि धातुविज्ञान यांचे जवळून निरीक्षण करता आल्यामुळेच त्यांनी भावी आयुष्यात रसायनचिकित्सात्मक असामान्य शोध लावले.  

वयाच्या चौदाव्या वर्षापासून तत्कालीन पद्धतीप्रमाणे चांगल्या शिक्षणाच्या शोधार्थ ते यूरोपभर हिंडले. यूरोपातील निरनिराळ्या विद्यापीठांतून पुढील पाच वर्षे त्यांनी ज्ञानार्जनाकरिता भ्रमंती केली परंतु त्यांचे समाधान एकाही ठिकाणी झाले नाही. त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षी (१५१० मध्ये) व्हिएन्ना विद्यापीठाची वैद्यकीय पदवी मिळविली असावी. पुढे त्यांनी फेरारा विद्यापीठात शिक्षण घेतले व १५१६ च्या सुमारास तेथील वैद्यकाची पदवी मिळविली. या विद्यापीठात गेलेन, ॲरिस्टॉटल इ. ग्रीक वैद्यांवर तसेच अरबी वैद्यकीय शास्त्रज्ञांवर उघड उघड टीका करण्यात येई. त्यामुळे पॅरासेल्ससही स्वतःचे विचार मोकळेपणाने मांडू लागले असावेत. वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर काही वर्षे ते सर्व यूरोपभर हिंडले. वयाच्या तेहतिसाव्या वर्षी त्यांची बाझेल विद्यापीठात वैद्यकाचे अधिव्याख्याते म्हणून नेमणूक झाली. त्या वेळी ‘ग्रेट पॅरासेल्सस’ म्हणून त्यांची सर्वदूर ख्याती पसरली होती. त्यामुळे सबंध यूरोपातून विद्यार्थी त्या विद्यापीठाकडे आकर्षित झाले होते. त्यांची व्याख्याने फक्त विद्यार्थ्यांकरिताच नसून आम जनतेकरिताही खुली असत. एक दिवस सर्व विद्यार्थ्यांसमोर त्यांनी अव्हिसेना [⟶ इब्न सीना] या प्रसिद्ध अरबी वैद्यांचे व गेलेन यांचे ग्रंथ जाळले होते. बहुतेक सर्वत्र लॅटिन भाषेतूनच वैद्यकाचे शिक्षण दिले जात असताना त्यांनी जर्मन भाषेतून शिकविण्यास सुरुवात केली होती. कारण त्यांना जनतेची भाषा प्रिय होती. त्यांची कीर्ती सर्वदूर पसरल्याने त्यांच्या व्याख्यानांना अतोनात गर्दी होत असे.

त्यांचे हे यश फार काळ टिकले नाही कारण त्यांना अनेक शत्रू उत्पन्न झाले. एवढेच नव्हे तर त्यांना तेथून जीव घेऊन पळून जावे लागले. त्यानंतरची आठ वर्षे त्यांनी मित्रांच्या आश्रयाने काढली. याच काळात मिळालेल्या फुरसतीचा फायदा घेऊन त्यांनी ग्रेट सर्जरी बुक हाग्रंथ लिहिला. १५३६ मध्ये हा ग्रंथ प्रसिद्ध होताच त्यांची ख्याती सर्वत्र पसरून ते पुन्हा कीर्तिशिखरावर आरूढ झाले. या ग्रंथाद्वारे त्यांनी वैद्यकशास्त्राच्या प्रगतीत मोलाची भर घातली आहे.  

१५३०च्या सुमारास पाऱ्याची संयुगे तोंडाने दिल्यास ⇨उपदंश (गरमी) हा रोग बरा होतो हे दाखवून १९०९ च्या सुमारास शोधून काढण्यात आलेल्या या रोगावरील ‘साल्व्हरसान’ (मूळ औषध आर् स्फिनामाइन) या नव्या गुणकारी औषधाची पूर्वसूचनाच त्यांनी दिली होती. खाणकामगारांना होणारी ‘सिकतामयता’ (सलिकॉसीस) ही विकृती पापाचे फळ नसून धातुमय फवारे अंतःश्वसनातून गेल्यामुळे होते, हे त्यांनी सांगितले. ‘माणसाच्या आजारास जे पदार्थ कारणीभूत होतात तेच त्याला बराही करतात’ हे आधुनिक होमिओपॅथीतील तत्त्व त्यांनी मांडले होते. ⇨गलगंड विकृतीचा आणि खनिजांचा विशेषेकरून पिण्याच्या पाण्यातील शिशाचा संबंध दाखवून देणारे ते पहिलेच वैद्य होते. पारा, गंधक, शिसे, लोह, आर्सेनिक, मोरचूद, अफू या पदार्थांचे अंश असलेली नवी औषधे बनवून व वापरून वैद्यक आणि रसायनशास्त्र यांना जवळ आणण्याचे श्रेय त्यांनाच देण्यात येते. पॅरासेल्सस यांनी आधुनिक वैद्यकाच्या प्रगतीस हातभार लावला एवढेच नव्हे, तर मनोदोषचिकित्सेतही मोलाची भर घातली, असे आधुनिक मानसोपचारज्ञ कार्ल युंग यांनी म्हटले आहे.

वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी साल्झबर्ग येथे रहस्यमय परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाला.  

भालेराव, य. त्र्यं.

.