रीड, चार्ल्स : (८ जून १८१४−११ एप्रिल १८८४). इंग्रज कादंबरीकार. इप्सडन, ऑक्सफर्डशर येथे जन्मला. मॉड्‌लिन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्या कॉलेजचा तो पुढे उपाध्यक्षही झाला. रीडने वकिलीची परीक्षा दिली होती परंतु वकिली कधीच केली नाही.

एक यशस्वी नाटककार म्हणून रीडने आपल्या वाङ्‌मयीन कारकीर्दीचा आरंभ केला. चाळीस नाटके त्याने लिहिली. तथापि त्याच्या नाट्यकृतीतील व्यक्तिरेखनात फारशी सफाई दिसून येत नाही. अतिनाट्याकडे (मेलोड्रामा) त्याची प्रवृत्ती असल्याचे प्रत्ययास येते. मास्क्‌स अँड फेसीस हे त्याचे सर्वांत यशस्वी नाटक.

रीडची ख्याती आज आहे, ती मुख्यतः त्याच्या कादंबऱ्यांमुळे. त्या एकूण १४ आहेत. त्यांतून विविध सामाजिक समस्यांकडे पाहण्याचा त्याचा मानवतावादी दृष्टिकोण दिसून येतो. सामाजिक अन्यायावर त्याने प्रखर टीका केली. इट इज नेव्हर टू लेट टू मेंड (१८५६) ह्या कादंबरीत त्याने तुरुंग सुधारण्याचा प्रश्न हाताळला. हार्ड कॅश (१८६३) मध्ये त्याने मनोरुग्णांना दिल्या जाणाऱ्या) वाईट वागणुकीवर प्रकाश टाकला. पुट यूअरसेल्फ इन हिज प्लेसमध्ये कामगार संघटनांच्या दहशतवादी कारवायांवर त्याने टीका केली आहे.

द क्लॉइस्टर अँड द हर्थ ही रीडची सर्वोत्कृष्ट व विशेष गाजलेली कादंबरी. ख्रिस्ती धर्मसुधारणेच्या (रेफॉर्मेशन) पार्श्वभूमीवर लिहिलेल्या ह्या कादंबरीत भ्रमंती करणाऱ्या एका विद्ववानाची कथा सांगितली आहे. यूरोपीय जीवनाचे विशाल दर्शन तीतून घडते. ह्या विद्वानाचा पुत्र म्हणजेच प्रबोधनकालीन डच विद्वान व कॅथलिक धर्मसुधारक इरॅस्मस होय, अशी सूचना कादंबरीच्या अखेरीस देण्यात आली आहे.

आपल्या कादंबऱ्या वास्तववादी व्हाव्यात, त्यांतील तपशील वस्तुस्थितीला धरून असावेत म्हणून रीड खूप काळजी घेत असे. निरीक्षणाबरोबरच तो वर्तमानपत्रादी विविध साधनांच्या साहाय्याने वस्तुस्थितिनिदर्शक संदर्भ आणि सामग्री गोळा करीत असे. त्यासाठी त्याने एक नोंदपुस्तकही ठेवले होते. लंडन येथे तो निधन पावला.

संदर्भ : Burns, W. Charles Reade, New York, 1961.

कळमकर, य. शं.