शारीर, तुलनात्मक : मानवी शरीराची रचना अभ्यासताना या शरीराचे इतर प्राण्यांशी किती साम्य आहे, याचा शोध घेणे उद्‌बोधक ठरते. माणूस हा एक प्राणीच आहे आणि त्याच्या शरीराच्या अनेक वैशिष्ट्यांमुळे तो जरी अद्वितीय वाटत असला, तरी ती सर्व जैविक उत्क्रांतीतून प्राप्त झाली आहेत, हे अशा अभ्यासातून लक्षात येते. तसेच मानव या विचारशील प्रजातीच्या जीवनशैलीसाठी आवश्यक अशी शरीरक्रिया, वैज्ञानिक कार्ये या शरीराकडून कशी होतात हेही समजते. प्राणिशास्त्रीय वर्गीकरणातही उपयोगी पडणाऱ्या या अभ्यासाला तुलनात्मक शारीर म्हणतात. शारीर विषयाच्या या उपशाखेत मिळणारी माहिती वैद्यकाच्या अनेक प्रायोगिक उपशाखांना उपयोगी पडते. उदा., प्रायोगिक शरीरक्रियाविज्ञान, प्रायोगिक औषधिक्रियाविज्ञान, विकृतिविज्ञान, शल्यचिकित्सा यांसारख्या अनेक क्षेत्रांत प्राण्यांवर प्रयोग करताना तुलनात्मक शारीर लक्षात घ्यावे लागते.

ऐतिहासिक आढावा : नैसर्गिक कुतूहलामुळे आसपासच्या विविध प्राण्यांच्या बाह्य स्वरूपाचे निरीक्षण माणूस सुरुवातीपासूनच करीत आला आहे. स्वत:च्या सुरक्षिततेसाठी परिसरातील प्राण्यांच्या वर्तनाचे आणि स्थूलमानाने शरीररचनेचे आकलन करणे वा होणे स्वाभाविकच होते. शिकारी जीवनातील मांसभक्षणाच्या आहार पद्धतीमुळे प्राण्यांची थोडीफार अंतर्गत रचनाही त्याला अवगत होत असे परंतु हेतुपूर्वक निरीक्षण करून त्यातून निष्कर्ष काढण्याची सुरुवात ⇨अरिस्टॉटल (इ.स.पू. ३८४–३२२) या ग्रीक तत्त्ववेत्यांपासून झाली. असे म्हणता येईल. जाती व उपजातींमध्ये (प्रजाती या नावाने आता ओळखल्या जाणाऱ्या) प्राण्यांचे वर्गीकरण करण्याची कल्पनाही त्यांनीच पुढे मांडली. त्यांनी तुलनात्मक निरीक्षणासाठी निवडलेल्या प्राण्यांमध्ये ऑक्टोपस, देवमासा, डॉल्फिन व पॉरपॉइज यांचा समावेश होता. देवमासा हा सस्तन जलचर आहे, ही गोष्ट प्रथम त्यांनीच निदर्शनास आणली. सस्तन प्राण्यांची उत्सर्जन व जनन तंत्रे, नखे, खूर यांचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी केला. तसेच कासव व मासे यांचे खवले, पक्षांची पिसे यांचाही अभ्यास ते करीत असत. ही सर्व बाह्य निरीक्षणे होती.

ग्रीक वैद्य ⇨गेलेन यांनी इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात अनेक प्राण्यांचे काळजीपूर्वक विच्छेदन केले. माकडासह अनेक लहानमोठ्या प्राण्यांची तुलनात्मक वर्णने लिहून त्यांनी या क्षेत्रात घातलेली भर जवळजवळ एक हजार वर्षे अबाधित राहिली. त्या कालखंडात शवविच्छेदनाला बंदी असल्याने गेलेन यांचे वृत्तांत वैद्यकशास्त्राने जसेच्या तसे स्वीकारले व त्यावरच आपले वैद्यकीय सिद्धांत कायम ठेवले. पंधराव्या शतकात लिओनार्दो दा व्हींची या इटालियन चित्रकारांनी प्राणिजगतातील अनेक वर्गांच्या अभ्यासास सुरुवात केली. त्यांचे स्नायू, हाडे आणि हृदय यांची चित्ररूप वर्णने त्यांनी आपल्या मानवी प्रतिमांप्रमाणेच उत्कृष्टपणे निर्माण केली. पक्षी व मानव यांच्या सांगाड्यांवर आधारित वर्णने सोळाव्या शतकात प्येअर बलाँ (१५१७–६४) यांनीही प्रसिद्ध केली. याच काळात ⇨अँड्रिअस व्हेसेलिअस यांनी केलेल्या मानवी शवविच्छेदनामुळे गेलेन यांच्या वर्णनातील अनेक चुका दुरुस्त होऊ शकल्या. ⇨विल्यम हार्वी यांच्या प्राणिविच्छेदनामुळे सोळाव्या शतकाअखेरीपासून तुलनात्मक शारीर-अध्ययन अधिक संपन्न होऊ लागले. निरुपयोगी, कालबाह्य अशा इंद्रियांचे प्राण्यांमधील अस्तित्व हार्वी यांनी निदर्शनास आणले. सतराव्या शतकात एडवर्ड टायसन, जेरार्ड ब्लेस व क्लोद पेरो यांनी या तुलनात्मक अभ्यासात भर घातली. [⟶ प्राणिविच्छेदन शवपरीक्षा].

अठराव्या शतकात अनेक विस्तृत अभ्यासपूर्ण संशोधनपर लेखांतून शरीररचनेमधील समानतेच्या कारणांचा ऊहापोह होऊ लागला. जर्मन कवी गटे यानं सर्व प्राण्यांचा पूर्वज एकच असावा, अशी भूमिका घेतली. सर्व प्राणिमात्र एकमेकांपासून पूणपणे भिन्न असून त्यांच्यात आढळणारे साधर्म्य ही एक दैवी चमत्कृती आहे, अशीही एक मतप्रणाली अस्तित्वात आली. ईश्वराने सर्व प्राणी निर्माण केलेले असून प्रत्येक प्रजाती ही एक विशेष निर्मिती आहे, या पारंपरिक कल्पनेला ही मतप्रणाली पूरक होती. याउलट दुसऱ्या मतानुसार, ‘शरीरांच्या रचनांमध्ये एक प्रकारचे सातत्य आढळते प्राण्यांचा एकमेकांशी निश्चित संबंध असतो वैचित्र्यामध्येही काही साधर्म्य असते’. या साधर्म्याचा शोध जॉन हंटर या ब्रिटिश शास्त्रज्ञांनी सु. ५०० प्राण्यांच्या अभ्यासातून घेतला. त्यांच्या विस्तृत संग्रहालयातील नमुन्यांमुळे तुलनात्मक शारीर या विषयास शास्त्रीय वळण लागून दैववादास मोठा धक्का बसला. तरीपण या विषयाचे जनक मानले गेलेले ⇨बाराँ झॉर्झ क्यूव्ह्ये (१७६९–१८३२) हे फ्रेंच शास्त्रज्ञ मात्र विशेष निर्मिती सिद्धांताचे पुरस्कर्ते व उत्क्रांतिवादाचे विरोधक होते. जीवाश्मांच्या अभ्यासाची व त्यांच्या वर्गीकरणाची क्यूव्ह्ये यांनी सुरुवात केली. नामशेष झालेल्या प्राण्यांचे सांगाडे त्यांनी पुनर्रचना पद्धतीने तयार केले. नैसर्गिक आपत्तींमुळे हे प्राणी नष्ट झाले असावेत, असे त्यांचे मत होते. पृष्ठवंशी प्राण्यांचे त्यांनी अभ्यासलेले जीवाश्म आणि इतर विस्तृत निरीक्षणे पुढे उत्क्रांतिवादाच्या सिद्धांतास आधारभूत ठरले.

एकोणिसाव्या शतकात तुलनात्मक शारीरातील अनेक उदाहरणांचा उपयोग करून ⇨चार्ल्‌स डार्विन यांनी आपला ⇨नैसर्गिक निवड हा सिद्धांत मांडला. त्यानुसार बहुविध गुणधर्मांच्या प्राणिजातींमधून, फक्त परिसराशी जुळवून घेण्याची क्षमता असलेले प्राणीच टिकून राहतात, इतर नष्ट होतात. या प्रक्रियेतून जैव उत्क्रांतीस चालना मिळते, असे डार्विन यांचे प्रतिपादन होते. या विचाराच्या आधारासाठी होत असलेले प्रयोग, जीवाश्मांचे पुरावे आणि उत्क्रांतीबद्दलची साशंकता दूर करण्यासाठी होत असलेली विवेचने यांमधून तुलनात्मक शारीर समृद्ध झाले. जर्मन निसर्गवैज्ञानिक एर्न्स्ट हाइन्रिख हेकेल यांनी जेलिफिश, कॅल्शियमयुक्त स्पंज व रेडिओलॉरिया वर्गीय आदिजीव या सागरी प्राण्यांच्या अभ्यासास चालना दिली. अनेक प्राण्यांच्या वंशवृक्षांची मांडणी केली. तसेच प्रत्येक प्राण्याच्या व्यक्तिगत जीवनवृत्तामध्ये त्याच्या उत्क्रांतिप्रक्रियेची थोडक्यात पुनरावृत्ती आढळते, असेही दाखवून दिले. या पुनरावर्तन सिद्धांतास ⇨कार्ल एर्न्स्ट फोन बेअर या ⇨भ्रूणविज्ञानाचा जनक मानल्या जाणाऱ्या जर्मन शास्त्रज्ञांकडूनही पुष्टी मिळाली. हेकेल व टी. एच. हक्सली यांनी तुलनात्मक भ्रूणविज्ञानाच्या अभ्यासातून तुलनात्मक शारीर अधिक प्रगतिशील केले, असे म्हणता येईल. कार्ल गेगेनबॉबर यांचा कूर्चीय माशांच्या कवटीचा अभ्यास, हाही या काळातील एक महत्त्वाचा अभ्यास ठरला. [⟶  क्रमविकास].

विसाव्या शतकात अवयवांचे कार्य, कार्यानुवर्ती विकसनशीलता, कार्यतंत्राची रचना, कोशिकांतर्गत पिंड, कोशिका-विभेदन, जनुकविज्ञान व भ्रूणविज्ञान या उपक्षेत्रांवर अधिक लक्ष केंद्रित होऊ लागले. त्यातून विविध प्राण्यांच्या परस्परसंबंधांबद्दल निष्कर्ष निघू लागले. मानवी शरीर व वैद्यक यांच्या अभ्यासातील अनेक आधुनिक तंत्रे उपयुक्त ठरू लागली. उदा., क्ष-किरण चित्रण, प्रतिजन-प्रतिपिंड प्रक्रिया, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, प्राणिवर्तनाची नोंद करणारी मानसशास्त्रीय तंत्रे, जैवद्रवातील संप्रेरकांचे (हॉर्मोनांचे) मापन, किरणोत्सर्गी समस्थानिकांचा उपयोग, ऊतकांमधील सूक्ष्म रसायनांचे मापन इत्यादी. मानवी मेंदूचा आकार व कार्यपद्धतीबद्दल सर जॉन एक्लिस यांनी केलेल्या अभ्यासातून तांत्रिक तंत्राच्या रचनेची तुलनात्मक अंगे स्पष्ट होऊ लागली.


तुलनात्मक अभ्यासाच्या पद्धती : दोन किंवा अधिक प्रजातींच्या शरीररचनांची तुलना करण्यासाठी केवळ बाह्य निरीक्षणांवर अवलंबून राहण्याऐवजी इतर तंत्रांचा (संस्थांचा) उपयोग केल्यास साम्य व भेदस्थळे यांची अधिक खोल चिकित्सा करता येते. सध्या प्रचलित असलेल्या अभ्यासपद्धती पुढीलप्रमाणे आहेत.

स्थूलमानीय बाह्यस्वरूप : प्राणिशरीराचे बाह्यस्वरूप पुढीलप्रमाणे असते : त्वचेची जाडी, तिच्यावरील संरक्षक स्राव, केस, पिसे, खवले त्यांचे विविध भागांवरील कमी-अधिक प्रमाण डोळे, नाक, कान, तोंड व दात यांची ठेवण प्राण्याची उभे राहण्याची, बसण्याची व हालचाली करण्याची पद्धत शेपूट, नखे, खूर यांचे अस्तित्व व रचना हातापायांसारख्या उपांगांची संख्या व रचना. अशा प्रकारच्या बाह्यस्वरूप निरीक्षणातून प्राण्यांच्या वर्गीकरणाबद्दल काही प्राथमिक स्वरूपाचे निष्कर्ष निघू शकतात उदा., सस्तन प्राणी, मत्स्य, कीटक, पक्षी इत्यादी.

अन्नग्रहण व वर्तन : अन्न मिळविण्यासाठी, भक्ष्य पकडण्यासाठी किंवा स्वसंरक्षणासाठी आवश्यक असे सहजप्रेरणाजन्य वर्तन दिवस-रात्रीचा नित्यक्रम प्रजोत्पादनासाठी घडून येणारे वर्तन गर्भधारणेचा काळ, वारंवारता, पिलांची संख्या, नवजातांचे संरक्षण व पोषण करण्याची पद्धत मादीमधील अंडाणुनिर्मिती व अंडमोचन सुरू होण्याचे व समाप्तीचे वय प्रजोत्पादनाची आवर्तनशीलता स्वतंत्रपणे अथवा समूहांनी राहण्याच्या सवयी कळपातील इतरांशी संपर्क ठेवण्याच्या पद्धती या सर्व शरीरक्रिया आणि वैज्ञानिक व वर्तनविषयक माहिती शरीरचनेमधील भेदांची कारणमीमांसा करण्यासाठी उपयोगी असते. उदा.,शिकारी प्राण्यांच्या दातांची रचना फलाहारी प्राण्यांपेक्षा निराळी असते. त्यांच्या हालचालीही अधिक वेगाने होतात. घ्राणेंद्रिये व श्रवणशक्ती अधिक तीक्ष्ण असते.

विच्छेदन : मृत प्राण्याच्या अथवा शुद्धिहरण केलेल्या जिवंत प्राण्यांच्या विच्छेदनातून अंतर्गत रचनेची कल्पना येते. विशेषत: तंत्रिका तंत्र, पचनेंद्रिये, जननेंद्रिय, उत्सर्जन तंत्र यांसारख्या जैव विघटनाने सहज नष्ट होणाऱ्या मृदू ऊतकांचे ज्ञान मिळविण्यासाठी विच्छेदनाखेरीज दुसरा मार्ग उपलब्ध नसतो. ऊतकांचे ताजे नमुने घेतल्यास त्यांची सूक्ष्मरचनाही अभ्यासता येते. [⟶ प्राणिविच्छेदन].

हाडांचे सांगाडे किंवा उपलब्ध असलेल्या हाडांचे निरीक्षण : वन्य प्राणी, दुर्मीळ पशुपक्षी यांच्या मिळतील तेवढ्या हाडांच्या मदतीने संपूर्ण शरीराच्या आधारभूत सांगाड्याची थोडीफार कल्पना येऊ शकते. हाडांवरील स्नायुबंधांच्या व सांध्यांच्या खुणांवरून प्राण्याच्या शरीररचनेची वैशिष्ट्ये लक्षात येतात. हाडांमधील खनिज घटकांमुळे त्यांचे विघटन फार हळू होत असते. उत्खननातील लुप्त प्राण्यांच्या हाडांपासून त्यांचे सांगाडे पुन्हा निर्मिण्याची सुरुवात क्यूव्ह्ये यांनी केली.

जीवाश्मांचा अभ्यास : पृथ्वीवर सजीवांची उत्पत्ती सु. २५० कोटी वर्षांपूर्वी झाली असावी, असा अंदाजे आहे. त्या वेळी एककोशिकीय व जलचर असणाऱ्या सजीवांपासून पुढे अनेक प्रकारचे बहुकोशिकीय प्राणी तयार झाले व त्यांपैकी काही भूचर होऊ लागले. भूपृष्टाच्या सतत होणाऱ्या पुनर्रचना, ज्वालामुखींचे उद्रेक आणि सागरांची पुनर्निर्मिती यांमुळे अनेक ठिकाणी नवीन खडक तयार होत गेले. अशा खडकांमध्ये आणि गाळाचे थर साचून तयार होणाऱ्या अवसादी खडकांमध्ये वेळोवेळी तत्कालीन जीवसृष्टीचे नमुने अडकून पडले. कायमस्वरूपी ठशांच्या रूपातील हे जीवाश्म प्राणिसृष्टीतील निरनिराळ्या टप्प्यांचे दर्शन घडवितात. विशेषकरून हाडांसारख्या कठीण ऊतकांचे व पृष्ठवंशीयांचे अवशेष जरी प्रामुख्याने सहज आढळत असले, तरी मृदुकाय प्राण्यांमधील सिलिका, स्ट्रॉंशियम व कॅल्शियमामुळे त्यांचेही जीवाश्म होऊ शकतात. सुमारे ५९ कोटी वर्षांपूर्वीच्या खडकांमध्ये आढळलेल्या जीवाश्मांमुळे प्रवाळ, स्पंज आणि कधीकधी एककोशिकीय आदिजीवांचेही पुरावे मिळतात. [⟶ जीवाश्म].

भ्रूणवैज्ञानिक निरीक्षणे : अंडाणूच्या फलनापासून अर्भकाच्या जन्मापर्यंत ज्या विविध अवस्था दिसतात, त्यांमध्ये त्या प्राण्याच्या उत्क्रांतीचे प्रतिबिंब बऱ्याच अंशी दिसून येते. त्यामुळे भ्रूणाची शरीररचना आणि उत्क्रांतीच्या खालच्या पायऱ्यांवरील प्राण्यांचे शारीर यांची तुलना उद्‌बोधक ठरते. तसेच काही ठरावीक अवस्थेपर्यंत निकटच्या प्रजातींचे गर्भ किती साम्य दाखवितात, हेही तुलनात्मक शारीराच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे ठरते. कधीकधी प्रौढावस्थेत अगदी भिन्न रचना असलेल्या प्राण्यांच्या भ्रूणावस्था किंवा प्राथमिक अवस्थांमध्ये काही साम्य आढळून आल्यामुळे त्यांचा परस्परसंबंध लावणे शक्य होते.

जैवरेणूंचा अभ्यास : ऊतकांच्या सूक्ष्मदर्शकीय निरीक्षणाप्रमाणेच त्यांच्या घटक रेणूंचा जैवरासायनिक अभ्यासही बरीच साम्यस्थळे निदर्शनास आणतो. यकृतामधील आणि स्नायूंमधील चयापचयात्मक प्रक्रियांमध्ये निर्माण होणारे पदार्थ, प्रथिनांची प्रतिरक्षावैज्ञानिक कार्यशीलता, जनुकद्रव्यातील (डीएनए) घटकांचा रचनाक्रम यांचा समावेश अशा अभ्यासात होतो. उदा., मानवी जनुकद्रव्य व चिंपॅंझीचे डी-ऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल (डीएनए) यांत जवळजवळ ९८% साम्य असल्याने चिंपँझी हा वानर माणसाच्या सर्वांत जवळचा प्राणी समजला जातो. मानवी रेणूंची इतर प्राण्यांच्या तत्सम रेणूंशी तुलना करण्यासाठी निवडलेल्या प्रथिनांमध्ये हीमोग्लोबिन, सायटोक्रोम सी, इन्शुलीन, वृद्धिसंप्रेरक, इम्युनोग्लोब्युलीन प्रतिपिंड इ. विविध पदार्थांचा समावेश झालेला दिसतो.

अपृष्ठवंशी प्राणी : शरीररचनेची तुलना प्रामुख्याने पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये आणि विशेषतः मानवी शरीराच्या संदर्भात जास्त विस्ताराने केलेली असते, असे समजले जाते परंतु जातिविकासाचा मागोवा घेण्यासाठी या विषयाचे महत्त्व सर्वच प्राण्यांच्या बाबतीत सिद्ध झाले आहे. त्यामुळे आद्य  एककोशिकीय जीवांपासून ते सर्वाधिक विकसित मानवी शरीरापर्यंत विस्तृत वर्णपट त्याने व्यापलेला आहे. अपृष्ठवंशीयांमध्ये मृदू ऊतकांचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांचे मरणोत्तर विघटन जलद व अधिक पूर्णपणे होते. बाह्य सांगाड्यात असलेले कठीण ऊतक दीर्घकाळ टिकत असले, तरी त्यांच्यापासून मिळणारी अंतर्गत रचनेबद्दल माहिती मर्यादित असते, म्हणून ताज्या स्थितीमधील शरीराचे विच्छेदन व सूक्ष्म निरीक्षण यांवर अधिक भर द्यावा लागतो.

एककोशिकीय प्राण्यांपासून बहुकोशिकीयांची निर्मिती करणारी प्रक्रिया सिद्ध करणारे अनेक सिद्धांत प्रचलित आहेत. हेकेल यांनी भ्रूणविज्ञानावर आधारित जो सिद्धांत मांडला, त्यानुसार अनेक कोशिका एकत्र येऊन त्यांच्यापासून गॅस्ट्रिआड नावाचा प्राणी प्रथम निर्माण झाला (अंडाणूच्या विभाजनामुळे तीन आद्यस्तरांची निर्मिती होऊन त्यामुळे जो पोकळ गोल तयार होतो, त्याला गॅस्ट्रला म्हणतात. त्यावरून हे नाव तयार केले). प्रवाळाप्रमाणे एकत्र वसाहत करून राहणाऱ्या या प्राण्यापासूनच सर्व प्राणी विकसित झाले असावेत. हा सिद्धांत मागे पडून त्याला पर्यायी दोन सिद्धांत पुढे आले. दोन्ही पर्यायांमध्ये आत पोकळी असलेल्या देहगुहीय प्राण्याऐवजी एक भरीव चपटा बहुकोशिकीय प्राणी अभिप्रेत आहे.

पहिल्या मतानुसार समूहाने राहणाऱ्या कशाभिकाधारक एककोशिकीय जीवांच्या एकत्रीभवनातून हा भरीव प्राणी निर्माण झाला असावा. मध्यजीव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्राणिसंघातील प्रौढावस्थेत ही रचना अजूनही आढळते. त्याच्या केवळ ५० प्रजाती आता उरल्या आहेत.

दुसऱ्या मताप्रमाणे बहुकेंद्रकीय आदिजीवांपासून कोशिकाविभाजनाने हा चपटा कृमी तयार झाला असावा. त्याच्यापासूनच पुढे एका उत्क्रांतिमार्गाने मोठे बहुकोशिकीय कृमी निर्माण झाले. दुसऱ्या मार्गाने अंतरंगात पोकळी तयार होऊन देहगुहीय जीव विकसित झाले. या दोन्हींपैकी कोणताही एक निश्चितपणे स्वीकारला गेला नसला, तरी त्यातून सर्वांत साधी रचना असलेल्या बहुकोशिकीय प्राण्यांच्या तुलनात्मक अभ्यासास चालना मिळाली आहे.

एककोशिकत्व, बहुकोशिकता, बहुस्तरीय रचना, विशिष्ट कार्यांसाठी विशेष ऊतक, इंद्रियनिर्मिती आणि शरीरक्रियावैज्ञानिक तंत्रांची सुसंघटित रचना अशी एकएक पायरी चढत प्राणिशरीरांची उत्क्रांती होत आली आहे. या सर्व स्थित्यंतरांच्या प्रक्रियेमध्ये शरीररचनेत घडून येणारे बदल स्थूलमानाने पुढील प्रकारचे आहेत.


शारीरिक समितीची निर्मिती : बहुसंख्य एककोशिक सूक्ष्मजीवांची रचना पूर्णपणे असममित असते. कोणत्याही प्रतलात छेद घेतला, तरी त्यामुळे निर्माण होणारे दोन अर्धांश भिन्न कोशिकांगे  दाखवितात. रेडिओलॅरियासारखा एखादाच अपवादात्मक प्राणी चेंडूसारखी गोलाकार समरचना दाखवितो. बहुकोशिकांमध्ये काही अंशी समरूपतेची सुरुवात झालेली आढळते.  सीलेटेरेटा (दंशक) संघातील म्हणजेच देहगुहीय पोकळी असलेल्या प्राण्यातील रचना उभ्या प्रतलांमध्ये छेद घेतल्यास समरूपता दाखवितो परंतु आडवा छेद घेतल्यास मिळणार वरचा (पाठीकडील) व खालचा (पोटाकडील) भाग मात्र भिन्न रचना दाखवितात. अशाच प्रकारची अरीय (त्रिज्यीय) सममिती तारामीन ज्या वर्गात आहे, त्या एकायनोडर्माटा (कंटकत्वचीय) प्राण्यांमध्येही दिसते. सर्वसाधारणपणे त्यांची पाच पाकळ्यांत म्हणजेच पंचअरीय रचना झालेली असते. अधिक उत्क्रांत झालेल्या प्राण्यांमध्ये शरीराचा पुढचा व मागचा भाग, तसेच पाठीचा व पोटाचा भाग पूर्णपणे भिन्न असतात परंतु डावा व उजवा असे भाग मात्र जवळजवळ सारखेच असतात. बहुसंख्य अपृष्ठवंशी व सर्व पृष्ठवंशींमध्ये आढळणाऱ्या या रचनेस दिवपार्श्व सममिती म्हणतात.

शीर्षसंघटन : जलचरांमधील सर्व दिशांनी मुक्तसंचार करण्याची अवस्था संपून एका विशिष्ट अंगाने पुढे सरकण्याची क्रिया जेव्हा सुरू होते व त्याचबरोबर त्रिज्यीय समरचनेचे रूपांतर द्विपार्श्व सममितीमध्ये होते, त्याच वेळी शीर्षसंघटन हा आणखी एक बदल झालेला दिसतो. शरीररचनेचे ध्रुवीभवन होऊन ज्या दिशेने प्राणी पुढे जातो, त्या भागात (पुढील भागात) संवेदनाग्राहक  इंद्रिये (डोळे, संस्पर्शक) व अन्नग्रहण करणारे तोंड इ. एकत्रित होऊ लागली. तसेच त्या भागातील तंत्रिका कोशिकांचे रूपांतर विशिष्ट कार्य करणाऱ्या पुंजात होऊन आदिम स्वरूपातील मेंदू निर्माण झाला. याउलट शरीराच्या मागील भागात अन्नमार्गाचे दुसरे टोक, उत्सर्जक इंद्रिये, जननेंद्रिये यांचे अस्तित्व दिसू लागले.

शरीरामध्ये अंतर्गुहीय पोकळीची निर्मिती : बहुकोशिकीय रचनेत पृष्ठभागावरील कोशिकांचा परिसराशी प्रत्यक्ष संपर्क येतो. त्यामुळे या कोशिकांचे पोषण व त्यांच्यात निर्माण झालेल्या अमोनियासारख्या उत्सर्जनयोग्य द्रव्यांचा निचरा सहज होऊ शकतो परंतु अधिक खोलवर असलेल्या कोशिकांचा असा प्रत्यक्ष संपर्क घडत नाही. या कोशिकांची मांडणी सैल (विरल) असल्यास त्यांच्या दरम्यान असलेल्या सूक्ष्ममार्गातून किंवा छिद्रांमधून बाहेरील द्रव आत पोहोचून अंतर्गत परिसराचे काम करू शकतो. उदा., स्पंजासारखे छिद्रिल प्राणी. अधिक दृढ रचनेत हे शक्य नसते. त्यामुळे अशा बहुकोशिकांच्या शरीरात मधोमध एक पोकळी तयार होऊन तिच्या तोंडावाटे बाह्य द्रवाशी संबंध निर्माण होतो. सीलेंटेरेटा (दंशक) संघातील हायड्रा, जेलिफिश यांसारख्या प्राण्यांमध्ये आद्य अन्नमार्गातून अशी पोकळी तयार होते. रोटिफेरा (चक्रांगधारी) आणि नेमॅटोमॉर्फा या संघांतील प्राण्यांत ही पोकळी भ्रूणाच्या अगदी प्रारंभिक अवस्थेतील विभाजनातून निर्माण झालेल्या कोरकगुहेचे (खंडीभवन गुहिका) सुधारित रूप असल्याने तिला कृतक देहगुहा म्हणतात. इतर सर्व प्राण्यांमध्ये गोलकृमी व त्यापेक्षा अधिक विकसित अपृष्ठवंशीयांमध्ये सुरुवातीच्या त्रिस्तरीय रचनेमधील मध्यस्तरापासून अशी पोकळी तयार होते व तिलाच खरी देहगुहा अशी संज्ञा देता येते. मृदुकाय आणि संधिपादांमध्ये तिचे स्वरूप बरेचसे बदललेले दिसते. हृदय व रक्तवाहिन्यांची निर्मिती न झालेल्या सर्व प्राण्यांमध्ये देहगुहीय पोकळीमधील द्रव हा पोषणद्रव्ये, चयापचयजन्य पदार्थ आणि वायू यांच्या वहनाचे कार्य करतो. या पोकळीच्या निर्मितीबरोबरच बाह्य जलाशी संपर्क ठेवणारी मुख व गुद ही आद्य द्वारे निर्माण होतात. सुरुवातीच्या अवस्थेतील कोरकरंध्राचे रूपांतर मुखात होते की गुदात यानुसार प्राण्यांचे आदिमुखीय आणि द्वितीयक मुखीय (नंतर निर्माण झालेले मुख) असे वर्गीकरण केले जाते.

विशेष कार्ये करणाऱ्या ऊतकसमूहांची निर्मिती : वर उल्लेख केल्याप्रमाणे एककोशिकीय प्राण्यांमध्ये आणि त्यांच्यापासून विकसित झालेल्या सुरुवातीच्या काही बहुकोशिकीय प्राण्यांमध्ये प्रत्येक कोशिका सर्व जीवनावश्यक कार्ये करू शकते. कोशिकांची संख्या वाढून त्यांची मांडणी अधिकाधिक गुंतागुंतीची होऊ लागल्यावर ही स्थिती टिकू शकत नाही. काही कोशिकास्तर किंवा समूह आपले कार्य विशिष्ट प्रक्रियांपुरतेच मर्यादित ठेवतात. यातूनच ऊतकांची व आदिम इंद्रियांची निर्मिती होते. स्थूलमानाने पुढील चार प्रकारचे ऊतक सुरुवातीस आढळू शकतात : (अ) आधारदायक व हालचालीस मदत करणारे, (आ) अन्नपदार्थांचे शोषण, समावेशन, परिवहन, संचय आणि व्यवचय करून अनावश्यक पदार्थांचे उत्सर्जन करणारे, (इ) प्रजोत्पादनासाठी आवश्यक जननक्षम कोशिका करणारे व रक्तातील कोशिकांची निर्मिती करू शकणारे,  (ई) विविध कार्ये करणाऱ्या व शरीरात सर्वत्र पसरलेल्या ऊतकांवर नियंत्रण ठेवून त्यांचा समन्वय घडवू शकणारे रासायनिक अथवा विद्युत्‌ प्रवाहरूपी संदेशदायक.

निरनिराळ्या प्रकारच्या विशेष ऊतकांची अथवा आदिम इंद्रियांची उत्पत्ती प्रथमच दाखविणारे प्राणी उत्क्रांतीच्या निरनिराळ्या टप्प्यांवर दिसून येतात. उदा., चपट्या कृमींमध्ये उत्सर्जन कार्य करणाऱ्या ज्वाला कोशिका व वाहिन्या आदिम वृक्क गणल्या जातात सीलेंटेरेटा संघात तंत्रिका कोशिका आढळतात मखमली कृमीत (ऑनिकॉफोरा) लांबट आकाराची हृदय नलिका आढळते काही गोलकृमींमध्ये आणि संधिपादांच्या काही पायांवर श्वसनेंद्रियांची निर्मिती दिसते फीतकृमी (अथवा शुंडकगुहीय या नावाने ओळखले जाणारे) या प्राण्यात प्रथमच पूर्णपणे भिन्न लिंगता दिसते.

समखंडनिर्मिती : द्विपार्श्व सममित आणि बरेचसे लांबट असे शरीरविकसित होत असताना काही प्राणिवर्गांमध्ये शरीराचे अनेक समान खंडांमध्ये विभाजन झालेले आढळते. प्रत्येक खंडात जीवनावश्यक इंद्रियांचा जवळजवळ पूर्ण असा संच काहीशा बदललेल्या स्वरूपात उपलब्ध असतो उदा., आदिवृक्क, देहगुहीय नलिका, तंत्रिका कोशिकीय गुच्छिका, जननेंद्रिये, काही चपट्या कृमींमध्ये प्रत्येक समखंडात अशा इंद्रियांच्या जोड्या आढळतात. गोलकृमी (नेमॅटोडा), संधिपाद(आर्थ्रोपोडा) व पृथुकृमी (प्लॅटिहेल्मिंथिस) या संघांमधील काही प्राणीच अशी समखंड निर्मिती करतात. प्राण्यांच्या आतड्यात वाढणारे काही कृमी असे समखंड वेळोवेळी मूळ शरीरापासून अलग करून यजमान प्राण्याच्या विष्ठेवाटे बाहेर जाऊ देतात. त्यामुळे यजमानाबाहेरील प्रजननसाखळीची सुरुवात होते. समखंडात्मक रचनेची काही वैशिष्ट्ये अधिक प्रगत प्राण्यामध्ये टिकून राहिलेली दिसतात. उदा., पृष्ठवंशीय प्राण्यांच्या उरोभागात व कटिभागात स्नायू, तंत्रिका, रक्तवाहिन्या यांची रचना एका विशिष्ट पद्धतीची असलेले अनेक खंड ओळीने निर्माण झालेले आढळतात.


पृष्ठरज्जूची निर्मिती : मानव आणि इतर पृष्ठवंशी प्राणी यांच्या निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरलेली उत्क्रांतिप्रक्रियेतील पायरी म्हणजे रज्जुमान प्राण्यांची उत्पत्ती ही होय. शरीराच्या पृष्ठीव (पाठीकडील) भागात तोंडाकडील टोकापासून थेट विरुद्ध टोकापर्यंत पसरलेल्या कठीण परंतु लवचीक अशा ऊतकाच्या लांबट कांडीला पृष्ठरज्जू असे म्हणतात. तिच्या पृष्ठीय अंगास तंत्रिका नलिका (जिच्यातून पुढे मेंदू व मेरुरज्जू विकसित होतो) असते. अधर अंगास (बाजूस) अन्नमार्ग आणि इतर सर्व इंद्रिये असतात. तंत्रिका नलिका पृष्ठीय अंगास असल्यामुळे रज्जुमान प्राण्यांचा विकास वर दिलेल्या द्वितीयक मुखीयांपासून (ड्यूटेरोस्टमा) झाला असावा असा निष्कर्ष आहे. अन्नमार्गाच्या सुरुवातीच्या भागात म्हणजे ग्रसनीत लहानलहान फटींसारख्या सूक्ष्म छिद्रांचे अस्तित्व हे रज्जुमानांचे आणखी एक वैशिष्टय असते. क्लोम-दरणी या संज्ञेने ओळखल्या जाणाऱ्या या छिद्रांमधून पाणी गाळून बाहेर पडते. त्यामुळे तेथे अडकलेले अन्नकण प्राण्याला मिळतात.

पृष्ठरज्जूच्या सभोवतीच्या संयोजक (जोडणाऱ्या) ऊतकाचे रूपांतर स्नायुखंडांमध्ये झालेले असते. पाठीपासून पोटापर्यंत तिरके पसरलेले हे स्नायूखंड आकुंचन-प्रसरणामुळे प्राण्याचे संपूर्ण शरीर वाकवून पुन्हा सरळ करतात व त्यामुळे प्राणी पुढे सरकतो. पृष्ठरज्जूमधील कोशिकांच्या वैशिष्ट्यपूर्ण दाट संरचनेमुळे तो दाबला जात नाही. त्यामुळे त्याची लांबी कमी न होता तो फक्त वाकतो व पुन्हा सरळ होतो. पाण्यात पुढे सरकण्यासाठी किंवा काठावरील ओलसर मातीतील अरुंद बिळात मागेपुढे सरकण्यासाठी ही रचना उपयोगी पडते.

या प्रकारची आदिम रज्जुमय रचना असलेले फार थोडे प्राणी आता आढळतात. सेफॅलोकॉर्डेटा (शीर्ष-रज्जुमान) या उपसंघातील ⇨अँफिऑक्सस हे उत्तम उदाहरण आहे. हेमिकॉर्डेटा (सामी-रज्जुमान) प्रकारामधील काही कृमी आणि यूरोकॉर्डेटा (पुच्छ-रज्जुमान) प्रकारामधील सी स्क्विर्ट या प्राण्यांच्या डिंभावस्थेत ही रचना दिसून येते. हे सर्व अपृष्ठवंशी उपसंघ असून कॉर्डेटा (रज्जुमान) संघातील चौथा व सर्वांत मोठा उपसंघ पृष्ठवंशी (कर्परी) यांचा आहे. [⟶ कॉर्डेटा].

कालांतराने पृष्ठरज्जूचे रूपांतर पृष्ठवंश म्हणजे पाठीच्या कण्यात झाले. तंत्रिका नलिकेतून निर्माण झालेल्या मेरुरज्जूस या पाठीच्या कण्याचे संरक्षण सर्व बाजूंनी प्राप्त झाले.

पृष्ठवंशी प्राणी : रज्जुमान परंतु अपृष्ठवंशी प्राण्यांपासून पृष्ठवंशींचा उपसंघ निराळ्या पद्धतीने विकसित होतात पाठीच्या कण्याबरोबरच मेंदूभोवतीही कठीण संरक्षण आवरण निर्माण होऊन त्याची परिणती अखेर डोक्याच्या कवटीत झाली. त्यामुळे या उपसंघाला कर्परी (कवटीधारक) असेही नाव आहे. त्याची इतर वैशिष्ट्ये अशी : संवेदन, हालचालींचे प्रेरण आणि संपूर्ण शरीराचे सुसूत्र नियंत्रण असे तिहेरी कार्य करणारा मेंदू : डोळे, नाक व कान या विशेष संवेदक इंद्रियांची निर्मिती अधिक व्यापक व सफाईदार हालचालींसाठी पर आणि पुढे त्यातूनच विकसित झालेली हात, पाय, पंख यांसारखी उपांगे ग्रसनीच्या दोन्ही बाजूंमधून क्लोम-दरणांची वाढ व त्यातून पुढे श्वसनेंद्रियांचा विकास ऑक्सिजन वहनासाठी अधिक कार्यक्षम अशा हीमोग्लोबिनयुक्त रक्तकोशिकांची निर्मिती जटिल व कार्यक्षम अन्नपचन आणि उत्सर्जनाच्या यंत्रणा.

सुरुवातीस सागरी वास्तव्य असलेली प्राणिसृष्टी हळूहळू जमिनीवर, गोड्या पाण्यात, रेताड कोरड्या वाळवंटापासून दलदलीच्या प्रदेशापर्यंत, बर्फाळ प्रदेशात अशी विविध भौगोलिक परिसरांत पसरू लागली. जमिनीवर आधीच निर्माण झालेल्या वनस्पतींचा आणि प्राणिजगातील काही जीवांचा समावेश आहारात होऊ लागला. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जमिनीचे खंड आणि महासागर यांच्या रचनेतही मोठे बदल घडत गेले. त्यामुळे पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये गेल्या ५० कोटी वर्षांमध्ये विविध प्रकारच्या शरीररचना विकसित झाल्या. सध्या अस्तित्वात असलेल्या प्रमुख पृष्ठवंशींमध्ये अहनू (बिनजबड्याचे) मासे, कूर्चायुक्त व अस्थियुक्त मासे, जल-स्थलचर (उभयचर), सरपटणारे प्राणी, पक्षी व सस्तन प्राणी यांचा समावेश होतो.

अँफिऑक्ससशी बरेच साम्य असलेले सुरुवातीचे काही पृष्ठवंशी आपल्या वर्तुळाकार तोंडाने पाणी शोषून घेतात किंवा जलाशयाच्या तळाशी गाळात तोंड खुपसून खाद्य आत घेतात. खालचा जबडा नसलेल्या या प्राण्यांपैकी  ⇨लॅंप्री मासा हा पृष्ठवंशींच्या शरीररचनेतील अनेक वैशिष्ट्यांच्या अगदी प्रारंभिक अविकसित अवस्था दाखवितो. त्याच्या कानांमध्ये ध्वनिसंवेदनांची निर्मिती होण्याआधीची अवस्था म्हणजे परिसरातील कंपनांचे संवेदन आढळते. एकमेकांशी काटकोनात असलेल्या तीन अक्षांभोवती आपल्या शरीराची हालचाल करणे या माशाला आपल्या परांमुळे सहज शक्य असते. याला साहाय्यक म्हणून शरीराच्या स्थितीची जाणीव करून समतोल साधणारे संवेदनही कानात निर्माण झालेले असते.

लॅंप्रीच्या दोन डोळ्यांनी त्याला इतर प्राण्यांप्रमाणे दिसू शकते. त्याशिवाय पिनीयल पिंडाशी जोडलेला तिसरा डोळा या प्राण्यात असतो. भिंग किंवा तारिका इत्यादींचा अभाव असलेले हे इंद्रिय प्रतिमा निर्माण करत नाही. त्यात केवळ प्रकाशाची कमीजास्त तीव्रता ओळखणारे संवेदक असतात. त्यांच्या उत्तेजनामुळे दिवसा त्वचेचा रंग गडद होतो व प्राण्याची हालचालही काही प्रमाणात कार्यान्वित होते. अशाच प्रकाशसंवेदक कोशिका त्वचेमध्ये आणि प्रत्यक्ष मेंदूच्या पुढच्या भागातही आढळतात. डोळे आणि जाड त्वचा यांची निर्मिती होण्याआधी उपलब्ध असलेली ही प्राथमिक स्वरूपाची संवेदक यंत्रणा असावी. इतर कोणत्याही प्राण्यात हे अवशेष दिसत नाहीत.

ग्रसनीच्या दोन्ही बाजूंना असलेल्या छिद्रांचा विकास हळूहळू पाणी बाहेर टाकणाऱ्या मोठ्या फटींमध्ये झाला. या फटींच्या मधल्या जागेतील ग्रसनीभित्तिकेत कूर्चा ऊतक निर्माण होऊन त्याच्या एकामागे एक अशा सात कमानी (क्लोम चाप) सुरुवातीच्या अहनू माशांमध्ये दिसू लागल्या. या कमानींपैकी पहिल्या कमानीपासून पुढे वाढलेल्या ऊतकाचे रुपांतर तोंडाभोवती कठीण अशा आधारदायक पट्ट्यांमध्ये होऊन माशांना खालचा व वरचा जबडा प्राप्त झाला. इतर कमानींपैकी एक कमान अविकसित राहून इतर पाच कमानी व त्यांच्या दरम्यान असलेली क्लोमछिद्रे यामुळे माशांची श्वसन यंत्रणा विकसित झाली. ऑक्सिजनयुक्त रक्ताचे वितरण शरीरात सर्वत्र करणारे ओळीने तीन कप्पे असलेले हृदय निर्माण झाले. कूर्चायुक्त ऊतकांमुळे मजबूत परंतु लवचीक असे शरीर असलेले हे मासे शार्क, उंदीरमासा, पाकट, रांचा या प्रकारात अजूनही अस्तित्वात आहेत. कूर्चायुक्त माशांच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये विविध प्रकारचे दात असलेले शक्तिमान जबडे, अन्नाचे मोठे तुकडे सहज पचविण्यासाठी जठराची निर्मिती आणि छाती, मधला भाग व शेपटीकडील भाग यांमध्ये विविध आकारांच्या सुनियंत्रित परांचे अस्तित्व यांचा समावेश होतो.

माशांचा दुसरा वर्ग अधिक विकसित अशा अस्थिमिनांचा आहे. शरीराच्या विविध आकरांच्या परांच्या काटेरी किंवा किरणाकार रचना दर्शविणाऱ्या कमीजास्त प्रमाणात कूर्चेचे अस्थीभवन घडलेल्या आणि स्वसंरक्षणासाठी अनेक प्रकारच्या यंत्रणा असणाऱ्या या माशांचे सागरी जीवन उत्क्रांतीच्या अभ्यासकांना आकर्षक वाटते. गंध आणि चव या संवेदनांची तीक्ष्णता वाढल्यामुळे शिकारीसाठी दूरवर संचार करणारे मासे या वर्गात आढळतात. संरक्षक कवच, तीक्ष्ण काटे, विषारी ग्रंथी, आकर्षक प्रकाशमानता, मोहक रंगसंगती तसेच विजेचा झटका देणारी इंद्रिये यांसारख्या वैशिष्ट्यांचा उपयोग संरक्षणासाठी व शिकारीसाठी करणारे प्रकार या माशांमध्ये आढळतात. काही प्रकारांमध्ये बाहेरील हवा आत घेऊन किंवा शरीरांतर्गत ऑक्सिजन विमोचन करून फुगवता येणारी पिशवी आढळते. तिचा वापर करून मासा पाण्यात कोणत्याही पातळीवर, परांची हालचाल केल्याशिवाय एका जागी दीर्घकाळ स्थिर राहू शकतो. मांसल पर असलेले काही मासे छातीवरील परांचा काहीसा हातांसारखा उपयोग करतात. यातूनच पुढे उपांगांची निर्मिती झाली. बहुसंख्य मासे क्लोम इंद्रियांचा उपयोग श्वसनासाठी करत असले, तरी काही माशांमध्ये नाकाचा व नवनिर्मिती फुफ्फुसांचाही वापर होत असल्याने दुहेरी श्वसनपद्धती आढळते. अस्थिमिनांमधील अनेक प्रकारांत ट्राऊट, ईल (अहीर), पाइक, गारफिश, गारपाइक, बडिश, हेरिंग, स्टर्जन, बोफिन, बटरफ्लाय स्नाउट यांचा समावेश होतो.


जलचर प्राणी जमिनीवर येण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा त्यांच्या परांचे रूपांतर पायांच्या दोन जोड्यांमध्ये झाले. पाचपाच बोटांचे मागील व पुढील पाय असलेल्या या चतुष्पाद उभयचरांमध्ये बेडूक, भेक (कोरडी व फोडांसारखे उंचवटे असलेली त्वचा असणारे बेडूक), ⇨सॅलॅमॅंडर, ⇨न्यूट यांचा समावेश होतो. माशांसारखे खवले नसून त्वचा सैल ओलसर असते. कारण हवेतील ऑक्सिजन ग्रहण करण्याचे काम त्वचाही करते. नाकपुड्यांमधून घेतलेली हवा फुफ्फुसांत पोहोचविण्यासाठी खालच्या जबड्याचा तळाचा भाग भात्यासारखी खालीवर हालचाल करतो. दुसऱ्या क्लोमचापातून विकसित झालेल्या या यंत्रणेमुळे नाकपुड्या मधूनमधून बंद करून आत पकडलेल्या हवेतील ऑक्सिजनचा जास्तीत जास्त उपयोग बेडकाला करता येतो. अंड्यांचे फलनही शरीराबाहेर पाणथळ जागेत होत असल्योन बेडूक नेहमी जलाशयाच्या जवळपास राहतात. स्वरयंत्रातून सात-आठ प्रकारचे सांकेतिक आवाज त्यांना काढता येतात. श्रवणेंद्रियाचा विकास माशांपेक्षा अधिक होऊनही बाह्यकर्णाऐवजी त्वचेवरच एक गोल पडदा असतो. अंतर्गत रचनेतील एक वैशिष्ट्य म्हणजे हृदयात दोन कर्णिका व एकच जवनिका असल्यामुळे शुद्ध व अशुद्ध रक्तांचे अंशतः मिश्रण होत असते. फुफ्फुसे व बाकीचे शरीर यांमध्ये त्याचे वितरण योग्य रीतीने होण्यासाठी महारोहिणीमधील झडपेची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. बेडकाची हालचाल मुख्यतः मागचे पाय ताणून उडी मारून होत असते. यामुळे मागच्या पायाचे स्नायू बळकट असतात. उडी जमिनीवर पडल्यावर बसणारा हादरा सहन करण्यासाठी छातीच्या व खांद्याच्या भागातील हाडांची वक्षीय मेखला मजबूत असते. पाठीचा कणा आखूड असून, कंबरेच्या हाडांची लांबट रचना, त्यांना जोडलेली त्रिकास्थी आणि शेपटीचा पूर्ण अभाव ही वैशिष्ट्ये बेडकांच्या उड्यांना सहायक ठरतात. या वर्गातील इतर प्राणी काहीसे सरपटणारे, शेपटीयुक्त आणि माशांशी जास्त साम्य दाखविणारे असतात.

जमिनीवर आलेले प्राणी अधिकाधिक काळ पाण्यापासून दूरदूर राहू लागले, तेव्हा सरपटणाऱ्या प्राणिवर्गाची [⟶ सरीसृप वर्ग] निर्मिती झाली. अंडाणूचे फलन शरीराच्या आतच होऊन त्यापासून निर्माण झालेल्या गर्भाभोवती जलमय कोश व त्यावर कॅल्शियमाच्या संयुगांचे पातळ कवच अशी संरक्षक रचना तयार होऊ लागली. त्यामुळे प्रजोत्पादनासाठी पाण्यात न जाता कोरड्या जमिनीवरही हे प्राणी अंडी घालू शकत. त्वचा कोरडी जलाभेद्य असून कधीकधी तिच्यावर कठीण शृंगी पदार्थाचे कवच असे. बरगड्यांच्या हालचालींमुळे श्वसनक्रिया होई. शरीरात उष्णता निर्माण होत नसल्यामुळे हे प्राणी थंडीच्या वेळी उन्हात बसत किंवा बिळात जाऊन राहत. सुमारे १५ ते २२ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर विपुल संख्येने असलेल्या या प्राण्यांमध्ये महाकाय डायनोसॉर व तत्सम प्राणी होते. आज या वर्गात पाली, सरडे, सर्प, सुसरी व कासवे यांची मोजकीच प्रजाती संख्या आढळते. तापमानातील फार मोठे बदल त्यांना सहन होत नाहीत. अन्नपचन, चयापचय व उत्सर्जन यांत पाण्याचा फार कमी उपयोग केला जातो. भक्ष्यांच्या विविधतेनुसार जबडा व त्यातील दात यांच्या रचनेत वैचित्र्य आढळते.

सरपटणारे प्राणी हवामानातील बदलांमुळे पृथ्वीवर विविध क्षेत्रांत पसरत असताना सु. १९ कोटी वर्षांपूर्वी त्यांच्यामध्ये मागील पायांवर उभे राहण्याची प्रवृत्ती वाढली. त्या काळापासून पक्षी [⟶ पक्षी वर्ग] आणि सस्तन प्राण्यांच्या निर्मितीच्या दिशेने उत्क्रांती प्रक्रिया सुरू झाली. पुढील पायांचे रूपांतर हळूहळू पिसारा असलेल्या उपांगात होऊन त्यातून पंख निर्माण झाले. त्यामुळे पक्ष्यांचे पंख आणि इतर प्राण्यांचे पुढचे पाय हे समजातता (एका भ्रूणवैज्ञानिक भागातून भिन्न प्रकारच्या इंद्रियांची निर्मिती म्हणजे भिन्न कार्य करणारे) या तत्त्वाचा आविष्कार दाखवितात. पक्ष्यांची पिसे उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करतात, शरीरास विशिष्ट आकर्षक आकार देऊन लैंगिक आकर्षण निर्माण करतात. उडताना हवेचा प्रवाह नियंत्रित करतात मोठी पिसे प्रत्यक्ष उड्डाणास आवश्यक अशी पंखांची हालचाल अधिक परिणामकारक करतात. हाडांमधील मोठमोठे वायुकोश आणि मजबुती वाढविणारे आधारतीर (छपराच्या वाशांना आधार देणाऱ्या तिरक्या पट्यांप्रमाणे) उरोस्थीची तुळईसारखी मजूत मेखला यामुळे उडताना संपूर्ण शरीराचा भार पंखांवर पेलला जातो. लांब मान, चार-पाच मणके एकत्र सांधून तयार झालेला आखूड उरोभाग, द्विशिरस्क मोठ्या बरगड्या, जाड त्रिकास्थीपासून तयार झालेली कटिमेखला यांमुळे हाच भार, पक्षी उभा राहिला असता दोन पायांवर पडतो. गुरुत्वमध्याचा लंब पावलांमध्ये पडत असल्याने स्थिर उभे राहणे व एक-एक पाऊल पुढे टाकत चालणे या क्रिया तोल न जाता होऊ शकतात. पाण्यात चालणे किंवा पोहणे, भक्ष्य धरून उडणे, फांदीवर बसणे, जमिनीवर चालणे इ.क्रियांसाठी अनुरूप अशी रचना असलेली चार बोटांची व नखांची पावले पक्ष्यांना असतात. चोचीच्या रचनेत अशीच विविधता आढळते.

दातांच्या अभावामुळे पक्षी अन्नाचे तुकडे तसेच गिळतात. ते साठविण्यासाठी अन्ननलिकेच्या शेवटी अन्नपुट नावाची पिशवी असते. कबुतरांमध्ये त्यात पोष ग्रंथीच्या प्रोलॅक्टिन हॉर्मोनाच्या प्रभावामुळे दुधाची निर्मिती होते परंतु बहुसंख्य पक्ष्यांमध्ये या पिशवीत अन्न भिजून मऊ होते आणि आवश्यक असल्यास पिलांना भरविण्यासाठी परत चोचीत येते. जठराचे दोन भाग असतात. प्रथम ग्रंथिल जठरात एंझाइमांची क्रिया होते. नंतर पेषणीमध्ये कठीण अशा कॉइलिनाच्या खडबडीत अंतस्तरामुळे आणि गिळलेल्या खड्यांच्या मदतीने अन्नाचे चूर्णन होते. ही सर्व क्रिया अतिजलद व पूर्णपणे प्रथिनपचन करणारी असते. आतड्यातही जलद पचन व पाण्याचे शोषण होऊन कठीण असा मल मलाशयात येतो. यूरिक अम्लयुक्त मूत्रही तेथेच येते. या मिश्रणातील पाणी, जवळजवळ पूर्णपणे शोषले जाऊन पक्ष्याची विष्ठा तयार होते. या संयुक्त मलमूत्राशयास अवस्कर (मूत्रपूरिष) म्हणतात. त्यात जननमार्गाचे (नरात रेतवाहिनी व मादीत अंडवाहिनी) द्वारही उघडते. डावीकडील जननमार्ग कार्यक्षम असतो उजवा सुप्तावस्थेत असतो. अंडवाहिनीच्या अंतस्तरात अल्बुमीन हे प्रथिन, कॅल्शियमसंपन्न कवच पदार्थ आणि परिपक्व अंड्याचे अवस्करात बहिःक्षेपण सुकर करणारा श्लेष्मल द्रव निर्माण होतात.

पक्ष्यांची श्वासनलिका लांब असून तिच्या खालच्या टोकाला स्वरिका हे स्वर निर्माण करणारे इंद्रिय असते. विविध स्वर व स्वरमालिका (गाणी) त्यातून निघतात, फुफ्फुसांमध्ये प्रवेश करणाऱ्या मुख्य श्वसनीचा संपर्क फुफ्फुसातील वायुकोशांव्यतिरिक्त इतर काही मोठ्या वायुसंचयक पिशव्यांशी येतो. हाडांनाही या पिशव्या जोडलेल्या असतात. श्वासावाटे आत घेतलेली हवा या पिशव्यांमुळे पुनःपुन्हा फुफ्फुसांमध्ये प्रवेश करते. ऑक्सिजनाचा अधिकाधिक उपयोग करून घेण्यास मदत करणारी ही रचना, विरळ हवेच्या उंचीवर श्वसन अधिक कार्यक्षम ठेवते.

पक्ष्यांचे डोळेही अधिक कार्यक्षम असतात. शंकुकोशिकांचे दृक्‌पटलातील अधिक प्रमाण, जवळचे पाहण्यासाठी भिंग आणि स्वच्छपटल यांच्यात होणारे बदल आणि दूरवरचे क्षेत्र पाहण्यासाठी दोन्ही डोळे मिळून जवळजवळ ३६० अंश व्यापणारे दृष्टिक्षेत्र यामुळे पक्ष्यांना रंगज्ञान आणि आसमंतातील हालचालींची जाणीव असा दुहेरी फायदा मिळतो.

पृष्ठवंशी प्राण्यांपैकी ज्या वर्गात मानवाचा समावेश होतो, त्या स्तनी (सस्तन) वर्गीयांची माहिती जरा अधिक विस्ताराने पाहणे इष्ट होईल.


स्तनी वर्ग : [⟶ स्तनी वर्ग]. पक्षिवर्ग आणि सस्तन प्राणी यांचा क्रमविकास एकाच कालखंडात सुरू झाला परंतु वसतिस्थाने, संचार आणि आहार यांच्या भिन्न पद्धतींमुळे शरीररचनेतील फरक वाढत गेला. तापमानावर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा दोन्ही वर्गांमध्ये विकसित झाल्यामुळे हे सर्व नियततापी (उष्ण रक्ताचे) प्राणी अतिशीत ध्रुवप्रदेशापासून उष्ण वाळवंटांपर्यंत सर्वत्र पसरू शकले. भूचर चतुष्पाद प्राण्यांमध्ये गर्भाची वाढ दीर्घकाळ गर्भाशयात होऊन जन्म झाल्यानंतरही काही काळ मातेच्या दुधावर पोषण होण्याचा क्रम स्थापित झाला. तसेच काही अंडी घालणारे अपवाद (उदा., प्लॅटिपस व काटेरी मुंगीखाऊ) सोडल्यास गर्भाशयातील पोषण जास्त परिणामकारक होण्यासाठी अपरा (वार) हा तात्पुरता ऊतकसमूह निर्माण झाला. अपरेच्या निर्मितीत भ्रूणवेष्ट आणि अपरापोषिका ही भ्रूणाची पटले आणि गर्भाशयाचा अंतस्तरीय रक्तवाहिनीयुक्त भाग यांचा कमी-अधिक प्रमाणात सहभाग दिसून येतो. अपरा आणि स्तनपोषण यांच्या अपरिहार्यतेमुळे पिलांची संख्या कमी झालेली आढळते परंतु  मेंदूच्या विकासामुळे पालनपोषणासाठी उपयुक्त बौद्धिक क्षमता वाढून पिले जगण्याचे प्रमाणही वाढले आहे.

सरपटणाऱ्या प्राण्यांच्या तुलनेत सस्तन प्राण्यांचा संचार वसतिस्थानापासून अधिक दूरवर होतो. सर्व ऋतूंमध्ये आणि दिवसा व रात्री आहार घेण्याची क्षमता असल्यामुळे निष्क्रिय किंवा सुप्त अवस्थेची जरुरी नसते. शरीराचे तापमान ३१º ते ३८º से. मध्ये कुठे तरी स्थिरावलेले असून परिसराच्या तापमानानुसार प्रत्येक प्रजातीत ते भिन्न असते. तापमानाची ही मर्यादा सरपटणाऱ्या प्राण्यांपेक्षा (२०º ते ३०º से. पेक्षा) थोड्या वरच्या पातळीवर व पक्ष्यांपेक्षा (४२º ते ४५º से. पेक्षा) खालच्या पातळीवर असते. घामाच्या ग्रंथी, धापा टाकण्याची क्रिया, शरीर चाटत राहणे, रक्तवाहिन्यांचे प्रसरण यांसारख्या योजना मेंदूतील तापमाननियंत्रक केंद्राच्या प्रभावामुळे कार्यान्वित होत असतात. त्वचा केसांनी आच्छादलेली, जलरोधक व स्नेहग्रंथीयुक्त असते. शुद्ध व अशुद्ध रक्त पूर्णपणे अलग ठेवणारे चार कण्यांचे हृदय, त्यापासून निघणारी डावीकडे झुकलेली महारोहिणी व जागोजाग झडपा असलेल्या नीला इत्यादींमुळे रक्तभिसरण यंत्रणा विविध हालचालींना आवश्यक असा रक्तपुरवठा करू शकते.

पाठीचा कणा सरळ असून मानेतील सात मणक्यांपैकी पहिले दोन डोक्याच्या कवटीशी वैशिष्ट्यपूर्ण सांध्याने जोडलेले असतात. परिणामतः डोक्याची सर्व प्रकारची हालचाल मुक्तपणे होऊन सर्व संवेदना (ऐकणे, पाहणे, वास व चव घेणे) चांगल्या प्रकारे ग्रहण करता येतात. बाह्यकर्णाचा नसराळ्यासारखा आकार, मध्यकर्णातील तीन हाडांची साखळी, अंतःकर्णाची मळसूत्रासारखी (सर्पिल) रचना, डोळ्याच्या गोलाकाबाहेरील स्नायू, नेत्रभिंगाची समायोजक यंत्रणा इ. वैशिष्टयांमुळे संवेदन अधिक व्यापक झालेले असते. वक्षीय मेखला व तिला जोडलेले पुढचे देन पाय मुख्यतः शरीराचा भार उचलतात. श्रोणिमेखलेपैकी श्रोणिफलकास्थीचा पसरट भाग डोक्याच्या दिशेने झुकलेला असून पोटाच्या बाजूने जघनास्थी त्यामानाने लहान असते. ही मेखला व मागचे पाय यांचा शरीरास पुढे ढकलण्यासाठी अधिक उपयोग केला जातो. उभयचर बेडकामध्ये आढळणारी हाडांची सर्वसाधारण आकृतिबंधीय मांडणी सर्व सस्तन प्राण्यांत आढळते पण तिच्यात आवश्यकतेनुसार बरेच बदल झालेले दिसतात. या मांडणीत बाहू किंवा मांडी यांचे एक हाड प्रबाहू किंवा पाय यांची दोन हाडे, मनगट किंवा घोट्यामध्ये लहानलहान हाडांच्या दोनतीन रांगा तळहात व तळपाय यांत पाच हाडे आणि पाच बोटांमध्ये प्रत्येकी तीन किंवा दोन हाडांची मालिका अशी रचना असते.

खालच्या व वरच्या जबड्यांत प्रत्येक बाजूस पुढे चपटे पटाशीसारखे दात, त्यांच्या बाजूला तीक्ष्ण टोकदार सुळा आणि त्याच्या मागे रुंद पृष्ठभागाच्या उपदाढा व दाढा अशी सर्वसाधशरण मांडणी असते. मांसाहार, वनस्पतींचा पाला किंवा फळे यांचा आहार किंवा धान्याहार यांनुसार दातांच्या रचनेत लक्षणीय फरक पडला आहे. माशांच्या किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे दातांची निर्मिती वरचेवर न होता फक्त एकदाच दुधाचे दात पडून त्यांच्या जागी नवीन दात येतात. उशिरा दात येण्यामुळे कवटीच्या हाडांची पूर्ण वाढ होण्यास वाव मिळतो आणि वरचेवर दातांची पुनर्निर्मिती न झाल्यामुळे त्यांचे पृष्ठभाग एकमेकांवर अधिक चांगल्या रीतीने टेकतात, असे मानले जाते.

सस्तन प्राण्यांच्या या सर्वसाधारण आकृतिबंधात अनेक प्रकारचे रचनात्मक बदल आहारविहारानुसार घडून आलेले दिसतात. त्यानुसार अस्तित्वात आलेले काही प्राणी खालीलप्रमाणे आहेत.

कांगारू : गर्भाशय व जननमार्ग अरुंद नळीसारखा असल्यामुळे भ्रूणाची पूर्ण वाढ तेथे होत नाही. काही आठवड्यांत अविकसित गर्भ जननमार्गातून बाहेर येऊन पोटावरील, स्तन आच्छादनाच्या पिशवीत प्रवेश करतो. तेथे त्याच्या तोंडात स्तनातून दुधाचे सक्रिय अंतःक्षेपण होऊ लागते. जवजवळ ८-९ महिने अशा प्रकारे पिशवीतील पोषण झाल्यावर त्याची वाढ पूर्ण होते. या रचनेस अनुकूल अशी पुढील पाय उचलून मागील पायांनी उड्या मारत चालण्याची पद्धत कांगारूत विकसित झालेली आहे. या वर्गातील इतर प्राण्यांमध्ये (उदा., ऑपॉस्सम, कोआला, अस्वल) ही पोषणपद्धती आता नष्ट झाली आहे परंतु पोटाच्या पिशवीला आधार देणारी हाडे अवशेषरूपात आढळतात. [⟶ कांगारू शिशुधान प्राणी].

उंदीर व ससे : शाकाहारी प्राण्यांच्या या वर्गात अन्न कुरतडणारे पुढचे धारदार दात (कृंतक) आणि खाल्लेल्या अन्नाचे दोन वेळा पचन करू शकणारी पाचक यंत्रणा आढळते. खारीमध्ये या दातांची कातरीप्रमाणे हालचाल होऊन कठीण टरफले फोडणे शक्य होते. पुढच्या पायांचा उपयोग वस्तू घट्ट पकडून ठेवण्यासाठी केला जातो. सशांमध्ये मागील पायांच्या मदतीने उड्या मारण्याची कांगारूसारखी चाल दिसून येते.

जलचर प्राणी : देवमासे, डॉल्फिन, पॉरपॉइज यांसारख्या प्राण्यांचे शरीर विपुल चरबी असलेले, बिनकेसाच्या गुळगुळीत चिवट त्वचेने आच्छादलेले आणि लांबट असते. पुढच्या पायांचे रूपांतर पाणी कापणाऱ्या वल्ह्यासारख्या अवयवात झालेले असते मागील पाय व कटीय मेखला नसतात. शेपटीच्या टोकाला असलेल्या आडव्या फाळांचा उपयोग पोहण्यासाठी होतो. जबडा खूप लांब असून त्यात मोठे दात (किंवा निळ्या देवमाशामध्ये खालच्या जबड्यात पाणी गाळण्याची यंत्रणा) असतात. डोक्यावरच्या छिद्रातून श्वसन होते पाण्याचा उंच फवाराही उडविता येतो. बाह्यकर्ण नसतात.

खुरी प्राणी : अनेक सस्तन प्राण्यांच्या पायांत फार मोठे बदल होऊन कठीण शिंगासारख्या पदार्थांचे खूर त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांचे चार प्रमुख वर्ग आहेत. पायाबरोबरच जबडा, दात आणि पचनसंस्थाही आहारास अनुरूप अशा पद्धतीने बदलल्या आहेत.

(१) वन्य, मांसाहारी किंवा शिकारी प्राणी : पुढच्या पायांत पाच व मागच्या पायांत चार बोटे असून त्यांच्यापासून गादीसारखी मऊ आघात शोषक पावले (पंजे) तयार होतात. स्नायूंच्या मदतीने आतबाहेर होऊ शकणारी तीक्ष्ण नखे, लांब सुळे इ. वैशिष्ट्ये असतात. उदा., कुत्रा, कोल्हा, लांडगा, मांजर, वाघ, सिंह, चित्ता, अस्वल, सील, मुंगूस इत्यादी.

(२) हत्ती : नाकापासून सोंडेची निर्मिती, पुढच्या दातांपासून हस्तिदंत, भरभक्कम पाय आणि जाड शुष्क त्वचा.


(३) विषमखुरी : तळहात किंवा तळपाय पूर्णपणे जमिनीवर टेकून चालण्याऐवजी बोटांवर किंवा चवड्यांवर चालण्याचा प्रयत्न करून प्राण्यांची गती वाढली. अधिक उंचीवरील (वनस्पतींच्या) भागापर्यंत पोहोचणेही शक्य झाले. या प्रयत्नात पाच बोटांपैकी सर्वांत लांब म्हणजे तिसरे बोट किंवा त्याच्याजवळची बोटे (चौथे व दुसरे) विकसित होऊन बाकीची जमिनीस न टेकल्यामुळे नामशेष झाली. बाहू व प्रबाहू किंवा मांडी व पाय येथील हाडे आखूड होऊन त्यापुढील हाडे (तळहात, तळपाय, बोटे) अधिक लांब झाली. टेकणाऱ्या बोटाचे शेवटचे हाड पसरट होऊन त्यातून खूर निर्माण झाले. यातूनच घोडा, गेंडा, पाणघोडा व तत्त्सम प्राणी आपल्याला दिसतात. अधिक लांब बाह्य कर्ण, लांब मान, घ्राणेंद्रियांची तीक्ष्णता, जाड त्वचा, संरक्षणकारक रंगसंगती इ. इतर वैशिष्ट्ये त्यात दिसतात.

(४) समखुरी : याच प्रक्रियेत फक्त तिसरे व चौथे बोट वाढून दोन खुरी प्राणी तयार झाले. शेळी, मेंढी, गाय, हरीण, डुक्कर, जिराफ, उंट यांसारखे प्राणीही त्यांची उदाहरणे आहेत. जलद चालीबरोबरच यातील काहींना संरक्षणासाठी शिंगे प्राप्त झाली आहेत. हे सर्व प्राणी शाकाहारी असून स्वतः वन्य प्राण्यांचे भक्ष्य म्हणून बळी पडू शकतात.

नखर प्राणी : ज्या सस्तन प्राण्यांमध्ये हातापायांची सामान्य रचना फारशी बदलली नाही अशा प्राण्यांपैकी अनेक नामशेष झाले. काहींनी जमिनीपेक्षा झाडावर राहणे पसंत केले. काहींनी मुंग्यासारखे अपृष्ठवंशी प्राणी आहार म्हणून स्वीकारले, तर काहींनी फळे व पाने यांचा आहारात समावेश केला. या सर्व प्राण्यांचा नखर या गटात समावेश होतो. वटवाघूळ, चिचुंदरी, आर्मडिलो, छछुंदर, जाहक यांसारख्या अनेक प्राण्यांचा यात समावेश होतो परंतु या गटातील सर्वांत महत्त्वाचा उपगट म्हणजे नरवानर या गणाचा होतो. यातच मानवाचा समावेश होतो.

नरवानर गण आणि मानव : जमिनीवरील संचार सोडून बहुतांश जीवन झाडावर राहणाऱ्या आणि वनस्पतिजन्य आहार घेणाऱ्या सस्तन प्राण्यांमधून ⇨नरवानगर गण निर्माण झाला. अशा प्रकारच्या जीवनातून क्रमविकसित झालेली शरीरिक वैशिष्ट्ये त्या वर्गातील गोरिला, चिंपँझी, मानव यांसारख्या प्राण्यांना परत जमिनीकडे वळल्यानंतरही उपयोगी पडत राहिली. फांद्या घट्ट पकडण्यासाठी हातापायांना असलेली पाचपाच लांबट बोटे, चपटी नखे, पाठ उचलून कण्याचा शेवटचा भाग झाडावर टेकून बसण्यास योग्य अशी कंबरेची रचना, आंगठा व शेजारचे बोट यांची टोके एकमेकास टेकू शकतील अशी हाताची चिमट्यासारखी रचना, तीक्ष्ण श्रवणेंद्रिये, दोन्ही डोळ्यांच्या मदतीने दृष्टीस पडलेल्या वस्तूच्या खोलीचा अंदाज घेण्याची क्षमता व बहुविध कार्ये करणारा मोठ्या आकाराचा मेंदू ही याची वैशिष्ट्ये म्हणता येतील.

नरवानर गणातील सध्या अस्तित्वात असलेल्या प्राण्यांच्या निरीक्षणातून होमो (मानव) या प्रजातीचा क्रमविकास स्पष्टपणे लक्षात येतो. यातील महत्त्वाचे प्राणी खालीलप्रमाणे :

उपगण पूर्ववानर : झाडांमध्ये राहणारे लेमूर, गॅलॅगो, पोट्टो, लोरिस, टार्सिअर, आय-आय, सिफाका हे प्राणी मुख्यतः निशाचर, कीटकभक्षक, शरीराच्या मानाने लांब व केसाळ शेपटी असलेले आणि लांबट तोंडाचे असतात. गंध संवेदन तीव्र असून डोळ्यांची ठेवण एकमेकांपासून अपसारी अक्ष निर्माण करणारी असते. त्यामुळे दृष्टीला त्रिमिती ज्ञानाचा फायदा मिळत नाही. लेमूरशिवाय इतरांच्या नेत्रपटलात केवळ शलाकाकोशिका असतात, शंकुकोशिका नसतात. हातापयांची चौथी बोटे सर्वांत लांब असतात व पहिले (आंगठा) आत वळून फांदी पकडण्यासाठी उपयोगी पडते. गर्भाशय दुहेरी (द्विशृंगी) असून बाह्य जननेंद्रियांमध्ये प्रजननाच्या मोसमानुसार ग्रंथिस्रावनिर्माण करणारे बदल होत असतात. टोकदार दात आणि बोटे यांच्या मदतीने झाडाचा पृष्ठभाग किंवा फांद्यांमधील फटी खरडून तेथे लपलेले कीटक बाहेर काढून खाण्यासाठी हे प्राणी सक्रिय असतात. मांजरांपेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे या वर्गातील बहुतेक सर्व प्राणी जमिनीवर किंवा झाडांच्या फांद्यांवर सारख्याच सहजपणे वावरू (हिंडू) शकतात. फळे किंवा पानेही ते खातात.

उपगण मानवसदृश : (अँथ्रोपॉयडिया). या उपगणात गंधसंवेदनाची क्षमता कमी होऊन श्रवणेंद्रिये, दृष्टी व हातापयांच्या बोटांतील स्पर्शसंवेदन अधिक तीव्र झालेले आढळते. नाकाचा उपयोग कमी झाल्याने चेहरा निमुळता नसून अधिक सपाट दिसू लागला आहे. त्यावर भावदर्शक हालचाली निर्माण करणारे स्नायू त्वचेखाली विकसित होत आहेत. दोन्ही डोळ्यांचे अक्ष समांतर होऊन दृष्टिक्षेत्रे परस्परव्यापी झाल्यामुळे खोलीचे बोधन होत आहे. ध्वनिसंकेतांनी एकमेकांशी संवाद साधणे, दिवसा हिंडणे, शोधक हालचाली, व्यापक क्षेत्रात हिंडून वनस्पतिजन्य आहार घेणे इ. वैशिष्ट्ये या उपगणात आढळतात. संवेदनाच्या व्यापाराबरोबर मेंदूची वाढही होऊन डोक्याचा आकार गोलाकृती झाला आहे. मेरुरज्जूशी मेंदूचा संबंध जोडणारे कवटीचे बृहद्‌रंध मागील बाजूस नसून तळाकडे सरकले आहे. प्रमस्तिष्काच्या (मोठ्या मेंदूच्या) वाढीबरोबर त्याला पृष्ठभागांवर घड्या पडून सीता (खाचा) व संवेलक यांची निर्मिती झाली आहे. गर्भाशय एकाच कप्प्याचा असून त्यात आवर्ती बदल घडून येऊन ऋतुस्रावाचे चक्र सुरू झाले आहे. पिलाची पूर्ण वाढ होऊन प्रौढ निर्माण होण्यास लागणारा काळ ७ ते २० वर्षे इतका दीर्घ झाला आहे.

अँथ्रोपॉयडिया उपगणात माकडांची दोन अधिकुले आणि वानर व मानव (होमिनॉयडिया अधिकुल) यांचा समावेश होतो.

(१) सेबॉयडिया : दक्षिण अमेरिकेतील या अधिकुलात लांब शेपटी व लांब हातपाय असलेली काही माकडे आपल्या परिग्राही शेपटीच्या घट्ट पकडीने संपूर्ण शरीराचा भार उचलू शकतात. स्पायडर माकड आपल्या सु. तीस मणक्यांच्या शेपटीचा उपयोग पाचव्या पायासारखा करून फांद्यांना लटकत जंगलात दूरवर हिंडू शकते. याशिवाय चतुष्पादीय संचार, दोन पायांनी जमिनीवर चालणे, उड्या मारत जाणे इ. अनेक प्रकारांनी त्याला कोणत्याही दिशेने लीलया संचार करणे अगदी सहज शक्य असते. या अधिकुलातील कॅप्युचिन, निशाचर घुबडी माकड, हाउलर माकड, मार्मोसेट इ. प्राणी थोड्याफार फरकाने अशीच काही वैशिष्ट्ये दाखवितात. मार्मोसेट एका वेळी २-३ पिलांना जन्म देते.

(२) सर्कोपिथेकॉयडिया : आशिया व आफ्रिकेतील या अधिकुलात बॅबून, मॅकॉक (ऱ्हीसस), मॅंड्रिल, लंगूर, ग्वेनॉन, कोलोबस इ. माकडांचा समावेश होतो. जंगलात झाडावर आणि माळरानात जमिनीवर अशा दोन्ही ठिकाणी वेगाने धावणाऱ्या मिश्राहारी ⇨बॅबूनची रचना या वर्गाची वैशिष्ट्ये दाखविते. लवचीक पाठीचा कणा धावताना मागेपुढे वाकू शकतो आसनास्थीच्या कठीण उंचवट्यांमुळे जमिनीवर बसता येते शेपटीचा उपयोग लटकण्यासाठी होत नसल्याने ती लहान असते चार पायांवर धावण्यासाठी बोटांची लांबी कमी असते आंगठा मोठा व चिमटीत वस्तू पकडण्यास सक्षम अशा रीतीने हालू शकतो. अशा रीतीने ही माकडे झाडावरून परत जमिनीकडे वळण्याच्या क्रमविकासाच्या तयारीचे काही टप्पे स्पष्टपणे दर्शवितात. बॅबूनखेरीज इतर माकडांमध्ये हे बदल कमी प्रमाणात असून ती मुख्यतः झाडावर राहून पाने व फळे या आहारावर जगतात. [⟶ माकड].

(३) होमिनॉयडिया : हे वानर आणि मानव यांच्या अधिकुलाचे नाव आहे. कारण मानवाची बरीच वैशिष्ट्ये प्रकट होण्यास सुरुवात झालेली येथे आढळते. वानर कुलामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या प्राण्यांना मानवसदृश किंवा महाकाय कपी (वानर) असेही म्हणतात. माकडांपेक्षा मोठ्या आकाराच्या या वानरांपैकी ⇨चिंपॅंझी हा त्यातल्या त्यात लहान आकाराचा, कमी ताकदीचा आणि मानवाशी सर्वाधिक सादृश्य दाखविणारा प्राणी आहे. इतरांमध्ये गिबन (हायलोबेटीस), ओरॅंगउटान आणि गोरिला यांचा समावेश होतो. [⟶ मानवसदृश कपि].

हे सर्व वानर आपल्या शरीराच्या मोठ्या आकारामुळे झाडांवर तोल सांभाळून चालू शकत नाहीत. त्यामुळे दोन्ही हातांनी फांदीला घट्ट धरून एका फांदीकडून दुसरीकडे झेप घेण्याची बाहुसंचलन पद्धत त्यांनी अवलंबलेली आहे. हातांची लांबी पायांपेक्षा अधिक होऊन शेपटी नाहीशी होणे, छातीची रुंदी वाढणे, उरोमेखला अधिक स्नायुमय होणे, पंजे मोठे व मजबूत होणे, मानेची लांबी वाढणे यांसारखे बदल बाहुसंचलनामुळे घडून आले आहेत. कटिभागाची लांबी कमी असून त्याखालचा त्रिकास्थी भाग लांब झाला आहे. जमिनीवर चालण्यासाठी तळपायाची लांबी व रुंदी वाढून पायाचा आंगठा लहान होऊन तो इतर बोटांना समांतर होऊ लागला आहे. दोन पायांवर चालण्याचा प्रयत्न केल्यास तोल जात असल्यामुळे मधूनमधून हात टेकावे लागतात. या पद्धतीने अर्धोन्नत (ओणवे) होऊन चालताना हाताच्या चार बोटांच्या दुसऱ्या हाडांचा स्पर्श जमिनीवर होतो ती अधिक मजबूत झालेली दिसतात. गिबनशिवाय इतर वानर या पद्धतीचा अधिक अवलंब करतात. तळहात किंवा बोटांचा आतील भाग जमिनीस न टेकता नखांच्या बाजूचा पृष्ठभाग टेकतो. त्यामुळे हातांचे स्पर्शसंवेदन सुरक्षित राहते. माकडांपेक्षा मेंदूच्या आकारात वाढ झालेली दिसते. पाठीचा कणा सरळ किंवा किंचित अंतर्वक्र असतो. चिंपॅंझीमध्ये चेहरा अधिक भावदर्शक आणि स्वरयंत्र अनेक प्रकारचे सुस्पष्ट आवाज निर्माण करणारे असते. या सर्व वानरांची ग्रहणशक्ती माकडांपेक्षा अधिक असल्यामुळे त्यांना माणसांच्या सवयी शिकविणे कठीण नसते.

वानर कुलापेक्षा अधिक प्रगत कुलाचे होमिनिडी (मानुष) असे नाव असून त्यात आधुनिक मानव आणि त्याचे पूर्वज यांचा समावेश होतो. गेल्या सु. १० ते २० लक्ष वर्षांमध्ये ही प्रगती झाली असावी. या काळातील जीवश्मांच्या अभ्यासावरून अनुमान केलेल्या ऑस्ट्रॅलोपिथेकस, रामपिथेकस यांसारख्या जाती आणि त्यामानाने नंतरच्या म्हणजे ५ ते १० लक्ष वर्षांपूर्वीच्या उन्नतावस्थेतील मानुष (होमो इरेक्टस) आणि कुशल मानुष (होमो हॅबिलिस) या प्रजाती नामशेष झाल्या असून विचारशील मानुष (होमो सेपियन) ही प्रजाती आता अस्तित्वात आहे. ती गेल्या ५ लाख वर्षांत विकसित झालेली असावी, असे मानले जाते. [⟶ मानवप्राणी].


या सर्व क्रमविकासात चिंपॅंझी किंवा त्यासारख्या वानरांपासून मानवाची निर्मिती होताना झालेली शारीरिक परिवर्तने मुख्यतः कंकाल सांगाडा आणि स्नायूंमधील असून त्यांच्या आनुषंगाने मेंदूतही अनेक बदल झाले. ताठ होऊन दोन पायांवर चालण्याच्या बदलामुळे पाठीचा कणा प्रथम सरळ होऊ लागला परंतु मान उचलून दृष्टी सरळ समोर ठेवण्याच्या प्रयत्नामुळे लवकरच त्यात मानेच्या भागात पुढे बाक निर्माण झाला. दोन पायांवर तोल सांभाळण्याच्या क्रियेत उदरपोकळीच्या भागात आणखी एक बाक तयार झाला. अशा रीतीने पुढे दोन वक्रता व उरीय भागात अंतर्वक्रता असा कणा तयार होऊन त्यातून संपूर्ण शरीराचे वजन कटिमेखलेकडे व तीमधून मांड्यांच्या हाडांकडे टाकले जाऊ लागले. त्रिकास्थी व त्याखालील कण्याचा भाग (माकडहाड) यांचा आकार लहान झाला. कार्यक्षम चालीसाठी गुडघे एकमेकांच्या जवळ आले परंतु मोठ्या डोक्याच्या अर्भकास जन्म देण्यासाठी श्रोणिमेखला रुंदच राहिली, त्यामुळे मांडीच्या हाडांचा आकार तिरका झाला. उन्नतस्थिती स्थिर ठेवण्यासाठी नितंबाचे व कंबरेच्या आतील व बाहेरील स्नायू बळकट आणि आकराने मोठे झाले. त्यांच्यासाठी बंधस्थानाचा अधिक पृष्ठभाग मिळावा म्हणून श्रोणिफलकास्थीसारख्या हाडांचा पसरट भाग विस्तारून श्रोणींचा बाहेरील भागही मोठा झाला. एकामागून एक पाऊल टाकताना संपूर्ण शरीराचा भाग एकाच पावलावर पडत असल्यामुळे पावलांची कमान, टाचेचे हाड आणि पायाचा आंगठा यांचे ऊतक अधिक मजबूत झाले. पावलातील पाच पादास्थींची रुंदीही वाढली.

शरीराचा भार तोलण्याचे कार्य संपल्यामुळे हात (बाहू, प्रबाहू इ.) सडपातळ झाले. कुशल कामांसाठी आवश्यक असे बोटांचे स्नायू व मनगटाचे सांधे अधिक कार्यक्षम होऊ लागले. झाडांवर किंवा उघड्या जमिनीवर न राहता सुरक्षित गुहांचा आश्रय घेतल्यामुळे शरीराचा केसाळपणा कमी झाला. उन्नतावस्थेत राहण्याच्या सवयीमुळे छातीच्या पिंजऱ्याचे वजन उदराच्या दिशेने ओढले जाऊन श्वसनमार्ग मुखग्रसनीपासून काहीसा खाली सरकला. याचा परिणाम स्वरयंत्र आणि तालू यांमधील नळीसारखी जागा अधिक लांबट होऊन त्यातील अनुस्पंदक गुणामुळे मानवाच्या आवाजातील कर्कशता कमी होण्यात झाला. जीभ, ओठ आणि दात यांच्या मदतीने वायुमार्गावर नियंत्रण ठेवून मानवाला विविध प्रकारचे ध्वनी निर्माण करणे शक्य झाले. यातूनच श्राव्य संकेतांवर आधारित भाषा तयार झाल्या. हातांचा उपयोग केल्यामुळे पुढचे दात व सुळे यांचा उपयोग कमी होऊन आकार लहान झाला. दातांची कवळी अर्धवर्तुळाकार होऊन खालचा जखडा थोडा मागे सरकल्यामुळे चेहऱ्याची ठेवण अधिक सपाट व हनुवटी टोकदार झाली.

इतर संवेदनांच्या विकासामुळे गंधसंवेदनेची तीव्रता कमी होऊन मेंदूमधील संबंधित क्षेत्र लहान झाले परंतु दृष्टी, श्रवण, स्पर्श आणि स्वाद यांसारख्या संवेदनांचे ग्रहण, त्यांचा एकमेकांशी संबंध जोडून अर्थ लावणे आणि तो स्मृतीमध्ये साठविणे यासाठी आवश्यक चेताकोशिकांची संख्या वाढून मेंदूचा आकार वाढला. हालचालीवर नियंत्रण ठेवण्याच्या कोशिकाही वाढल्या. त्यामुळे मेंदूची डोळ्यांच्या पातळीपेक्षा किती तरी उंच वाढ होत गेली. कवटीची उंची वाढून उंच कपाळ, दोन्ही बाजूंनी आणि पाठीमागे विस्तारलेले केशाच्छादित डोके आणि काहीसा निमुळता सपाट चेहरा यांमुळे माणूस वानरापेक्षा निराळा दिसू लागला. विविध वेशांमध्ये शरीरचनेत थोडेफार फरक आढळतात.

पहा : क्रमविकास नरवानर गण पक्षिवर्ग पुराप्राणिविज्ञान पृष्ठवंशी मानवप्राणी मानवसदृश कपि सरिसृप वर्ग स्तनी वर्ग.

संदर्भ : 1. Eccles, Sir John C. Evolution of the Brain : Creation of the self, London, 1989 

           2. Goodall, Jane, The Chimpanzee : The Living Link Between Man and Beast, Edinburgh, 1992. 

           3. Laverack, M.S.  Dando J. Lecture-notes and Invertebrate Zoology, Oxford, 1987. 

           4. Rogers, Elizabeth, Looking at Vertebrates, England, 1986. 

           5. Young J. Z. The Life of Vertebrates, Oxford, 1983.

श्रोत्री, दि. शं.