हिरुडिनिया : ॲनेलिडा (वलयी प्राणिसंघ) या संघातील एक वर्ग. या वर्गात जळवांच्या सु. ३६० जातींचा समावेश होतो. मॉलस्क व पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांचे रक्त शोषून त्या आपली उपजीविका करतात. [→जळू]. 

 

हिरुडिनिया वर्गातील प्राण्यांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत : (१) बहुतेक प्राणी बाह्यपरजीवी असून ते रक्तशोषक (रक्तचूषक) आहेत. ते गोड्या वा खाऱ्या पाण्यात राहतात. काही प्राणी दमट मातीत राहतात, तर काही अंतःपरजीवी (दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरात राहणारे) आहेत. (२) प्राण्यांचे शरीर लांब वा वाटोळे, खंडयुक्त असून खंड वलयाकार आणि सारखे असतात. शरीर पृष्ठीय व अधर बाजूने चपटे वा दंडगोल असून ०.५–४५ सेंमी. लांब असते. (३) शरीरावरील कायखंडांची संख्या ठराविक असून बाह्यभागावर २–५ गौण वलये असतात. (४) शरीराच्या अग्र (पुढच्या) व पश्च (मागच्या) टोकाशी एकेक चूषक असतो. मुख अग्रचूषकात व गुद्द्वार पश्चचूषकाच्या लगेच पुढच्या पृष्ठावर असते. दोन्ही चूषक अंतःपरजीवी प्राण्यात परजीवीस पकडून ठेवण्यास मदत करतात. (५) अग्रचूषक व पश्चचूषक आलटून पालटून जमिनीस चिकटतात. शरीर पुढे ओढले जाते व चूषक सुट्टे होतात. अशा प्रकारे प्राणी हालचाल करतात. (६) या प्राण्यांमध्ये संस्पर्शक, पार्श्वपाद व चिटे नसतात. (७) डोक्यावर (मस्तकावर) संयुक्त परंतु इतर कोणतेही अवयव नसतात. (८) देहगुहा मोठ्या प्रमाणावर कमी झालेली असून लहान-मोठी रक्तकोटरे (रक्त असणाऱ्या पोकळ्या– खळगे – वगैरे) तिचे द्योतक आहेत. देहगुहेत मृदूतक हाद्रव पदार्थ भरलेला असतो. (९) शरीर स्नायूपासून बनलेले असूनत्यामध्ये आकुंचन व प्रसरणाची शक्ती असते. (१०) रक्तवाहिन्यांच्या भित्ती स्नायुमय असतात. (११) हे प्राणी उभयलिंगी (नर आणि मादी यांची जननेंद्रिये एकाच प्राण्यात असणारे) असतात. या प्राण्यात वृषण असंख्य असून त्यांची व वृषकांची रचना खंडयुक्त असते. अंडाशयाची एकच जोडी असून मैथुनांगही असते. (१२) शरीराच्या अंतर्गत अंडाचे फलन होते. गर्भाची वाढ सरळ व रूपांतरण पद्धतीने कोशात होते. काही जातींत प्राण्यास जन्म दिला जातो. 

 

या वर्गात पुढील चार गणांचा समावेश होतो : 

 

ॲकँथॉब्डेलिडा : (१) या गणातील प्राण्यांच्या शरीरात २० खंड असतात. (२) अग्रचूषक नसतो. पश्चचूषक हे विकसित झालेले असून यात चार खंड असतात. (३) प्राण्याच्या अधर-पार्श्व बाजूस पहिल्या पाच खंडापर्यंत शूकाच्या दोन रांगा असतात. (४) देहगुहेचे अर्धवट विभाजन २० आडव्या पडद्यांनी झालेले असते. (५) वक्कक (उर्त्सजन करणारे अवयव) प्रत्येक खंडात असून ते छिद्राद्वारे बाहेरील बाजूस उघडतात. (६) रक्ताभिसरण तंत्रामध्ये पृष्ठीय व अधर रक्तवाहिन्या असतात. (७) तंत्रिका तंत्रात २० अधर गुच्छिका असतात. त्यांपैकी पहिली व शेवटची संयुक्त असते. (८) हे प्राणी ऑलिगोकीटा व हिरुडिनिया या दोन्ही प्राण्यांचे गुणधर्म दाखवितात. यावरून ते या दोहोंमधील दुवासाधणारे प्राणी आहेत, असे मानले जाते. (९) उदा., ॲकँथॉब्डेल. 

 

ऱ्हिंकॉब्डेलिडा : (१) या गणातील प्राणी खाऱ्या किंवा गोड्या पाण्यात राहणारे परजीवी प्राणी आहेत. (२) या प्राण्यात बाहेर येणारा शुंड असतो. (३) जबडे व चिटे नसतात. (४) रक्ताभिसरण तंत्र स्वतंत्र असून देहगुहा कोटरे रक्ताभिसरण तंत्रापासून वेगळी असतात. रक्त रंगहीन असते. (५) शरीरात २, ३, ६ किंवा १२ खंड असतात. (६) कोशातून गर्भ बाहेर पडतो. कोशात श्वेतक द्रव्य नसते. (७) उदा., पिसीकोला व प्लॅकोब्डेला. 

 

ग्रॅथॉब्डेलिडा : या गणातील हिरुडिडी व हेमाडीस्पीडी ही कुले आहेत. (१) या गणातील प्राणी खाऱ्या व गोड्या पाण्यात राहणारेआहेत. (२) ग्रसनी बाहेर येत नाही. (३) जबड्यात तीन दात असतात. (४) रक्त तांबड्या रंगाचे असते. (५) प्रत्येक खंडात पाच गौण वलये असतात. (६) गर्भ बाहेर पडल्यावर तो कोशातील श्वेतक द्रवात काही काळ राहतो. (७) उदा., हिरुडो, फिलोब्डेला व फायटोबेला. 

 

हर्पॉब्डेलिडा : (१) या गणातील प्राणी गोड्या पाण्यात राहणारे असून मांसभक्षक आहेत. (२) ग्रसनी बाहेर येत नाही. (३) जबडा वा दात नसतात. (४) उदा., डीना व ट्रोकिटा. 

 

जळवांचे महत्त्व : हीमाडिप्सा या जमिनीवरील जळवा हिमालय, सिक्कीम व आसामच्या डोंगराळ उतारावर आढळतात. घोडा, गाय, कुत्रा या प्राण्यांचे रक्त शोषून त्या आपली उपजीविका करतात. ‘कॅटल लिचेस’ जंगलात चरण्यास गेलेल्या गायी व म्हशीचे रक्त शोषून उपजीविका करतात. प्राण्यांस चिकटलेल्या जळवा सोडविण्यासाठी ब्राईन (अति-खारट पाणी), अल्कोहॉल व व्हिनेगर या द्रवांचा वापर करतात. 

 

फार प्राचीन काळापासून भारतात व जगातील इतर देशांतही रोगी व्यक्तीचे दूषित रक्त त्यास वेदना न होता शोषून घेण्यासाठी जळवांचा वापर केला जात असे. ग्रीक वैद्यकशास्त्रात देखील जळवांचा वापर उपचारा-साठी केला जात असे. जखमांवरील सूज कमी करण्यासाठी हिरुडो मेडिसिनॅलिस ही जळवांची यूरोपियन जाती वापरली जात असे. याउपचार पद्धतीस ‘लिचरी’ असे म्हटले जात असे. अमेरिकेत मॅक्रोब्डेला डेकोरा ही जळवांची जाती उपचारासाठी वापरली जात असे. याजातीची कृत्रिम पैदासही केली जात असे. 

भारतात प्राचीन काळापासून आयुर्वेदात जळवांचा वापर करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील वैद्य देखील जळवांचा वापर करत असत. पांढरे होणारे केस व वार्धक्याची लक्षणे यांवरील उपचारासाठी जळवांचा वापर केला जात असे. मटेरिया मेडिका या ग्रंथानुसार जळवांचा वापर मूळव्याध, टॉन्सिल व खल (टक्कल) यांवरील उपचारासाठी करतात. जळवांपासून हिरुडीन हा पदार्थ मिळविला जात असे. सध्या याची जागा आधुनिक रक्तक्लथन प्रतिबंधक औषधांनी घेतली आहे. आजही भारतात तसेच यूरोपात जळवांचा विविध उपचारांसाठी वापर केला जातो. 

 

पहा : ॲनेलिडा जळू. 

पाटील, चंद्रकांत प.