वर्मा ज्ञानींद्र सुधींद्र : (२१ फेब्रुवारी १९१८-  ). आधुनिक ओडिया कवी व लेखक. जन्म कटक जिल्ह्यातील कुसुपूर गावी. स्वयंशिक्षित व्यक्तिमत्त्व. पेशाने पत्रकार. काव्य, नाटक, कथा, कादंबरी अशा विविध वाङ्‍मयप्रकारांत त्यांनी भरीव कामगिरी केली. त्यांचे बोले हुँटी हे काव्यनाट्य १९४० मध्ये प्रसिद्ध झाले व अत्यंत लोकप्रिय ठरले. टी. एस्. एलियट, एझरा पाउंडप्रभृती पाश्चात्त्य साहित्यिकांच्या साहित्यकृतींची त्यांनी ओडियामध्ये भाषांतरे केली. शताब्दिर स्वप्‍नभंग (१९४३), लाल घोडा (१९४७), कोरा बाजार चाबूक (१९५०), शेष-अभिसार (१९५२), भूमिका (१९५४), तिनाति हृदयर कहानी (१९५५), अपराहनार आकाश (१९६५) ह्या त्यांच्या प्रमुख कादंबऱ्या होत. कथयंती (१९६७) हा दर्जेदार कथासंग्रह, संदर्भ संचयन (१९५२) हा टीकाग्रंथ, एक रात्री (१९४९) व रत्‍नरेखा (१९५२) हे काव्यसंग्रह, ही त्यांची अन्य उल्लेखनीय ग्रंथसंपदा होय. त्यांच्या काव्यातून खऱ्याखुऱ्या आधुनिक व प्रगतिशील मनाचा आविष्कार दिसतो, तसेच मुक्त विचारसरणी व मूर्तिभंजक वृत्ती ह्यांचा प्रत्यय येतो. कुठेही ढोंग, दांभिकता आढळली, की त्यांवर ते आपल्या काव्यातून औपरोधिक शैलीद्वारा कडाडून हल्ला चढवितात पण कित्येकदा त्यांच्यातला विचारवंत कलावंतावर मात करताना दिसतो.

दास, कुंजविहारी मिश्र, नरेंद्र (इं.) इनामदार, श्री. दे. (म.)