तुपीअन : दक्षिण अमेरिकेतील अमेरिकन इंडियन जमातींच्या समूहाचे नाव. तुपी वा तुपी–ग्वारानी किंवी टुपी या नावांनीही हा समूह ओळखला जातो. हा भाषिक समूह असून दक्षिण अमेरिकेतील सर्वांत मोठा भाषिक गट आहे. या समूहाने लोअर ॲमेझॉन, टपझॉस, शिंगू, टोकँटीन्स व ब्राझीलचा किनारा हा प्रदेश व्यापला आहे. पोर्तुगीज लोक ब्राझीलमध्ये प्रथम आले, तेव्हा ब्राझीलवर मुख्यत्वे या लोकांचीच सत्ता होती त्यांची शेती फार संपन्न असून ते अनेक कलांत वाकबगार होते. त्यांच्या भाषा प्रगल्भ आहेत. शिकार व मच्छीमारी हेच त्यांचे सुरुवातीस व्यवसाय होते. ते कपडेही फारच कमी वापरीत. पिसे व अलंकार यांनी ते आपले शरीर भूषवीत. त्यांची ओष्ठभूषणे ओठाला भोक पाडून त्यात अडकवितात. ते सामुदायिक घरांत राहतात. ही घरे म्हणजे कुडाच्या भिंती असलेल्या मोठ्या झोपड्या असतात. त्यांच्यात पितृसत्ताक कुटुंबपद्धती अस्तित्वात आहे.

तुपीअन जंगले तोडून व जमीन जाळून त्या ठिकाणी शेती करतात आणि बटाटे, मका, वाटाणा, घेवडा, कापूस इ. पिके काढतात. हे उत्तम दर्यावर्दी आहेत. त्यांची नौकानिर्मितीबद्दल ख्याती आहे. एका नौकेत ६० माणसे बसू शकतात. धनुष्य, राळ व गदा हीच त्यांची मुख्य शिकारीची साधने होत. ते मृतांना मोठ्या मृत्पात्रात घालून पुरीत. समुद्रकिनाऱ्यावरच्या तुपींची भाषा ख्रिस्ती मिशनऱ्यांनी त्या भागातील भाषा बनविली. त्यांच्यापैकी बहुसंख्य लोक त्यामुळे ख्रिस्ती झाले. त्यांचा मूळ धर्म शामानप्रणीत असून एकूण धार्मिक समारंभ कमी प्रमाणात आढळतात.

संदर्भ : Steward, J. H. Ed. A Handbook of South American Indians, Vol. 3, New York, 1948.

भागवत, दुर्गा