ब्रिॲन्स्क : सोव्हिएट रशियाच्या ब्रिॲन्स्क विभागाची (ओब्लास्ट) राजधानी व देशातील एक प्रमुख औद्योगिक शहर. लोकसंख्या ४,०७,००० (१९८१). हे मॉस्कोच्या नैऋत्येस ३३६ किमी. द्यिस्ना नदीकाठी वसलेले आहे. लोहमार्ग प्रस्थानक म्हणून विशेष प्रसिद्ध. प्रथम ‘ब्रिन्य’ व तदनंतर ‘देब्रिॲन्स्क’ म्हणून ओळखले जाणारे हे शहर ११४६ मध्ये वसविले गेले. मध्ययुगात हे तत्कालीन रशियाच्या दक्षिण सरहद्दीवर असल्याने येथील किल्ल्यास लष्करी दृष्ट्या मोठेच महत्व होते. त्या काळात (सु. १४०० ते १६००) हे लिथ्युएनियाच्या ताब्यात होते पुढे हे रशियाच्या अंमलाखाली आले. दुसऱ्या महायुद्धात काही काळ (१९४१ – ४३) ते जर्मनांच्या ताब्यात होते.

महायुद्धोत्तर काळानंतर ब्रिॲन्स्क-ब्येझित्सा या औद्योगिक परिसराचे हे केंद्र बनले. येथे लोखंड, पोलाद, यंत्रसामग्री, लाकूडकाम, सिमेंट, मांसप्रक्रिया, मोटारी इ. उद्योगधंदे विकसित झालेले आहेत. नैसर्गिक वायू वितरणाचे प्रमुख केंद्र म्हणूनही यास महत्व आहे.

गाडे, ना. स.