पराग ज्वर : (हे फीव्हर). परागांच्या अधिहृषतेमुळे [→ॲलर्जी] उद्‍भवणाऱ्या आणि शिंका येणे, नाक चोंदणे व त्यातून पाणी गळणे, नाक, घसा व डोळे यांना खाज सुटणे ही प्रमुख लक्षणे असलेल्या मोसमी विकृतीला पराग ज्वर म्हणतात. पराग ज्वर हे नाव सर्वस्वी चुकीचे आहे. कारण परागाशिवाय बुरशी, बीजाणू (वनस्पतींचे सूक्ष्म प्रजोत्पादक घटक) व तांबेरा (एक प्रकारचे कवक म्हणजे बुरशीसारखी हरितद्रव्यरहित वनस्पती) यांसारखे अन्य अधिहृषता उत्पादक पदार्थही या रोगाचे कारण असू शकतात. शिवाय या विकृतीचे प्रमुख लक्षण ‘ज्वर’ कधीच नसते. किंबहुना त्याचा अभावच असतो. एके काळी या विकृतीला सामान्य माणूस ‘गुलाब ज्वर’ म्हणूनही संबोधीत असे.

इ. स. १५६५ पासून ज्ञात असलेल्या या रोगाचे उत्तम वर्णन १८१९ मध्ये जॉन बोस्टॉक या इंग्लिश शरीरक्रियावैज्ञानिकांनी प्रथम लिहिले. १८३१ मध्ये जॉन एलिअट्‍सन यांनी पराग कारणीभूत असल्याचे प्रथम सुचविले व १८७३ मध्ये ब्लॅकली यांनी संशोधनानंतर ही विकृती परागजन्य असल्याचे सिद्ध केले.

एका अंदाजाप्रमाणे एकट्या अमेरिकेत ५०,००,००० रोगी या विकृतीने पछाडलेले असावेत. परागांचे हवेतील प्रमाण हे त्यांची सांद्रता, स्थान, मोसम आणि हवामान यांवर अवलंबून असल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळ्या महिन्यांंत झाल्याचे आढळते. काही वृक्षांचे पराग आणि काही तणांचे पराग कारणीभूत असल्याचे आढळले आहे. वसंत ऋतूत वृक्ष पराग आणि ग्रीष्मात तण पराग हवेत अधिक सांद्रित होतात. भारतात होलोप्टेलिया या वंशातील व इतर गवतांमुळे पराग ज्वर आणि इतर अधिहृषताजन्य रोग होतात. अँब्रोशिया वंशातील रॅगवीड नावाच्या तणाचे (गवताचे) पराग हे अमेरिकेतील पराग ज्वराचे प्रमुख कारण आहेत. पडीत बखळीसारख्या जमिनीत कोठेही उगवणाऱ्या या गवताच्या एकाच झुडपापासून जवळजवळ २ x १० पराग तयार होतात. सर्वसाधारणपणे परागाचा व्यास २५ मायक्रॉन (१ मायक्रॉन = १०-३ मिमी.) असतो व ते हवेने सहज दूरवर नेले जातात. समुद्रकिनाऱ्यापासून सु. ६५० किमी. दूर  अंतरावरील समुद्रावर तसेच ४,२०० मी. उंचीवरही पराग सापडतात.

अदृश्य असणारे पराग जेव्हा अधिहृषता असलेल्या व्यक्तीच्या नाकातील श्लेष्मकलास्तरात (पातळ पटलमय बुळबुळीत अस्तरात) अडकतात. तेव्हा तेथील लायसोझाइम नावाचे एंझाइम (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणणारे प्रथिनयुक्त संयुग) त्याच्या कार्बोहायड्रेट वेष्टनाचा नाश करते व आतील प्रथिने मोकळी होतात. या प्रथिनांपैकी काही प्रतिजनोत्पादक (ज्यांच्यामुळे शरीरात विशिष्ट प्रतिकारक पदार्थ–प्रतिपिंडे–निर्माण होतात अशा द्रव्यांचे उत्पादक) असतात. त्यांपैकी दोन ज्ञात असून त्यांना ‘अँटिजेन ई’ व ‘अँटिजेन के’ अशी नावे देण्यात आली आहेत. शरीर त्याविरुद्ध प्रतिरक्षी पदार्थ (प्रतिपिंड) तयार करते. परिणामी प्रतिजन-प्रतिरक्षी विक्रियेचा परिणाम म्हणून अधिहृषताक्षम व्यक्तीतच रोगलक्षणे उद्‌भवतात.

नाक व डोळे या शरीरभागांमध्ये रोगलक्षणांचा विशेष भर आढळत असला, तरी सबंध शरीरच परागांना अधिहृषताक्षम बनलेले असते. पराग मोसम सुरू होताच नाक, टाळू, घसा आणि डोळे यांना खाज सुटते. डोळ्यांतून अश्रू वाहू लागून जोरदार शिंका येतात. नाकातून पाण्यासारखा पातळ उत्सर्ग सुरू होऊन नाक चोंदते व श्वासोच्छ्वासास त्रास होतो. ही रोगलक्षणे साध्या पडशापेक्षा अधिक जोरदार आणि एकदमच सुरू होणारी असतात. डोळे लाल होतात व सुजतात. नाकातील श्लेष्मकला सुजून निळसर लाल किंवा कधीकधी फिक्कट पडलेली आढळते.

पुष्कळ वेळा स्वानुभवानेच रोगी रोगनिदान करू शकतो. नाकाच्या श्लेष्मकलास्तराची तपासणी, इतर रोगलक्षणे, अधिहृषतेसंबंधीचा आनुवंशिक कौटुंबिक इतिहास आणि मोसमी प्रकार यांवरून निदान करणे सोपे असते. नाकातील उत्सर्गात रक्तानुरागी कोशिका (इओसीन या गुलाबी रंगाच्या रंजक द्रव्याने सहज रंगविता येणाऱ्या पेशी) बहुसंख्य आढळतात. रोगाची खात्री होण्याकरिता त्वचापरीक्षा दोन प्रकारांनी करता येते. एकीत त्वचेवर ओरखडा काढून त्यात पराग भरतात दुसरीत परागांचा अर्क अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) त्वचेत घालतात. १० ते १५ मिनिटांत दोन्ही प्रकारांत परीक्षेच्या जागी लालसर उंचवटा उत्पन्न होणे हे व्यक्त (निश्चित) प्रतिक्रियेचे लक्षण असते. अधिहृषताक्षम व्यक्तींपैकी ९५% व्यक्तींमध्ये ही परीक्षा खात्रीलायक निदानास उपयुक्त असते.

या रोगात उपद्रव सहसा आढळत नाहीत. मोसम संपताच रोगलक्षणेही नाहीशी होतात. मोसम संपल्यानंतरही रोग चालूच राहिल्यास कुत्रा, मांजर किंवा घोडा या प्राण्यांच्या त्वचेवरील कोंडा, घरगुती धुळीचे कण इ. अन्य अधिहृषता उत्पादक कारणांचा शोध करावा लागतो. अशा वेळी याच विकृतीला ‘बारमाही अधिहृषताजन्य नासिकाशोथ’ म्हणतात. ३०% व्यक्तींमध्ये फुप्फुसापर्यंत रोग पोहोचून दमा उद्भवण्याची शक्यता असते.

मोसमाच्या वेळी परागसंपर्क टाळणे प्रतिबंधात्मक ठरते. पराग उत्पादन वाढीच्या काळात ग्रामीण भागात जाण्याचे टाळणे, घराची दारेखिडक्या बंद ठेवणे, वातानुकूलित जागेत राहणे, विशिष्ट ठिकाण मोसमापुरते सोडून इतरत्र जाणे इत्यादींचा समावेश प्रतिबंधात्मक उपायांत होतो. नाकातील मोड किंवा इतर विकृतींवर शस्त्रक्रिया करून त्या नाहीशा करणे हितावह असते. नाकातील विशिष्ट श्लेष्मकलास्तराचे दाहकर्म करणे (दाहक पदार्थ, तप्त लोखंड, विद्युत् प्रवाह वा अन्य प्रकारे कोशिकासमूहाचा म्हणजे ऊतकाचा नाश करणे) किंवा त्यात झिंक सल्फेटाचे आयनीकरण करणे (एकदिश विद्युत् प्रवाहाच्या साहाय्याने ऊतकांमध्ये विरघळणाऱ्या लवणाचे आयन–विद्युत् भारित रेणू–आत घालणे) कधीकधी उपयुक्त ठरते. तोंडाने हिस्टामीनरोधके (सूक्ष्म रक्तवाहिन्या विस्फारणाऱ्या हिस्टामीन या संयुगाच्या क्रियेला रोध करणारी औषधे उदा., क्लोरफिनिरामीन) देतात. या औषधांनी पुष्कळ वेळा नाकासंबंधीच्या लक्षणांचा जोर कमी होऊन आराम पडतो. तसे न झाल्यास डेक्सॅमेथासोनसुक्त औषधाचा नाकात फवारा मारतात. जरूर पडल्यास तोंडाने कॉर्टिकोस्टेरॉइड औषधे देतात. मोसम सुरू होण्यापूर्वीच विशिष्ट परागापासूनच बनविलेल्या अर्काची वाढत्या मात्रेची अंतःक्षेपणे देण्याचा इलाजही उपयुक्त ठरला आहे. या इलाजाला विशिष्ट विसुग्राहीकरण म्हणतात.

संदर्भ : 1. Devidson, S. Macleod, J.,Ed. The Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1973.

   2. Harvey, A. M. and others, Ed. The Principles and Practice of Medicine, New Delhi, 1974.

देवधर, वा. वा. भालेराव, य. त्र्यं.