पीस : पिसे फक्त पक्ष्यांयच्या अंगावरच आढळत असल्यामुळे ⇨ पक्षी वर्गाचे ते एक वैशिष्य्ल आहे. पिसे विशिष्ट अधिचर्मीय (बाह्य त्वचेची) संरचना असून त्यांचे शरीरावर आच्छादन असते ते हलके, लवचिक आणि ऊष्मारोधक असते. शेपटी आणि पंखांवरील पातळ, सपाट पिसांचे पृष्ठभाग बनलेले असतात आणि ते उड्डाणाच्या वेळी पक्ष‌्यांचे शरीर उचलून धरून त्याला आकार देतात.

आ.१. पिसाचा (आवरण-पिच्छाचा) विकास: (अ) आणि (आ) सुरूवातीच्या अवस्था दाखविणारे छेद : (१) त्वचीय अंकुरक, (२) बाह्य त्वचा, (३) पिच्छ-अंकुरक, (४) चर्म (इ) नंतरच्या एका अवस्थेचे त्रिमितीय चित्र : (१) शृंगित आवरण, (२) पिच्छक, (३) रक्तवाहिनी, (४) पिच्छ-मज्जा (लगदा), (५) पिच्छ-पुटक, (६) बाह्य त्वचा, (७) चर्म.

 पिसाची उत्पत्ती आणि वाढ त्वचेवरील स्थानिक अंकुरकापासून (त्वचेवरील मऊ पेशीसमूहाच्या निमुळत्या लहान उंचवट्यापासून) होते आणि वाढ होत असताना त्याच्यावर असलेले अधिचर्माचे आच्छादन वर ढकलले जाते. या पिच्छ–मुकुलाचे (पिसाच्या अंकुराचे) बूड एका वाटोळ्या खळग्यात रुतते हा खळगा भावी पिच्छ-पुटक होय याच्या योगाने पीस त्वचेत घट्ट बसलेले असते. मुकुलावरील अगदी बाहेरच्या अधिचर्म-कोशिकांचा (पेशींचा) एक निव्वळ शृंगित (केराटीन नावाच्या तंतुमय प्रथिनाने युक्त असा) कोष (परित्वक) बनतो आणि आतल्या अधिचर्म-कोशिकांची समांतर शलाकांच्या स्वरूपात मांडणी होते एका मोठ्या मध्य शलाकेपासून भावी पिच्छ-दंड (पिसाचा दांडा) आणि इतरांपासून पिच्छक (पिसाच्या दांड्याच्या दोन्ही बाजूंना वाढणाऱ्या व पिसाचे पाते तयार करणाऱ्या वाढी) तयार होतात.

आ. २. (अ) प्रारूपिक उड्डाण-पिच्छ : (१) पिच्छाक्ष, (२)पिच्छदंड, (३) पिच्छ-फलक, (४) पिच्छक (आ) पिसाचा तपशील : (१) पिच्छ-दंड, (२) पिच्छक, (३) पिच्छिका (इ) पिच्छक आणि पिच्छिका यांची रचना दाखविणारे त्रिमितीय चित्र : (१) पिच्छ-दंड, (२) पिच्छक, (३) पिच्छिका, (४) अंकुशिका. मध्यभागी असणाऱ्या मऊ त्वचीय मज्जेत (मूळ त्वचा अंकुरकात) रक्तवाहीन्या असतात पोषण हे मज्जेचे एकमेव कार्य असते. पिसाची पूर्ण वाढ झाल्यावर मज्जा वाळते. म्हणून पीस ही निव्वळ अधिचर्मीय संरचना असते. पुटकामध्ये वाढ होत असताना अधिचर्म-कोशिकांत रंगाच्या उत्पत्तीकरीता वर्णकीचे (रंगद्रव्याचे ) निक्षेपण (साचण्याची क्रिया) होते आणि ते नंतर केव्हाही होत नाही. वाढ पूर्ण झाल्यावर कोष फुटतो आणि पक्षी आपल्या चोचीने तो काढून टाकतो. यानंतर पीस पसरून त्याचा खरा आकार दिसू लागतो. 

पिसांचे तीन मुख्य प्रकार आहेत : आवरण-पिच्छे, रोम-पिच्छे आणि कोमल-पिच्छे. यांपैकी आवरण-पिच्छे नेहमीच्या पाहण्यातली असली, तरी त्यांची रचना गुंतागुंतीची असते.

आवरण-पिच्छात सपाट पिच्छ-फलक (पिसांचे पाते) असून त्याला मध्य पिच्छ-दंडाचा आधार असतो हा दंड पिच्छ-पुटकात घट्ट बसलेल्या पिच्छाक्षाचा विस्तार असतो. पिच्छ-फलकाचा प्रत्येक अर्ध पुष्कळ, समांतर, बारीक पिच्छकांचा बनलेला असून ते पिच्छ-दंडाच्या दोन्ही बाजूंपासून निघालेले असतात. 


आ. ३ पिसांचे तीन मुख्य प्रकार : (अ) आवरण-पिच्छ : (१) अनुपिच्छ (आ) रोम-पिच्छ : (१) पिच्छक व पिच्छिका (इ) कोमल-पिच्छ : (१) पिच्छक व पिच्छिका. प्रत्येक पिच्छकाच्या समीपस्थ (जवळच्या) आणि दूरस्थ (दूरच्या) बाजूंवर असंख्य, लहान, समांतर पिच्छिका असून त्यांच्यावर सूक्ष‌्म अंकुशिका (बारीक आकडे) असतात. एकमेकींच्या समोर असणाऱ्या पिच्छिकांच्या ओळी अंकुशिकांनी सैलपणे जोडलेल्या असतात. पुष्कळ पिसांच्या पिच्छाक्ष व पिच्छ-दंड यांच्या जोडावर एक गौण पिच्छ-दंड आणि पिच्छ-फलक असतो, याला अनुपिच्छ म्हणतात. त्वचेतील स्नायू आणि लवचिक तंतूंच्या योगाने पक्ष्याला पिसे विस्कटता येतात किंवा ताठ उभी करता येतात आणि नंतर पुन्हा व्यवस्थित बसविता येतात. आवरण-पिच्छांमुळे पक्ष्यांच्या शरीराला आकार येतो. शेपटीवरील आणि पंखांवरील पिसांचा आवरण-पिच्छात समावेश करता येईल.

 रोम-पिच्छ एक लांब तंतूसारखा दंड असून त्याच्या टोकावर थोड्या पिच्छिकायुक्त कमजोर पिच्छकांचा झुपका असतो. ही पिसे शरीरावर तुरळक असतात काही आवरण-पिच्छांच्या पुटकांजवळ यांचे झुपके असतात. यांच्या कार्याविषयी माहिती नाही.

पुष्कळ पक्ष्यांच्या पिल्लांच्या अंगावर अंड्यातून बाहेर पडण्याच्या वेळी मऊ कोमल-पिच्छांचे आवरण असते आणि ते उत्कृष्ट रोधक असते. कोमल-पिच्छात एक आखूड पिच्छाक्ष आणि लहान पिच्छ-दंड असतो पिच्छक लांब व लवचिक असून त्यांवर आखूड पिच्छिका असतात. पुष्कळ पाणपक्ष्यांच्या आणि भूचर पक्ष्यांच्या आवरण-पिच्छांखाली कोमल-पिच्छे असतात.

पिसांची वाढ होत असताना झालेल्या वर्णकाच्या निक्षेपणामुळे पिसांचे रंग उत्पन्न होतात. सूर्यपक्ष्यांसारख्या काही पक्ष्यांच्या मानेवरील निळा व हिरवा रंग आणि विविध रंगांच्या छटा त्या जागी असलेल्या पिसांच्या पृष्ठीय रचनेत असलेली सूक्ष्म व पातळ तकटे आणि त्यांच्याखाली असणाऱ्या दाट वर्णकामुळे उत्पन्न होतात. पक्ष्यांमध्ये आढळणारा पांढरा रंग हा वर्णकामुळे नसून पिसातील केराटिनाच्या रेणूंमधील मोकळ्या जागेत हवा भरली गेल्याने आणि हवा व केराटीन यांची प्रकाशीय घनता (अपारदर्शकतेचे मान) भिन्न असल्यामुळे पिसांवर पडणारा बहुतेक पांढरा प्रकाश प्रकीर्णित झाल्याने (विखुरला गेल्याने) ती पांढरी दिसतात [→ केराटिने]. पिसांचा निळा व हिरवा रंग तसेच रंगदीप्ती (उदा., मोराच्या पिसातील) यांना प्रकाशाचे प्रकीर्णन, परावर्तन व व्यतिकरण हे भौतिक आविष्कार आणि पिसांची संरचना बहुधा कारणीभूत असतात [→ पक्षि वर्ग].

पीस 

त्वचेवरील काही जागांवरच पिसे उगवतात. त्यांना पिच्छ-क्षेत्रे म्हणतात. यांच्यामध्ये असणाऱ्या उघड्या (पिसे नसलेल्या) जागांना अपिच्छ-क्षेत्रे म्हणतात. पक्ष्यांची पिसे गळून पडतात आणि त्यांच्या जागी नवी येतात. या क्रियेला ⇨ निर्मोचन म्हणतात. ही क्रिया क्रमाक्रमाने होणारी असल्यामुळे

पक्ष्याच्या शरीराचे भाग उघडे पडत नाहीत. कित्येक पक्ष्यांमध्ये लिंगानुसार पिसांमध्ये फरक असल्याचे आढळून येते. हा फरक आकार व रंग या दोन्ही बाबतींत दिसून येतो (उदा., ब्राउन लेगहॉर्न कोंबड्या, मोर). विशिष्ट ⇨ हॉर्मोनांच्या स्रवणामुळे हा फरक पडतो असे प्रयोगान्ती दाखविण्यात आले आहे. तथापि यासंबंधी अद्यापही संशोधन चालू आहे.

पिसांचा लेखणीसाठी उपयोग सहाव्या शतकापासून ते एकोणिसाव्या शतकात पोलादी लेखणी प्रचारात येईपर्यंत चालू होता. कावळा, हंस, गरुड, घुबड, शिकरा इ. पक्ष्यांची पिसे लेखणीकरिता वापरीत असत. पिसे हलकी, मऊ व स्थितिस्थापक (ताण काढून घेतल्यावर पुन्हा मूळ स्थितीत येणारी) असल्याने गाद्या, उशा व रजया यांत भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्यांचा वापर करण्यात येतो. बाणांची दिशा नियंत्रित करण्यासाठी पिसांचा फार पूर्वीपासून उपयोग करण्यात येत आहे. नागा, रेड इंडियन इ. लोक अद्यापही शिरस्त्राणात वा इतर शिरोवेष्टनांत सौंदर्यवर्धनासाठी पिसे वापरतात. याकरिता पूर्वी शहामृगाच्या पिसांना फार मागणी होती. उंटाच्या व सेबलच्या केसांच्या चित्रकारांच्या ब्रशांसाठी आधारक (होल्डर) म्हणून निरनिराळ्या आकारमानांच्या पिसांचा उपयोग करतात. पंखे, कुंचे व बॅडमिंटनची फुले बनविण्यासाठी पिसांचा उपयोग केला जातो. मासेमारीसाठी तयार करण्यात येणाऱ्या कृत्रिम माश्यांसाठी (कीटकांसाठी) पिसांचा वापर करण्याचा प्रघात वाढत आहे. घरगुती सजावटीसाठीही पिसांचे विविध प्रकार वापरले जातात [→पिसांचे कलाकाम]. निरनिराळ्या प्रकारची पिसे छंद म्हणूनही कित्येक लोक संग्रहित करतात.

केवळ पिसांकरिता कित्येक पक्ष्यांचा नाश झाल्याने काही पक्ष्यांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे अनेक देशांमध्ये याबाबतीत शासकीय निर्बंध घालण्यात आलेले आहेत. (चित्रपत्र ५०).

पहा : प्राण्यांचे उड्डाण.

कर्वे, ज. नी.