तेजासिंग : (१८९४–१९५४). आधुनिक पंजाबी लेखक व विचारवंत. जन्म अड्याला येथे. काही काळ ते मुंबईच्या खालसा महाविद्यालयाचे तसेच पतियाळा येथील मोहिंद्र महाविद्यालयाचे प्राचार्य होते. पंजाबी भाषा, साहित्य व संस्कृती यांच्या अभिवृद्ध्यर्थ एक स्वतंत्र पंजाबी विद्यापीठ असावे, असे त्यांना मनापासून वाटे. त्यांचे हे स्वप्न आता पतियाळा येथे पंजाबी विद्यापीठ स्थापन झाल्याने साकार झाले आहे.
पंजाबी व इंग्रजी साहित्याचा त्यांचा व्यासंग सखोल होता. त्यांनी पंजाबीत व इंग्रजीत ग्रंथरचनाही केली आहे. इंग्रजी साहित्यातील लँब, मेकॉले आणि मॅथ्यू आर्नल्ड यांचा प्रभाव त्यांच्यावर होता. त्यांचे विचार पुरोगामी व उदारमतवादी आहेत. पंजाबी भाषा, साहित्य, समाज, इतिहास इ. अनेक विषयांवर त्यांनी वैचारिक व संशोधनपर लेखन केले. शीख गुरुद्वारांतील सुधारणा चळवळीशीही त्यांचा घनिष्ठ संबंध होता. पंजाबीतील विविध नियतकालिकांतून त्यांनी अनेक विचारप्रवर्तक लेख लिहिले. पंजाबी गद्याची नवी दालने उघडणारे शैलीकार लेखक म्हणून त्यांना मानाचे स्थान आहे. स्पष्टता, साधेपणा, नेमक्या शब्दांचा वापर, आकर्षक वाक्यरचना, प्रवाहीपणा, युक्तिवाद सामर्थ्य इ. गुणविशेष त्यांच्या गद्यात आढळतात. त्यांनी अनेक इंग्रजी ग्रंथांनाही इंग्रजीतून अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिल्या. चोखंदळ साहित्यसमीक्षक म्हणूनही त्यांना पंजाबीत महत्त्वाचे स्थान आहे. ग्रंथसाहिबाचा तसेच शीख धर्माचा त्यांचा व्यासंग चांगला होता. त्यांनी सुबोध पंजाबीत शीख गुरूंवर गद्यग्रंथ लिहिले आहेत.
तेजासिंगांचे काही महत्त्वाचे इंग्रजी व पंजाबी ग्रंथ पुढीलप्रमाणे : शब्दार्थ (१९३७), सिखिझम, इट्स आयडियल्स अँड इन्स्टिट्यूशन्स (१९३८), एसेज ऑन सिखिझम (१९४४), शब्दांतिक लगाँ मात्रा साहित्य दर्शन (वाङ्मयेतिहास–१९४९), नवीआँ सोचाँ (लेखसंग्रह–१९४९), सहिज सुभा (लेखसंग्रह–१९४९), साहित दर्शन (लेखसंग्रह–१९५१), टीका जपजी (१९५२), आर्सी (आत्मचरित्र–१९५२) इत्यादी.
के. जगजीत सिंह (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)