वनस्पति−२ : सजीवांचे वनस्पतिसृष्टी व प्राणिसृष्टी असे स्थूलमानाने वर्गीकरण केले जाते. वनस्पतींची प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे असतात : (१) वनस्पतींच्या कोशिकांना (पेशींना) कोशिकाभित्तींचे संरक्षक कवच असते. या कोशिकाभित्ती बहुतेक वनस्पतींत सेल्युलोजाच्या असतात. (अपवाद : सूक्ष्मजंतू, नीलहरित ⇨शैवले, ⇨कवके). (२) वनस्पती कोशिकांमध्ये प्राकलकणू (विशिष्टता पावलेली सूक्ष्म सजीव कोशिकांगे) असतात. यांपैकी हरितकणूंत ⇨प्रकाश संश्लेषण क्रिया होते. या क्रियेत सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेच्या साहाय्याने पाणी व कार्बन डाय-ऑक्साइड यांपासून कार्बोहायड्रेटे तयार होतात (अपवाद : कवके, सूक्ष्मजंतू). (३) बहुतेक वनस्पती जमिनीत एका ठिकाणी स्थिर असतात. प्राण्यांप्रमाणे त्या भ्रमण करू शकत नाहीत (अपवाद : क्लॅमिडोमोनस, व्हॉल्व्हॉक्स इ.). (४) बहुतेक वनस्पतींच्या वाढीला कालमर्यादा नसते. प्राण्यांच्या वाढीला ती तशी असते.

काही सजीवांत वनस्पती व प्राणी या दोघांचीही लक्षणे एकत्रित अशी आढळतात. या सजीवांचा समावेश वनस्पतिसृष्टीत करावा की प्राणिसृष्टीत करावा यासंबंधी शास्त्राज्ञांना संदेह पडतो. या सर्व सजीवांचा समावेश ‘प्रोटिस्टा’ या जीवसृष्टीत करतात. सूक्ष्मजंतू, मिक्झोमायसिटीज, कवके यांचा समावेश वनस्पतिसृष्टीत करावा किंवा नाही याबाबतीत वनस्पतिशास्त्रज्ञांत मतभेद आहेत.

सर्व सजीवांमध्ये अनेक समान लक्षणे असतात. उदा., सर्वाचे ⇨जीन (गुणसूत्रांमधील आनुवंशिक घटकांची एकके) हे डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल [⟶ न्यूक्लिइक अम्ले] या संयुगाचे बनलेले असतात. जीवद्रव्यातील (कोशिकेतील मूलभूत सजीव द्रव्यातील) घटक समान असतात. यावरून जीववैज्ञानिकांच्या मते असा निष्कर्ष निघतो की, सर्व सजीवांची उत्पत्ती समान पूर्वजापासून झाली व काळाच्या ओघात त्यांचा ⇨क्रमविकास (उत्क्रांती) होऊन सूक्ष्मजंतू, कवके, शैवले, उर्वरित वनस्पती व प्राणी उत्पन्न झाले [⟶ जीव जीवोत्पत्ति].

वनस्पतिसृष्टित कमालीची विविधता आहे. केवळ सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्यानेच दिसू शकतील अशा वनस्पतींपासून निलगिरी (यूकॅलिप्टस) सारख्या गगनचुंबी आणि वड व सेक्वोया यांसारख्या महाकाय वनस्पती पृथ्वीतलावर आहेत. या वनस्पतींच्या लक्षावधी जाती आज अस्तित्वात आहेत. जंगलातील वनस्पती, शेतांतील पिके, हिरवळी, शोभिवंत वनस्पती यांच्याद्वारे सामान्य माणसाचीही वनस्पतिसृष्टीमधील विविधतेशी तोंडओळख असते.

सर्व सजीवांना अन्नासाठी हरित वनस्पतींवर अवलंबून राहावे लागते. माणसाच्या अन्न, वस्त्र व निवारा या प्राथमिक गरजा मुख्यत्वेकरून वनस्पती भागवितात. यांशिवाय औषधे, सुगंधी द्रव्ये, उत्तेजक पेये, टॅनिने, रेझिने, रबर, डिंक, कागद, मसाल्यचे पदार्थ, फर्निचर व इतर शोभिवंत वस्तू बनविण्यासाठी लागणारे लाकूड, इंधन वगैरे शेकडो वस्तू त्याला वनस्पतींपासून मिळतात. एकूण सृष्टिक्रमात व मानवाच्या दृष्टीने वनस्पतीचे महत्त्व अनन्य साधारण आहे. अधिक माहितीसाठी कोशिका क्रमविकास जीव जीवद्रव्य जीवविज्ञान               प्रकाशसंश्लेषण प्राणि वनस्पतिनामपद्धति वनस्पतींचे वर्गीकरण वनस्पतींचे चलनवलन ‘शरिरक्रियाविज्ञान, वनस्पतींचे’ ‘शारीर,वनस्पतींचे’ या नोंदी पहाव्यात.

आपटे, वि. वि.

वनस्पतींचे मानवी जीवनातील महत्त्व : जीवनास अनुकील अशी परिस्थिती पृथ्वीच्या आरंभी नव्हती ती हळूहळू पुढे निर्माण होत गेली. त्यानंतर ⇨जीवोत्पत्ती झाली आणि पुढे कालांतराने प्राणी व वनस्पती असे भेद त्या सजीवांत निर्माण झाले. त्याच वेळी जीवसृष्टीच्या या दोन प्रमुख घटकांमध्ये सहजीवनास सुरुवात झाली व त्यांचे एक सुसंवादी जीवन सुरू झाले आणि आजपावेतो त्याचा क्रमाने विकास होत आला. हिरव्या वनस्पतींच्या अंगी पाणी, खनिजे व सूर्यप्रकाशातील ऊर्जा यांचा वापर करण्याचे सामर्थ्य असल्याने त्या अन्ननिर्मिती करतात. [⟶ प्रकाशसंश्लेषण]. सर्व प्राणिमात्र व स्वतः वनस्पती या अन्नाचा आणि त्यातील ऊर्जेचा उपयोग करून जगतात, तसेच वनस्पती आणि प्राणी यांमध्ये वायु-विनिमय तर होतोच [⟶ श्वसन, वनस्पतींचे], शिवाय प्राण्यांनी शरीराबाहेर टाकलेले कार्बनी आणि अकार्बनी पदार्थ कमी जास्त रूपांतर पावून पुन्हा वनस्पतींच्या शरीरात परत येतात [⟶ चयापचय]. सतत चालू असलेल्या या देवघेवीत ऊर्जा व पदार्थ अक्षय राहतात. कोट्यावधी वर्षे चालू असलेल्या घडामोडींत सर्व सजीव क्रमाक्रमाने बदलत आले असून परिणामतः मनुष्य व त्यांच्याभोवती असलेल्या असंख्य बीजी वनस्पती यांचे प्राबल्य आज अनुभवास येत आहे. मनुष्याच्या क्रमविकासात त्याचा व त्याच काळात ज्यांचा क्रमविकास घडून आला त्या फुलझाडांचा [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] घनिष्ठ संबंध आला असून त्यांचा परस्परांवर प्रभाव पडला आहे, हे अनुभवसिद्ध आहे. ज्या सापेक्षातः अधिक रूक्ष भूमीवर मनुष्यांनी वस्त्या केल्या तेथेच बीजी वनस्पतीचा अधिक संख्येने विकास झाला व मनुष्याला सुलभ रीत्या अन्नपुरवठा करण्यास त्यांचा उपयोग झाला. मनुष्याच्या सांस्कृतिक विकासातही फुलझाडांचा वाटा मोठा आहे. कित्येक वनस्पतींचा वार्षिक आयुःकाल व तृणधान्यांच्या बाबतीत आढळणारे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या उत्पादनात श्रमाच्या मानाने मिळणारा अधिक मोबदला, यामुळे फक्त शेतीवर अवलंबून राहणाऱ्या लहान व सापेक्षतः कायम वस्त्या आणि अधिक जटिल सुसंस्कृत समाज यांचा विकास झाला. लागवडीत आणलेल्या व इतर वनस्पतींवर मनुष्याचे जीवन अवलंबित असून त्याच्या गरजेशी वनस्पती इतक्या समरस झाल्या आहेत, की त्यासुद्धा मानवावर अवलंबित आहेत असे म्हणणे सयुक्तिक होईल. जीवनातील तीव्र स्पर्धेत मानवाच्या संरक्षण, संवर्धन, लागवड इ. बाबतींतील मदतीशिवाय कित्येक वनस्पती आज जिवंत दिसल्याच नसत्या. आरंभी म्हटल्याप्रमाणे मनुष्य व कित्येक वनस्पती प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे परस्परावलंबित असून त्यांच्यात ⇨सहजीवन आहे. मनुष्यांच्या जीवनावर आणि संस्कृतीवर वनस्पतींचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असा प्रभाव पडलेला आढळतो त्यासंबंधीची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

प्रत्यक्ष प्रभाव : मनुष्याच्या प्रमुख गरजा ज्यांमुळे भागविल्या जातात त्यांचा येथे अंतर्भाव असून त्यांच्याशी संबंधित अशा काही वनस्पतींच्या माहितीची रूपरेखा येथे दिली आहे. त्यामध्ये मनुष्यांना अन्न, वस्त्र व निवारा देणाऱ्या वनस्पतींचा पहिला क्रमांक असून त्यानंतर त्यांची उन्नती अथवा सुधारणा करण्यास कारणीभूत ठरलेल्या वनस्पती म्हणजे बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारी) तेले, मसाल्याचे पदार्थ, मादक द्रव्ये, औषधे, विषे इ. ज्यांपासून मिळतात त्यांचा उल्लेख येतो. लाकूड, ⇨त्वक्षा (बुचाच्या पदार्थाची निर्मिती करणाऱ्या कोशिकांचा थर), मेदी तेले, मेणे, रबर, डिंक, रेझिने, रंग व टॅनिने यांचा औद्योगिक दृष्ट्या उपयोग असल्याने त्यासंबंधीच्या वनस्पती व शोभादायक वनस्पती यांचाही उल्लेख येथे अपरिहार्य आहे.


अन्न : ‘अन्नमयाः प्राणाः’ या उक्तीवरून सर्व सजीवांना अन्नाचे मूलभूत किती मोठे आहे, याची कल्पना येते. जगात वनस्पतींच्या एकूण सु. ३,००० जाती अन्नाकरिता वापरल्या जातात तथापि त्यांपैकी फक्त तीनशे जातींना लागवडीत वापरल्या जातात तथापि त्यांपैकी फक्त तीनशे जातींना लागवडीत महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या तांदूळ, गहू, जोंधळा, मका, ऊस, साखरेचा बीट, बटाटा, कसावा (टॅपिओका), घेवडे (सोयाबीनसह), भूईमूग, नारळ व केळ ही पिके प्रमुख आहेत. सर्व प्रमुख संस्कृती तृणधान्यनिर्मितीवर विकास पावल्या आहेत. ईजिप्शियन, ग्रीको−रोमन व मध्यपूर्व ह्या प्रदेशांत गहू, अतिपूर्वेस तांदूळ आणि इंका, ॲझटेक व माया या लोकांच्या प्रदेशात मका यांचे महत्त्व उदाहरण म्हणून सांगता येईल. जगातील सु. ६०% लोक आज तांदळावर उपजीविका करीत असल्याने सर्व धान्यांत त्याला श्रेष्ठत्व आले आहे. मूलभूत प्रमुख कार्बोहायड्रेट अन्न म्हणून अमेरिकेत मक्याचा प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे उपयोग केला जातो तेथे गव्हाचा क्रमांक दुसरा आहे. याशिवाय स्टार्चाचा पुरवठा इतर अनेक वनस्पींपासून होतो उदा. याशिवाय स्टार्चाचा पुरवठा इतर अनेक वनस्पतींपासून होतो उदा., बार्ली, ओट, मिलो (ज्वारी), राय, इ. कमी प्रतीची तृणधान्ये. भारतात ज्वारी, तांदूळ, गहू, मका, बाजरी, नाचणी यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करतात. बटाटा, रताळी, साबुदाणा, गोराडू, कारंदा, सुरण, अळू, आरारूट, फणस, केळी, ब्रेंडफूट (भाकरीच्या झाडाचे फळ) इत्यादींचा कमीअधिक वापर अन्नात स्टार्चाकरिता सर्वत्र करतात तसेच स्टार्च अनेक उद्योगांत बराच वापरला जातो. घेवडे, भुईमूग, उडीद, मसूर, तूर, हरभरा इ. कित्येक कडधान्ये शाकीय प्रथिनांकरिता प्रसिद्ध आहेत. अनेक कपाली (कवची फळे) व आठळी फळे (उदा., बदाम, अक्रोड, जरदाळू, चारोळी, चेस्टनट, काजू इ.), काही फळभाज्या (उदा. भोपळा, वांगे), मुळे, गाजर, बीट, सुरण इ. वनस्पती मुख्यतः कार्बोहायड्रेट व काही प्रमाणात प्रथिने पुरवितात. यांशिवाय अन्नात अंतर्भूत असलेले महत्त्वाचे पदार्थ म्हणजे मेद (किंवा वसा, ओशट घन व द्रव पदार्थ), खनिजे व जीवनसत्त्वे होत. यांपैकी वनस्पतिजन्य खाद्य स्थिर तेलांचा पुरवठा अनेक तेलबियांपासून होतो उदा., भुईमूग, नारळ, सूर्यफूल, करडई, सरसू, सोयाबीन, कारळा, सरकी, मका, तीळ, ऑलिव्ह, तेल-माड इत्यादींचा वापर देशपरत्वे कमीअधिक प्रमाणात केला जातो. कोको, शिया बटर वृक्ष (आफ्रिका), मोह इत्यादींपासून खाद्य घन मेद मिळवितात. कित्येक स्थिर तेलांचे ⇨हायड्रोजनीकरण घडवून आणून अधिक टिकाऊ अशी घन तेले (उदा., ‘वनस्पती’) तुपाऐवजी वापरण्यास बनविली आहेत व त्यांचा स्वयंपाकात सर्रास उपयोग केला जात आहे. खनिजांचा व जीवनसत्त्वांचा पुरवठा अनेक पालभाज्यांतून होतो, तसेच कित्येक फळभाज्या व कंदमुळांतून होतो. शिवाय भाज्यांतून मिळणाऱ्या चोथ्यामुळे पचनास मदत होते. माठ, पोकळा, चाकवत, करडई, अंबाडी, चवळी, हरभरा, मेथी, मोहरी, अळू या सामान्य देशी भाज्यांशिवाय कोबी, कॉलिफ्लॉवर (फुलकोबी), लेट्यूस (सालीट), स्पिनॅक (पालक), एंडाइव्ह [⟶ कासनी], सेलरी (अजमोदा) इ. विदेशी पालेभाज्या लोकप्रिय होत आहेत. आंबा, केळी, अंजीर, खजूर, अननस, संत्री, मोसंबी, पेरू, चिकू, डाळिंब, सफरचंद ॲव्होकॅडो, पपई, लोक्वाट, द्राक्षे, लिची, सीताफळ, रामफळ, बिही, चेरी, सप्ताळू इ. अनेक खाद्य देशी व विदेशी फळांचा उपयोग अन्न व जीवनसत्त्वे मिळविण्यास होतो. [⟶ फळ भाजीपाला].

वस्त्र : शास्त्रीय दृष्ट्या तीन प्रकारचे वनस्पतीजन्य धागे (तंतू) वस्त्रे बनविण्यासाठी वापरले जातात : (१) कापूस, सफेत यावर (कपोक) व शाल्मली (लाल सावर) यांपासून पृष्ठधागे, (२) फ्लॅक्स व ज्यूट [⟶ ताग] या वनस्पतींतील परिकाष्ठ-धागे (रसकाष्ठ भागातील सूक्ष्म घन कोशिका) व (३) अबाका [म्यूझा टेक्सिस्टलिस ⟶ केळ], सिसाल व हैनक्वैन [अगेव्ह फॉर्क्रॉयडीस ⟶ घायपात] यांच्या पानांपासून मिळणारे धागे. मानवास सर्वांत महत्त्वाचा वनस्पतिजन्य धागा कापूस असून फार पूर्वीपासून दोन्ही गोलार्धांत तो परिचित आहे (भारतात इ. स. पू. तीन वर्षे व पेरू देशात इ. स. पू. २५०० वर्षे). इ. स. पू. २००० वर्षांपूर्वी यूरोपात असलेल्या स्विस जलाशयातील मानवी वस्त्यांना फ्लॅक्सचा धागा परिचित होता तसेच इ. स. पू. १५०० वर्षांपासून ⇨हेंपचा [⟶ गांजा] धागा उपयोगात आहे. आदिमानव प्रथम वस्त्रहीन अवस्थेतच वावरत असे. पुढे त्याच्या वंशजांनी झाडांचा पाला व साली यांपासून अथवा प्राण्यांच्या कातड्यांनी शरीर संरक्षणास आरंभ केला त्यानंतर वनस्पतिजन्य धागे काढून, विणून व वस्त्रे बनवून वापरण्यास सुरुवात झाली अशा रीतीने संस्कृतिवर्धनातील महत्त्वाचा टप्पा मानावाने गाठला. आज तो वनस्पतिजन्य नेसर्गिक धाग्यांऐवजी अशतः किंवा पूर्णतः कृत्रिम (संश्लिष्ट) धाग्यांनी बनविलेला कपडा वापरू लागला आहे [⟶ तंतू, नैसर्गिक तंतु, कृत्रिम]. वाढत्या लोकसंख्येची ही गरज असावी.

मसाले : मनुष्यप्राणी कित्येक वर्षे सापेक्षतः साधेच पदार्थ खात असे परंतु हलूहळू आपले अन्न स्वादिष्ट व रुचकर (खमंग) करण्यास समर्थ बनू लागला. यामध्ये ज्या वनस्पतिजन्य पदार्थांचा त्याला उपयोग झाला त्यांना मसाल्याचे पदार्थ म्हणतात. यांचा शोध व उत्पादन प्रथमतः उष्ण व उपोष्ण कटिबंधातील काही देशांत होऊन कित्येक जुन्या जगप्रवासी लोकांनी त्यांचा इतरत्र प्रसार केला. इतकेच नव्हे, तर पुढे पुढे व आजमितीसही त्या पदार्थांना व्यापारी महत्त्व आले व कित्येक पदार्थ आर्थिक दृष्ट्या श्रेष्ठ ठरले आहेत. सध्या सु. तीस मसाल्याचे पदार्थ सामान्यपणे वापरात असून बहुतेक सर्व पुढे दिलेल्या वनस्पतींच्या भिन्न अवयवांपासून मिळवितात : वेलदोडा, दालचिनी, लवंग, धने, जिरे, मेथी, मिरी, मिरची, हिंग, जायफळ (जायपत्री), मोहरी, खसखस, हळद, लसूण इत्यादी [⟶ मसाले]. यांपैकी काही मसाल्याच्या पदार्थांचा औषधांतही वापर केला जात असून काहींचे अर्कही उपलब्ध आहेत.

बाष्पनशील तेले : हजारो जातींच्या फुलझाडांपासून ही बाष्परूपाने उडून जाणारी तेले काढली जातात व विविध उद्योग, ओषधे, मसाले, सुगंधी तेले व अत्तरे यांत मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. ⇨कापूर हे महत्त्वाचे बाष्पनशील तेल असून उद्योगांत त्याचा वापर बराच मोठा आहे. सुमारे ३०० फुलझाडांच्या जातींचा उपयोग सुगंधी द्रव्यांकरिता करतात. त्यांमध्ये बर्गमॉट (लिंबू प्रजातीतील एक फळ), संत्रे, जिरॅनियम, गुलाब, जॅस्मिनम या प्रजातीतील मोगरा, सायळी, जाई, जुई इ. जाती गवती चहा, रोशा, व्हायोलेट, लव्हेंडर, चंदन, इलँग-इलँग (कनांगा ओडोराटा), केवडा इत्यादींचा समावेश होतो. विंटरग्रीन [⟶ गंधपुरा] तेल व पेपरमिंट तेल [⟶ पुदिना] यांचा औषधे व मिठाई यांत उपयोग करतात [⟶ बाष्पनशील तेले]. लाखो किग्रॅ. फुलांचे उत्पादन सुगंधी तेले व अत्तरे यांकरिता केले जाते.

औषधे आणि उत्तेजक व मादक द्रव्ये : आजपावेतो मनुष्याने जवळजवळ बहुतांश औषधे वनस्पतींपासून मिळविलेली आहेत. जी औषधे केवळ रासायनिक पद्धतीने संश्लेषित केली आहेत. त्यांची रासायनिक संरचना नैसर्गिक औषधाप्रमाणेच असते. यांमध्ये काही नवलपूर्ण औषधांच्या शोधामुळे वनस्पतींच्या वैद्यक हितसंबंधाचे पुनरुज्जीवन झाले. वनस्पतीपासून नंतर प्राप्त झालेल्या औषधांपैकी काही पुढे दिली आहेत : क्युरेर [कुचल्याच्या प्रजातीतील एका जातीच्या सालीपासून व मूळापासून काढलेला अर्क ⟶ कुचला] स्नायुशैथिल्यिक सेनेगा स्नेकरूटपासून अतिरक्तादाबापासून स्ट्रोफँथस सामेंटोससपासून कॉर्टिसोन काही सूक्ष्म वनस्पतींपासून (उदा., सूक्ष्मजंतू, कवक इ.) मिळविलेले ⇨प्रतिजैव पदार्थ (अँटिबायॉटिक्स) इत्यादी. कित्येक जुन्या औषधांचे महत्त्व आजही टिकून आहे उदा., कोरफड, बेलाडोना, कोका, डिजिटॅलिस, एफेड्रीन, यूकॅलिप्टस (निलगिरी), एरंडेल, अरगट, ज्येष्ठमध, कुचला, अफू, सोनामुखी वगैरे. औषधी वनस्पतींच्या सध्या चालू असलेल्या संशोधनामुळे कित्येक नवीन महत्त्वाची रोगनिवारक द्रव्ये उपलब्ध होणे शक्य आहे. [⟶ वनस्पति, औषधी].


कॅफीन हे उत्तेजक द्रव्य अनेक देशांत स्वतंत्रपणे उपयोग आले आहे. कॉफी, कोको व कोला यांची बीजे, चहा, मॅटे व यापॉन (कासीन इलेक्स व्हॉमिटोरिया) यांची पाने, योकोची (पौलिनिया योको) साल इत्यादींपासून हे द्रव्य मिळते. चहाचा उपयोग प्रथम चीनमध्ये औषधाकरिता केला गेला परंतु आता कोणत्याही कॅफीनयुक्त पेयापेक्षा तो जास्त होतो. पाचशे वर्षापूर्वी अरबांनी इथिओपियातून कॉफीचा इतरत्र प्रसार केला व आता व्यापारी दृष्ट्या कॉफी अधिक महत्त्वाची ठरली आहे. स्पॅनिश विजयापूर्वी ॲझटेक लोकांनी कोकोचा उपयोग केला होता मात्र १५०२ मध्ये त्याचा प्रसार यूरोपात झाल्यावर त्याची लोकप्रियता खूपच वाढली. कोल्याचा वापर आफ्रिकेत तर होतोच परंतु सोडायुक्त पेय स्वरूपात घेण्यास त्याची इतरत्र निर्यात होते. दक्षिण अमेरिकेत हॉलीच्या पानातील मॅटेचा उपयोग पेयाकरिता करतात तसेच अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या आग्नेय भागत यापॉनचा मूळचा वांतिकारक उपयोग कमी होऊन आता ते उत्तेजक पेय बनविण्यास वापरतात. ग्वारानाच्या (पौलिनिया कुपाना) बियांचे चूर्ण ॲमेझॉन खोऱ्यात व योकोच्या सालीचे चूर्ण पश्चिम ॲमेझॉन भागात फार उत्तेजक पेयाकरिता उपयोगात आहेत. अरबस्तानात खट (कॅथा इड्यूलिस) नावाच्या वनस्पतीची ताजी पाने चघळतात कारण त्यांत कॅफिनासारखे उत्तेजक अल्कलॉइड असते. आग्नेय आशियात ⇨सुपारीचा उपयोग तांबुलाकरिता करीत, असे हीरॉडोटस यांनी इ. स. पू. ३४० मध्ये नमूद केले आहे.

यीस्ट या कवकाच्या साहाय्याने शर्करेचे रूपांतर मद्यात होते ही गोष्ट फार प्राचीन काळापासून मनुष्यास माहीत झाली आहे. शेकडो फळे, पिठूळ धान्ये व मुळे यांपासून निर्माण केलेल्या मद्ययुक्त पेयांना एक सांस्कृतिक भूमिका प्राप्त झाली आहे. या मद्यांत किण्वन केलेली (बिअर, वाइन इ.) किंवा ऊर्ध्वपातित (व्हिस्की, रम, जिन, ब्रँडी इ.) असे प्रकार आढळतात. [⟶ मद्य].

काही वनस्पतींच्या अंगी मनुष्याच्या शरीरावर किंवा मनावर अनित्य परिणाम होतात, ही गोष्ट फार प्राचीन काळापासून अनुभवसिद्ध आहे. असा पदार्थांना त्याने पवित्र ठरवून जादू व धर्म यांच्याशी त्यांची सांगड घालून ठेवली. यांमध्ये ⇨तंबाखूसारखी मद्यहीन पण मादकचेतके, कवकवा (पायपर मेथिस्टिकम या मिरीच्या जातीतील एका जातीपासून बनविलेले मादक पेय) सारखी संमोहके, पेयोटे, फ्लाय अगॅरिक [⟶ भूछत्रे] व मरीव्हाना (गांजा) यांसारखी संभ्रमकारके (निराधार भ्रम निर्माण करणारी) आणि कोका व अफू यांसारखी सुखभ्रम उत्पन्न करणारी इत्यादींचा समावेश होतो. यांपैकी सुखभ्रम उत्पन्न करणारी इत्यादींचा समावेश होतो. यांपैकी सुखभ्रम निर्माण करणाऱ्यांना वैद्यकीय दृष्ट्या अधिक महत्त्व आहे, कारण त्यांत मानव्यनाशी व सुखदायी गुणधर्म असतात. अफू मूळची आशिया मायनरातील असून तीत अनेक अल्कालॉइडे असतात आणि त्यांमध्ये मॉर्फीन व कोडीन प्रमुख आहेत. कोकेन भरपूर असलेली कोकाची पाने लाखो दक्षिण अमेरिकी इंडियन लोक चघळतात. भरपूर गांजा (मरीव्हाना), भांग व चरस (हशीश) असलेल्या हेंपच्या स्त्री-पुरुष (किंजल्कयुक्त) कलिका आजही उत्तर आफ्रिका ते भारत या प्रदेशात उपयोगात असून त्यांचा प्रसार वाढत आहे अमेरिकेत ते तंबाखूसारखे ओढतात. संभ्रकारकांमुळे काल्पनिक व भडकरंगी स्वप्ने अनुभवास येतात. मानसिक रोगांवर त्यांचा औषधासारखा उपयोग होण्याची शक्यता आढळली आहे. मेक्सिकन व अमेरिकी इंडियन लोकांच्या एका धर्मपंथात महत्त्व पावलेल्या पेयोटे नावाच्या निवडुंगाला प्रायोगिक मनोविकार चिकित्सेत एका प्रभावी साधनाचा दर्जा मिळेल असे दिसते. मेक्सिकोतील काही धार्मिक विधींमध्ये उपयोगात असलेल्या काही भूछत्रांचे व मॉर्निंग ग्लोरीचे (निळवेल, गारवेल यांसारख्या वेलींचे), संभ्रमकारक परिणाम अशाच प्रकारचे आहेत, असे आढळले आहे. आज मोठ्या प्रमाणावर सर्वत्र वापरात असलेल्या तंबाखूचा उपयोग अमेरिकी आदिवासी विधिपूर्वक करीत. १५५६ मध्ये तिचा प्रथम प्रवेश औषधाकरिता झाला परंतु कट्टर सार्वजनिक विरोधाला न जुमानता उत्तेजक म्हणून तिचा प्रसार फार जलद झाला. तंबाखू ओढणे, चघळणे, तपकिरीप्रमाणे नाकाने ओढणे सामान्य असून काही अमेरिकी इंडियन लोकांत चाटणे व तिचा काढा पिणे हेही आढळते. तंबाखूचे उत्पादन व संस्करण हा आज जगातील मोठ्या धंद्यांपैकी एक बनला आहे.

मानवी संस्कृती व इतिहास यांच्याशी ⇨विषारी वनस्पतींचा बराच संबंध आलेला आढळतो. प्रारंभिक सामाजिक जीवनात जमातींच्या उत्सवांत, लढायांत, शिकारींत, मासेमारीत, अपराधांचा शोध घेण्यात व गर्भपातनात त्यांचा सर्रास वापर होत असे. सांप्रत काळी काही विषारी वनस्पती कीटकनाश व मूषकसंहार यांकरिता वापरल्या जातात. उष्ण कटिबंधात अशा वनस्पती असंख्य आहेत. अमेरिकेत चारशेवर नमूद केल्या गेल्या आहेत. मासेमारीत जगभर वापरली जाणारी मत्सविषे दक्षिणे अमेरिकेत विकास पावली असून आज तेथे सु. शंभरावर मत्स्यविषे वापरात आहेत. यांपैकी रोटेनॉन हे अत्यंत महत्त्वाचे असून त्याचा कृषीमध्ये कीटकनाशाकरिता उपयोग करतात तसेच दुसरे महत्त्वाचे विष पायरेथ्रम हे शेवंतीच्या प्रजातीतील जातीपासून काढलेले आहे. कसोटी लावण्यास वापरात असलेल्या काही विषयांचा उपयोग प्रारंभिक जमातीत खुनी किंवा निर्दोषी यांची निश्चिती करण्यासाठी करीत. ही विषे शिंबावंत [⟶ लेग्युमिनोजी] कुलातील काही वनस्पतींपासून काढीत. त्यांपैकी एकापासून काढलेले, फायसोस्टिग्माइन या नावाचे द्रव्य नेत्रचिकित्सेत वापरले जाते. कित्येक तण व शोभेच्या वनस्पती विषारी असून काही खाद्य वनस्पतींतील (उदा., टॅपिओका) विषारीपणा काढून टाकल्याशिवाय त्यांचा उपयोग करीत नाहीत.

तेले, मेद व मेणे : मागे उल्लेख केल्याप्रमाणे काही खाद्य तेलांचा व मेदांचा अन्नात समावेश होतो. त्यांपैकी काही व इतर अखाद्य तेलांचा, मेदांचा व मेणांचा साबण, वंगणे इत्यादींत बराच वापर होतो. त्यांचे उत्पादन बव्हंशी बियांपासून होते आणि त्या वनस्पती महत्त्वाच्या मानतात. तेलांमध्ये सुकणारी (जवस, सोयाबीन, टुंग तेल), अर्धवट सुकणारी (सरकी, मका, तीळ, सूर्यफूल) व न सुकणारी (ऑलिव्ह, भुईमूग, एरंड) असे तीन प्रकार आढळतात. नारळ व इतर काही उष्ण कटिबंधीय वृक्षांपासून घन किंवा अर्धघन तेले मिळतात. पाम (ताल) वृक्षांपैकी अनेकांपासून मेदी अम्ले मिळतात. मेण काढता येण्याजोग्या वनस्पती फारच थोड्या आहेत. व्हर्निशे आणि पॉलिशे यांत वापरली जाणारी मेणे औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाची असून त्यांची निर्मिती काही मरुवासी वनस्पतींत होते उदा., कार्नोबा, कँडेलिल्ला, वॅक्समिर्टल, कौसू व होहोबा. [⟶ तेले व वसा मेण].

चीक, डिंक, रेझिने : रबर बनविता येण्यासारखा ⇨चीक ज्यांपासून मिळतो अशा सु. १,००० वनस्पती नमूद असून त्यांपैकी फक्त पन्नासच व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. जगातील सु. ९०% रबराचे उत्पादन पॅरा रबर ट्री (हेविया ब्राझीलिएन्सिस) या मूळच्या ॲमेझॉन प्रदेशातील वृक्षांपासून होते याची लागवड आग्नेय आशियात केलेली आढळते. जगातील बाजारपेठेत आल्यापासून फारच थोड्या अवधीत रबराने मानवी संस्कतीचा मार्ग बदलून टाकला आहे. सुमारे २० कोटी क्विंटल रबराचे उत्पादन औद्योगिक कार्यात खर्च होते. कित्येक चिकाळ वनस्पतीपासून मिळणाऱ्या ठिसूळ द्रव्याचा उपयोग बालाटा (बकुळीच्या प्रजातीतील मायूसोपस ग्लोबोसाया या वृक्षापासून काढलेले व स्थितीस्थापक नसलेले रबर), गटापर्चा, जेलुटाँग, चिकल इ. उद्योगांत करतात बालाटा व गटापर्चा यांचे उपयोग सारखेच असून चिकूच्या चिकापासून बनविलेल्या चिकलचा (डिंकाचा) उपयोग शल्यक्रियेत वापरली जाणारी फीत, दंत वैद्यक व चघळण्याचा डिंक (च्युईंग गम) यांकरिता करतात. चिकलाऐवजी जेलुटिंग वापरपतात हे चीक मलेशियातील डिएरा कॉस्टुलॅटा व त्यासारख्या इतर काही जातींपासून काढतात.


डिंक व रेझिन अनेक वनस्पतींपासून मिळतात. रुक्ष प्रदेशातील झाडांपासून डिंक मिळतो व त्याचा उपयोग चिकटविणारे पदार्थ, रंग, छपाई, औषधे इत्यादींत केला जातो. रेझिनचा उपयोग रोगणे, साबण, धूप, सुगंधी पदार्थ व अत्तरे आणि औषधे यांमध्ये करतात. कोपल, डामर आणि लाखेचे व्हार्निश यांत कठीण रेझीन वापरतात. आफ्रिका, न्यूझीलंड, आग्नेय आशिया व दक्षिण अमेरिका येथील शिबावंत व शंकुमंत वृक्ष यांपासून मिळणारे अर्धवट अश्मीभूत (शिलारूप) कोपल मिळते व ते नरम असते. मलेशिया व सुमात्रा येथील डिप्टेरोकार्पेसी कुलातील वृक्षांपासून वॅलॅनोकार्पस, होपिया, शोरिया इ. प्रजातींपासून) मिळणारी डामर नावाची रेझिने मुख्यतः स्पिरिट व्हार्निशे व नायट्रोसेल्युलोज लाख-व्हर्निश यांत वापरतात. भारतात मुख्यतः साल, धूप व राळधूप या वृक्षांपासून डामर रेझिने मिळवितात. बाल्टिक क्षेत्रात अंबर (अश्मीभूत रेझिन) विपुल आढळते ते मायोसीन (सु. २ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील वृक्षांपासून निघालेले रेझीन होय. आशियातील ⇨सुमाकच्या जातीपासून मिळणारे एक नैसर्गिक लाख-व्हार्निश चीनच्या कलाकुसरयुक्त व लाख-व्हर्निशाने रंगविलेल्या शोभिवंत भांड्यांच्या निर्मितीत वापरतात, ओलिओरेझिनात अधिक बाष्पनशील तेल असून टर्पेंटाइन व बाल्सम यांचा त्यात अंतर्भाव होतो. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील आग्नेय भागातील पाइन वृक्षापासून काढलेले टर्पेंटाइन हे नौदलाला उपयुक्त अशा वस्तू उत्पादन करणाऱ्या उद्योगात आधारभूत असे फार महत्त्वाचे ओलिओरेझीन आहे. कॅनडा बाल्सम, स्प्रूसगम व विनेशियन ही गौण प्रकारची व काही शंकुमंत वृक्षांपासून काढलेली टर्पेंटाइन असून पेरू बाल्सम, टोलू बाल्सम, बेंझोइन, स्टोरॅक्स ही औषधोपयोगी आहेत. व्यापारी आणि ऐतिहासिक दृष्ट्या हिंग, गुग्गुळ, फ्रँकिन्सेस (धूप) इ. गम रेझिने महत्त्वाची आणि डिंक व रेझिने यांची मिश्रणे आहेत. धूप, अत्तरे, सौंदर्यप्रसाधने इत्यादींत त्यांचा उपयोग करतात पश्चिम आशिया व उत्तर आफ्रिका येथील मरू प्रदेशात गम रेझिनांची निर्मिती होते. [⟶ टर्पेंटाइन डिंक रेझिन].

रंग : पूर्वी भिन्न प्रकारचे रंग भिन्न वनस्पतींच्या भिन्न अवयवांपासून काढीत परंतु आता बहुतेक सर्व रासायनिक संश्लेषणाने बनवितात. या संदर्भांत पुढील वनस्पतींना महत्त्व होते व आजही कोठे कोठे त्यांचा उपयोग करतात पतंगी, रक्तचंदन, पतंग, कच्छ (कात खैर), फुस्टिक, ब्राझीलवुड, नीळ, मेंदी, वोड, मंजिष्ठ, मॅडर, हळद, क्वर्सिटॉन (ब्लॅक ओक), लोकाओ (बोराच्या प्रजातीतील दोन चिनी झाडे), केशर, गँबोज, केसरी, करडई, यूरोपीय बकथॉर्न, पर्शियन बेरी, ऑर्किल किंवा कडबेअर (धोंडाफुलापासून काढलेला रंग) इत्यादी. [⟶ रंगद्रव्ये, वनस्पतींची रंजन, जैव].

टॅनिने : अनेक वनस्पतींत टॅनिने असूनही व्यापारी दृष्ट्या फारच थोड्यांचा उपयोग केला जातो. हेमलॉक, ओक, कच्छ वनस्पती (समुद्रकाठी असलेल्या खाऱ्या दलदलीतील झाडे) व वॅटल (बाभळीच्या प्रजातीतील काही जाती) यांची साल, चेस्टनट व क्वेब्रॅको यांचे लाकूड, सुमाक व गँबिअर (युन्कॅरिया गँबीर) यांची पाने, हिरड्याची फळे इत्यादींपासून टॅनिने मिळवतात. प्राण्यांच्या कातडीतील प्रथिनांबरोबर टॅनिनांचा संयोग होऊन कातडे कमावले जाते. मायफळाच्या अर्काचा फेरस सल्फेट, डिंक व एखादा रंग यांच्याशी रासयनिक संयोग होऊन काही शाया बनवितात. [⟶ टॅनिने].

कागद : जगातील सर्वांत मोठ्या वनस्पती उत्पादांपैकी कागद हा एक असून त्याची निर्मिती अनेक भिन्न नैसर्गिक धाग्यांपासून करतात. सुमारे १८५० पासून याकरिता वृक्षातील प्रकाष्ठ सूत्रांचा उपयोग केला जात आहे. स्प्रूस, हेमलॉ, पाइन, बर्च, पॉप्लर या वृक्षांपासून सामान्यतः कागद लगदा मिळवितात. चीनमध्ये पहिल्याने कागद निर्मिला गेला. भारतात ⇨बांबूपासून काही कागदनिर्मिती करतात. प्राचीन काळी ईजिप्तमध्ये वापरलेले लेखन-साहित्य ⇨पपायरसापासून बनविले असल्याने त्या काळचे बौद्धिक दृष्ट्या असलेले महत्त्व ओळखणे जरूर आहे. [⟶ कागद].

लाकूड व त्वक्षा : मानवाला फार प्राचीन काळापासून लाकूड ही फार मोलाची देणगी आहे. ते हलके व बळकट, उष्णतारोधक, स्वस्त व सहज उपलब्ध होणारे, जरूर तसे हत्यारांचे संस्कार करू देणारे असे बहुगुणी असते. बांधकामात उपयुक्त असल्याने मानवाला निवारा देण्यात फार प्राचीन काळापासून ते उपयोगात आहे. त्याशिवाय कपाटे, पेट्या, सजावटी सामान, नावा व इतर काष्ठोद्योग इत्यादींकरिता ते आजही महत्त्वाचे आहे. लाकडाऐवजी हल्ली लोखंडाचा बराचसा उपयोग केला जातो, कारण लाकडाचा पुरवठा वाढत्या मागणीपेक्षा बराच कमी आहे. उपयुक्त लाकूड देणाऱ्या वनस्पतींचे संशोधन करून व त्यांची लागवड करून उत्पादन वाढीचे प्रयत्न सुरू आहेत. रेझिनयुक्त कृत्रिम मिश्रकाष्ठ आज उपलब्ध आहे. तसेच कृत्रिम यांत्रिक साहाय्याने लाकडाचे मोठे तक्ते बनविले जात असून त्यांचा हरप्रकारे उद्योगात वापर चालू आहे. जंगलाच्या आसपास काष्ठोद्योगांची सुविधा केली जाते. प्राचीन ग्रीक लोकांना वृक्षांच्या सालीपासून उपलब्ध होणाऱ्या त्वक्षेची (कॉर्क म्हणजे बुचासारख्या पदार्थांचे थर) माहिती होती. हल्ली ओकच्या सालीपासून मिळणाऱ्या त्वक्षेचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो कधी ती दळून व त्यात चिकट पदार्थ मिसळून विशेष कार्याकरिता वापरतात. [⟶ त्वक्षा प्लायवुडलाकूड].

अप्रत्यक्ष प्रभाव : रोगकारक व इतर प्रकारे नुकसानकारक (उदा., तण) अशा वनस्पतींचा येथे अंतर्भाव केला जातो. यांनी केलेल्या वनांतील व शेतांतील वनस्पतींच्या नाशामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागते. सतत निवड व प्रजनन करून उपलब्ध झालेल्या जाती व नवीन जाती वापरून हे नुकसान टाळण्याचे प्रयत्न बऱ्याच अंशी यशस्वी झाले आहेत. रोगनाशक द्रव्ये वापरून पिके वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. तणांचा नाश करण्यासाठी तणनाशके वापरण्यात येतात. काही खाद्य व औषधोपयोगी तणांचा उपयोगही केला जात असून काहींच्या अवशेषांपासून जमिनीची सुधारणा करणे साधले आहे. जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) व तापमान यांवर होणाऱ्या वनांच्या नियंत्रक परिणामांमुळे मानवी जीवनावर प्रभाव पडलेला आढळतो. वनांमुळे महापुराचे संकट टळते तसेच जलसुरक्षितताही लाभते. भिन्न प्रकारच्या उद्यानांमुळे इमारती व लहान मोठ्या वस्त्यांना शोभा आणली जाते. वन्य पशुपक्षी व वने यांचे संरक्षण आणि वृक्षारोपण यांची राष्ट्रकार्यात गणना केली जाते. [⟶ वनविद्या].

वरील विवेचनात बीजी वनस्पतींचे आणि त्यातही फुलझाडांचे महत्त्व मनुष्याच्या जीवनात कसे वाढत आले आहे हे निर्देशित केले असले, तरी अलीकडे अनेक अबीजी वनस्पतींनाही (उदा., काही कवके, शैवले, शैवाक इ.) व्यावहारिक महत्त्व येत चालले आहे व मानवजातीचा त्यामुळे फायदा होत आहे, याबद्दल दुमत नाही.

विविध वनस्पतींचे धार्मिक महत्त्व व त्यांच्या संबंधीच्या दंतकथा यांचे उल्लेख त्या त्या वनस्पतीवरील नोंदीत केलेले आहेत.

पहा : कवक क्रमविकास वनस्पति, अबीजी विभाग वनस्पति, बीजी विभाग शैवले शैवाक सहजीवन सूक्ष्मजंतुविज्ञान.

 संदर्भ : 1. Hill, A. F. Economic Botany, Tokyo, 1952.

             2. Hutchinson, J. Melville, R. The Story of Plants and Their Uses to Man, London, 1948.

             3. Schery, R. W. Plants for Man, New York, 1952. 

             4. Uphof, J. C. T. Dictionary of Economic Plants, New York, 1968.

परांडेकर, शं. आ.