बरुआ, गुणाभिराम : (१८३७-१८९४). आधुनिक असमियातील आद्य नाटककार, चरित्रकार, इतिहासकार व समाजसुधारक. जन्म जोरहाट येथे. वडिलांचे नाव रणराम बरूआ. ⇨आनंदराम ढेकिआल फूकन (१८२९-५९) यांच्याशी रणरामांचे जवळचे नाते होते. रणरामांचे निधन होताच त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आनंदरामांनी उचलली. अल्पवयीन गुणाभिरामांना आनंदरामांनी शिक्षणासाठी कलकत्यास पाठवले. १८५४ मध्ये गुणाभिराम प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मिळवून उत्तीर्ण झाले. कलकत्तयास प्रेसिडेन्सी कॉलेजात प्रथम कलाशाखेचा आणि नंतर कायद्याचा अभ्यास करू लागले. तेथे ते दोन वर्षे होते. १८५७ मध्ये त्यांचा वज्रसुंदरी नावाच्या मुलीशी विवाह झाला. आनंदरामांच्या १८५९ मध्ये झालेल्या आकस्मिक निधनामुळे त्यांना हे शिक्षण मधेच सोडून आसामात परतावे लागले आणि स्वतःच्या व आनंदरामांच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी नोकरी पतकरावी लागली. १८५९ मध्ये गुणाभिरामांची उपसहायक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि १८६० मध्ये त्यांना अतिरिक्त उप आयुक्त म्हणून पदोन्नती मिळाली. स्वतःच्या व आनंदरामांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडली. १८८७ मध्ये सरकारने त्यांना ‘राय बहादूर’ हा किताब दिला. १८९० मध्ये ते ह्या नोकरीतून निवृत्त झाले. कलकत्त्यातील वास्तव्यामुळे त्यांचा दृष्टिकोन सुधारणावादी बनला. ईश्वरचंद्र विद्यासागरांच्या व राजा राममोहन रॉय यांच्या विचारांचा त्यांच्या तरूण मनावर खोलवर प्रभाव पडला. ब्राह्मो समाजाचे ते अनुयायी होते. विधवा-विवाह, स्त्रीशिक्षण व स्त्रीपुरुषसमानता यांचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. कलकत्ता येथून प्रसिद्ध होणाऱ्या आसाम बंधु ह्या मासिकाचेही ते काही काळ संपादक होते. कलकत्ता विद्यापीठाच्या स्थापनेसाठी त्यांनी प्रयत्न केले. या विद्यापीठाच्या विधिसभेचे ते काही काळ सदस्यही होते.

 

राम-नवमी हे त्यांचे नाटक आधुनिक असमियातील आद्य शोकात्म नाटक मानले जाते. ह्या शोकात्मिकेत त्यांनी विधवाविवाहाची समस्या मोठ्या सहानुभूतीने व कलात्मक ताकदीने हाताळली आहे. नवमी नावाच्या बालविधवा मुलीची व रामचंद्र ह्या सुशिक्षित तरुणाची प्रेमकथा त्यांनी ह्या नाटकात रंगविली आहे. सामाजिक अनिष्ट रूढींमुळे ह्या दोघांचा विवाह होऊ शकत नाही व त्यांचा अंत होतो, असे करुण, शोकान्त चित्रण त्यांनी त्यात केले आहे. विवाह-रहस्य हे त्यांचे दुसरे नाटक अपूर्ण आहे. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी स्वतः १८६७ मध्ये विष्णुप्रिया नावाच्या एका बालविधवेशी विवाह करून समाजापुढे आदर्श घालून दिला.

 

 

आनंदराम ढेकियाल फूकनर जीवनचरित्र (१८८०) हा त्यांचा असमियातील आद्य चरित्रग्रंथ आजही आदर्श मानला जातो. असमबुरंजी (१८८४) हा त्यांचा दर्जेदार इतिहासग्रंथ असून तो वस्तुनिष्ठ विश्लेषणात्मक इतिहासलेखनाचा उत्तम नमुना समजला जातो. त्यांच्या विविध इतिहासपर लेखांतूनही त्यांचे हे वैशिष्टय दिसून येचे.

 

 

आसाम बंधु, बिजुली, जोनाकि इ.नियतकालिकांतून त्यांनी साहित्य, इतिहास, विज्ञान इ. विषयांवर अनेक लेख लिहिले. बिजुलीत गुणाभिरामांचे कठीण शब्दर रहस्य ब्याख्या ह्या शीर्षकाने जे विविध लेख निनावी प्रसिद्ध झाले, ते त्यांचे चिरंजीव ज्ञानदाभिराम यांनी संकलित करून १९११ मध्ये प्रसिद्ध केले. जोनाकीतून त्यांनी ‘गुरूदत्त’ ह्या टोपणनावाने काव्यलेखनही केले. प्राचीन वैष्णव कवी माधवदेव (सु.१४८९-१५९६) यांच्या नामघोषा ह्या काव्यग्रंथाचे त्यांनी चिकित्सक संशोधन-संपादन केले (१८५६).

 

आधुनिक असमिया गद्यसाहित्य समृद्ध करून त्याचा विकास करण्यात ⇨ हेमचंद्र बरूआ (१८३५-९६) आणि गुणाभिराम यांचा वाटा मोठा आहे. त्यांच्या उत्स्फूर्त व प्रभावी गद्याने बंगाली ऐवजी असमियाचा शालेय शिक्षणात पुन्हा अंतर्भाव झाला. त्यांच्या संपादकत्वाखालील आसाम बंधूतील लेखांद्वारे त्यांनी आसामी जनतेचे हक्क व हितसंबंध जोपासले. आसाममध्ये उच्च शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणूनही प्रयत्न केले. ते वृत्तीने राष्ट्रवादी होते. ‘सौमर भ्रमण’ ह्या त्यांच्या नितान्तसुंदर लेखात त्यांचे उत्कट आसामप्रेम व्यक्त होते. केवळ आंतरजातीयच नव्हे, तर आंतरप्रांतीय विवाहाचेही ते पुरस्कर्ते होते. त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्तींनी बंगालमधील प्रसिद्ध टागोर कुटुंबात विवाह केले.

 

त्यांची गद्यशैली प्रभावी असून तिने आधुनिक असमिया गद्यलेखनाचा मानदंड निर्माण केला. गुणाभिराम व त्यांचे समकालीन हेमचंद्र बरुआ, चंद्रकुमार आगरवालाप्रभृतींनी आसामच्या राष्ट्रीय पुनरुत्थानाचा पाया घातला व नव्या समाजरचनेस चालना दिली.

 

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं), कर्णे, निशा (म.)