स्नेल, जॉर्ज डेव्हिस : (१९ डिसेंबर १९०३-६ जून १९९६). अमेरिकन आनुवंशिकीविज्ञ. जीन ड्युसेट व बरूजी बेनासर्फ यांच्यासमवेत त्यांना ऊतक अनुरूपतेवरील संशोधनाबद्दल १९९० चे शारीरक्रिया विज्ञान विषयाचे नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. दात्याचे आनुवंशिक घटक (गुणसुत्राची रचना) व रुग्णाचे आनुवंशिक घट हे एकमेकास अनुरूप असतील तर अशा स्थितीत रुग्णाचे शरीर रोपण केलेल्या ऊतक कोशिकांचा स्विकार करते यास ऊतक अनुरूपतता म्हणतात.

त्यांचा जन्म ब्रॅडफोर्ड मॅसेच्युसेट येथे झाला. त्यांनी १९२६ मध्ये डार्टमाऊथ महाविद्यालयातून पदवी संपादन केली. हावर्ड विद्यापीठातून त्यांनी १९३० मध्ये डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी संपादन केली. १९३१-३३ या काळात त्यांनी आनुवंशिकीविज्ञ हर्मन जे म्युलर यांच्यासमवेत टेक्सास विद्यापीठात संशोधनाचे काम केले. १९३५ मध्ये त्यांनी बार हर्बर येथील जॅक्सन प्रयोगशाळेत संशोधक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ते याच ठिकाणी १९५७ मध्ये वरीष्ठ संशोधक झाले. ते १९६९ मध्ये निवृत्त झाले. त्यांनी टेक्सास विद्यापीठात असताना क्ष किरणामुळे सस्तन प्राण्यात उत्परिवर्तन होते हे त्यांच्या उंदरावरील प्रयोगातून सिध्द केले होते. उंदरावर केलेल्या त्वचा रोपणाचा स्विकार केला जात नाही हे त्यांना माहित होते. संकर होऊ शकणाऱ्या जातीत अशा प्रकारे त्वचारोपण केले तर त्याचा स्विकार होण्याची शक्यता वाढते हे स्नेल यांचे सहकारी पेटर गोरर यांनी दाखविले. हे उंदराच्या त्वचेवर असणाऱ्या ऊतक अनुरूप प्रतिजनामुळे शक्य होते. त्यास एच-२ प्रतिजन असे म्हणतात. स्नेल यांनी या एच-२ प्रतिजनचा सखोल अभ्यास केला.

त्यांनी उंदरामध्ये परस्परात संकर होऊ शकणाऱ्या जाती निर्माण केल्या. यासाठी त्यांनी पार्श्वसंकर पध्दत वापरली. या संकरातून तयार झालेल्या जाती आनुवंशिक दृष्टीने सारख्या होत्या. फरक फक्त एच-२ लोकसमध्ये होता. प्रयोगानंतर एच-२ प्रतिजनचे नियंत्रण करण्यात ते यशस्वी झाले. एच-२ प्रतिजनचे नियंत्रण एच-२ कॉम्लेक्समधील गुणसुत्र १७ च्या साह्याने करता येते. हे त्यांनी दाखवून दिले. यास मेजर हिस्टोकॉम्पॅटीब्लिटी कॉम्प्लेक्स (चकउ) म्हणतात. त्यांच्या संशोधनामुळे त्वचा रोपण यशस्वी होण्याचे प्रमाण वाढले. त्यांचा बार हर्बर (मैने) येथे मृत्यू झाला.

पाटील, चंद्रकांत प.