रोहिणी-विस्फार : (ॲन्युरिझम). काही कारणाने एखाद्या ठिकाणी रोहिणीची भित्ती दुर्बल झाल्यास त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या फुगवट्यास रोहिणी-विस्फार असे म्हणतात. जन्मजात दोष सोडल्यास हा विकार बहुधा चाळीस ते सत्तर वर्षे या वयोगटात व मुख्यतः पुरुषांत आढळतो. कारणांप्रमाणे रोहिणी तंत्रातील (जाळ्यातील) वेगवेगळ्या ठिकाणी तो होतो.

प्रकार : रोहिणी-विस्फाराचे तीन मुख्य प्रकार करता येतात व प्रत्येक प्रकार होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. हे प्रकार असे : (१) मिथ्या रोहिणी-विस्फार, (२) खरा व अंतःच्छेदक रोहिणी-विस्फार आणि (३) रोहिणी-नीला-विस्फार.

(१) मिथ्या रोहिणी-विस्फार : प्रत्यक्ष रोहिणी-भित्ती विस्तारून हा विस्फार होत नसून विस्फाराभोवतीची भित्ती काही भागात क्लथित (साखळलेल्या) रक्ताची व दाबल्या गेलेल्या भोवतालच्या ऊतकाची (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या-पेशींच्या-समूहाची) बनलेली असते, म्हणून त्यास मिथ्या म्हणतात. बहुधा आघातजन्य विस्फार या प्रकारचे असतात किंवा खरा विस्फार फुटून या प्रकाराचा विस्फार होऊ शकतो.

(२) खरा विस्फार : प्रत्यक्ष रोहिणी-भित्ती फुगून झालेल्या विस्फारास खरा रोहिणी-विस्फार म्हणतात.

रोहिणी-भित्तीच्या मध्यस्तरात अपकर्ष व ऊतकमृत्यू झालेला असताना व त्याच बरोबर रक्तदाब वाढलेला असताना अंतःस्तराचा भेद झाल्यास मध्यस्तर दुभागतो आणि या पोकळीत रक्त शिरून झालेल्या रोहिणी-विस्फाराला अंतःच्छेदक विस्फार असे म्हणतात परंतु विस्फाराच्या भित्ती मूळ रोहिणी-भित्तीचाच भाग असल्याने तो खऱ्या विस्फाराचाच प्रकार होय. हा प्रकार त्या मानाने कमी आढळणारा असून महारोहिणीतच सहसा दिसतो. कालांतराने मध्यस्तर दुभागत तो वाढत जातो. महारोहिणी विभागून तिच्या दोन प्रमुख शाखा होतात. या अवस्थेपर्यंत पोहचल्यावर किंवा त्या आधीही बाह्यस्तर कमकुवत झाल्यास तो फुटून तात्काळ मृत्यू येतो.

(३) रोहिणी-नीला-विस्फार : काही कारणाने एकमेकीशेजारील रोहिणीत व नीलेत संधी होऊन रोहिणीतील रक्त नीलेत शिरते. या वेळी रोहिणीतील रक्ताचा उच्च दाब सहन करण्याची नीला-भित्तीची कुवत नसल्याने तिचा विस्फार होतो व त्यास रोहिणी-नीला-विस्फार म्हणतात. अशा विस्फाराची कारणे बहुधा आघातजन्य असली, तरी रोहिणी व नीला यांना जोडणारी पिशवीसारखी रचना असणे किवा जन्मजात दोष हीही कारणे असू शकतात.

कारणे : रोहिणी-भित्ती दुर्बल होऊन रोहिणी-विस्फार होण्याची कारणे पुढीलप्रमाणे असतात : (१) जन्मजात दोष, (२) आघातजन्य, (३) शोथजन्य (दाहयुक्त सुजेमुळे होणारा) व (४) अपकर्षजन्य.

(१) जन्मजात विस्फार : गर्भाची वाढ होत असताना रोहिण्यांच्या मध्यस्तरांत दुर्बलता राहून गेल्याने अनेक ठिकाणी (विशेषतः रोहिणीस फाटे फुटतात त्या ठिकाणी) लहान लहान १ ते १.५ सेंमी व्यासाचे विस्फार असणारी जन्मजात विकृती निर्माण होते. या विस्फारांना ‘बदरी-विस्फार’ (बेरी या फळाशी साम्य असलेले विस्फार) असे म्हणतात. हे प्रामुख्याने मेंदूतील रोहिण्यांत व बहुधा मेंदूच्या तळाशी असलेल्या विलिस रोहिणी वलयात [⟶ तंत्रिका तंत्र] दिसतात. अनेक वर्षे ते लक्षणांशिवाय राहू शकतात परंतु कोणत्याही वेळी, विशेषतः रक्तदाब वाढल्यास आणि प्रौढ वयात ते फुटतात. मेंदूच्या पृष्ठभागावरील रोहिण्यांत ते असल्यास, ते फुटल्यावर मस्तिष्कावरणाबाहेर (मेंदूभोवतील आवरणाच्या बाहेर) रक्तस्त्राव होतो. हा रक्तस्त्राव त्या मानाने कमी धोकादायक व कमी विनाशकारी असतो त्यामुळे मुख्यतः मेंदूवर दाब पडल्याची लक्षणे उद्‌भवतात व असा रोगी शस्त्रक्रिया करण्यास जास्त योग्य असतो हे ‘बदरी-विस्फार’ मस्तिष्काच्या तळाशी असलेल्या रोहिणीचक्रात असल्यास ते फुटल्यावर मस्तिष्कावरणात रक्तस्त्राव होतो व तो जास्त गंभीर असतो. मस्तिष्कवाहिनीजन्य अपघाताच्या किंवा आघात लक्षणसमूहाच्या रोग्यांपैकी १०% रोग्यांत अपघाताचे हे कारण आढळते. रक्तस्त्रावाचे प्रमाण व ठिकाणाप्रमाणे डोके दुखणे, दाबजन्य लक्षणे, मान व पाठीचा कणा ताठ होणे. बेशुद्धी व तात्काळ मृत्यू इ. अनेक प्रकारे हा विकार प्रकट होऊ शकतो. मेंदूतील दाब वाढल्यामुळे उद्‌भवणारी लक्षणे, वाहिनीदर्शन (क्ष-किरणांना अपारदर्शक असणारा पदार्थ अंतःक्षेपित करून वाहिनीचे करण्यात येणारे क्ष-किरण दर्शन) व रक्तमिश्रित मस्तिष्कमेरुद्रव (मेंदू व मेरुरज्जू यांच्या सभोवती असणारा व त्यांना यांत्रिक आधार देणारा द्रव) यांवरून निदानाची निश्चिती होते. या विकारावर उपचार शस्त्रक्रियेने करावयाचे की वैद्यकीय स्थितिरक्षक स्वरूपाचे करावयाचे, हे त्या त्या परिस्थितीनुसार ठरवावे लागते. तथापि या बाबतीतही मतभेद आहेत. शिवाय यातून वाचलेल्या रोग्याला पुढे कोणत्याही वेळी याच प्रकारचा अपघात पुन्हा होऊ शकतो.


(२) आघातजन्य विस्फार : तीक्ष्ण शस्त्र किंवा बंदुकीची गोळी यांसारख्या आघातांमुळे खोलवर जखम होऊन एखाद्या मोठ्या रोहिणीचा भेद झाल्यास अंतर्गत रक्तस्त्राव होतो. त्यामुळे निर्माण होणारा रक्तसाठा मूळ रोहिणीशी जोडलेला असल्याने मिथ्या रोहिणी-विस्फार निर्माण होतो. तसेच रोहिणी आणि नीलेचा भेद झाल्यास रोहिणी-नीला-विस्फारही होऊ शकतो.

(३) शोथजन्य विस्फार : उपदंश, जंतुजन्य हृदंतस्तरशोथ (हृदयाचा व त्याच्या झडपांच्या अस्तराला येणारी दाहयुक्त सूज) किंवा पर्विल बहुरोहिणीशोथ [⟶ कोलॅजेन रोग] यांमुळे रोहिणी-भित्ती दुर्बल होऊन हा प्रकार होतो. उपदंशाच्या तिसऱ्या अवस्थेत महारोहिणी कोटरे आणि महारोहिणी यांमध्ये शोथप्रक्रिया सुरू झाल्याने मुखतः तीन प्रकारचे विकार संभवतात. महारोहिणीची वक्षीय किंवा उदरगुहीय भागातील भित्ती दुर्बल होऊन तिची स्थितिस्थापकता (लवचिकपणा) कमी होऊन रोहिणी-विस्फार होणे, हा त्यांतील एक प्रकार होय. हा विस्फार खूप मोठा होऊ शकतो. त्यामुळे आजूबाजूच्या अवयवांवर दाब पडून त्यांची कार्यक्षमता कमी होणे व महारोहिणीच्या त्या भागातून फुटणाऱ्या शाखांतून पुढील अवयवांना होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा येणे या प्रकारचे परिणाम होतात. कालांतराने हा विस्फार फुटून मोठा रक्तस्त्राव व तात्काळ मृत्यू असे परिणाम होतात. पूर्वी उपदंश हे या रोहिणी-विस्फाराचे प्रमुख कारण होते परंतु लवकर निदान व रोग तिसऱ्या अवस्थेत जाण्याआधीच पूर्ण गुणकारी उपचार यांमुळे आता हा प्रकार कमी दिसतो.

जंतुजन्य हृदंतस्तरशोथात लहान पण जंतुयुक्त क्लथ (गुठळी) रोहिणीत अडकल्यास त्या ठिकाणी रोहिणीशोथ होतो व रोहिणी-भित्ती कमकुवत होते.

(४) अपकर्षजन्य विस्फार : रोहिणी विलेपी विकारात [⟶ रक्ताभिसरण तंत्र] रोहिणी-भित्तीत काही ठिकाणी वसापकर्ष (स्निग्ध पदार्थाचा अपकर्ष) होऊन कालांतराने तेथे ऊतकमृत्यू होतो. या ठिकाणी कॅल्शियम लवणांचा संचय व कालांतराने व्रणनिर्मिती याप्रमाणे प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेत रोहिणी-भित्तीच्या तिन्ही स्तरांचा कालांतराने समावेश होऊन रोहिणी-भित्ती कमकुवत बनते व त्या ठिकाणी विस्फार होतो. साधारणतः वयाच्या चाळीशीनंतर रोहिणी विलेपी विकार आढळत असल्याने हे विस्फार ४० वर्षानंतरच्या वयोगटात आढळतात आणि या विकाराचाच परिणाम म्हणून रक्तदाबही वाढलेला असल्याने ते खूप मोठे होऊ शकतात. हा विकार सर्व मोठ्या रोहिण्यांना कमी-अधिक प्रमाणात होत असल्याने मोठ्या रोहिण्यांत कुठेही हे विस्फार होऊ शकतात परंतु महारोहिणीच्या वक्षीय व उदरगुहीय भागांत ते प्रामुख्याने आढळतात. आकारांप्रमाणे या विस्फारांना तर्कुरुपी, कोशाकार (पिशवीसारख्या आकाराचा) इ. नावे दिलेली आहेत. काही वेळा अंतःस्तराचा भेद होऊन कमकुवत मध्यस्तरात रक्त शिरून झालेल्या विस्फाराला अंतःच्छेदक विस्फार म्हणतात. त्याचे वर्णन वर आलेले आहे.

लक्षणे व चिन्हे : रोहिणी-विस्फाराची लक्षणे विस्फाराचे स्थान व त्याचे आकारमान यांवर अवलंबून असतात. ही लक्षणे त्या त्या प्रकारात वर्णन केलेली आहेत. शरीरांतर्गत अनैसर्गिक वाढीमुळे आजूबाजूच्या ऊतकांवर दाब पडल्याने उद्‌भवणारी लक्षणे व रोहिणी-विस्फार फुटून अंतर्गत रक्तस्त्रावामुळे उद्‌भवणारी लक्षणे असे या लक्षणांचे सर्वसाधारण दोन गट करता येतात. पहिल्या गटात, त्या ठिकाणी वेदना होणे (उदा., डोकेदुखी, पोटदुखी, छाती दुखणे इ.) बाजूचे ऊतक दाबले जाऊन त्या ऊतकाचे कार्य मंदावणे किंवा पोकळ अवयवांच्या अवकाशिका (छिद्र आकारमान) कमी अधिक बंद  होणे (उदा., श्वासनलिका दाबली जाऊन गुदमरल्याप्रमाणे वाटणे व धाप लागणे, खोकला इ.) विस्फार अस्थीच्या जवळ असल्यास त्या ठिकाणी वेदना होणे व कित्येक वेळा अस्थी पोखरून निघणे आणि अवयवाचा रक्तपुरवठा बंद झाल्याने ऊतकमृत्यू व कोथ (मृत्यू होऊन सडण्याची क्रिया) होणे या लक्षणांचा समावेश होतो. दुसऱ्या गटात अंतर्गत रक्तस्त्राव, अवसाद (रक्तप्रवाहात एकदम बिघाड झाल्यामुळे होणारा शक्तिपात), रक्तस्त्रावामुळे तात्काळ उत्पन्न होणारी दाबजन्य लक्षणे, मस्तिष्क-वाहिनीजन्य आघात लक्षणसमूह, हृद्‌निष्फलता, वृक्क (मूत्रपिंड) निष्फलता व तात्काळ मृत्यू या गोष्टी संभवतात.

हृदयक्रियेबरोबर आकुंचन-प्रसरण होणारी गाठ व त्या गाठीच्या ठिकाणी गुंजन ध्वनी ही चिन्हे तपासणी करताना विस्फाराच्या ठिकाणी आढळतात. क्ष-किरण तपासणी व वाहिनीदर्शनाने निदान निश्चिती होते. मस्तिष्क रोहिणी-विस्फारातून रक्तस्त्राव झाल्यास कटि-सूचिवेध (कमरेपाशील तिसऱ्या व चौथ्या मणक्यात सुई खुपसून वेध) घेतल्यावर रक्तमिश्रित मस्तिष्क-मेरुद्रव आढळतो.


उपचार : क्वचित प्रसंगी रोहिणी-विस्फारात रक्तक्लथन होऊन त्यात तंत्वात्मक ऊतक तयार होते व तो आपोआप बरा होतो.

शस्त्रक्रियेने विस्फारित रोहिणीचा भाग काढून टाकणे, कृत्रिम कलमाचा वापर करून विस्फारित जागेला बाहेरून आधार देणे किंवा विस्फारित रोहिणीचा भाग काढून त्या जागी कृत्रिम नळी बसवणे यांसारखे उपचार करता येतात. आता कृत्रिम श्वासोच्छ्‌वासाचे तंत्र विकसित झाल्याने व हृदय-फुप्फुस संयंत्रण वापरात आल्यापासून अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करणे त्या मानाने सुलभ झाले आहे परंतु अपकर्षजन्य रोहिणी-विस्फारित विकार सर्व मोठ्या रोहिण्यांत पसरलेला असल्याने व त्यामुळे इतरत्रही विस्फार असण्याची किंवा होण्याची शक्यता असल्याने या उपायांचा म्हणावा तितका उपयोग होत नाही.

मस्तिष्क रोहिण्यांतील विस्फारासाठी विस्फाराच्या मुळाशी रोहिणी बांधून टाकणे किंवा समायिक अथवा अंतःस्थ ग्रीवा रोहिण्या (मानेतील रोहिण्या) बांधून टाकणे यांसारखे उपाय करता येतात किंवा वैद्यकीय स्थितिरक्षक व आधारदायी उपचार केले जातात. या दोन प्रकारांपैकी कोणत्या प्रकारे उपचार करावेत, हे रोग्याच्या सर्वसाधारण शारीरिक परिस्थितीनुसार ठरवावे लागते व त्याबद्दलची तज्ञांत मतभेद आहेत. तसेच मस्तिष्क रोहिण्यांतील जन्मजात विस्फार अनेक ठिकाणी पसरलेले असल्याने एखाद्या ठिकाणच्या उपचारानंतर दुसऱ्या ठिकाणचा विस्फार पुढे कधीतरी फुटण्याचा धोका पूर्णपणे टाळता येत नाही. हे विस्फार मेंदूच्या पृष्ठभागावरील रोहिण्यांत असल्यास शस्त्रक्रिया जास्त सोपी व जास्त उपयुक्त होऊ शकते.

जर शस्त्रक्रिया करण्याएवढा एवढा अवधी मिळाला व रोग्याची सर्वसाधारण परिस्थिती शस्त्रक्रिया करण्यायोग्य असेल, तर फुटलेल्या विस्फारावर त्वरित शस्त्रक्रियेशिवाय अन्य उपाय नाही.

सर्वसाधारणपणे रोहिणी-विस्फाराचे फलानुमान (रोग्याच्या भावी प्रगतीसंबंधीचे पूर्वानुमान) चांगले असू शकत नाही.

संदर्भ : 1. Evans, W. Diseases of the Heart and Arteries, Baltimore, 1964.

           2. Hurst, J. W., Ed., The Heart, Arteries  and Veins,  Tokyo, 1974.

प्रभुणे. रा. प.