मँचेस्टर२ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या न्यू हॅंपशर राज्यातील सर्वांत मोठे औद्योगिक शहर. राज्याच्या काँकर्ड या राजधानीच्या दक्षिणेस २७ किमी. वरील हे शहर मेरिमॅक नदीच्या दोन्ही तीरांवर वसले असून या महानगरात गॉफ्सटाउन, डेरी, बेडफर्ड आणि हुकसिट ही गावे येतात. लोकसंख्या ९०,९३६ महानगर १,६०,७६७ (१९८०).

मँचेस्टरची स्थापना १७२२–२३ च्या सुमारास झाली. प्रथम त्याचे ‘ओल्ड हेरिज टाउन’ असे नाव होते. नंतर १७३५ मध्ये ‘मॅसॅचूसेट्स बे कॉलनी’ कडून कॅ. विल्यम टिंग्ज व त्याचे सहकारी यांना हे शहर बहाल करण्यात आले, त्यामुळे त्याचे ‘टिंग्जटाउन’ असे नामांतर झाले. १७५१ मध्ये त्याचे ‘डेरीफील्ड’ असे नाव पडले. इंग्लंडमधील ‘मँचेस्टर’ या जगप्रसिद्ध कापडगिरणीकेंद्रावरून याला १८१० मध्ये तेच नाव देण्यात आले. १८४६ मध्ये याला शहराचा दर्जा मिळाला. बेंजामिन प्रिचर्ड याने देशातील पहिल्या कापडगिरण्यांपैकी एक येथे १८०५ मध्ये उभारली होती. १९३०–३५ पर्यंत मँचेस्टर कापड-उद्योगावर निर्भर होते. कापडउद्योगाच्या ऱ्हासानंतर (१९३५) शहरात अन्य उद्योगांचा मोठ्या प्रमाणावर विकास व विस्तार घडून आला. पादत्राणे, कापड व वस्त्रे, विद्युत्‌सामग्री, इलेक्ट्रॉनिकी, लोखंडी सामान, कागद, टायर यांसारख्या विविध उद्योगांचे निर्मितिकेंद्र व वितरणकेंद्र म्हणून मँचेस्टर प्रख्यात आहे. येथील छपाई व प्रकाशन हे उद्योग तसेच विमाव्यवसाय महत्त्वाचे मानण्यात येतात.

शहरामध्ये ‘मँचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस’, ‘नोत्रदाम महाविद्यालय’, ‘सेंट ॲपन्सेल्‌म्स महाविद्यालय’, ‘कार्पेंटर मिमॉरियल लायब्ररी’, ‘करिअर गॅलरी ऑफ आर्ट्स’, ‘मँचेस्टर हिस्टॉरिक असोसिएशन’ इ. शैक्षिणिक-सांस्कृतिक संस्था आहेत. बंकरहिलच्या लढाईतील अधिकारी जनरल जॉन स्टार्क याचे मँचेस्टर येथे वास्तव्य होते. त्याचे दफन येथे करण्यात आले असून स्मारकाही उभारण्यात आलेले आहे.

गद्रे, वि. रा.