पुनरावर्ती ज्वर : बोरीलिया वंशातील विविध सर्पिल सूक्ष्म जंतूंमुळे उद‌्भवणाऱ्या, काही दिवस संतत ज्वर येणे, तो एकाएकीच कमी होऊन काही दिवसांच्या प्राकृतावस्थेनंतर सर्वसामान्य अवस्थेनंतर पुन्हा येणे ही लक्षणे असलेल्या संसर्गजन्य रोगास पुनरावर्ती ज्वर म्हणतात. साथीच्या दृष्टीने पुनरावर्ती ज्वराचे दोन प्रकार समजण्यात येतात : (१) ऊ-वाहित [उवांच्या द्वारे प्रसार होणारा → ऊ], (२) गोचीड-वाहित [→ गोचीड].

ऊ-वाहित पुनरावर्ती ज्वर : मुख्यत्वे मानवी शरीरावरील पेडिक्यूलस ह्यूमॅनस जातीच्या उवांमुळे बोरीलिया रिकरेन्टिस नावाचे सर्पिल सूक्ष्मजंतू मानवी रक्तात प्रवेश करून हा विकार उत्पन्न करतात. ऊ चावल्यामुळे हे सूक्ष्मजंतू शरीरात प्रवेश करीत नाहीत खाजवल्यामुळे पडलेल्या ओरखड्यातून चिरडलेल्या उवांमधून बाहेर पडणारे हे सूक्ष्मजंतू त्याजागी चोळण्यामुळे फाटलेल्या त्वचेतून रक्तप्रवाहात मिसळतात. थंड व समशीतोष्ण प्रदेशांत ज्या ठिकाणी उवांचे प्रमाण अधिक असते त्या ठिकाणी बहुधा हा विकार आढळतो. कधीकधी आफ्रिका, मध्य पूर्व, भारत व दक्षिण अमेरिका या प्रदेशांतून थंडीच्या दिवसांत या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळते.

रोगाचा परिपाक काल (जंतू शरीरात शिरल्यापासून रोगलक्षणे दिसून येईपर्यंतचा काळ) २ ते १२ दिवसांचा असतो. रोगाची सुरुवात एकाएकीच डोकेदुखी, सर्वांगदुखी, मळमळणे व उलट्या, शक्तिपात व ज्वर या लक्षणांनी होते. ज्वर ४० से. पर्यंत वाढतो व नंतर टिकून राहतो. त्वक्‌रक्तिमा (त्वचेची लाली), डोळे लालभडक होणे, नासा-रक्तस्रवण (नाकातून रक्त वाहू लागणे किंवा घोळणा फुटणे), त्वचेवर रंजिकामय (रंग बदललेल्या व पृष्ठभागाच्या वर न उचलल्या गेलेल्या ठिपक्यांनी युक्त) पुरळ उमटणे इ. लक्षणे दिसू लागतात. पुष्कळ वेळा या रंजिका रक्तस्रावी असतात. यकृतवृद्धी व प्लीहावृद्धी (पानथरीची वाढ) तसेच कावीळ होते. सर्वसाधारणपणे वरील लक्षणांचा जोर एक आठवडा टिकतो आणि त्यानंतर ज्वरासहित सर्व लक्षणे एकदमच नाहीशी होतात. काही दिवस ते तीन आठवड्यांपर्यंत रोग्यास बरे वाटून ज्वररहीत काळानंतर सर्व लक्षणे पुन्हा उद‌्भवतात. यावरूनच या रोगास ‘पुनरावर्ती ज्वर’ असे नाव दिले गेले आहे. दुसऱ्या वेळी पहिल्यापेक्षा लक्षणांचा जोर कमी असतो. कधीकधी अशी दहा आवर्तनेही होतात व नंतर रोगी बरा होतो. सर्वसाधारणपणे आवर्तनांचे प्रमाण फक्त दोनच असते. एकदा रोग होऊन गेलेल्या रोग्यामध्ये प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक्षमता) उत्पन्न होते परंतु ती एक वर्षभरच टिकते. यामुळे हा रोग नेहमी आढळणाऱ्या प्रदेशात रोगाच्या साथीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता दर दोन किंवा तीन वर्षांनी संभवते.

निदानाकरिता ज्वरावस्थेतील रक्ततपासणीच उपयुक्त असते कारण फक्त याच अवस्थेत सूक्ष्मजंतू सूक्ष्मदर्शकाखाली दिसतात. हे सूक्ष्मजंतू  

 सुक्ष्मदर्शकातून दिसणारे पुनरावर्ती ज्वराचे सूक्ष्मजंतू : १) तांबड्या कोशिका (पेशी) २) बोरीलिया सर्पिल सूक्ष्मजंतू

सर्वसाधारणपणे १५ मायक्रॉन (१ मायक्रॉन =१०-६ मी.) लांब व ०·३ ते ०·५ मायक्रॉन जाड असून प्रत्येकास ६ ते ८ नागमोड असतात.

उपचाराकरिता रोग्यास रुग्णालयात ठेवावे लागते. उवांच्या नाशाकरिता डी डी टी (क्लोरोफिनोथेन) व सर्वांग स्वच्छ धुणे हे उपाय उपयुक्त असतात. लक्षणानुरूप इलाजाशिवाय टेट्रासायक्लीन व क्लोरँफिनिकॉल ही प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे गुणकारी ठरली आहेत. इथिओपियात पहिल्या दिवशी ५०० मिग्रॅ. टेट्रासायक्लीन नीलेतून अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) देतात. व दुसऱ्या दिवशी तेवढीच मात्रा त्याच पद्धतीने देतात. मूळ रोगावर आणि आवर्तन प्रतिबंधक म्हणून ही पद्धत उपयुक्त ठरली आहे. मात्र प्रतिजैव औषधांच्या वापरानंतर ए. यारिश व के. हर्क्सहायमर या शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखली जाणारी गंभीर प्रतिक्रिया (मूळ रोगाची सर्व लक्षणे अधिक बळावणे) उद‌्भवण्याचा धोका लक्षात घ्यावा लागतो.

गोचीड-वाहित पुनरावर्ती ज्वर : पशु-पक्षी व मानव यांचे रक्तशोषण करणाऱ्या परोपजीवी (दुसऱ्या सजीवांवर उपजीविका करणाऱ्या) गोचिडी (ऑर्निथोडोरस मौबेटा) या बोरीलिया ड्यूटोनाय नावाच्या रोगकारक सर्पिल सूक्ष्मजंतूंच्या वाहक असतात (ऑर्निथोडोरस वंशातील इतर जातीही प्रदेशनिष्ठ पुनरावर्ती ज्वराच्या अन्य सूक्ष्मजंतूंच्या वाहक आहेत येथे उल्लेखिलेली जाती दक्षिण आफ्रिकेतील आहे). गोचिड्यांच्या चाव्यातून हे सूक्ष्मजंतू मानवी शरीरातील रक्तप्रवाहात शिरतात. गोचिडीच्या मादीच्या अंड्यातूनही हे सूक्ष्मजंतू भ्रूणात पसरू शकतात. आफ्रिका, उत्तर भारत, अमेरिकेचा काही भाग या प्रदेशांत हा रोग प्रदेशनिष्ठ स्वरूपात आढळतो. ज्या भागात रोगजंतुसंचय कृंतक प्राण्यांत (भक्ष्य कुरतडून खाणाऱ्या प्राण्यांत उदा., उंदीर, घूस, खार, इ.) अधिक असतो त्या भागात गोचिड्यांच्या चाव्यामुळे रोगफैलाव अधिक होतो. गोचीड मानवी रक्त क्वचित शोषते. माणूस जमिनीवर झोपला असताना व झुडपातून वस्तीस राहिल्यास गोचीड चावण्याचा संभव अधिक असतो. गोचीड चावते त्या ठिकाणी तिची लाळ, मल व इतर द्रव्ये त्वचेतून शिरतात व ती सर्व सूक्ष्मजंतू-संसर्गित असतात. कधीकधी त्वचेवरील ओरखडा किंवा खरचटा यांसारख्या त्वचाभंग झालेल्या ठिकाणी वरील पदार्थ शिरून रोग उद‌्भतवतो.

तीन ते सहा दिवसांच्या परिपाक कालानंतर ऊ-वाहित प्रकारासारखीच रोगलक्षणे उद‌्भवतात. रक्तातील एकूण सूक्ष्मजंतूंचे प्रमाण पहिल्या प्रकारापेक्षा बरेच कमी असते आणि ते फक्त ज्वरावस्थेतील रक्ततपासणीतच दिसतात. आवर्तन संख्या अधिक (३ ते ६)असते परंतु मृत्यूसंख्या पुष्कळच कमी (२ ते ५%)असते. औषधोपचार पहिल्या प्रकारासारखेच असतात.

संदर्भ : 1. Davidson, S. Macleod, j. Ed. Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1973. 2. Salle, A. J. Fundamental Principles of Bacteriology, Tokyo, 1961.

रानडे, म. आ. भालेराव,य. त्र्यं.