विष्णू प्रभाकर : (२१ जून १९१२) प्रख्यात हिंदी साहित्यिक. मीरनपूर (उत्तर प्रदेश) या गावी जन्म. त्यांची आई त्यांच्या घरातील पहिली सुशिक्षित स्त्री असून तिने हुंड्याचा एक भाग म्हणून बरीच पुस्तके माहेरहून आणली होती. आईच्या वाचनाच्या आवडीचा प्रभाव विष्णू प्रभाकरांवर इतका पडला की लहानपणी ते इतर खेळण्यांऐवजी पुस्तकांशीच खेळायचे.

पंजाब विद्यापीठातून बी.ए. ची पदवी संपादन केल्यानंतर ते लेखनाकडे वळले. कथा कादंबऱ्या नाटके, एकांकिका, व्यक्तिचित्रे , प्रवासवर्णने, चरित्रग्रंथ अशा विविध साहित्यप्रकारातील  त्यांची सु. सत्तर पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. संघर्ष के बाद (१९५३), खंडित पूजा (१९६०), मेरी मेरी तैतीस कहाणियाँ (१९६७), धरती अब भी धूम रही है(१९७०), फूल टूटने से पहले (१९७७) इ. त्यांचे कथासंग्रह खूप गाजले. त्याच्या कथा-कादंब‍ऱ्यांमधून मुख्यत्वेकरून व्यक्ती आणि समष्टी यांच्यामधील संबंध चित्रित केलेले आहेत. त्यांच्या कथांमध्ये सूक्ष्मतरल संवेदनशीलता प्रकर्षाने जाणवते. गांधीवादाचा प्रभावदेखील त्यांत बऱ्याच प्रमाणात आढळतो. त्यांमुळे त्यांच्या कथा आदर्शाकडे झुकलेल्या दिसतात. तथापि त्यांच्यातील संघर्षही प्रभावीपणे व्यक्त झाला आहे. ढलती रात(१९५१), निशिकांत (१९५१), तट के बंधन (१९५५), स्वप्नमथी (१९५६), दर्पण का व्यक्ती (१९६८) या त्यांच्या काही कादंबऱ्या होत. त्यांच्या बऱ्याच कादंबऱ्या⇨ प्रेमचंदाच्या परंपरेतील आहेत. नाटककार व एकांकिकाकार म्हणूनही त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. रंगमंचाच्या व लोकसाहित्याच्या दृष्टीने त्यांनी बरेच महत्वपूर्ण कार्य केले आहे. कुहासा  और किरण हे त्यांचे नाटक स्वातंत्र्योत्तरकालीन भ्रष्टाचाराचे  विदारक दर्शन घडविते. टूटते परिवेश मध्ये त्यांनी दोन पिढ्यांमधील संघर्ष चित्रित केला आहे. नव प्रभात, डॉक्टर (१९५८), युगे युगे क्रांती, सत्ता के आरपार, गंधार की भिक्षुणी ह्या त्यांच्या नाटकांनी त्यांना विशेष प्रसिद्धि मिळवून दिली. सत्ता के आरपार या नाटकाला १९९० साली मूर्तिदेवी आणि शलाका ही पारितोशिके मिळाली.

एकांकिकालेखनाच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांचे सु. बारा एकांकिकासंग्रह  प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील मैं भी मानव हूँ हा एकांकिकासंग्रह ऐतिहासिक कथांवर आधारित आहे, तर सम रेखा-विपम रेखा आणि सॉंकले  हे दोन संग्रह समाज , धर्म, राष्ट्र अशा विषयांशी संबद्ध आहेत. रीढ की हाड्‌डी, आँचल और ऑंसू आणि दृष्टी की खोज हे त्यांचे गाजलेले आन्य एकांकिका संग्रह होत. वृत्तपत्रीय (रिपोर्ताज) शैलीत त्यांनी जे लेखन केले, ते अतिशय मार्मिक आणि सरस आहे. जाने अनजाने (१९६०) हा त्यांचा रेखाचित्रांचा संग्रहही वैशिष्ट्यपूर्ण ठरला. १९६० नंतर त्यांनी प्रसिद्ध बंगाली साहित्यिक ⇨ शरत् चंद्र चतर्जी यांचे चरित्र लिहिण्यास सुरवात केली. शरदबाबूंच्या जीवनावर त्यांनी लिहिलेला आषारा मसिहा (१९७४) हा हिंदी साहित्यातील एक उत्तम चरित्रग्रंथ मानला जातो. या ग्रंथाला पाब्लो नेरूदा सन्मान (१९७५) आणि सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कार (१९७६) लाभले. हा ग्रंथ जास्तीत जास्त विश्वासार्ह व प्रमाणभूत व्हावा, म्हणून त्यांनी सतत चौदा वर्षे अथक परिश्रम केले. बंगाल, बिहार व ब्रम्हादेश (म्यान् मार) येथे भ्रमंती करून त्यांनी अनेकांच्या मुलाखती घेतल्या. शरदबाबूंच्या काळातील लोकांशी बोलताना भाषेची आडचण भासू नये, म्हणून ते बंगाली भाषादेखील शिकले. त्यामुळेच हे पुस्तक शरदबाबूंचे विचार, त्यांचे भावविश्व आणि त्यांचे व्यक्तिमहत्व अतिशय चांगल्या पद्धतिने वाचकांनपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी ठरले आहे. त्यांना राष्ट्रीय एकात्मता पारितोषिक (१९८०), हरियासाहित्य  अकादेमी पुरस्कार (१९८१), साहित्य वाचस्पती (१९८६), संस्थान सन्मान (१९८७) आणि अधर्नारीश्वर या कादंबरीसाठी साहित्य आकादेमीचा पुरस्कार (१९९३) देऊन गौरविण्यात आले.

सारडा, निर्मला