बेअर, कार्ल एर्न्स्ट फोन :(२९ फेब्रुवारी १७९२ – २८ नोव्हेंबर १८७६). जर्मन प्राणिवैज्ञानिक. अंड्यापासून प्रौढ प्राण्याचा विकास कसा होतो, हे विशद करणाऱ्या मूलभूत संकल्पना त्यांनी मांडल्या. भ्रूणाची निर्मिती व विकास (वाढ) यांच्या अभ्यासाला भ्रूणविज्ञान म्हणतात आणि ते या विज्ञानाचे आद्य प्रणेते मानले जातात. त्यांचा जन्म व शिक्षण पिएप (एस्टोनिया, रशिया) येथे झाले. १८१४ साली डॉर्पाट विद्यापीठाची एम्. डी. पदवी मिळविल्यावर १८१७ सालापर्यंत त्यांनी बर्लिन व व्हिएन्ना येथे अध्ययन केले. १८१९ साली प्राणिविज्ञानाचे सहप्राध्यापक आणि १८२२ साली प्राध्यापक म्हणून त्यांची केनिग्झबर्ग विद्यापीठात नियुक्ती झाली. तेथे त्यांनी १८३४ सालापर्यंत भ्रूणविज्ञानाचे संशोधनही केले. नंतर ते रशियाला गेले व तेथे त्यांनी भूगोल, शारीरिक मानवशास्त्र, मानवजातिविज्ञान, पुरातत्त्वविद्या, कीटकविज्ञान इ. विषयांचे संशोधन केले. १८३४ साली ते सेंट पीटर्झबर्ग ॲकॅडेमी ऑफ सायन्सचे पूर्ण सदस्य व तेथील ग्रंथालयाचे ग्रंथपाल झाले. तेव्हा त्यांनी रशियन सरकारला अनेक वैज्ञानिक बाबतींत सल्ला दिला होता. १८६२ साली ग्रंथपालपदावरून निवृत्त झाल्यावर १८६७ पर्यंत ते ॲकॅडेमी चे मानद सदस्य होते. तदनंतर ते एस्टोनियाला परतले.

केनिग्झबर्ग येथेच त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले. तेथील प्राणिसंग्रहालयाचे ते प्रमुख होते. सी. एच्. पांडर यांच्याबरोबर त्यांनी कोंबडीच्या अंड्याची वाढ कशी होते, यावर बरेच संशोधन केले. १८२७ साली त्यांनी सस्तन प्राण्याचे अंडे (अंडाणू) प्रथम पाहिले व त्याच्या रचनेचा अभ्यास करुन त्याचे वर्णनही प्रथम केले. पुटक-द्रायूत (अंडकोशातील द्रवाने भरलेल्या पिशवीतील द्रवात) तरंगणारा छोटासा पिवळा ठिपका असे त्यांनी कुत्र्याच्या अंड्याचे वर्णन केले होते. सस्तन प्राण्याच्या अंडकोशातील द्रव पदार्थाने भरलेली पिशवी म्हणजे अंड-पुटक हेच अंडे होय, असा तत्पूर्वी समज होता परंतु अंड-पुटक हे अंडे नसून त्यात खरे अंडे असते, असे बेअर यांनी दाखूवून दिले.Entwicklungsgeshichte der Tiere (प्राण्यांच्या विकासाचा इतिहास, १८२८ – ३७) या पुस्तकात त्यांनी आपला जनन-स्तराविषयीचा सिद्धांत मांडला आहे. त्यानुसार पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्याच्या अंड्याचे विभाजन होऊन चार जनन-स्तर (नंतर मधल्या दोन स्तरांचा एकच स्तर मानण्यात येऊ लागल्याने तीन जनन-स्तर राहिले) निर्माण होतात आणि प्रत्येक स्तरापासून विशिष्ट अशी शरीरातील विविध ऊतके (समान रचना व कार्य असलेले पेशींचे समूह) अथवा अवयव प्रौढात निर्माण होतात, असे त्यांनी दर्शविले.

विविध वर्गांतील पृष्ठवंशी प्राण्यांच्या अंड्यांचा व त्यांच्या भ्रूणांच्या विकासाचा अभ्यास करुन त्यांनी पुढील काही नियम तयार केले. या सर्व प्राण्यांच्या भ्रूणावस्थांमध्ये काही अंशी सारखेपणा असून भ्रूण जेवढे लहान तेवढे त्यांच्यात अधिक साम्य आढळते. विविध प्राण्यांतील एकच अवयव त्याच मूळ जनन-स्तरापासून विकसित होतो. प्रौढावस्थेत निराळे दिसणारे अवयव (उदा., पक्ष्याचे पंख व माणसाचे हात) भ्रूणावस्थेत सारखेच असतात, असेही त्यांनी दाखवून दिले. एका जातीचा भ्रूण कधीच दुसऱ्या जातीच्या प्रौढासारखा नसतो तर अगदी सारख्या जातींचे भ्रूणही विकास होताना एकमेकांपासून अधिकाधिक वेगवेगळे होत जाताना दिसतात. अशा प्रकारे प्राण्याच्या जीवनाची वाटचाल साध्याकडून जटिलतेकडे (गुंतागुंतीकडे), सर्वसाधारण प्रकाराकडून विशेष प्रकाराकडे अथवा एकविधतेकडून वैचित्र्यपूर्णतेकडे होत असल्याचे दिसून येते. जग हे वाढत्या प्रमाणात विभेदित व जटिल होत आहे. या आपल्या सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ हर्बर्ट स्पेन्सर यांनी या नियमांचा आधार घेतला होता. बेअर यांचे हे संशोधन डार्विन यांच्या क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) सिद्धांतालाही उपयुक्त ठरले होते. तथापि हल्लीचे सर्व जीव एका वा थोड्याच सामान्य अशा पूर्वजांपासून उत्क्रांत झाले असावेत, हे डार्विन यांचे मत बेअर यांना मान्य नव्हते.

बेअर यांनी पृष्ठरज्जूविषयी केलेल्या संशोधनाची रुपरेषा त्यांच्या वरील पुस्तकातच दिली आहे. सर्व पृष्ठवंशी प्राण्यांच्या भ्रूणांचा विकास होताना प्रारंभी प्राण्यांच्या लांबीच्या दिशेत कोशिकांचा (पेशींचा) एक दंड असतो आणि पुढे याच्याच भोवती पाठीचा कणा निर्माण होतो, हे त्यांनी दाखविले. या आद्य पृष्ठरज्जूमुळे ज्या आदिम प्राण्यांत पृष्ठरज्जू प्रौढावस्थेतही असतो अशा प्राण्यांशी पृष्ठवंशी प्राण्यांचा संबंध जोडणे शक्य झाले.

रशियात गेल्यावर त्यांचा भ्रूणविज्ञानाचा अभ्यास बंद झाला. मात्र तेथे त्यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला. उत्तर रशियात काढण्यात आलेल्या अनेक धाडशी वैज्ञानिक माहिमांमध्ये त्यांनी भाग घेतला (उदा., १८३७ साली आर्क्टिककडे गेलेल्या मोहिमेचे ते नेते होते) आणि या निर्मनुष्य भागातील वनस्पती, कीटक इत्यादींचे नमुने त्यांनीच प्रथम गोळा करून आणले. माशांविषयी संशोधन करुन त्यांनी एक ग्रंथ लिहिला तसेच बाल्टिक व कॅस्पियन समुद्रांतील माशांसंबंधी त्यांनी एक प्रबंधही लिहिला होता. कीटकांविषयी त्यांनी थोडे संशोधन केले होते. तसेच रशियन एंटॉमॉलॉजिकल सोसायटी स्थापण्यास त्यांनी साहाय्य केले व ते तिचे अध्यक्षही झाले (१८६०). भूगोलातही त्यांनी बरेच संशोधन केले. उदा., रशियातील नद्यांच्या किनाऱ्यांचे स्वरुप ज्या घटकांमुळे निर्माण झाले, त्यांचा त्यांनी अभ्यास केला होता. भटकंतीमुळे त्यांना मानवजातिविज्ञानाबद्दल गोडी निर्माण झाली होती व त्यांनी सेंट पीटर्झबर्ग ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसमध्ये मानवी कवट्यांचा मोठा संग्रह केला होता तसेच आदिमपणाच्या मानानुसार त्यांनी मानवाचे सहा प्रकार पाडले होते. त्यांनी प्राचीन काळच्या काशामध्ये असलेल्या कथिलाच्या उत्पत्तीविषयी अध्ययन करून लिहिले होते.

Epistola de Ovi Mammalium et hominis Genesi (१८२७)हिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ॲनिमल (भाग १ व २, १८२८ व १८३७), डेव्हलपमेंट ऑफ फिशेस (१८३७) हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ असून त्यांनी आत्मचरित्रही लिहिले होते.

सेंट पीटर्झबर्ग सोसायटी फॉर जिऑग्राफी अँड इथ्नॉग्राफी व जर्मन अँथ्रॉपॉलॉजिकल सोसायटी यांची स्थापना त्यांनी केली. १८६७ साली त्यांना कॉल्पी पदक देण्यात आले होते. ते लंडनची रॉयल सोसायटी व पॅरिस ॲकॅडेमी यांचे सदस्य होते. रशियाच्या उत्तरेकडील एक बेटास त्यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव देण्यात आले आहे. ते डॉर्पाट (हल्लीचे तार्तू, रशिया) येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि. ठाकूर, अ. ना.