प्राणिविज्ञान: ह्या विज्ञान शाखेत प्राण्यांचा सर्वांगीण अभ्यास केला जातो. ⇨जीवविज्ञानाच्या ज्या दोन मुख्य शाखा आहेत त्यांपैकी प्राणिविज्ञान ही एक असून दुसरी ⇨ वनस्पतिविज्ञान ही आहे.

 

उगमवइतिहास: वर नमूद केल्याप्रमाणे जीवविज्ञानाचीच ही एक शाखा असल्याने प्राणिविज्ञानाचा उगम व इतिहास ह्याचा ऊहापोह ओघानेच जीवविज्ञानात केलेला आढळतो. तथापि थोडक्यात व स्थूलमानाने असे म्हणता येईल की, प्राणिविज्ञानाच्या उगमाची निश्चित काळवेळ सांगणे जरी शक्य नाही, तरीही इतिहासपूर्व काळात मानवाचा प्राण्यांशी अन्नाचे साधन म्हणून व संभाव्य धोक्याचा दृष्टिकोनातून जेव्हा संबंध आला त्यातून प्राणिविज्ञानाचा उगम झाला. मानवाच्या विकासाबरोबर लोकविद्येतून व सांस्कृतिक ठेव्यातून एकूण सजीवांबद्दल विशेषतः प्राण्यांबद्दल व त्यांच्या मानवाशी असलेल्या संबंधाबद्दल (उदा., माणसाळविलेले प्राणी) माहिती मिळू लागली व जसजसा अधिकाधिक बोध होऊ लागला तसतसे प्राणिविज्ञान मूर्त स्वरूप धारण करू लागले.

 

भारतात वैदिक वाङ्‌मयात, तसेच इ. स. पू. दहाव्या ते सहाव्या शतकापर्यंतच्या काळात शेती व दूधदुभत्यासाठी पशुपालन, पशुरोगचिकित्सा, वैद्यक शिक्षण इ. प्रकारांनी प्राणिविज्ञानाचा अप्रत्यक्ष रीतीने अभ्यास होत होता व उपयोग केला जात होता [⟶ जीवविज्ञान]. असे असले, तरी वैज्ञानिक दृष्टिकोनातून जीवविज्ञान आणि वनस्पतिविज्ञानाप्रमाणे प्राणिविज्ञानाचा एक शास्त्रशाखा म्हणून पाश्चिमात्य देशांतच पाया घातला गेला. तात्पर्य, गणित, खगोलशास्त्र, वैद्यक ह्यांप्रमाणे प्राणिविज्ञान, वनस्पतिविज्ञान व पर्यायाने जीवविज्ञान ह्यांचा आधुनिक दृष्टिकोनातून शास्त्र म्हणून अभ्यास भारतात झालेला नव्हता, असे दिसते.

 

विकास: प्राणिविज्ञानाच्या विकासाच्या टप्प्यांचे थोडक्यात वर्णन पुढीलप्रमाणे करता येईल. महान ग्रीक तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ व प्राणिविज्ञानाचे जनक ⇨ ॲरिस्टॉटल (इ. स. पू. ३८४-३२२) व त्यांचे विद्यार्थी ⇨ थीओफ्रॅस्टस (इ. स. पू. ३७२-२८७) ह्यांनी प्राणिविज्ञानाच्या विकासाचा पाया घातला. सजीवांचे विस्तृत वर्णन व एकूण निसर्गात (विश्वात) आढळणारा क्रम ह्यावरच त्यांचा भर होता. रोमन काळात ⇨ थोरलेप्लिनी यांनी Historia Naturalis ह्या ३७ खंडी विश्वकोशासारख्या प्रबंधातील ७ ते ९ खंड प्राणिविज्ञानासाठी दिलेले आढळतात.

 

कित्येक शतके ॲरिस्टॉटल यांनी घालून दिलेल्या परंपरेतच भूमध्यसामुद्रिक प्रदेशात प्राणिविज्ञानाची वाटचाल होत होती. तर मध्ययुगात यूरोपमध्ये त्यात लोकविद्या, लोकभ्रम (अंधश्रद्धा) व प्रतीकवाद यांचाच भरणा जास्त झाला होता. नंतर त्यांतील बऱ्याच गोष्टींचा त्याग करण्यात आला व सतराव्या ते अठराव्या शतकांतच प्राण्यांच्या अभ्यासास अधिकाधिक शास्त्रीय स्वरूप येऊ लागले. हे विशेषतः ⇨ विल्यम हार्वी, ⇨ कार्ललिनीअस व ⇨ झॉर्झक्यूव्ह्ये ह्या अनुक्रमे इंग्लिश, स्वीडिश व फ्रेंच शास्त्रज्ञांच्या कार्यावरून स्पष्ट होते. ह्याच कालखंडात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास सूक्ष्मदर्शकाच्या वापराने प्रचारात आलेली कोशिकेची (पेशीची) संकल्पना, त्यांचे सजीवांच्या संरचनेतील महत्त्वाचे स्थान व भ्रूणविज्ञानास त्यामुळे मिळालेली चालना ह्यांमुळे प्राणिविज्ञानाचा विकास होत होता. रसायनशास्त्र व शरीरक्रियाविज्ञान ह्यांच्या आधारे, तसेच कोशिकासिद्धांतही लक्षात घेऊन शरीरांतर्गत परिस्थितीत एक प्रकारचे स्थैर्य असते (ज्याला समस्थिती म्हणतात) असे फ्रेंच शास्त्रज्ञ ⇨ क्लोदबेर्नार यांनी प्रतिपादन करून प्राणिविज्ञानात महत्त्वाची भर घातली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुधारित सूक्ष्मदर्शकांच्या अभिरंजकांच्या (सूक्ष्मदर्शकाने सुलभपणे निरीक्षण करता येण्यासाठी कोशिका किंवा कोशिकासमूह रंगविण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या रंजक वा इतर द्रव्यांच्या) साहाय्याने कोशिकांची अंतर्रचना व पर्यायाने सूक्ष्मशारीराच्या (सूक्ष्मशरीररचनेच्या) अभ्यासासही वेग आला. ह्याच सुमारास ⇨ चार्ल्डार्विन यांनी ⇨ क्रमविकासासारख्या (उत्क्रांतीसारख्या) मूलभूत सिद्धांतावर आपल्या ⇨ नैसर्गिकनिवडीच्या तत्त्वावर आधारलेले नवीन व दूरगामी परिणाम करणारे विचार प्राण्यांची उदाहरणे देऊन मांडले. आनुवंशिकतेच्या [⟶ आनुवंशिकी] तत्त्वांचे क्रमविकासात महत्त्व आहे हे डार्विन यांनी जरी ओळखले होते, तरी ⇨ ग्रेगोरमेंडेल यांचे कारक सिद्धांत डार्विन यांना उपलब्ध होऊ शकले नव्हते. कारण मेंडेल याचे १८६६ मध्ये प्रसिद्ध झालेले व प्रयोगावर आधारित असलेले निष्कर्ष १९०० सालापर्यंत विज्ञानजगतात दुर्लक्षित राहिलेले होते. त्यानंतर विसाव्या शतकात आनुवंशिकीच्या अभ्यासास महत्त्व येऊ लागले, जनुकाचे [⟶ जीन] अनन्यसाधारण महत्त्व पटल्यामुळे एकूण जीवविज्ञानाच्या व अर्थात प्राणिविज्ञानाच्या अभ्यासाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल होऊ लागला. आता अभिजात किंवा दीर्घकाल प्रचलित असलेल्या शारीर इ. प्राणिविज्ञानाच्या उपशाखांच्या अभ्यासापेक्षा नवनवीन दृष्टिकोनांतून प्राण्यांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले जात आहे. उदा., प्राण्यांच्या शरीरक्रियाविज्ञानाकडे व भ्रूणविज्ञानाकडे वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहणे, ⇨ परिस्थितिविज्ञानाद्वारे प्राणिजाती गणना व तत्संबंधीचा अभ्यास करणे, जीवभौतिकी, जीवरसायनशास्त्र, रेणवीय जीवविज्ञान, बहिर्जीवविज्ञान ह्यांतील प्रयोगांसाठी प्राण्यांचा उपयोग करणे इत्यादी. हा बदल इतका होत आहे की, काहीजण तर प्राणिविज्ञानाऐवजी प्राणिजीवविज्ञान (ॲनिमल बायॉलॉजी अथवा लाइफ सायन्स) अशी संज्ञा वापरू लागले आहेत. परिणामी शास्त्रज्ञ किंवा अभ्यासू प्राणिवैज्ञानिक न राहता परिस्थितिवैज्ञानिक, शरीरक्रियावैज्ञानिक, कोशिकावैज्ञानिक इ. प्रकारचे विशेष व्यासंगी होऊ लागले आहेत. तसेच प्राणिसंग्रहालये व ⇨ प्राणिसंग्रहोद्याने आता केवळ प्राणी ठेवलेली ठिकाणे न राहता त्यांच्या कार्याची व्यापकता खूप वाढलेली आहे. अशा ठिकाणांशी संलग्न असलेल्या सुसज्ज प्रयोगशाळा, दवाखाने, संशोधन संस्था ह्यांमार्फत प्राण्यांविषयी माहिती, प्रशिक्षण, संरक्षण, नष्ट होण्याचा धोका असलेल्या प्राणिजातींचे संवर्धन, प्राण्यांचा वर्तनविषयक अभ्यास इत्यादींविषयी महत्त्वाचे संशोधन करण्यात येत असून त्यांच्यामार्फत संशोधनपर निबंधही प्रसिद्ध होत असतात. अर्थात असे बदल होत असले, तरी प्राणिविज्ञान म्हणजे प्राण्यांचा सर्वांगीण अभ्यास करणारे शास्त्र ह्या मूलभूत विचारसरणीस काही बाध येत नाही.

 

उपशाखा: प्राणिविज्ञानाच्या (१) आकारविज्ञान, (२) शारीर (३) कोशिकाविज्ञान, (४) शरीरक्रियाविज्ञान, (५) सूक्ष्मरचना, (६) वर्गीकरणविज्ञान, (७) पुराजीवविज्ञान (पुराप्राणिविज्ञान), (८) परिस्थितिविज्ञान, (९) भ्रूणविज्ञान, (१०) आनुवंशिकी, (११) प्राणिभूगोल, (१२) क्रमविकास इ. उपशाखा आहेत. ह्यांतील बऱ्याच वनस्पतिविज्ञानाच्याही उपशाखा आहेत. [⟶ जीवविज्ञान]. तसेच जीवभौतिकी, जीवरसायनशास्त्र, सूक्ष्मजीवविज्ञान, रेणवीय जीवविज्ञान, बहिर्जीवविज्ञान ह्या जीवविज्ञानविषयक शाखांचाही संबंध प्राण्यांशी येतो. ह्या सर्वांची संक्षिप्त माहिती ‘जीवविज्ञान’ ह्या लेखात दिलेली आहे. प्राणिविज्ञानाच्या इतरही काही विशिष्ट उपशाखा आहेत. उदा., प्रायोगिक प्राणिविज्ञान या उपशाखेत आनुवंशिकी, आकारविज्ञान, भ्रूणविज्ञान इत्यादींविषयक प्रयोग करून प्राण्यांत काही संरचनात्मक किंवा आकृतिबंधविषयक बदल घडवून आणून अभ्यास केला जातो.


 

अंतःस्रावविज्ञानात [वाहिनीविहीन ग्रंथींच्या स्रावांसंबंधीच्या शास्त्रात → अंतःस्रावी ग्रंथि] हॉर्मोनांची प्राण्यात काय क्रिया होते इत्यादींचा अभ्यास केला जातो. ⇨ कीटकविज्ञान ही प्राणिविज्ञानाची एक अत्यंत मोठी व महत्त्वाची उपशाखा असून तीत कीटकांचा सर्वांगीण अभ्यास केला जातो. जीवोपजीवविज्ञानात सर्व जीवोपजीवी (दुसऱ्या जीवांवर जगणाऱ्या) प्राण्यांचा अभ्यास करतात, तर मत्स्यविज्ञानात माशांचा व पक्षिविज्ञानात पक्ष्यांचा विशेष अभ्यास केला जातो. उभयचर (जमिनीवर व पाण्यातही राहणाऱ्या) आणि सरीसृप (सरपटणाऱ्या) प्राण्यांचा अभ्यास करणाऱ्या अनुक्रमे उभयचरविज्ञान व सरीसृपविज्ञान अशा वेगळ्या उपशाखा आहेत. पुराप्राणिविज्ञानात प्राणिजीवाश्मांचा (गतकालीन प्राण्यांच्या शिळारूप अवशेषांचा) अभ्यास विशेषतः जातिवृत्त (जातीच्या विकासाचा इतिहास) व क्रमविकास यांच्या दृष्टिकोनातून करतात.

 

विश्वकोशामध्ये प्राणिविज्ञानातील वर उल्लेखिलेल्या उपशाखांची, तसेच इतर निरनिराळ्या विषयांची माहिती दिलेली आहे. उदा., वर्गीकरणाच्या संदर्भात प्राण्यांचे महत्त्वाचे गण, वर्ग, संघ इत्यादींच्या स्वतंत्र नोंदी दिलेल्या आहेत. काही प्राण्यांची नमुनेदार उदाहरणे म्हणून सविस्तर माहिती दिलेली आहे. उदा., अमीबा, गोगलगाय, पट्टकृमी, पर्णकृमी, झुरळ, तारामीन इत्यादीं. यांशिवाय गाय, म्हैस, घोडा, मेंढी इ. महत्त्वाच्या प्राण्यांविषयी स्वतंत्र नोंदी आहेत. पचन तंत्र (पचन संस्था), जनन तंत्र, उत्सर्जन तंत्र इत्यादींची क्रमविकासाच्या दृष्टिकोनासहित माहिती सामान्यतः त्या त्या तंत्राच्या मानवी वैद्यकाच्या व पशुवैद्यकाच्या माहितीस जोडून दिलेली आहे. अस्थी, डोळा, नाक, कान, दात, शंख, शिंपला यांसारख्या प्राण्यांच्या अवयवांसंबंधीही स्वतंत्र नोंदींमध्ये माहिती दिलेली आहे. जीवोपजीवन, मत्स्योद्योग, कीटकविज्ञान, मधमाश्यापालन, रेशीम, लोकर, फर उत्पादन, लाख इ. अनुप्रयुक्त (व्यवहारोपयोगी) विषयांवरही स्वतंत्र नोंदींत माहिती दिलेली आहे. प्राण्यांविषयीच्या माहितीच्या आधारे क्रमविकास, परिस्थितिविज्ञान, प्राण्यांचे वर्तन, प्राण्यांचे सामाजिक जीवन, प्राण्यांचे स्थलांतर इ. विषयांवरही स्वतंत्र नोंदी आहेत. मायावरण, अनुकृती, शीतनिष्क्रियता व ग्रीष्मनिष्क्रियता, वृद्धी, संचलन, प्रणयाराधन तसेच पक्षिगान, पक्ष्यांचा थाटमाट, चर्मपूरण, प्राणिविच्छेदन, जलजीवालय, वन्य जीवांचे रक्षण, वन्य जीवांचे आश्रयस्थान अशा विशेष नोंदीही दिलेल्या आहेत. प्राणिभूगोल, प्राणी माणसाळविणे, प्राणिसंग्रहोद्याने, प्राणिवैज्ञानिक संस्था व संघटना अशा प्राणिविज्ञानविषयक नोंदी समाविष्ट केलेल्या आहेत. खाटीकखाना, चर्मोद्योग, मांस उद्योग, दुग्ध व्यवसाय, डुक्कर, कुक्कुटपालन, मोती व्यवसाय यांसारख्या विषयांवरील नोंदींतही प्राणिविज्ञानाचा संबंध दर्शविला आहे.

 

प्राणिविज्ञानात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या झॉर्झ क्यूव्ह्ये, चार्ल्‌स डार्विन, एर्न्स्ट हेकेल, जूलियन हक्सली, टॉमस मॉर्गन, ग्रेगोर मेंडेल, योहानेस म्यूलर, हेरमान म्यूलर, आल्फ्रेड वॉलिस, झां लामार्क इ. शास्त्रज्ञांच्या चरित्रपर नोंदी दिलेल्या आहेत.

 

अभ्यासपद्धतीवअनुप्रयुक्तता : प्राणिविज्ञानाच्या सुरुवातीच्या अभ्यासपद्धतीत प्राण्यांच्या विस्तृत वर्णनावर भर असे. त्यात आकारविज्ञान, प्राण्याचे टिकाऊ स्वरूपात परिरक्षण करून ठेवणे, व्यवच्छेदन, निरनिराळे सूक्ष्मदर्शक, सूक्ष्मछेदक, अभिरंजक वापरून अभ्यास करणे व नामकरण इ. पद्धतींचा वापर करून वर्गीकरणात्मक अभ्यास करणे, तसेच प्राणिविज्ञानाच्या विविध उपशाखांच्या अनुषंगाने निरनिराळे प्राणी व प्राणिगट ह्यांचा विशेष अभ्यास करणे इ. पद्धतींनी अजूनही अभ्यास केला जातो. तथापि आता प्रायोगिक विज्ञान, प्रत्यक्ष अधिवासाचा (प्राण्याच्या नैसर्गिक राहण्याच्या ठिकाणाचा) अभ्यास करणे, तसेच भौतिकी, रसायनशास्त्र, सांख्यिकी (संख्याशास्त्र) इ. शास्त्रांतील विविध अभ्यासपद्धतींचा वापर करणे अशा विविध रीतींनी प्राणिविज्ञानाविषयक अभ्यास अधिक सखोल, व्यापक व उपयुक्त करण्याकडे भर देण्यात येऊ लागला आहे. मानव हाही एक प्राणीच असल्याने प्राणिविज्ञानाची अनुप्रयुक्तता मानवजातीच्या दृष्टीने फार जवळची व मोलाची आहे. वैद्यक, पशू व मानवी वैद्यक, सार्वजनिक आरोग्य, कृषिविज्ञान, प्राणिजातींचे संरक्षण व संवर्धन ह्या सर्वांसाठी प्राणिविज्ञानाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. काही सामाजिक विज्ञानशाखांचाही प्राणिविज्ञानाशी संबंध येतो. प्राण्यांचा मोहक आकार व रंग, त्यांची विविधता ह्यांनी मन उल्हसित होते म्हणून प्राण्यास सौंदर्यशास्त्र दृष्ट्याही महत्त्व आहे. डोंगर, दऱ्या, जंगले, नदीकाठ, समुद्रकिनारा इ. ठिकाणी सहलीस जाऊन शरीर आणि मन तर उल्हसित होतेच पण प्राण्यांचे अधिवास, अनुकूलन ह्यांच्या अभ्यासाने मानवास आपले आयुष्य अधिक सुखकारक कसे होऊ शकेल ह्याची कल्पना येते. अशा अनेकविध कारणांसाठी प्राणिविज्ञानाचा अभ्यास अत्यावश्यक आहे.

 

पहा : आनुवंशिकी कीटकविज्ञान क्रमविकास जीवविज्ञान परिस्थितीविज्ञान पशुवैद्यक पुराजीवविज्ञान पुराप्राणिविज्ञान भ्रूणविज्ञान वैद्यक.

 

संदर्भ : 1. Assimov, I. A Short Story of Biology, London, 1965.

            2. Gardner, E. J. History of Biology, Minneapolis, 1965.

            3. Hickman, C. P. Integrated Principles of Zoology, Tokyo, 1966.

            4. Villee, A. Walker, W. F. Jr. Smith, F. E. General Zoology, Tokyo, 1968.

            5. Weisz, S. P. B. The Science of Zoology, New York, 1966.

 

परांजपे, स. य.