उवासगदसाओ : जैनांचा सातवा अंगग्रंथ. या ग्रंथाची दहा अध्ययने असून त्यात श्रावकधर्माचे म्हणजे गृहस्थधर्माचे सोदाहरण प्रतिपादन केले आहे. पहिल्या अध्ययनात श्रमणोपासक आनंद याने घेतलेल्या बारा व्रतांचे (पाच अणुव्रते  व सात शिक्षापदे) व स्वतःवर घालून घेतलेल्या नियम-निर्बंधांचे सविस्तर वर्णन आहे. त्याने अनेक वस्तूंच्या भोगोपभोगांवर मर्यादा घालून घेतल्या व हिंसेशी निगडित असे कोळसा तयार करणे (अंगारकर्म), वनकर्म, दंतवाणिज्य, विषवाणिज्य यांसारखे पंधरा धंदे न करण्याचा निश्चय केला अन्य पंथीय देवतांचा व त्यांच्या अनुयायांचा सन्मान करणे किंवा अन्नपानादीद्वारा त्यांचा सत्कार करणे इ. गोष्टीही त्याने सोडल्या. त्याच्या प्रेरणेनेच त्याच्या पत्‍नीने श्रावकधर्माचा स्वीकार केला. आनंदाने चौदा वर्षे श्रावकधर्माचे यथाशास्त्र पालन केले. घरी धर्मानुष्ठानात विक्षेप येतात म्हणून त्याने मित्रमंडळी व नातेवाईकांसमक्ष थोरल्या मुलावर कुटुंबाची जबाबदारी सोपवून तो प्रोषधशाळेत (उपवासशाळेत) उपासकासाठी असलेल्या बारा प्रतिमांचे आचरण करीत राहिला. त्याला अवधिज्ञान प्राप्त झाले व संलेखन  व्रतानुसार अनशन करून तो मृत्यू पावला आणि मृत्यूनंतर तो स्वर्गात देव म्हणून जन्मला असे वर्णन आहे. दोन ते पाच अध्ययनांमध्ये कामदेवादी चार श्रमणोपासकांच्या कथा असून देवादिकांकडून उपसर्ग झाल्याने जीवित, नातेवाईक, आरोग्य आणि मालमत्ता धोक्यात असताही ते आपल्या व्रतांनाच कसे चिकटून राहिले याचे वर्णन आले आहे. सहाव्या अध्ययनात कुंडकोलिकाची कथा असून त्यात देवांकडून आजीवक (आजीविक) पंथाचा गोशाल याच्या मतांची प्रशंसा होत असताही त्याने महावीराच्या धर्मावरील स्वतःची श्रद्धा कशी ढळू दिली नाही, हे दाखविले आहे. सातव्या अध्ययनात आजीवकोपासक सद्दालपुत्ताची कथा असून त्यात महावीराने युक्तिवाद करून गोशालाच्या नियतिवादाचे खंडन कसे केले, सद्दालपुत्ताने महावीराचा धर्म कसा स्वीकारला, त्याला पुन्हा आपल्या पंथात ओढण्याचे गोशालाचे सर्व प्रयत्‍न कसे निष्फळ ठरले, हे दाखविले आहे. सहाव्या-सातव्या अध्ययनांतून मिळणारी आजीवक पंथाची माहिती उल्लेखनीय आहे. आठव्या अध्ययनात महाशतक नावाच्या श्रमणोपासकाला त्याची पत्‍नी रेवती विषयोपभोगाचे आमिष दाखविते परंतु तो विचलित होत नाही, उलट त्याच्या पत्‍नीलाच कसे दुःख भोगावे लागते, हे दाखविले आहे. नवव्या-दहाव्या अध्ययनांत दोन श्रमणोपासकांच्या शांत व निर्विघ्न अशा आध्यात्मिक आणि धार्मिक जीवनाच्या कथा आहेत.

प्रस्तुत अंगग्रंथ श्रमणोपासकांच्या कथांद्वारा श्रावकधर्माचे प्रतिपादन करतो. या कथांतील उपासकांपैकी बहुतेक श्रीमान व्यापारी असून ते श्रावकधर्माचा अंगीकार करून श्रावकावस्थेतच काही सिद्धी प्राप्त करून घेतात व अंती संलेखनाद्वारा मृत्यू पावून स्वर्गात देव म्हणून जन्मतात. या कथा आर्य सुधर्माने जंबू या स्वतःच्या शिष्याला सांगितल्या आहेत. कथा एका ठराविक साच्याच्या असून निवेदनपद्धती नीरस, शुष्क व कंटाळवाणी वाटते.

संदर्भ : 1. Rudolf Hoernle, A. F. Ed. The Uvasgadasao, Calcutta, 1888.

           2. Vaidya, P. L. Ed. The Uvasgadasao, Poona, 1930.

कुलकर्णी, वा. म.