एर्राप्रेगडा : (चौदावे शतक ­­­— पूर्वार्ध). तेलुगू महाभारतकार कवित्रयांपैकी शेवटचा कवी. ‘शब्दब्रह्मवेत्ता’ व ‘प्रबंधपरमेश्वर’ ही बिरूदे त्यास लावली जातात. रेड्डी नरेशांचा त्यास आश्रय होता. नन्नयाने अपुरे सोडलेले व तिक्‍कन्नाने टाळलेले वनपर्व यानेच लिहिले. तेलुगू व संस्कृत या भाषांवर त्याचे प्रभुत्व होते. हरिवंश आणि नृसिंहपुराण  हे त्याचे महत्त्वाचे ग्रंथ होत. त्याने एक रामायणही रचिले असावे, पण ते उपलब्ध नाही.

वनपर्वातील एकूण २,९०० गद्य-पद्यांपैकी (संमिश्ररचना) १,६०० ची रचना एर्राने केली. नन्नय व तिक्कन्न या पूर्वसूरींच्या काव्यशैलींशी अनुरूप मेळ घालून त्याने आपले महाकवित्व सिद्ध केले. त्यातील ‘धर्मव्याधउपाख्यान’, ‘सावित्रीकथा’ ही त्याच्या अप्रतिम रचनाकौशल्याची उदाहरणे म्हणून सांगता येतील. त्याच्याहरिवंशाची रचना भागवताच्या दशमस्कंधावर आधारित असून त्याच्या दहा आश्वासांत मिळून २,६०० पद्ये आहेत. उषापरिणयातील मुग्ध प्रणय, चित्ररेखाकथा, बालकृष्णलीला, यशोदेचे वात्सल्य इत्यादींत कवीच्या सहजसुंदर व स्वतंत्र प्रतिभेचा प्रत्यय येतो.

एर्रा हा शिवभक्त असूनदेखील त्याने नृसिंहपुराण  लिहिले, ही गोष्ट तो आपल्या आश्रयदात्यासारखाच सहिष्णू होता, हे सिद्ध करते. ही कथा त्याने ब्रह्मांडपुराण व विष्णुपुराणातून घेतली आहे. या काव्यामुळे तेलुगू साहित्यात कलात्मकतेचे युग सुरू होऊन आगामी प्रबंधरचनेचा पाया घातला गेला.

शैलीबाबत एर्राने नवनवीन यशस्वी प्रयोग केले. तथापि नन्नयाची भाषा व तिक्कन्नाची शैली यांच्या संमिश्रणातून त्याने स्वत:ची अशी स्वतंत्र शैली निर्माण केली. त्याच्या नव्या प्रयोगांमुळे तेलुगू साहित्य समृद्ध झाले. श्रीनाथासारख्या तेलुगू महाकवीनेही एर्राच्या शैलीवैचित्र्याची प्रशंसा केली आहे.

टिळक, व्यं. द.